Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedअवकाळी आणि अवकळा

अवकाळी आणि अवकळा

– डॉ. मधुकर बाचूळकर, वनस्पतीतज्ज्ञ, कोल्हापूर

निसर्गाचे चक्र फिरले की, काय होते, याचा प्रत्यय सध्या येत आहे. वास्तविक, हा हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल देणारा काळ. पण उत्तराखंडात हिमनग वितळून आणि हिमकडे कोसळून निर्माण झालेल्या महाप्रचंड जलप्रलयानंतर ऐन हिवाळ्यात गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा आपण अनुभवला.

- Advertisement -

यावरून हवामानात बदल किती वेगाने आणि अनपेक्षितपणे होत आहेत, याची आपणांस कल्पना येऊ शकेल. पर्यावरण, निसर्गाचा र्‍हास करून आपणच या आपत्तींना निमंत्रण देतो आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. यासाठी आपणास कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करावे लागेल. तरच निर्माण झालेली अवकळा हळूहळू ओसरू लागेल.

सध्या गारपीट आणि अवकाळी पावसाने महाराष्ट्र हवालदील झाला आहे. राज्याच्या सर्व भागात त्याचा फटका बसला आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात त्याचे प्रमाण जास्त आहे. पेट्रोल-डिझेलच्या ज्वलनाने होणारी कार्बनडाय ऑक्साईडची निर्मिती आणि बेसुमार, प्रचंड वृक्षतोड, तसेच वनांचा र्‍हास यामुळे दरवर्षी पृथ्वीचे तापमान वाढत आहे. यामुळेच हवामान बदलाची ही स्थिती निर्माण होत आहे. गारपीट, अवकाळी पाऊस, हिमनग वितळणे, हिमकडे तुटून कोसळणे, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्ती, मानवी हस्तक्षेपांमुळेच ओढवतात. एकूणच ताज्या समस्येच्या निमित्ताने आपल्याला अंत:र्मुख होण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.

अवकाळी :

निसर्गाचे चक्र फिरले की, काय होते, याचा प्रत्यय सध्या येत आहे. वास्तविक, हा हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल देणारा काळ. पण उत्तराखंडात हिमनग वितळून आणि हिमकडे कोसळून निर्माण झालेला महाप्रचंड जलप्रलय आपण नुकताच पाहिला आणि त्यानंतर ऐन हिवाळ्यात गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा आपण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील जनतेने अनुभवला. उत्तर-मध्य महाराष्ट्र, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पूणे जिल्ह्यात तसेच मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि कोंकणासहित सर्व राज्यभर अवकाळी पाऊस झाल्याने, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गारपीटीने पशुपक्षीही दगावले आहेत. विजा पडून माणसे व जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. कांही ठिकाणी तर अवकाळी पावसाने आणि गारपीटीमुळे अक्षरश: हाहाकार उडाला आहे.

सर्वसाधारणपणे नेहमी अवकाळी पाऊस व गारपीट उन्हाळ्यात होते. पूर्वी अगदी क्वचितपणे हिवाळ्यात अवकाळी पाऊस होत असे. पण हल्ली अवकाळी पाऊस थंडीच्या दिवसांत, हिवाळ्यातही होत आहे. कडाक्याच्या थंडीतही हिमनग वितळत आहेत. हिमकडे कोसळत आहेत. यावरून हवामानात बदल किती वेगाने आणि अनपेक्षितपणे होत आहेत, याची आपणांस कल्पना येऊ शकेल. हिवाळ्यात, थंडीच्या दिवसात गारपीट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अद्यापही वातावरण ढगाळच आहे, यामुळे पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे.

आतापर्यंतचे चित्र असे होते की, चक्रीवादळ झाल्यानंतर अवकाळी पाऊस होतो. पण यावेळी थोडे वेगळेच घडले. मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग, कर्नाटक ते उत्तर केरळ या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले. तर मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग आणि विदर्भ या परिसरात चक्रिय स्थिती झाली. यामुळे अवकाळी पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली. उत्तरेकडून येणारे गार वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणारे उष्ण वारे, यामुळे संमिश्र हवामान निर्माण होऊन वातावरणावर परिणाम झाला. परस्पर विरोधी वारे एकत्र झाल्याने अवकाळी पावसाबरोबरच गारपीटही झाली.

इंधन जाळल्यामुळे, वणवे, जाळपोळ, कचरा व शेतीतील तणे, गवत, चिपाड जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते. हल्ली वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण सतत वाढत आहे. वनस्पती आणि वृक्ष हा कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात व ऑक्सिजन वातावरणात सोडतात. तथापि, आपण मात्र वृक्ष, वने-जंगले नष्ट करून, कार्बन डायऑक्साईड शोषून घेणार्‍या वृक्षांची संख्या, वनांचे प्रमाण सातत्याने कमी करत असल्याने, वातावरणात कार्बन डायऑक्साईड 34 ते 36 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचा पृथ्वीभोवती दाट थर निर्माण झाला आहे. हा थर सुर्य प्रकाशातील जास्तीत जास्त उष्णता शोषून घेतो व पृथ्वीपासून परावर्तीत होणारी उष्णता अडवितो. यामुळे पृथ्वीचे तापमान दरवर्षी वाढत आहे. या सार्‍याचा परिणाम हवामान बदलावर झाले आहे आणि त्यातूनच चक्रीवादळे, अवकाळी पाऊस, गारपीट यांचे दुष्टचक्र सुरू झाला आहे.

अवकळा :

पृथ्वीचे तापमान वाढत असल्यामुळेच ध्रुव प्रदेशातील बर्फ वेगाने वितळत आहे. हिमकडे तुटत आहेत. हिमनग, हिमनद्या नष्ट होऊ लागल्या आहेत. वितळलेल्या बर्फाचे पाणी समुद्रात मिसळून समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. समुद्र किनार्‍यालगतचे प्रदेश, लहान-मोठी गावे पाण्यात बुडू लागली आहेत. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या पर्यावरणीय संशोधनानुसार मुंबई महानगराच्या सुमारे 20 टक्के किनारपट्टींला पुराचा अतितीव्र धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. दक्षिण मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरांना सर्वाधिक तडाखा बसणार आहे. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने होणारी वाढ लक्षात घेऊन केलेल्या एका संशोधनातून मुंबई महानगराच्या किनारपट्टीला असलेला धोका अधोरेखित झाला आहे.

या संशोधनानुसार सन 1976 ते 2015 दरम्यान जमिनीच्या उपयोगात झालेले बदल, दलदल, पाणीसाठे आणि कांदळवनांचा र्‍हास अशा अशाश्वत विकासामुळे, मुंबई महानगरामधील सखल भाग समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीमुळे अतिसंवेदनशील बनला आहे. दक्षिण आणि पूर्व उपनगरांची 50.75 किलोमीटरची किनारपट्टी अति संवेदनशील असल्याचे समोर आले आहे. जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राच्या वाढत्या पातळीचा थेट परिणाम म्हणून पुढील कांही वर्षातच हा सर्व भाग पाण्याखाली बुडेल असा इशारा अभ्यासाअंती देण्यात आला आहे.

मुंबईच्या एकूण 274 किलोमीटर किेनारपट्टी पैकी 55.83 कि.मी. किनारपट्टी कमी संवेदनशील, 60.90 कि.मी. मध्यम संवेदनशील तर 50.75 कि.मी. किनारपट्टी अति संवेदनशील प्रकारात मोडते. कुर्ला, देवनार, शिवाजीनगर, ट्रॉम्बे, कोळीवाडा ही पुर्वेकडील उपनगरे, ठाणे खाडीचा पश्चिम भाग तर गोराई, मीरा-भाईंदर ही उत्तर मुंबईतील उपनगरे व अंधेरी पश्चिम भाग तसेच कुलाबा, बीपीटी कॉलनी, कफ परेड, दादर चौपाटी, गिरगांव ही दक्षिण मुंबईतील उपनगरे आणि नवी मुंबईचा कांही भाग तसेच उत्तन, उरण, अलिबाग, मुरूड ही गांवे व शहरे यांना महापुराचा व समुद्राच्या पाण्यात बुडण्याचा सर्वात जास्त धोका आहे. यामुळे मुंबईवर अवकळा पसरली आहे.

समुद्राच्या पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत असल्याने चेन्नई व कोलकत्ता ही महानगरेही संवेदनशील बनली आहेत. ओडिसा राज्यातील समुद्र किनार्‍यावर असणारी अनेक गांवे पाण्याखाली बुडू लागली आहेत. अंदमान-निकोबार येथील कांही बेटे पूर्णपणे पाण्याखाली बुडाली आहेत.

आपल्या देशातील समुद्र किनार्‍यांवर असणार्‍या सर्व गावांना व शहरांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. कांदळवनांच्या अतिक्रमणावर बंदी असूनही, योग्य अंमलबजावणी होत नसल्याने, त्यांचा र्‍हास वेगाने सुरू आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे किनारपट्टी नियमन प्रदेश (सीआरझेड) नियमांमध्ये शिथिलता आली आहे. दलदलीच्या जागेवर बांधकाम करण्यास बंदी असूनही बांधकामे थांबलेली नाहीत. नवीन बांधकामे व विकास प्रकल्पं या जागेवरही सुरूच आहेत. हे सर्व मानवी हस्तक्षेप रोखण्यास शासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे आपल्या राज्यात व देशात असुरक्षित लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही अत्यंत गंभीर बाब असूनही ती पूर्णपणे दुर्लक्षित आहे.

समुद्राच्या पाण्याच्या पातळीत सतत वाढत होत असल्याने पुढील 50-60 वर्षात पृथ्वीतलावरील 27 देश समुद्रात बुडतील असा अंदाज व शक्यता आहे. यामध्ये श्रीलंका, बांग्ला देश या आपल्या शेजारील देशांचाही समावेश आहे. या कारणामुळे त्यावेळची परिस्थिती आपल्यासाठी अत्यंत भयावह असेल. अर्थात हे सर्व लगेच होईल असे नाही. पण हळूहळू तशी अवस्था निर्माण होऊ लागली आहे, हे मात्र नक्की. यामुळेच मानवाचे पृथ्वीतलावरील अस्तित्व 2120 पर्यत नष्ट होऊन जाईल, असा गंभीर इशारा वरीष्ठ वैज्ञानिकांनी यापूर्वीच दिला आहे.

जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, चक्रीवादळे, अवकाळी पाऊस, व गारपीट, ऋतु चक्रातील बदल, परस्पर विरोधी हवामानाची स्थिती, यासर्व आपण नैसर्गिक आपत्ती मानतो. पण यासर्व मानवनिर्मित आपत्ती आहेत. आपणच यासाठी जबाबदार आहोत. पण एकीकडे या आपत्तींबाबत शंख करायचा आणि दुसरीकडे, त्या ज्या मुळे होतात त्या थांबविण्यासाठी कांहीच करायचे नाही. अशातून या आपत्ती कशा रोखता येणार हा मोठा प्रश्न आहे. पर्यावरण, निसर्गाचा र्‍हास करून आपणच या आपत्तींना निमंत्रण देतो आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. यासाठी आपणास कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करावे लागेल. वृक्षतोड, वनांचा विनाश थांबवावा लागेल. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करून वृक्षांची संख्या आणि वृक्ष आच्छादन क्षेत्र वाढवावे लागेल. तरच निर्माण झालेली अवकळा हळूहळू ओसरू लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या