Friday, April 26, 2024
HomeUncategorizedविनम्र; पण धाडसी बनण्याचा काळ

विनम्र; पण धाडसी बनण्याचा काळ

– रतन टाटा , ज्येष्ठ उद्योगपती

नव्या जगाचा उदय होत असताना तसेच नवनवीन तंत्रज्ञान आपल्यासमोर येत असताना आपण नवा दृष्टिकोन बाळगणार्‍या युवकांची, गटांची आणि समुदायांची ओळख पटवून त्यांच्यातील कुतूहल आणि जिंकण्याची दुर्दम्य ऊर्जा वाढविण्यासाठी त्यांना पाठबळ दिले पाहिजे.

- Advertisement -

आपल्या भोवतालात स्थित्यंतर घडत असताना नवकल्पना आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्याची संस्कृती आपण विकसित केली पाहिजे आणि अपयशाची भीती न बाळगता अशा नवकल्पनांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे.

या पृथ्वीवरील मानवजातीने पूर्वी कधीच पाहिले नव्हते असे एक अभूतपूर्व वर्ष अशी 2020 ची नोंद इतिहासात होईल. आपण कोणत्या दिशेला निघालो आहोत आणि पुढील वर्षाने आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे, याबाबत माझ्या द़ृष्टिकोनातून भाष्य करणे मला प्रथमच एवढे अवघड जात आहे. मानवजातीसाठी ही एक परीक्षा आहे आणि आपल्याला मार्ग सापडेल याविषयी मला खात्री आहे.

आपण आजवर अनेक चक्रे अनुभवली. मग ती आरोग्याची असोत, व्यवसायातील असोत किंवा जागतिक संसर्गजन्य आजारांची चक्रे असोत. परंतु ज्या-ज्यावेळी ही चक्रे थांबून नाकाबंदी होते, त्या-त्यावेळी चपळाई आणि सृजनशीलतेच्या साह्याने ती फोडण्याची ताकद मानवजातीला प्राप्त होते. काही दशकांपूर्वी आलेला एचआयव्ही हा संपूर्ण मानवजातीचा विनाश करेल, असे मानले गेले होते. पण जेव्हा आपण मागे वळून पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की, आपण विषाणूवर मात करण्यासाठी संशोधनात गुंतवणूक केली आणि आपली सर्व बौद्धिक क्षमताही खर्ची घातली. त्यामुळेच आपण त्यात यशस्वी झालो.

आता कोरोनाबाबत आपल्याला प्रभावी लस सापडेल किंवा कदाचित सापडणारही नाही; पण संसर्गाची तीव्रता कमी करणारे औषध मात्र आपल्याला सापडेल याविषयी मी आशावादी आहे. परंतु या संसर्गाला गृहित धरण्याची मानसिकता आपण सोडून द्यायला हवी. अशा मानसिकतेमुळे काय घडले ते युरोप आणि अमेरिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपण सुरक्षित राहायला हवे आणि त्यासाठी सतत मास्क वापरणे, सतत हात धुणे याबरोबरच जे उपाय उपयुक्त ठरले आहेत, ते सर्व करणे गरजेचे आहे. मी असे काही लोक पाहिले आहेत, जे संपूर्ण आठ महिन्यात घराबाहेर पडलेही नाहीत; पण तरीही विषाणूच्या संपर्कात आले. म्हणूनच आपण सर्वप्रथम विनम्र व्हायला हवे. आपण हे जाणून घ्यायला हवे की, आपल्या भोवताली अत्यंत शक्तिशाली असे काहीतरी आहे. तो एक स्वाभाविक जीवजंतू आहे आणि कर्करोगासारखाच आहे; मात्र त्याचा वेग आणि मृत्युदर प्रचंड आहे. हा एक वास्तवातला विषाणू आपल्यासोबत वास्तव्याला आला आहे हे समजून घेऊन आपण आदरयुक्त भावनेने परिस्थिती हाताळायला हवी. संपूर्ण जग एकच आहे आणि एकत्रितपणे लढलो तरच आपण सगळे जिंकू शकतो, हेच या दिवसांनी आपल्याला शिकविले आहे.

अर्थकारणाचा विचार करता, खूप घसरणीचे दिवस आपल्याला पाहावे लागले आहेत आणि सर्व व्यवसायांनी आपले रूपांतर नव्या काळाशी सुसंगत असे करणे आवश्यक ठरणार आहे. जागतिक संसर्गाचा उद्रेक झाल्यामुळे तयार झालेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी नवे कालसुसंगत आणि सृजनशील मार्ग शोधले आहेत, हे आपण पाहिले.

आपल्या सर्वांनाच एक राष्ट्र म्हणून देशातील जनतेकडून उपभोग आणि खरेदी वाढण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या उभारणीत मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनीच एकजुटीने प्रयत्नशील राहायला हवे. प्रचंड दबावाखाली असलेले उद्योग आणि क्षेत्रे पुन्हा रुळावर आणण्यासाठी आपण झटायला हवे. या दिशेने भारत सरकारने काही सकारात्मक पावले उचलली आहेत आणि आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ती उपयुक्त ठरतील, असा मला विश्वास आहे. परंतु नवे मार्ग, नवे पर्याय शोधून काढण्यासाठी तसेच नव्या संधींचा शोध घेऊन यशस्वी होण्यासाठी आपण एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.

आर्थिक चक्राचा विचार करीत असताना, संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात ज्या स्थलांतरित मजुरांना जीवितहानी आणि काम गमावण्यासह बरेच काही सोसावे लागले आहे, त्यांचा विचार आपण सर्वप्रथम करायला हवा, असे मला वाटते. त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता म्हणून त्यांना हे सर्व भोगावे लागले. त्यांच्याकडे एक गोष्ट मात्र होती आणि एक देश म्हणून आपण सर्वांनी तिचा सन्मान करायला हवा, ती जपायला हवी. ती गोष्ट म्हणजे त्यांचे कौशल्य. त्यांच्या अनुपस्थितीत या कौशल्याची भरपाई अन्य कोणीही करू शकणार नाही. मजुरांच्या या कौशल्याधारित समुदायाला संरक्षण आणि प्रोत्साहन देणारे वातावरण जर आपण

निर्माण करू शकलो तर एक देश म्हणून आपण निश्चित यशस्वी होऊ. सध्याचे सरकार या बाबतीत चांगले काम करीत असून, लोकांना कौशल्यपूर्ण बनविण्याची गरज ओळखून त्यासाठी गुंतवणूक करीत आहे.

या समुदायाला आपली कौशल्ये वापरता यावीत आणि नव्यांनी ती शिकावीत यासाठी सरकारने व्यासपीठ निर्माण केले आहे. हे चक्रच आर्थिक प्रगतीला गतिमान करू शकते, त्याचप्रमाणे या समुदायाला योग्य उपजीविका उपलब्ध करून देण्याबरोबरच उत्तम जीवनमान प्रदान करू शकते.

महिलांनी घरबसल्या अर्थप्राप्तीसाठी मार्ग शोधले तर त्या या अर्थचक्राच्या महत्त्वाचा हिस्सा बनू शकतात. यापुढील काळात महिला अधिक प्रमाणात क्षमताधारित कौशल्ये शिकतील आणि जी कामे महिला करू शकतात अशी कल्पनाही कुणी केली नसेल ती कामे करताना दिसतील. अमुक कामे पुरुषांनी करायची आणि अमुक कामे स्त्रियांनी करायची हा भेदाभेद यापुढील काळात असणार नाही. लैंगिक समानता आणि समान कामासाठी समान मोबदला या बाबी आर्थिक उत्कर्षासाठी यापुढे अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. ज्या-ज्यावेळी घसरण सुरू होते, त्या-त्यावेळी अशी माणसे असतात, ज्यांना त्यावरील उपाय सापडलेला असतो. महिला ही बाब अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकतात; परंतु आपण त्यांच्या कर्तृत्वाला आणि उत्साहाला खुले आकाश मिळेल असे वातावरण निर्माण करतो का, हे तपासायला हवे. देशातील कौशल्यवृद्धीसाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

नव्या जगाचा उदय होत असताना तसेच नवनवीन तंत्रज्ञान आपल्यासमोर येत असताना आपण नवा दृष्टिकोन बाळगणार्‍या युवकांची, गटांची आणि समुदायांची ओळख पटवून त्यांच्यातील कुतूहल आणि जिंकण्याची दुर्दम्य ऊर्जा वाढविण्यासाठी त्यांना पाठबळ दिले पाहिजे. मागील काळातील उद्योजकांची मानसिकता वेगळी होती. तो काळच वेगळा होता. पूर्वीच्या काळाप्रमाणे मोठे उद्योगधंदे उभारणे आता सोपे राहिलेले नाही.

आगामी काळात आपल्याला तसे पाहायलाही मिळणार नाही. सृजनशील संकल्पना आणणे आणि त्यांचे संधीत रूपांतर करणे, त्यासाठी योग्य तेवढी गुंतवणूक करणे आणि धडाडीने ती संकल्पना पूर्णत्वास नेणे हेच भविष्यात महत्त्वाचे ठरणार आहे. आपण जेव्हा आपल्या देशाची तुलना अमेरिकेशी करतो, तेव्हा याच बाबतीत कमी पडतो.

अमेरिकेत दहापैकी आठ उद्योजक अयशस्वी झाल्यावर ‘इट्स ओके’ असे म्हणतील. ‘इट्स ओके’ ही संस्कृती आहे आणि ती आपण रुजविली पाहिजे. असे केल्यासच अल्पकालीन आणि मध्यमकालीन संकल्पना उदयास येतील. भारतात उत्तमोत्तम संकल्पना बाळगणारे असंख्य युवक आहेत. वास्तविक, गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारखे जगभरातील उत्तमोत्तम तंत्रसमृद्ध उद्योग भारतीय मंडळीच चालवत असल्याचे दिसून येईल. असे का घडत आहे, याचा आपण शांतपणे बसून विचार केला पाहिजे. यातील अनेक मंडळी उच्चपदावर आहेत आणि तेथे पोहोचण्यासाठी त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले आहेत. माझ्या मते, आपल्याकडे अनेक तरुणांच्या मनात प्रभावी संकल्पना आहेत. त्यांच्यातील उपक्रमशीलता आणि क्षमतेला प्रोत्साहन देणे आणि त्यांना नाउमेद न करणे हा आपल्या इच्छाशक्तीचा भाग आहे. त्याचबरोबर तरुणांना जपान आणि कोरियातून गुंतवणूक आणण्यास सांगण्याऐवजी आपणच भारतीय चलनात अशा नवोपक्रमांमध्ये गुंतवणूक करायला हवी. माझ्यापुरता विचार करायचा झाल्यास, मी अशा स्टार्टअपच्या पर्यावरणाला बळ देण्याचा नेहमीच प्रयत्न करतो; परंतु तरुणांकडून काहीतरी शिकावे, अनुभव घ्यावा हा त्यामागील हेतू असतो. ज्यांच्याकडून मला काही शिकायला मिळेल, अशांकडे मी नेहमीच आकर्षित होतो. परंतु बर्‍याच वेळा ही कृती अंतरिक प्रेरणेतून घडते, कारण संधीचा लाभ घेण्याइतकी चपळाई असणार्‍यांना माझी नजर ओळखू शकते.

नव्या वर्षात आपण चार गोष्टी प्रकर्षाने लक्षात घ्यायला हव्यात.

1) जगाला गृहित धरता कामा नये.

2) आपल्यावर नियंत्रण ठेवणारी एक प्रचंड शक्ती आहे. आपण विनम्रता आणि कृतज्ञता हे गुण अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण जीवन अशाश्वत आहे. आपण सुरक्षित राहिले पाहिजे आणि संपूर्ण मानवजातीला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

3) आपल्या खाण्यापिण्याच्या, राहण्याच्या, शिकण्याच्या, खेळण्याच्या पद्धती तंत्रज्ञानामुळे बदलत चालल्या आहेत. या नव्या जगात आपण धाडसीपणे प्रवेश केला पाहिजे आणि प्रत्येक समस्येवर सर्वानुमते उत्तर शोधले पाहिजे.

4) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आपल्या भोवतालात स्थित्यंतर घडत असताना नवकल्पना आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्याची संस्कृती आपण विकसित केली पाहिजे आणि अपयशाची भीती न बाळगता अशा नवकल्पनांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे.

- Advertisment -

ताज्या बातम्या