पुन्हा सरपण!

पुन्हा सरपण!

घोटी | जाकीर शेख | Ghoti

प्रतिदिन पेट्रोल, डिझेल (Petrol, diesel) व स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (Cooking gas cylinder) सतत दरवाढ (Price increase) होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनता महागाईने त्रस्त झाली आहे.

गॅस सिलेंडरचे वाढते दर सर्वसामान्यांना पेलवत नसल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी पुन्हा चुली पेटवल्या आहेत. जळावू लाकडे गोळा करण्यासाठी जंगलाची वाट धरली आहे. महिलांना थंडी गारठ्यात जंगलात वणवण करत जळणासाठी सरपण मिळविण्यासाठी शोधा शोध करावी लागत आहे.

कोरोना (corona) संसर्गामुळे ठप्प असलेले उद्योग, व्यवसाय पुन्हा सुरू झाले असले तरी आर्थिक मंदीचे (Economic downturn) सावट कायमच असल्यामुळे रोजगाराची समस्याही भीषण रुप घेत आहे. अशातच सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत असल्याने गोरगरिबांची पंचाईत झाली आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत 910 रुपयांवर पोहचली असून त्यात 60 रुपये आगाऊ गाडीभाडे द्यावे लागत आहे.

त्यामुळे सिलेंडरचा खर्च एक हजाराच्या आसपास गेला आहे. हे सिलिंडर 15 ते 20 दिवसही पुरत नाही. त्यामुळे दूसरा सिलिंडर घेण्यासाठी पैशांची तजविज करावी लागते. अशा परिस्थितीत गॅस सिलिंडर (Gas cylinder) घेणे परवड नसल्याने ग्रामीण भागातील जनता पुन्हा चुलींचा आधार घेत आहे. सरपणासाठी महिला जंगलात वणवण भटकंती करत असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे.

उज्ज्वला योजनेतून (Ujjwala Yojana) गरीब कुटुंबांना गॅस सिलेंडर आणि शेगडी सरकारकडून मिळाली. परंतु, ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना सिलेंडर भरण्यासाठी पैसेच नसल्याने सिलिंडर रिफिल करता येत नाही. त्यामुळे उज्ज्वला योजनेचा मूळ उद्देश बाजूला पडला आहे.

गॅसही रिफिल करता येत नाही आणि शिधापत्रिकेवर मिळणारे रॉकेलही मिळत नसल्याने महिलांना सुके लाकूड व गवर्‍यांचा आधार घ्यावा लागत आहे. ताळेबंदीच्या काळात रेशन दुकानातून उपलब्ध करुन दिलेल्या धान्यांंमूळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला. स्वस्त धान्य दुकानातून धान्यांसह रॉकेलही मिळत होते. परंतु, गॅसचा लाभ घेतल्यामुळे दुकानातून मिळणारे रॉकेल बंद झाले.

100 रुपयात उज्वला गॅसची जोडणी मिळत असल्याने सुरुवातीच्या काळात या योजनेला उत्तम प्रतिसादही मिळाला. परंतु, सिलेंडरच्या किमतीतील दरवाढ आवाक्याबाहेर गेल्याने आपली चुलचं बरी अशी भावना आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांमध्ये झाली आहे. रेशनकार्डवर मिळणारे केरोसीन सुद्धा बंद झाल्याने ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक बजेट बिघडले असून पुन्हा गोवर्‍या व सरपणावर चुली पेटत असल्याचे वास्तव आहे. आरक्षित जंगलातून चुलीसाठी सरपण मिळणे अवघड असले, तरी जंगलतील रस्त्याच्या कडेला मिळणार्‍या लाकूडफाटा विनापैशांच्या असल्याने ग्रामीण कष्टकरी महिला जमा करतांना दिसतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com