Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedकरोनाच्या संकटात दिल्लीत प्रदूषणाची चिंता

करोनाच्या संकटात दिल्लीत प्रदूषणाची चिंता

नवी दिल्ली । सुरेखा टाकसाळ

पन्नास वर्षापूर्वी संध्याकाळ झाली की दिल्लीत धुराचे साम्राज्य पसरायचे. घराघरातून चुली व शेगड्यांमधून धुराचे लोट बाहेर पडत. हिवाळ्यात तर चौकाचौकात पेटवलेल्या शेकोट्यांच्या धुराचीही त्यात भर पडायची.

- Advertisement -

कुठल्याशा मोकळ्या जागेत तंदूरच्या भट्टी धूर ओकत असत. शेजारपाजारच्या बायका आपला कणकेचा गोला तेथे घेऊन जात आणि 10 पैशाला एक याप्रमाणे ‘तंदूर की रोटी’ भाजून घेत. त्यांचे स्वयंपाक घरातील काम हलके होत असे. परंतु दिल्ली धूरमय होत असे.

आज दिल्ली चुली शेगड्या मुक्त आहे. केरोसीनचा वापरही होत नाही. स्टोव्ह पेटत नाही. सगळे काही गॅसवर चालते. शहरातील बहुतेक सर्व वाहने देखील परंतु आज दिल्ली धुरात लिप्त आहे. जणू काही थंडीत अंगावर ओढलेली दुलई. दिल्लीची हवा इतकी प्रदूषित आहे की शास्त्रीय/वैज्ञानिक परिभाषेप्रमाणे ती पिवळ्या ‘धोकादायक’पासून लाल ‘विषारी’ झाली आहे. म्हणजेच श्वासोश्वासाकरता-माणसांच्या आरि जनावरांसाठी देखील ही हवा घातक आहे.

अनेक वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या शिफारशीप्रमाणे दिल्लीतील अनेक लहानमोठे कोळसा, लाकूड इंधन वापरणारे उद्योगधंदे दिल्लीतून हद्दपार करण्यात आले होते. तेव्हा केवळ डिझेलवर चालणारी सार्वजनिक वाहतुकीची वाहने ऑटोरिक्षा, बसेस दिल्लीत राहिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डिझेलची जागा नैसर्गिक वायु इंधनाने घेतली आणि सार्वजनिक वाहने स्वच्छ झाली. पण हवेतील प्रदूषणाचे दिल्लीतील प्रमाण वाढतच राहिले आहे.

कारण? शेजारच्या राज्यातील शेतातील पराली जाळण्याची पद्धत. पराली म्हणजे पिकांची कापणी झाल्यानंतर शेतात उरलेल्या धांडे/ताटे/जाळण्याची प्रक्रिया असे केल्याने धांडे उपटून टाकण्यासाठी द्याव्या लागणार्‍या मजुरीचा खर्च वाचतो आणि भाजली जाऊन जमीन सकस होते. असा समज, रानात वणवा लागून गेल्यानंतर रान पुन्हा हिरवेगार होते हे खरे आहे. परंतु दरवर्षी पंजाब, हरयाणा, पश्चिम उत्तर प्रदेशात लावण्यात येणार्‍या लाखो एकर शेतातील आगीमुळे फायदा किती आणि नुकसान किती याचा अंदाज येणे कठीण आहे.

पंजाब व हरयाणा ही राज्ये देशाची अन्नधान्य कोठारे आहेत. देशाच्या वार्षिक गहू उत्पादनापैकी 40 टक्के उत्पादन ही दोन राज्ये करतात. त्यामुळे लाखो कुटुंबाचे पोट भरते. परंतु शेतातील आगींमधून निघणार्‍या धुराने किती कोटी फुफ्फुसे कोंडली जातात आणि श्वसनाच्या रोगांकरता किती कोटी रुपयांचे औषध, उपचारानंतर खर्च होतात. याचा अंदाज न बांधलेलाच बरा.

दिल्लीत प्रदूषणाचे प्रमाण वाढले की लहान मोठ्या सरकारी-खाजगी दवाखाने, इस्पितळांमध्ये पेशंटस्ची गर्दी वाढेल. अ‍ॅक्टर्स ंगंभीर इशार्‍यांच्या घंटा वाजवतात. प्रदूषणावर राजकीय पक्षांचे राजकारण गरम होण्यास वेळ लागत नाही. प्रदूषणाबाबत आरडाओरडा सुरू झाला की दिल्ली सरकार या प्रदूषणाचा ठपका शेजारच्या राज्यात पराली जाण्यावर ठेवतात आणि दुसरीकडे ‘ऑड-इव्हन’चा आपला लाडका नियम लावून ‘कामगिरी’ केल्याचा दावा करते.

तशातच यंदा गेल्या दहा महिन्यांपासून करोना (कोविड 19) ने देशात सर्वत्र थैमान घातले आहे. त्यात या प्रदूषणाची भर म्हणजे यापुढील काळात दिल्ली समोर काय ताट वाढून ठेवले आहे. याची सहज कल्पना येते. पण सर्वसामान्य दिल्लीकरांचा संयम सुयला आहे.

रस्ते, बाजारांमधील गर्दी पाहिली की करोनाच्या चिंतेऐवजी लोकांची बेफिकीरी व बेपर्वाईचे दर्शन घडते. काही न झाल्याप्रमाणे ते वागतात. मास्क न लावणार्‍यांना रस्त्यात अडवून दंड आकारला जातो. त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातात. त्याचीही त्यांना तमा नसते. मास्क घातले तरी शोभेसाठी नाकाऐवजी गळ्यांमध्येच ते अधिक असतात. दिल्लीतील इस्पितळांवर निर्बंध दिसत नाहीत. दिल्लीच्या 2019/2020 या वर्षाच्या आर्थिक पहाणीनुसार दिल्लीत दरडोई उत्पन्न हे राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट म्हणजे 3 लाख 89 हजार 143 रु. इतके आहे. याचा अर्थ इस्पितळांनी मनमानी करावी असा व्हायला नको.

आजच्या घटकेला, जगाच्या तुलनेत भारतात करोनाचे मामले कमी होत आहेत. ही दिलासा देणारी बाब आहे. परंतु, दिल्लीत एव्हाना करोनाची तिसरी लाय आलेली आहे. आणि ही खरी चिंतेची बाब आहे. थंडीच्या दिवसात श्वसनाच्या-घशाच्या आजारांमध्ये वाढ होतेच. ताातच स्थलांतरितांचे कामाच्या शोधात दिल्लीत पुनरागमन, नागरिकांचा बेफिकीर व बेजबाबदारपणा, या बरोबरच वाढते प्रदूषण देखील करोनाच्या वाढत्या संसर्गाला कारणीभूत ठरत आहे. येथे करोनाच्या दैनंदिन केसेस दुप्पट म्हणजे दोन हजारांवरून चार हजारांवर गेल्या आहेत. करोनामधून बरे होण्याचे प्रमाण जरी 80 टक्क्यांपर्यंत गेले असले तरी करोनाचे मामले वाढत आहेत. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

या आधी दिल्लीच्या ल्युटीन झोनमध्ये अतिदक्षता व सुरक्षित वातावरणात राहणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महिला बालकल्याण मंत्री स्मृती इराणी, नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीप पुरी, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया इत्यादींना देखील करोनाची बाधा झाली होती. रेल्वे राज्यमिं सुरेश अंगडी करोनामुळे दगावले. सांगायचा मुद्दा दिल्लीतील हवा अत्यंत प्रदूषित आहे.

आता तर दिवाळी जवळ आली आहे. सर्वात मोठा सण कितीही नियम, निर्बंध हटवले तरी बाजार आणि रस्त्यावर लोक गर्दी करणारच. तेलाचे असंख्य दिवे आणि मेणबत्त्या लावल्या जातील. सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर बंदी घातली असली तरीही फटाके वाजवले, फोडले जातील. वातावरण अधिकच प्रदूषित होईल. आसमंत धुराने भरून जाईल. यात संशय नाही आणि म्हणूनच अधिक भीती, काळजी व चिंता वाटते. सण काय पुढच्या वर्षीही येतील. पण आज जीव वाचवणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. स्वत:च्या बचावासाठी दिल्लीकरांना स्वत:च जागरुक रहायला हवे. पण, लक्षात कोण घेतो?

- Advertisment -

ताज्या बातम्या