पद मालदीवच, यश भारताचे

पद मालदीवच, यश भारताचे

- मिलिंद सोलापूरकर

हिंदी महासागरात प्रमुख स्थान असलेल्या मालदीव या आपल्या मित्रराष्ट्राला संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७६ व्या सत्राचे अध्यक्षपद मिळवून देण्यात भारत यशस्वी ठरला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेची कार्यवाही निष्पक्षरीत्या चालावी, हाच भारताचा हेतू आहे.

कोरोनाकाळात भारताने मालदीवला लसीच्या मात्रा पाठवून शेजार्‍यांना प्राधान्यक्रम हे आपले धोरण अधोरेखित केले आहे. मालदीवसोबत चांगले संबंध प्रस्थापित करणेच भारताच्या हिताचे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (यूएनजीए) भारताला एक मोठे यश मिळाले आहे. हिंदी महासागरात प्रमुख स्थान असलेल्या मालदीव या आपल्या मित्रराष्ट्राला संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७६ व्या सत्राचे अध्यक्षपद मिळवून देण्यात भारत यशस्वी ठरला आहे.

मालदीवला अध्यक्षपद मिळवून देणे हे भारतासाठी केवढे मोठे यश आहे, याचा अंदाज घ्यायचा असेल तर एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ती अशी की, सध्याचे जे यूएनजीएचे अध्यक्ष आहेत, ते तुर्कीचे रहिवासी आहेत आणि सातत्याने काश्मीर मुद्द्यावरून भारताला लक्ष्य करून पाकिस्तानच्या बाजूने ते वक्तव्ये करीत असतात. यावेळच्या निवडणुकीत आशिया प्रशांत क्षेत्रातील देशांनी भाग घ्यायचा होता. मालदीव हा दक्षिण आशियातील सर्वांत लहान देश आहे. परंतु हिंदी महासागरातील त्याच्या भौगोलिक स्थानामुळे त्याचे व्यूहात्मक महत्त्व मोठे आहे.

लष्करीदृष्ट्या भारतासाठी मालदीवचे महत्त्व गेल्या काही वर्षांपासून खूपच वाढले आहे. एक म्हणजे चीनचा वाढता दबदबा आणि दुसरे म्हणजे मालदीवमध्ये कट्टरपंथीयांचा ङ्गैलाव, या दोन कारणांमुळे मालदीवबाबत भारताची चिंता वाढली होती. २००८ मध्ये ३० वर्षांची हुकूमशाही संपुष्टात आणून जेव्हा मालदीवमध्ये लोकशाही प्रस्थापित झाली, तेव्हापासूनच त्या देशातील लोकशाहीची वाटचाल मोठ्या अडचणींमधून सुरू आहे.

तीस वर्षे मालदीवच्या राष्ट्रपतिपदी असणारे मोमून अब्दुल ग्यूम यांचे भारताशी निकटचे संबंध होते. त्यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी एकदा भारताने आपले लष्कर तिथे पाठविले होते. त्याच्यानंतर राष्ट्रपती झालेले मोहंमद नशीद हे अमेरिका आणि ब्रिटनशी जवळीक वाढविण्याच्या मताचे होते. परंतु २०१२ मध्ये नशीद यांना हटवून अब्दुल्लाह यामीन सत्तेवर आले तेव्हापासून भारताचे आणि मालदीवचे संबंध बिघडायला सुरुवात झाली आणि यामीन यांनी मालदीवला चीनच्या दावणीला बांधले.

अब्दुल्लाह यामीन यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार इब्राहीम सोलिह राष्ट्रपती बनले. आता मालदीव भारताबरोबर संबंधांमध्ये संतुलन राखत वाटचाल करीत आहे. या छोट्याशा देशाला संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेच्या ७६ व्या सत्राचे अध्यक्षपद मिळणे ही गौरवाची बाब आहे. मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्लाह शाहिद यांची संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यांना १४३ मते मिळाली. १९१ सदस्यांनी मतदानात भाग घेतला होता. शाहिद हे तुर्कीचे मुत्सद्दी वोल्कान बीजकिर यांची जागा घेतील. बीजकिर हे संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७५ व्या सत्राचे अध्यक्ष होते. निवडणुकीत अफगाणिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री डॉ. जालमेई रसूल हेही उमेदवार होते; परंतु त्यांना केवळ ४८ मते मिळाली.

मालदीवच्या या विजयात भारताने मोठी भूमिका बजावली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव २०२० मध्ये मालदीवच्या दौर्‍यावर गेले होते आणि त्याच वेळी भारताने मालदीवला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. महासभेच्या अध्यक्षपदासाठी प्रत्येक वर्षी गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेतली जाते आणि विजयासाठी सर्वसाधारण बहुमताची आवश्यकता असते. मालदीवने २०१८ मध्ये अब्दुल्लाह शाहिद यांना उमेदवार करण्याची घोषणा केली होती. शाहिद यांच्या ऐतिहासिक विजयामागे दोन महत्त्वाची कारणे आहेत.

पहिले कारण म्हणजे शाहिद हे यशस्वी मुत्सद्दी आहेत आणि त्यांना बहुउद्देशीय मंचांवर काम करण्याचा पूर्वानुभव आहे. दुसरे मोठे कारण म्हणजे, अङ्गगाणिस्तानच्या जालमेई रसूल यांनी आपली उमेदवारी खूप उशिरा जाहीर केली.

भारताने मालदीवचे या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. याच वर्षी ङ्गेब्रुवारीमध्ये मालदीवच्या सुरक्षेसाठी भारताने आपली बांधीलकी व्यक्त केली होती आणि मालदीवच्या सागरी सुरक्षिततेचा क्षमता विस्तार करण्यासाठी पाच कोटी डॉलरची संरक्षण कर्जसुविधा देण्याची तयारीही दर्शविली होती. याखेरीज भारताने मालदीवच्या नौसेना तळावर तटरक्षक दल, बंदरे आणि डॉकयार्ड विकसित करण्यासाठीच्या करारावरही स्वाक्षरी केली आहे. कोरोनाकाळात भारताने मालदीवला लसीच्या मात्रा पाठवून शेजार्‍यांना प्राधान्यक्रम हे आपले धोरण अधोरेखित केले आहे.

भारताने आपल्या मित्रदेशाला अध्यक्षपद मिळवून द्यावे असे पाकिस्तानला वाटत नाही. मालदीव पूर्णपणे एकाकी पडला होता; परंतु भारताने पाठिंबा दिल्यानंतर संपूर्ण जग मालदीवला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले. भारत आणि मालदीव दरम्यान ङ्गार पूर्वीपासून खूप घनिष्ट संबंध आहेत आणि हिंदी महासागरात मालदीव हा भारताचा व्यूहात्मक सहकारीही आहे. चीनची धोरणे आता मालदीवला कळून चुकली आहेत.

चीन सुरुवातीला शेजारी देशांना मदत करतो, तिथे गुंतवणूक करतो, अनेक योजना सुरू करतो, नंतर तेथील जमीन हस्तगत करतो. श्रीलंकेलाही कर्जाच्या जाळ्यात अडकवून चीनने हेच केले आहे. मालदीवचे राष्ट्रपती इब्राहीम सोलिह यांच्या कार्यकाळात भारत- मालदीव संबंध पुन्हा एकदा रुळावर आले आहेत. मालदीवसोबत चांगले संबंध प्रस्थापित करणेच भारताच्या हिताचे आहे. संयुक्त राष्ट्र महासभेची कार्यवाही निष्पक्षरीत्या चालावी, हाच भारताचा हेतू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com