बचत करावी नेटकी!

बचत करावी नेटकी!

महेश देशपांडे, गुंतवणूक सल्लागार

करोनाकाळात पैशांचा जपून वापर किंवा अनावश्यक खर्चांना कात्री लावून बचतीवर भर देणे किती आवश्यक आहे, हे आता आपल्या लक्षात येऊ लागले आहे. सुखी, आनंदी तसेच ताणविरहित जीवनासाठी शक्य तितकी बचत करायला हवी. कठीण काळात ही बचतच आपल्या कामी येत असते. त्या अनुषंगाने गुंतवणुकीचे गणित आखणे गरजेचे आहे.

जास्तीत जास्त पैसा साठवायला हवा, असा सल्ला जुनीजाणती मंडळी देत असतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत अनेक मध्यमवर्गीय कुटुंबे काटकसरीने राहत. ही काटकसर करताना अनावश्यक खर्चांना कात्री लावली जात असे. गदी जरूरीचे खर्च करून उर्वरित रक्कम वाचवण्यावर भर दिला जात असे. मुदत ठेवी, पोस्टाच्या बचत योजना, भविष्य निर्वाह निधीअशा काही सुरक्षीत पर्यायांची निवड करून अडीअडचणीसाठी पैसा गुंतवला जात असे.

करोनाच्या या काळात पैशांची बचत किती महत्त्वाची आहे हे आपल्या लक्षात आले असेल. या काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, वेतन कपात झाली, उद्योगधंदे बंद पडले. हातावर पोट असणार्‍यांची तर चांगलीच पंचाईत झाली. उत्पन्न कमी झाले तरी आवश्यक खर्च काही टळले नाहीत. याच काळात साठवलेला पैसा कामी आला. भविष्याच्या सुरक्षेसाठी तसेच ताणविरहित आयुष्य जगण्यासाठी शक्य तितका पैसा गुंतवणे आवश्यक आहे.

अनावश्यक खर्च कमी करून पैसे गुंतवता येतील. उत्पन्नाचा विचार करून आवश्यक खर्चांसाठी पैसे बाजूला काढून उर्वरित रक्कम वाचवणे शक्य आहे. यासाठी उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसवायला हवा. आज गुंतवणुकीच्या पारंपरिक आणि सुरक्षित पर्यायांसोबतच शेअर्स, म्युच्युअल फंडांसारखे चांगला परतावा देणारे पर्याय उपलब्ध झाले आहेत. गुंतवणूक जितक्या लहान वयापासून सुरू करता येईल तितके चांगले असे म्हटले जाते. त्यामुळे तरुणाईने नोकरी लागल्यानंतर गुंतवणुकीला सुरुवात करायला हवी. त्याचप्रमाणे काटकसरीने खर्च करण्याची आणि खर्च तसेच बचतीत समतोल साधण्याची सवयही सुरुवातीपासून लावून घेणे हितकारक ठरते.

यासाठी आपले सर्व स्रोतांपासून मिळणारे मासिक उत्पन्न पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे. यात आपले स्वतःचे, पत्नीचे, मुले कमावती असतील आणि संयुक्त कुटुंब असेल तर त्यांचे किंवा आई-वडील घरी असतील आणि त्यांना निवृत्तीवेतन मिळत असेल आणि एकत्रितपणे कुटुंब चालवले जात असेल तर हे ते उत्पन्नही लक्षात घेतले पाहिजे. यातून खर्चासाठी आणि गुंतवणुकीसाठी किती रक्कम उरते ते पाहिले पाहिजे. याचा अर्थ असा की आई-वडिलांच्या उत्पन्नातले किती उत्पन्न ते तुम्हाला घरखर्चासाठी वापरू देतात ते पाहिले पाहिजे.

शेती किंवा दुसर्‍या छोट्या व्यवसायातून अगर आणखी एखाद्या पार्ट टाईम नोकरीतून किती उत्पन्न मिळते, तेही विचारात घ्यावे. खरे म्हणजे तज्ज्ञ नेहमीच असा सल्ला देतात की हे सगळे लेखी असले पाहिजे. तुमचे उत्पन्न आणि आवश्यक खर्च यांची यादी करा. म्हणजे महिनाभरात कुठे वायफळ खर्च झाला ते लक्षात येऊ शकते.वायफळ खर्च अनेक मार्गांनी होत असतो. आपण गरज नसताना बर्‍याच वस्तू खरेदी करतो.

सेलमध्ये कमी किमतीत वस्तू मिळतात म्हणून वारेमाप खरेदी केली जाते. यापैकी बहुसंख्य वस्तू वापरल्याही जात नाहीत किंवा एकदा वापरून बासनात गुंडाळून ठेवल्या जातात. त्यातच सध्या ऑनलाईन खरेदीचे पेव फुटले आहे. ई कॉमर्स वेबसाईट्स, विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातून खरेदी केली जाते. हातात स्मार्टफोन असला की अशी खरेदी व्हायला वेळ लागत नाही. मात्र यामुळे बराच पैसा वाया जातो. हाच पैसा वाचवता येणे शक्य आहे.

गरज आणि चैन यातला फरक अधोरेखित झाला की गरजेइतका खर्च करणे शक्य होते. एखाद्या वस्तूचे आकर्षण आहे म्हणून किंवा नातलगांनी, मित्रमंडळींनी खरेदी केली म्हणून तुम्ही वायफळ खर्च करू नका. बोनस किंवा वेतन मिळाले की अशा मोहात टाकणार्‍या गोष्टींवर खर्च करण्याची इच्छा होते. परिणामी, महिनाअखेरीला पैशांची चणचण भासते. हे होऊ नये म्हणून वेतन किंवा उत्पन्न हाती आले की मासिक आवश्यक खर्चाचे पैसे आधी बाजूला काढून ठेवावेत. यात वाणसामानाचे बिल, दूध, भाजीपाल्यावरचा खर्च, पेपरचे बिल या खर्चांसह भाड्याच्या घरात रहात असाल तर घरभाडे, दुचाकी किंवा चारचाकीच्या इंधनाचा खर्च, आवश्यक औषधांवरचा खर्च, मुलांच्या शाळेचा किंवा महाविद्यालयाचा खर्च, घराचे हप्ते, विम्याचे हप्ते असे सगळे आवश्यक खर्च बाजूला काढा. म्हणजेच तुमची खर्चाची उद्दिष्टे व्यवस्थित लिहून काढा आणि त्यांची यादी करून तेवढे पैसे बाजूला ठेवा. उरलेल्या पैशात तुम्ही कशी आणि किती बचत करू शकता याचा आढावा घ्या. मात्र ही बचत छोट्या छोट्या खर्चांनी अडचणीत येऊ शकते. यासाठी खर्च केल्यानंतर राहिलेल्या शिल्लक रकमेतून बचत करण्याऐवजी बचत केल्यानंतर राहिलेल्या रकमेतून खर्च करा. याचा अर्थ बचतीला प्राधान्य द्या आणि पैशाची बचत करा.

खर्चाची नोंद करण्यासाठी आता अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्यांच्या सहाय्याने रोजचा जमाखर्च लिहून ठेवता येईल. प्रत्येक आठवड्याअखेरीस या खर्चावर नजर टाका. प्रत्येक पैशांचा हिशेब ठेवा. म्हणजे आपण कोणता खर्च वाचवू शकतो, याचा अंदाज येऊ शकेल. कारण नेहमीच असे म्हटले जाते की तुमचे वेतन नव्हे, तर तुमच्या खर्चाच्या सवयी तुम्हाला श्रीमंत किंवा गरीब बनवतात. काही आवश्यक खरेदी कराव्याच लागतात. अशा वेळी खरेदी करताना स्मार्ट शॉपिंग करणे महत्त्वाचे असते.

वृत्तपत्रातल्या किंवा टीव्हीवरच्या जाहिरातींमधून, व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या संदेशातून अलीकडे खरेदी करावयाच्या वस्तूंवर असलेल्या ऑफर्स, डिस्काऊंट्स इत्यादींची माहिती मिळते. त्याबरोबरच अनेक चांगले दुकानदार एखादाच आयटम शिल्लक राहिला म्हणून त्या वस्तू कमी किमतीत विक्रीस काढतो. हिवाळी आणि पावसाळी सेलवरही लक्ष ठेवा. ई कॉमर्स कंपन्याही सवलती देत असतात. या सवलतींचा लाभ घेता येईल. आजकाल महागडे कपडे, दागिने भाड्याने मिळतात. महागडे कपडे नियमितपणे घातले जात नाहीत. त्यामुळे ही रक्कम वाया जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कपडे, दागिने भाड्याने घेतल्यास तुम्ही बरीच रक्कम वाचवू शकता. विमान प्रवासाची तारीख आधीच ठरली असेल तर तिकिट काढून ठेवा. तुम्हाला खूप स्वस्त तिकिट मिळू शकते. शनिवार-रविवारची तिकिटे महाग असतात. त्यामुळे शुक्रवारी प्रवास करून तुम्ही एक वेळचे दोन ते तीन हजार रुपये सहज वाचवू शकता.आज क्रेडिट कार्ड सहज मिळते.

डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढत असल्यामुळे क्रेडिट कार्ड मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. मात्र कार्ड आहे म्हणून उगाचच खर्च करत सुटू नका. कार्ड स्वाईप करणे सोपेअसले तरी त्या रकमेची परतफेड करणे कठीण जाते. हप्त्यांवर घ्यायच्या वस्तूंची संख्या अगदी मर्यादित असावी. तुम्ही घराचे हप्ते फेडत असाल तर शक्यतो फर्निचर हप्त्यावर घेऊ नका. ते जमेल तसे विकत घ्या. काही दिवसांनी वेतनवाढ झाल्यावर कार घ्या. म्हणजेच आवश्यक खर्चही टप्प्याटप्प्याने करा.महागडी वस्तू खरेदी करताना तिचीपर्यायी वस्तू काय असेल आणितिचा उपयोग आणि त्या वस्तूचाउपयोग यात काय फरक असेलयाचा गांभीर्याने विचार करा.

महागडी वस्तू म्हणजे उत्तम वस्तू असे समीकरण दर वेळी असतेच असे नाही. तेव्हा वस्तूच्या खर्‍या दर्जाचा विचार करून तिचे मूल्य ठरवण्यास शिका आणि नंतर ती खरेदी करा. अगदी अत्यावश्यक खरेदीखेरीज चौकशी न करता, माहिती न घेता मोठ्या वस्तूंची अनाहूतपणे खरेदी करू नका.गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय योग्य आहे हे वय, उत्पन्न आणि जोखीम घेण्याची तयारी यावरून ठरते. तुम्ही प्रौढ किंवा वृद्ध असाल तर शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात नाही. त्याऐवजी बँकांमधल्या सुरक्षित ठेव योजनेतरक्कम गुंतवण्यास सांगितले जाते. तसेच म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना एकरकमी गुंतवणुकीऐवजी टप्प्याटप्प्याने म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास सांगितले जाते.

तरुणपणी शेअर बाजारातल्या इक्विटीमध्ये गुंतवणुकीचा पर्याय सुचवला जातो. परंतु अखेरीस तुमच्या जोखीम घेण्याच्या वृत्तीनुसार कोणत्याही वयात कुठे गुंतवणूक करायची याचा निर्णय घेऊ शकता. यासाठीच ‘50-20-30’ या नावाने ओळखलाजाणारा नियम पाळावा, असे सांगितले जाते. त्यानुसार कर वजा जाता हाती आलेल्या रकमेतली 50 टक्के रक्कम आवश्यक गरजा आणि बिलांवरील खर्चासाठी बाजूला ठेवा. बचत आणि गुंतवणुकीसाठी 20 टक्के रक्कम खर्च करा आणि उर्वरित 30 टक्के रक्कम नवीन वस्तूंची खरेदी, पर्यटन, मौजमजा यासाठी खर्च करा असे सांगितले जाते. परंतु सध्याची वाढती महागाई, वाढता वैद्यकीय खर्च तसेच करोनासारखी आपत्ती विचारात घेता शक्य तितकी अधिक गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता 50-20-30 ऐवजी हा नियम 50-40-10 असा करावा, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com