Monday, April 29, 2024
HomeUncategorizedजगाला कोड्यात टाकून....

जगाला कोड्यात टाकून….

– विश्वास सरदेशमुख – Vishwas Sardeshmukh

‘सुडोकूचे गॉडफादर’ Godfather of Sudoku मानल्या जाणार्‍या माकी काजी यांचे नुकतेच निधन झाले. वस्तुतः आपण सुडोकू का खेळतो, या प्रश्नाचे उत्तर त्यातील कोड्यात आहे. ही कोडी आपल्याला भुरळ घालतात. आपल्याला आव्हान देतात आणि आपण त्यातून सुटण्याचा मार्ग शोधू लागतो. हळूहळू आपल्याला हा खेळ खेळणे सवयीचे होऊन जाते. अशा प्रकारे जगाला ‘कोड्यात’ टाकणारा आणि अनेकांचे बुद्धिकौशल्य वाढविणारा सुडोकूचा निर्माता आपल्यातून निघून गेला आहे.

- Advertisement -

सुडोकू पझल आपण लहानपणापासून खेळत आहोत. लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वचजण सुडोकू खेळतात. सुडोकू खेळणार्‍या तमाम शौकिनांसाठी एक दुःखद बातमी म्हणजे ‘सुडोकूचे गॉडफादर’ Godfather of Sudoku मानल्या जाणार्‍या माकी काजी यांचे 10 ऑगस्ट रोजी निधन झाले. कर्करोगामुळे त्यांचा मृत्यू झाला. परंतु त्यांनी केवळ सुडोकूच्या बळावर देशविदेशात जी दिगंत ख्याती मिळविली त्याला सीमा नाही. वस्तुतः आपण सुडोकू का खेळतो, या प्रश्नाचे उत्तर त्यातील कोड्यात आहे. ही कोडी आपल्याला भुरळ घालतात. आपल्याला आव्हान देतात आणि आपण त्यातून सुटण्याचा मार्ग शोधू लागतो. हळूहळू आपल्याला हा खेळ खेळणे सवयीचे होऊन जाते. सुडोकू कोडे सुटल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळतो, हे सुडोकू खेळणार्‍यांनाच ठाऊक आहे.

वास्तविक सुडोकूचा शोध स्विस गणितज्ञ लियोनहार्ड यूलर यांनी 18 व्या शतकात लावला होता. परंतु त्याला लोकप्रियता मिळवून दिली ती माकी काजी Maki Qazi यांनीच. शब्दकोडी खेळण्याला सरावलेल्या लोकांना अंकांशी संबंधित कोड्यांशी बांधून ठेवण्याचे कौशल्य माकी काजी यांनी दाखविले. 1980 मध्ये काजी यांनी नियतकालिकांमधून सुडोकू छापण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू त्याची लोकप्रियता वाढतच गेली. ज्यावेळी सुडोकू डिजिटली लाँच करण्यात आले, तेव्हा तर त्याची लोकप्रियता अफाट वाढली. त्याचबरोबर 2006 पासून सुडोकूच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात येऊ लागल्या. या स्पर्धांमधून काजी यांना सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित केले जात असे.

माकी काजी यांचा जन्म 1951मध्ये सेपोरो येथे झाला. बारावी पास झाल्यानंतर त्यांनी कियो विद्यापीठात प्रवेश घेतला. परंतु 1970 मध्ये अमेरिका-जपान सुरक्षा कराराला होत असलेल्या विरोधामुळे त्यांना विद्यापीठात जाणे अनेकदा शक्य होत नसे. अखेर त्यांना शिक्षण सोडून द्यावे लागले. त्यानंतर त्यांनी छापखान्यात नोकरी केली. तिथेच एका अमेरिकी नियतकालिकावर त्यांची नजर गेली. त्यातल्या त्यात ‘नंबर क्रॉसवर्ड गेम’वर त्यांची नजर खिळली. 1980 मध्ये त्यांनी पहिले ‘पझल मॅगेझिन’ Puzzle Magazine सुरू केले. ‘पझल सुशिन निकोली’ ‘Puzzle Sushin Nikoli’ या नावाचे हे नियतकालिक त्यांनी जपानमध्येच आपल्या मित्रांच्या साथीने सुरू केले होते. कोड्याचे शीर्षक मोठे गमतीशीर होते.- ‘अंकांनी एकटे राहायला हवे’ म्हणजे ‘अविवाहित’! या शीर्षकाचे संक्षिप्त नाम म्हणजेच ‘सुडोकू’ होय आणि तेच नाव आता जगभरात लोकप्रिय आहे. जपानसह जगभरात याच नावाने ते अंककोडे लोकप्रिय झाले.

केवळ एवढ्यावरच ते थांबले नाहीत. 1983 मध्ये त्यांनी निकोली नावाच्या कंपनीची स्थापना केली. आपली दिनचर्या व्यवस्थित आखून घेऊन माकी काजी यांनी दर तीन महिन्यांनी अंककोडी तयार करणे आणि ती सुयोग्य पद्धतीने मांडणे अशी योजना तयार केली. जपानमध्ये त्यांनी ‘पझल बुक’ प्रकाशित करायला सुरुवात केली. त्यानंतर जपानमधील प्रत्येक पुस्तकाच्या दुकानात ‘पझल कॉर्नर’ दिसू लागला.

अशा प्रकारे अंकांच्या कोड्यामध्ये जगाला अडकवून माकी काजी हे जग सोडून गेले. त्यांच्या अंककोड्यात अनेकजण तासन्तास अडकून बसतात; परंतु सुटकेसाठी प्रयत्न करणे थांबवत नाहीत. अखेरीस जेव्हा कोडे सोडविण्यात यश मिळते, तेव्हा संबंधितांचा आनंद गगनात मावेनासा होतो. केवळ नियतकालिकेच नव्हे तर दैनिकांमध्येही सुडोकू प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झाले आहे.

कोडे सोडविताना अनेकांची दमछाक होते; मग कोडे तयार करणे किती कठीण असेल. परंतु माकी काजी म्हणायचे, की एखादा खजिना शोधण्यासारखे हे काम आहे. आज सुडोकू हे अंककोडे जगातील शंभराहून अधिक देशांत लोकप्रिय आहे. सुडोकूच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेणार्‍या स्पर्धकांची संख्या 20 कोटींपेक्षा अधिक आहे, असा खुद्द काजी यांच्याच नियतकालिकाचा म्हणजे ‘निकोली’चा दावा आहे. कोडी सोडविण्यात मजा आहे, हे लोकांना समजावून सांगण्यासाठी माकी काजी यांनी 30 देशांचा दौरा केला. अशा कारणासाठी इतके देश फिरलेला प्रवासी विरळाच! संपूर्ण जग जरी माकी काजी यांना ‘सुडोकूचा गॉडफादर’ म्हणत असले, तरी खुद्द काजी यांचे या बाबतीत वेगळेच म्हणणे होते. ते म्हणायचे, “मला सुडोकूचा गॉडफादर व्हायचे नाही. जपानमध्ये मी कोडी सोडविण्याची शैली आणि आवड रुजवू शकलो. याच रूपाने मला ओळखले जायला हवे. माझी तशी ओळख होईपर्यंत मी कोड्यांची मजा लोकांना देत राहीन.”

दहा ऑगस्टला रात्री 10.54 वाजता माकी काजी यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते 69 वर्षांचे होते. शब्दांची आणि अंकांची कोडी आज जगातल्या बहुतांश नियतकालिकांमध्ये आणि दैनिकांमध्ये मिळतात. तथापि, सुडोकूएवढी लोकप्रियता कोणत्याच कोड्याला मिळालेली नाही. परिणामी माकी काजी यांनी आर्थिकदृष्ट्याही मोठे यश मिळविले. त्यांची संपत्ती एक ते दीड कोटी अमेरिकी डॉलर एवढी असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या ‘निकोली’ या कंपनीच्या नावामागेही एक रहस्य दडलेले आहे. 1980 मध्ये आयर्लंडमधील महत्त्वाची रेस जिंकणार्‍या घोड्याचे हे नाव आहे. तीन वर्षांनी 1983 मध्ये याच नावाने कंपनी सुरू करण्याचा निर्णय माकी काजी यांनी घेतला. त्यांच्या नियतकालिकाला पहिल्याच वर्षी 50,000 वाचक लाभले होते. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते, की जेव्हा मला कोड्याची एखादी नवीन संकल्पना सापडते आणि त्यात खरोखर मोठी संभावना आहे असे लक्षात येते, तेव्हा मला प्रचंड आनंद मिळतो. निकोली या त्यांच्या नियतकालिकातील कोड्यांची संख्याही चक्रावून टाकणारी आहे. या नियतकालिकात तब्बल 200 प्रकारची कोडी प्रसिद्ध होत असत. ती सर्व कंपनीतच तयार केली जात असत. बॅग, कनेक्ट द डॉट्स, कंट्री रोड, क्रॉसवर्ड, सायफर क्रॉसवर्ड, एडल, फिलोमिनो, गोकिजेन ननामे, गोइशी हिरोई, हाशिवोकाकेरो, हेयावेक, हितोरी ही या माकी काजी यांच्या नियतकालिकातील काही लोकप्रिय कोड्यांची नावे होत. अशा प्रकारे जगाला ‘कोड्यात’ टाकणारा आणि अनेकांचे बुद्धिकौशल्य वाढविणारा सुडोकूचा निर्माता आपल्यातून निघून गेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या