Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedअप्रतिम शिल्पकलेने नटलेले अकोले तालुक्यातील सिद्धेश्वर मंदिर

अप्रतिम शिल्पकलेने नटलेले अकोले तालुक्यातील सिद्धेश्वर मंदिर

हिंदु धर्मात श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. सगळे सण उत्सव या महिन्यापासून सुरू होतात. हा महिना शंभु महादेवाचा प्रिय महिना या पवित्र अशा या श्रावणात शंभु महादेवाची मनापासून भक्ती केली जाते.

प्रवरा नदीच्या काठावर वसलेले अकोले हे टुमदार गाव. अकोले तालुक्यातील सुप्रसिद्ध काजवा महोत्सव आणि येथील डोळ्याला सुखावणारी निसर्गसंपन्नता. वर्षा ऋतूमध्ये तर येथील निसर्गसौंदर्य बहरुन येते. श्रावणात तर येथील सौंदर्य पहाण्यासारखे आहे. अकोले तालुक्यात गड किल्ल्याची भटकंती करतांना तेथील प्रसिद्ध असलेले सिद्धेश्वर मंदिर पहावयास विसरू नका.

- Advertisement -

अकोले तालुक्यातील मध्ययुगीन सिद्धेश्वराचे हे मंदिर अतिशय कोरीव आणि सुंदर आहे. प्रवेशद्वारातुन प्रवेश करताच तेंथील विस्तीर्ण प्रांगण नजरेस पडते. या मंदिराची बांधकाम शैली हेमाडपंथी आहे. मंदिराचा सभामंडप तत्कालीन शिल्पवैभवाची साक्ष देतो. एक मुख्य सभामंडप आणि दोन उपमंडप अशी त्रिदलीय रचना असलेले हे मंदिर असून, अतिशय नाजूक कोरीव काम केलेले स्तंभ, कीर्तिमुखे, पुष्पपट्टिका, विविध देवदेवतांची आणि यक्षांची शिल्पे, सागरमंथनासारखे काही पुराणप्रसंग, बाह्य भागात अश्वदल, गजदल असा सारा खजिनाच नजरेसमोर मांडून ठेवला आहे.

शिल्पकलेचा अत्यंत उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिराचा शोध इ.स. 1780 साली एका शेतकर्‍याने लावला. जमीन नांगरतांना त्याचा फाळ जमीनीत अडकला त्या जागेवर खोदून पाहिजे असता मंदिराचा काही भाग दिसून आला. तेव्हा गावकर्‍यांनी मिळून या मंदिराला जमिनीतून वर आणले व या मंदिराची साफसफाई केली. ही स्वच्छता करतांना येथे काही कागदपत्रे आणि तत्कालीन नाणी आढळली आहेत. मंदिराची रचना भूमिज शैलीतील आहे. यादवकालीन स्थापत्याचा आणि कलेचेा अप्रतिम संगम येथे दिसतो. हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिरात मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह बघावयास मिळते.

गर्भगृहात प्रवेश करताच समोर 4 फूट बाय 6 फूट अशी भला मोठी शंभु महादेवाची पिंड आहे. ही पिंड बारा ज्योर्तिलिंगांप्रमाणे थोडी खोल अशी जमिनीत आहे. तर समोरच चौथर्‍यावर नंदीची मुर्ती विराजमान आहे. मंदिराच्या गाभार्‍यात एक गणेश मुर्ती आणि मंदिराच्या मागील गर्भागारात एक गणेश मुर्ती आहे. या मंदिरात श्रावणात 33 दिवस लघुरूद्राचा अभिषेक केल्या जातो. यानंतर ही पिंड दहीभाताने आच्छादित केली जाते. तर भाद्रपद षष्टीला पालखी सोहळा आयोजित केला जातो ही पालखी ग्रामप्रदक्षिणा केली जाते. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात. बाहेरगावाहूनही भक्त येथे दर्शनासाठी येतात. शिवाय नित्य दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्यादेखील मोठी आहे. नित्य नियमाने येथे सकाळ सायंकाळ आरती होते. व वर्षभर इतरही सोहळे साजरे केले जातात.

सिद्धेश्वर मंदिरात पूर्व आणि पश्चिम अशा दोन बाजूंनी प्रवेश करता येतो. पण मंदिरात जाण्यासाठी प्रवेश पश्चिमद्वारातून आहे. मंदिराच्या स्तंभांच्या तळखड्यांचे आपण बारीक निरीक्षण केल्यास ते चौरस आकाराचे असून त्यांवर नृत्यगणेशाची मूर्ती पहावयास मिळते. मंदिराच्या आतील बाजूस असलेल्या स्तंभांवर पेशवेकालीन नक्षी व सुरूच्या झाडाच्या आकाराची रचना पहावयास मिळते. या मंदिराचे बारकाईने निरीक्षण केल्यास असे जाणवते की, प्रत्येक कालखंडात गरज भासल्यास मंदिराची डागडूजी केली गेली आहे.

मंदिरात प्रवेश करतांना उंबरठा नजरेत भरतो. मध्यभागी मंडारकाचे अंकन केलेले असून त्यावर किर्तीमुखाचे रंग दिसतात. सभामंडपात प्रवेशल्यानंतर चार मुख्य स्तंभ आणि भिंतीमध्ये दडलेले सहा अर्धस्तंभ दिसतात. मंदिराच्या आधारासाठी अर्धमंडपात बघायला मिळतात. स्तंभाची रचना ही चौरस स्तंभपादावर पार्वती, लक्ष्मी, सरस्वती आदी देवतांच्या हातात आयुध असलेली शिल्पे पहावयास मिळतात. मंदिरातील मध्यस्तंभ हे अष्टकोनी असून त्यात देवीदेवतांची शिल्पे पहावयास मिळतात. स्तंभाच्या शीर्षावर भारवाहक यश कोरलेले आहेत. तर सभामंडपाच्या अर्धस्तंभांवर किर्तीमुख कोरलेले आहेत. तर शीर्षावर उलटे नाग पहावयास मिळतात.

मंदिराचे वीतान करोटक शैलीचे असून चारही तुळ्यांवर शेषशायी भगवान, समुद्रमंथन, युद्धातील प्रसंग कोरलेले आढळतात. मंदिरातील गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर पत्र, नर,रत्न, व्याल,स्तंभ अशा पाच द्वारशाखा कोरलेल्या दिसतात. गर्भगृहाचे दुसरे प्रवेशद्वार पूर्वेकडे असून तेथे नंदीमंडप आहे. या नंदीमंडपात स्तंभावर जे यक्ष आहेत यांची मुखे मूषक, नरिेंसह यांची आहेत याबरोबरच या स्तंभावर देवी-देवता, पुराणातील प्रसंग, ऋषी मुनींची यांची शिल्पे पहावयास मिळतात. तर अर्ध मंडपाच्या बाह्य भागात असलेल्या देवकोष्ठावर तांडव करणारा शिव आणि दुसर्‍या देवकोष्ठात चामुंडा अशी शिल्पे दिसतात. मंदिर परिसरात हनुमान आणि रामाचे मंदीर ही आहे. प्रवरेच्या तीरावर ऐतिहासिक व पौराणिक वारशांप्रमाणे हे मंदिरही अकोले तालुक्याच्या वैभवात भर घालणारे आहे.

– वर्षा भानप

- Advertisment -

ताज्या बातम्या