दवंडीसाठी प्रधानाची दुय्यम पण कणखर भूमिका

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक | बिरबल | वैभव कातकाडे Nashik

आटपाट नगरात स्थानिकांच्या निवडीसाठी लोकशाही (lokshahi) पद्धतीचे वेध लागले होते. त्यासाठी जो तो आपापल्या परीने दवंडी (Dawandi) पिटवून आपली निवड होण्यासाठी प्रयत्न करणार होता. यामध्ये प्रधानाची (pradhan) कायदा आणि सुव्यवस्था (Law and order) राखण्याबाबत भूमिका अत्यंत महत्वाची होती; मात्र, कुठेतरी प्रधानाला या सर्वांमध्ये वेगळेपण दाखविण्याची हूल आली होती. अर्थात त्यातही कायद्याचं बोला या उक्तीप्रमाणे कृती असलेला हा प्रधान वेगळेपण दाखविण्याबाबत देखील कायद्याला धरून होता.

त्याचे झाले असे, नगराच्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीला अजून बराच अवकाश होता. या निवडणुकीत सारे आलबेल व्हावे, नगर चांगले सुशोभित असावे हा अट्टहास असलेला हा प्रधान त्यादृष्टीने प्रयत्न करत होता. त्यात त्याने कोणाचाही मुलाहिजा न ठेवता सरळ सरळ हुकुम सोडला. नगरात रस्त्यावर दवंडी पिटवायची असेल तर आधी माझी परवानगी लागेल.

हुकुम नागरिकांपर्यंत पोहचला; नगरातील स्वप्नाळू नागरिकांनी याचे स्वागतच केले. आता आपले नगर सुंदर आकर्षक होईल. रस्त्यांवर चुकीच्या दवंडी होणार नाही अशा भाबड्या आशेत नागरिक होते. मात्र, नगरातील एका वर्गाला या गोष्टीचे अपृप वाटले. नगरातील कायदा व सुव्यवस्था व्यतिरिक्त निर्णय घेण्यासाठी एक प्रधान असताना हा वर्दीतील प्रधान का निर्णय घेतो आणि हुकुम सोडतो. या प्रश्नाबाबत मसलत करण्यासाठी या वर्गाने निर्णय घेण्याचा अधिकार असलेल्या प्रधानाला जाऊन भेटायचे ठरवले.

झाले.. बंद दाराआड मसलती झाल्या.. प्रधानजी अहो, तुमच्या अधिकारांवर हा तर सरळ सरळ हातोडा आहे. तुम्ही याबाबत काही तरी करा. आणि आता आपले स्थानिक पातळीवर निवडणूक (Election) घ्यायची दवंडी तर द्यावी लागणार ना तुम्ही लागलीच काहीतरी करा, असा सूर मसलतीमध्ये निघाला. यावर प्रधान देखील.. ये बघा.. जे झालाय ते ठीक.. त्याची (वर्दीतल्या प्रधानाची) अन आपली एक जोड बैठक घेऊ आणि प्रश्न मिटवू असा सूर आळवायला लागला. या बैठकीनंतर एक दिवस जोड बैठक घेण्याचे ठरले.

जोड बैठकीत सगळ्यांचा एकच सूर होता. हा निर्णय इकडच्या प्रधानाचा आहे. तुम्ही तो निर्णय घेऊ शकत नाही. या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत वर्दीतल्या प्रधानाने दप्तरातून एक जाडजूड ग्रंथ बाहेर काढला. त्या ग्रंथ मधील नियमाचा उल्लेख दाखवला. नगरच्या सुशोभीकरणासाठी कायदा व सुव्यवस्था अंतर्गत असलेले नियम त्या संबंधित वर्गाला दाखवले. आणि दवंडी मध्ये काही आक्षेपार्ह असेल त्यातून माझ्या नगरात दुही माजत असेल तर मग मी कारवाई करेल अशी दुय्यम पण ठाम भूमिका घेतली. सर्व चर्चा मसलती पार पडल्यानंतर ठरले की, दवंडी साठी परवानगी देण्याची जबाबदारी संयुक्तपणे घ्यावी, काही आक्षेपार्ह असेल तर त्याला मनाई करण्याचे काम वर्दीतला प्रधान करेल असे ठरले.

आता मात्र नागरिक आणखीच सुखावले, आता नगरात कोणी रिकामी दवंडी करणार नाही. दवंडीत काही आक्षेपार्ह काही नसेल. काही असल्यास परवानगीपूर्वीच ते त्यातून काढल्या जाईल. आणि जर कोणी ऐकत नसेल तर मग वर्दीची ताकद त्याला दाखवली जाईल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *