Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedचीनमध्ये ‘पेंग’ वादळ

चीनमध्ये ‘पेंग’ वादळ

– प्रसाद वि. प्रभू, ज्येष्ठ पत्रकार

चीनमधील लोकप्रिय महिला टेनिसपटू पेंग शुआईने अलीकडेच चीनचे माजी उपपंतप्रधान झांग गावली यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यामुळे जगभरात खळबळ माजली आहे. या आरोपांनंतर ती सध्या गायब आहे. धक्कादायक बाब म्हणजे पेंग ही झांग यांची गर्लफ्रेंड म्हणूनच ओळखली जात होती; तर झांग गावली हे जिनपिंग यांचे प्रतिस्पर्धी जियांग झेमीन यांच्या नेतृत्वाखाली ‘शांघाय गँग’ शी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देण्यासाठी जिनपिंग यांनी पेंगच्या ‘मी टू’ चळवळीचा उपयोग केला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. विरोधकाना नमवण्यासाठी चीन सरकार वेगवेगळे प्रयोग करीत असते. सध्याचे प्रकरण हा त्याचाच एक भाग असावा.

- Advertisement -

चीनमध्ये बॅडमिंटन आणि टेबल टेनिस एवढी लोकप्रियता टेनिसला अजून मिळालेली नाही; पण झेंग ली, ली ना आणि पेंग शुआई वगैरे टेनिसपटूंनी चीनमध्ये टेनिसला चांगली गती दिलेली आहे. 35 वर्षीय पेंग शुआई ही चीनमधील एक लोकप्रिय महिला टेनिसपटू आहे आणि तिने अलीकडेच चीनचे माजी उपपंतप्रधान झांग गावली यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर चीनमध्ये खळबळ माजली आहे. शी जिनपिंग यांनी आपल्या आजीवन अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब करून घेण्याच्या दोन दिवस आधी हा आरोप झाल्यामुळे चिनी कम्युनिस्ट पक्षालाही हादरा बसला आहे.

चीनमध्ये ट्विटरला बंदी आहे; पण चीनचे स्वतःचे ट्विटर सारखेच ‘वायबो’ नामक ऑनलाईन व्यासपीठ आहे. झांग गावली यांनी किमान दहा वर्षे आपले अधूनमधून लैंगिक शोषण केल्याचा आरोप पेंगने केला आहे. झांग गावली ज्यावेळी मला आपल्या घरी बोलवून लैंगिक अत्याचार करीत असत त्यावेळी त्यांची पत्नी दाराबाहेर पहारा देत असे. मी कुठल्याही प्रकारचे रेकॉर्डिंग करू नये, याची दक्षता झांग यांनी घेतली होती. त्यांच्या लैंगिक अत्याचारामुळे माझी स्थिती चालत्या प्रेतासारखी झाली होती, असे पेंगने 2 नोव्हेंबर रोजी वायबोवर उघड केल्यावर चीनभर बोभाटा झाला. त्यानंतर चिनी प्रशासनाने वायबोवरील तिचा मजकूर तातडीने काढून टाकला; पण तत्पूर्वीच तिच्या मजकुराचे स्क्रीनशॉट ट्विटरवर गेल्यामुळे सोशल मीडियाद्वारे हे प्रकरण जगभर पोचले. पण तेव्हापासून पेंग शुआई गायब आहे. तिचा ठावठिकाणा लागत नाहीये. त्यामुळे टेनिसविश्व चिंतेत आहे. जागतिक महिला टेनिस संघटना, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना वगैरे क्रीडा संघटनांनी तिच्या जीविताविषयी चिंता व्यक्त करून चिनी सरकारकडे तिच्या सुखरूपतेविषयी माहीती देण्याची मागणी केली आहे.

प्रचंड आंतरराष्ट्रीय दबावामुळे चीन सरकारने ङ्गग्लोबल टाइम्सफ या आपल्या मुखपत्राद्वारे पेंग शुआईचे काही फोटो आणि व्हिडिओ अलीकडे प्रसिद्ध केले आहेत; पण ते खरे किती खोटे किती याबद्दल सार्‍या जगाला शंका आहे. मी आरोप मागे घेत असून, मी सुरक्षित आहे आणि घरामध्ये विश्रांती घेत आहे, असे पेंग शुआई सांगत असलेली पत्रे, इमेल, व्हिडीओ व्हायरल करण्यात आले आहेत. पण चीनची बनवेगिरी जगाला माहीत असल्यामुळे इथेही साशंकता कायम आहे. आता आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेचे प्रमुख थामस बाख यांच्याशी पेंग व्हिडिओ कॉलवर बोलली असल्याचे वृत्त आहे. हे प्रकरण एवढे गाजत आहे, याला कारण एका माजी उपपंतप्रधानवरच एवढा गंभीर आरोप झालेला आहे. 75 वर्षीय झांग गावली ही काही साधीसुधी व्यक्ती नाही. त्यामुळेच चीन सरकार सध्या त्यांच्याबद्दल मौन बाळगून आहे.

सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या सात सदस्यीय सर्वोच्च पॉलिट ब्युरो स्टँडिंग कमिटीमध्ये झांग गावली हे सात वर्षे सदस्य होते. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या मुदतीत झांग हे 2012 ते 2017 पर्यंत या कमिटीमध्ये होते. एक दशकापूर्वी झांग हे तियानजीन शहर शाखेच्या चायनीज कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख होते. त्यावेळी ते या शहराच्या टेनिस क्लबमध्ये नियमितपणे जायचे. तेथे त्यांची स्टार टेनिसपटू पेंग शुआईशी प्रथमच भेट झाली. इथूनच त्यांच्या भेटण्याचा सिलसिला सुरू झाला आणि अखेर त्याची परिणती पेंगने झांग यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यामध्ये झाली आहे.

आंतरराष्ट्रीय टेनिस जगतात पेंग शुआईचे नाव आहे. जागतिक महिला टेनिस संघटनेच्या दुहेरीच्या क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवणारी ती चीनची पहिली टेनिसपटू. 2014 मध्ये तिने हा टप्पा गाठला होता. महिला एकेरीतही तिने 2018 मध्ये जागतिक क्रमवारीत चौदाव्या स्थानापर्यंत मजल मारली होती. पेंग शुआईने आपल्या टेनिस कारकीर्दीमध्ये दोन एकेरीची आणि 22 दुहेरीची अजिंक्यपदे मिळवलेली आहेत. तिने 2013 च्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे अजिंक्यपद मिळवले होते. त्याचप्रमाणे 2014 च्या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेतही तिने दुहेरीचे विजेतेपद मिळवले होते. एकेरीमध्ये तिने 2014 च्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. एखाद्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत मजल मारणारी चीनची ती तिसरी खेळाडू ठरली होती.

दोन्ही हाताने चेंडू फटकावणे हे तिच्या खेळाचे वैशिष्ट्य समजले जाते. पेंग शुआईने आपल्या टेनिस कारकिर्दीत आत्तापर्यंत पहिल्या दहा आणि पाच मधील अनेक खेळाडूंना हरवलेले आहे. त्यामध्ये अनास्तासिया मिस्कीना, इलेना डिमेंटिव्हा, किम क्लीस्टर्स, अमेली मारिसमो, फ्रान्सिस्का शियाओन, येलेना यांकोव्हिक, मरियन बारटोली, अगनिस्का रेडव्हांस्का आणि व्हेरा वेनेरोवा यांचा समावेश आहे. पेंग शुआई गायब झाल्यानंतर जागतिक महिला टेनिस संघटनेने चीनमध्ये होणार्‍या आगामी बारा टेनिस स्पर्धा रद्द करण्याची धमकी दिली आहे. त्याचप्रमाणे येत्या फेब्रुवारीमध्ये चीनमध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचे आव्हान सतत करण्यात येत आहे. जागतिक मानवी हक्क संघटनेने ही पेंग शुआईच्या जीविताविषयी चिंता व्यक्त केली आहे.

या प्रकरणाला आता काही राजकीय तज्ज्ञांनी वेगळा अँगल देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यानुसार त्यांचा असा अंदाज आहे की चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे पेंग शुआईचा उपयोग आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना नमवण्यासाठी करत आहेत. विशेष म्हणजे पेंग ही झांग यांची गर्लफ्रेंड म्हणूनच ओळखली जात होती आणि आता तीन वर्षांनी तिने वायबोसारख्या सरकारी व्यासपीठावर आरोप करण्याचे धाडस करावे हे आश्चर्य मानले जात आहे.

कारण आरोप केल्यानंतर त्याचे काय गंभीर परिणाम होतील याची कल्पना पेंग शुआईला नक्कीच असणार. पण तिला संरक्षण देणारा कोणीतरी असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शी जिनपिंग यांचे प्रतिस्पर्धी जियांग झेमीन यांच्या नेतृत्वाखाली ‘शांघाय गँग’शी झांग गावली संबंधित आहेत. त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देण्यासाठी जिनपिंग यांनी पेंगच्या ङ्गमी टूफ चळवळीचा उपयोग केला असावा आणि त्यानुसार झांग यांच्यावरील आरोप जगभर पसरावेत अशी व्यवस्था जिनपिंग यांनीच केली असावी असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. जियांग झेमीन यांच्या नेतृत्वाखालील ‘शांघाय गँग’ ही शी जिनपिंग यांना सत्तेवरून खेचण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

चिनी सरकार आपल्या नागरिकांवर आपला अधिकार आहे असे समजते आणि तशाच प्रकारचे वर्तन सरकार करीत असते. विशेषतः आंतरराष्ट्रीय संपर्कात असलेल्या चिनी नागरिकांवर ती चिनी सरकारची ’काक दृष्टी’ असते. चीनमध्ये सरकार विरोधात आवाज उठवणार्‍यांची काय गत केली जाते हे सार्‍या जगाला माहीत आहे. विरोधकांना काही काळ गायब करून त्यांचा आवाज बंद करण्याची हातोटी चिनी सरकारला चांगली जमली आहे. पण विरोधकाना नमवण्यासाठी चीन सरकार वेगवेगळे प्रयोग करीत असते.

सरकारवर टीका केली म्हणून चिनी अब्जाधिश जॅक मा यांना 2020 मध्ये तीन महिने गायब करण्यात आले होते ते आता जगभर फिरत आहेत पण त्यांचा आवाज खाली आला आहे. 2018 मध्ये करचुकवेगिरीचा घोटाळ्यात सापडलेली चीनची प्रसिद्ध अभिनेत्री फॅन बिंगबिंग ही सुद्धा चार महिने गायब होती. पत्रकार आणि मी टू कार्यकर्ती सोफिया हुआंग सप्टेंबरमध्ये गायब झाली होती. त्यानंतर आता असे वृत्त आहे की चिनी पोलिसांनी तिला अटक केली आहे. त्यामुळे पेंग शुआईचे आता काय होणार याविषयी सारे जग चिंतेत आहे.

– प्रसाद वि. प्रभू, ज्येष्ठ पत्रकार

- Advertisment -

ताज्या बातम्या