50 वर्षांनंतर पुन्हा शाळा

50 वर्षांनंतर पुन्हा शाळा

इगतपुरी । वाल्मिक गवांदे | Igatpuri

शाळांचे दिवस (School days) प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर दिवस असतात. शाळा सुटली तरी शाळेच्या (school) आणि सोबत्यांच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात कायम रुंजी घालतात. त्यामुळेच शाळा सुटली तरी सोबत्यांची साथ कायम असते.

इगतपुरी (igatpuri) येथे असलेल्या महात्मा गांधी हायस्कूलमधील (Mahatma Gandhi High School) 1972 च्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन (Alumni) मोठ्या उत्साहात पार पडले. तब्बल 50 वर्षांनंतर हे माजी विद्यार्थी एकत्र आले. शाळेच्या आठवणींमध्ये रमून गेले होते.

महात्मा गांधी हायस्कूलच्या वर्गामधे आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाला 54 माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. भोपाळ (bhopal), मुंबई (mumbai), नाशिक (nashik), पुणे (pune), लासलगाव (lasalgaon), औरंगाबाद (Aurangabad) असे दूरवर राहणारे विद्यार्थीही खास यावेळी आले होते. सरस्वती देवीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. वर्गामध्ये आलेल्या आठवणीचे हस्तलिखितसहित मिठाईचे बॉक्स शाळेचे माजी ज्येष्ठ शिक्षक रामदास जोशी यांच्या हस्ते प्रत्येकाला देण्यात आले. बहुतांश सेवानिवृत्त (Retired) झालेले हे माजी विद्यार्थी एकमेकांना भेटून प्रचंड आनंदले होते.

त्यावेळचे ते शाळेचे मंतरलेले दिवस आठवून पुन: प्रत्ययाचा आनंद प्रत्येक जण घेत होता. भेटल्यानंतर प्रत्येकाने आपली नव्याने ओळख करून दिली. जुन्या आठवणींना उजाळा देतानाच सध्या आपल्या आयुष्यात काय चालले आहे हे एकमेकांना सांगताना गप्पा रंगत गेल्या. या शाळेतील माजी विद्यार्थी कमलाकर यांनी स्नेहसंमेलनाची संकल्पना मांडली. माजी विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण सादर केले तर काहींनी आपल्या शिक्षकांच्या (teachers) व त्या काळातील शाळेच्या आठवणी सांगितल्या.

शाळेमध्ये मनावर कोरलेले संस्कारच माणसाला त्याच्या पुढील आयुष्यात नैतिक बळ देतात असे मनोगत माजी शिक्षक रामदास जोशी यांनी व्यक्त केले. स्नेहसंमेलन कयशस्वी करण्यासाठी विजय चांडक, दलपत राठोड, उमाशंकर परदेशी, मोहन रावत, दिलीप लुणावत, भगवान पाटील, अलका कुलकर्णी, ऊर्मिला देवस्थळे, हेमा देशपांडे, कांचन सारडीवाल, अनिल पिंगळे यांनी परिश्रम घेतले. हेमकांत पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. तर उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने शिक्षक बापूराव जोशी, प्रसाद चौधरी, अविनाश कुलकर्णी आभार मानले.

Related Stories

No stories found.