द्रौपदीसी बंधु शोभे नारायण

द्रौपदीसी बंधु शोभे नारायण

राखी पौर्णिमा हा सण भारतात बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून मोठया उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा, दक्षिण भारतात अवनी अवीट्टम, उत्तरेत कजरी पौर्णिमा अश्या वेगवेगळ्या नावांनी हा सण साजरा केला जातो. राखी पौर्णिमेच दुसर नाव रक्षाबंधन. ह्याचा अर्थ असा की बहिण आपल्या संरक्षणाची जबाबदारी या रेशमी धाग्याच्या माध्यमातून भावाला देत असते. आणि भाऊही ही जबाबदारी समर्थपणे आपल्या खांद्यावर घेतो.

इतिहासात चितौडची राणी कर्नावतीने हुमायू बादशाहाला पाठवलेली राखीची कथा अजरामर आहे. ही राणी संकटात सापडली होती तिची सेना मोगलांच्या सैन्याला चिवटपणे झुंज देत होती. पण मोगलांच्या प्रचंड सैन्यापुढे तिच्या सैन्याची शक्ती कमकुवत होती. त्यावेळी राणीने बादशहा हुमायूला एक राखी आणि संरक्षण देण्याची मागणी करणार एक पत्र पाठवले. बादशहा मदतीला धावून येईल ना? अशी शंका होती पण बादशहाने या राखीचा आदर करून आपल्या बहिणीच्या मदतीला धावून आला. आणि स्वधर्मीयांशी युद्ध करून राणी संरक्षण केले. असे प्रचंड सामर्थ्य एका रेशमी धाग्यात आहे.

याबरोबरच द्रौपदीची कथाही सर्वश्रुत आहे. 'भरजरीचा पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण' हे गाणे तर सर्वांनी ऐकलेलेच असेल. या गाण्यातच श्रीकृष्णाचे बोट कापले गेले तेव्हा राजमहालात बोटाला बांधण्यासाठी चिंधी सापडली नाही ही गोष्ट द्रौपदीला समजताच तिने आपला भरजरी शेला फाडून ती चिंधी श्रीकृष्णाच्या बोटाला बांधली या साध्या प्रसंगाने श्रीकृष्णाचे मन भरून आले व त्याने द्रौपदीला आयुष्यभर संकटकाळात कायम तुझ्या मदतीला धावून येईल असे वचन दिले व हे वचन श्रीेकृष्णाने पाळले देखील.

राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वत:ला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. रक्षाबंधनाच्या या सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानले आहे. ही देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर तिलक लावते. हा तिलक फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार व सदबुद्धी जागृत राहण्यासाठीची पूेजा आहे.

सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार, भोग, लोभ, मत्सर, वासना, द्वेष, राग इत्यादींकडे भावाने आपल्या तिसर्‍या डोळ्याने पहावे य हेतूने बहिण भावाला तिलक लावून त्रिलोचन बनविते. इतका त्या तिलकाचा खोल अर्थ आहे. राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुरूषार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात.

द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला म्हणले श्रीकृष्णाला बांधलेली जरतारी शेल्याची चिंधी, गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी, राजपूत स्त्रीने बाजूच्या राजाला पाठवलेले राखीचे ताट काय किंवा भावाला पाठवलेली ई-शुभेच्छापत्रसहित राखी काय या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावाबहिणींचे परस्परांवरील प्रेम.

स्त्री कितीही मोठी, मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून त्याला सुचवू इच्छिते. यात तिचा दुबळेपणा नसून भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो. रक्ताचे नाते असणारे भाऊ बहिण असोत किंवा मानलेेले असो, पण या नात्यामागची भावना पवित्र व खरी आहे. यात कुठेही फसवणूक नाही. त्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते.

तूच आमचा त्राता, रक्षणकर्त्ता म्हणून देवालाही त्या दिवशी राखी वाहतात आणि उपयोगातल्या सगळ्या वस्तूंना राख्या बांधण्याची प्रथाही आढळते. आमच्या लहानपणी सकाळी उपाध्याय घरी येत ते घरातल्या प्रत्येकाला मंत्र म्हणून हातात राखी बांधायचे. तेव्हा काही कळायचे नाही. पण आता वाटतंय की ते इतर सर्व व्याधींपासून आमचे रक्षण व्हावे या हेतूने हे अभिमंत्रीत सुरक्षाकवच हातात बांधत असावेत.

- वर्षा श्रीनिवास भानप

9420747573

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com