नवीन नाशकात इच्छुकांची मोर्चेबांधणी

नवीन नाशकात इच्छुकांची मोर्चेबांधणी

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) निवडणुकांचा (election) कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असून

त्यातच आता ओबीसी आरक्षणसुद्धा (OBC reservation) जाहीर झाल्याने इच्छुकांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र नवीन नाशिक विभागात दिसत आहे. नाशिक महापालिकेत यंदा या विभागातून तीन नगरसेवक (Corporator) जास्त जाणार असल्याने इच्छुकांची संख्यासुद्धा वाढली आहे.

नाशिक शहरातील राजकीय घडामोडींमध्ये कायमच सिंहाचा वाटा नवीन नाशिक विभागाने (New Nashik Division) उचलला आहे. सध्याही या विभागात माजी पालकमंत्री (Guardian Minister), शिवसेना (shiv sena) व मनसेनेचे महानगरप्रमुख यांच्यासारख्या अनेक मातब्बर राजकीय नेत्यांचे निवासस्थान असल्याने या विभागाकडे बघण्याचा शहराचा दृष्टिकोनच वेगळा असतो. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका (election) नियमित वेळेप्रमाणे होतील, या दृष्टीने सर्वच राजकीय इच्छुकांनी मोर्चाबांधणी सुरु केली होती.

मात्र कोविडच्या (covid-19) परिस्थितीमुळे राज्यातीलच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local bodies) निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोविडची लाट ओसरल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर (Election program announced) करण्याचे आदेश दिल्याने या निवडणुकांसाठी इच्छुकांनी मोर्चाबांधणी सुरु केली आहे.

नवीन नाशिक परिसरात एकूण नगरसेवक संख्या 24 होती. त्यामध्ये शिवसेनेचे प्राबल्य होते तर मनपात सत्ताधारी भाजप (BJP) दुसर्‍या क्रमांकावर होती तर राष्ट्रवादी काँग्रेसचा (Nationalist Congress) एकच नगरसेवक होता. गेल्या काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करून महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्याने त्याचा परिणाम आता महानगरपालिकेच्या निवडणुकीवर पडणार यात शंकाच नाही. सध्याच्या प्रभाग रचनेनुसार नवीन नाशकातील नगरसेवकांची संख्या 27 झाली असून गेल्यावेळेपेक्षा तीन नगरसेवक (Corporator) यंदा जास्त असणार आहेत. सध्या सर्वच पक्ष आपले प्राबल्य टिकविण्याकरिता विविध आंदोलने, सोशल मीडिया आदी माध्यमांद्वारे लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या परिसरात आता शिंदे समर्थकही किती पुढे येणार हे बघण्यासारखे ठरणार आहे. शिंदे समर्थक इच्छुक या भागात असले तरी सध्या ते समोर येत नसले तरी निवडणुकीत याचा काहीसा फटका शिवसेनेला (shiv sena) बसणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच याठिकाणी भाजपच्या आमदार या दुसर्‍यांदा निवडून आल्याने त्यांनीही या विभागातून भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

नव्याने त्रिसदस्यीय पद्धतीची प्रभाग रचना झाली असली तरी ही प्रभाग रचना बदली जावून चार सदस्यीय प्रभाग रचना होईल, असा विश्वास काही राजकीय नेत्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने कार्यक्रम घोषित करण्याची सुचना केल्याने नवीन प्रभाग होणार नाही असे गृहीत धरून इच्छुकांनी पुन्हा आपली जनसंपर्काची मोहीम सुरु केली आहे. नवीन नाशिक परिसराचे शहराच्या तुलनेत राजकीय वर्चस्व असले तरी या भागात समस्या सुद्धा अजूनही प्रलंबितच राहिल्या आहेत. त्यामुळे अनेक इच्छुक विरोधकांनी केलेल्या कामांवरच टिप्पणी करण्याकडे लक्ष देतांना दिसत आहे.

आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी पुन्हा ओबीसी आणि महिला आरक्षण निघणार असल्याने हे आरक्षण सोडत कशी होते, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे एकीकडे नागरिकांशी गाठभेटी घेण्याबरोबरच पक्षश्रेष्ठींशी जवळीक साधून आपली उमेदवारी निश्चित करणे या दोन्हीकडे सध्या इच्छुकांचे लक्ष लागले आहे. नाशिक शहरात शिंदे समर्थकांमुळे काय परिणाम होणार हे येत्या काळात दिसून येणार असून निवडणूकीसाठी महाविकास आघाडी, युती कशीप्रकारे होते आणि कोणाचे तिकीट कापले जाते या सर्वच घडामोडींना वेग येणार आहे. नवीन नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग येत असला तरी या परिसरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याबरोबरच या विभागासाठी ठोस विकासकामे होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com