Monday, April 29, 2024
HomeUncategorizedसाने गुरूजी : मातृहृदयी समर्पित शिक्षक

साने गुरूजी : मातृहृदयी समर्पित शिक्षक

पांडुरंग सदाशिव साने, हे साने गुरुजी या नावाने सार्‍या महाराष्ट्राला परिचित झालेले होते. त्याकाळी गुरुजींना ओळखत नाही, असा एकही खान्देशी माणूस शोधून सापडणे मुश्किल होते. गुरुजींनी आपल्या जीवनात अनेक भूमिका प्राण ओतून वठविल्या आणि आपल्या समर्पणाच्या वृत्तीने त्यांना अजरामर करुन ठेवल्या. त्यातली महत्त्वाची आणि भावी पिढीला आकार देणारी भूमिका होती शिक्षकाची. साने गुरुजी हे पदवी प्रमाणपत्र घेऊन नोकरी करणारे, पोटार्थी शिक्षक नव्हते. शिक्षकी पेशा त्यांनी व्रत म्हणून स्वीकारला होता. कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक शिक्षण नसताना, केवळ आत्म्याच्या उर्मीतून, नवनिर्मितीच्या ध्यासातून गुरुजींमधला शिक्षक तयार झाला होता. ते मातृहृदयी शिक्षक होते. शाळा ही मुलांना कोंडून ठेवण्याच्या कोंडवाडा नसून, विद्यार्थ्यांवर वेगवेगळे संस्कार करून बघण्याची ती एक प्रयोगशाळा आहे, असं गुरुजी मानत. शिक्षकी व्यवसाय, पैसा कमविण्यासाठी अथवा दोन वेळच्या जेवणाची बेगमी होण्यासाठी त्यांनी स्वीकारलेला नव्हता. त्याकाळी पारतंत्र्यात असलेल्या देशाला स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशीचा महामंत्र देण्यासाठीच जणू गुरुजींनी, विद्यादानाचे कार्य हाती घेतले असावे.

गुरुजींनी पुण्याच्या न्यू पुना कॉलेजमधून 1924 साली एम. ए. साठी ऍडमिशन घेऊन, द्वितीय श्रेणीत एम. ए. पूर्ण केले. 17 जून 1924 साली अमळनेरच्या खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये, त्यांनी शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केली. 17 जुलै 1908 साली स्थापन झालेल्या खान्देश एज्युकेशन सोसायटीने प्रथम विद्यामंदिर शाळा सुरू केली. ती कालांतराने 17 जुलै 1934 साली प्रताप हायस्कूल म्हणून नावारूपाला आली. स्वातंत्र्याची आणि स्वदेशाची चळवळ या काळात जोरावर होती. त्याच्या परिणाम संस्था चालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांवरही झालेला होता. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुढे फार लौकिक मिळविल्याच्या नोंदी आहेत. साने गुरुजींची धडपडणारी मुले म्हणून ती प्रसिद्ध होती.

- Advertisement -

गुरुजींना मुलं आणि फुलं फार आवडत. मुलांच्या आणि फुलांच्या सानिध्यात प्रत्यक्ष परमेश्वराचा सहवास लाभतो, असा त्यांचा मानस होता. नवीन काही करावे, हा ध्यास त्यांच्या मनाला सतत पछाडून टाकी. त्या दृष्टीने शिक्षकी व्यवसायात त्यांच्या कर्तुत्वाला नवीन धुमारे फुटले. मुलांच्या निरागसतेतूनच त्यांना जीवनाचे धडे देण्याचे कार्य गुरुजींनी सुरू केले. प्रताप विद्यामंदिर फक्त शाळा न राहता, कर्मशाळा बनली. गुरुजी प्रताप विद्यामंदिरच्या वसतीगृहातच रहात. जे आजही आनंद भुवन म्हणून ओळखले जाते. प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना, या आनंद भुवन वसतिगृहात राहण्याचे भाग्य मला लाभले आहे. ज्या कर्मभूमीत गुरुजी राहिले, तेथील माती कपाळी लावताना अंगावर रोमांच उभे राहिले होते. जीवन कृतकृत्य झाल्याचे समाधान लाभले होते. पुढे शिक्षण संपल्यावर आयुष्यभर गुरुजींसारखं शिक्षण क्षेत्रात, मलाही ज्ञानदानाचे कार्य करता आले, हे मी माझे संचीत समजतो.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा गुरुजींचा स्थायीभाव होता. तो त्यांच्या वर्तनातून, वागण्या-बोलण्यातून, राहणीमानातून स्पष्टपणे दिसत असे. लांबकोट, काळी टोपी, ठसठशीत मिश्या आणि गळ्याभोवती उपरणे गुंडाळलेल्या गुरुजींची मूर्ती सात्विक वाटे. पायघोळ धोतर नेसलेले गुरुजी पुस्तकाविना सहसा दिसत नसत. अगदी प्रवासातदेखील त्यांच्याजवळ पुस्तकं असत. गाडीत, रेल्वेत फार काय वेटिंग रूममध्येदेखील, ते फावल्या वेळात पुस्तक वाचून, आपली ज्ञानाची तहान भागवीत असत. असा ज्ञानपीपासू व वेळेचे महत्त्व जाणणारा शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय व्हायला वेळ लागला नाही. गुरुजींनी लवकरच विद्यार्थ्यांची मने जिंकली होती.

शिक्षणशास्त्राचे कोणतेही शिक्षण घेतलेले नसताना, गुरुजींचे अध्यापन आदर्श होते. आदर्श शिक्षकांच्या अंगी असावेत, असे सारे गुण त्यांच्या ठायी होते. वर्गात शिकवताना गुरुजी कधीही खुर्चीत बसून शिकवत नसत. शिकवताना त्यांना पाठ्यपुस्तकाचीही गरज पडत नसे. कारण, विद्यार्थ्यांप्रमाणे ते स्वतः वर्गात शिकवायच्या विषयाचा सखोल अभ्यास घरुन करून येत. विषय शिकवतांना त्यांनी वेळेच्या आणि वेळापत्रकाच्या मर्यादेत स्वतःला मर्यादित करून घेतले नव्हते. एखादा विषय शिकवताना दुसर्‍या विषयाचा संदर्भ आला, तर ते त्या विषयावरही सर्वांकष चर्चा करीत. त्यांची माहिती व शिकवण्याची पद्धत इतकी अद्यावत असे, की विद्यार्थी तासंतास त्यांच्या शिकवण्यात मंत्रमुग्ध होत. पुढे गुरुजींचे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर गेले. त्यांनी आपल्या आठवणीत लिहून ठेवलेले आहे की, गुरुजी आम्हाला शिकवत होते हे सांगताना आम्हाला फार अभिमान वाटतो. वर्गात शिकवताना धड्यातील कारुण्य प्रसंगांनी रडलेले गुरुजी त्यांना पाहता आले. गुरुजींनाही आपण शिकवलेल्या करूण रसात साश्रूपूर्ण नेत्रांनी डुंबलेले विद्यार्थी पाहता आले. संवादाने मनामनाच्या तारा जुळवणारे धन्य ते गुरुजी आणी धन्य ते विद्यार्थी.

साने गुरुजींनी आपल्या व्यवसायात तन-मन धन अर्पण केले. कर्मज्ञान आणि त्यागाचा वसा घेतला. गांधी विचारांवर नितांत श्रद्धा ठेवली. यातूनच त्यांचे ओजस्वी, तेजस्वी व्यक्तिमत्वाला बहर आला. गुरुजींनी जीवनात संयम, विवेक, सेवा, प्रेम आणि सहकार्य यांना फार महत्त्व दिले. स्वच्छता, टापटीप आणि शिस्त त्यांना प्रिय होती. कोणतेही काम करण्यात त्यांनी कमीपणा वाटून घेतला नाही. त्यांनी मुलांवर आई सारखं प्रेम केलं. त्यांना मातृहृदयी शिक्षक ही ओळख मिळाली. यामुळेच विद्यार्थी व सहकार्यांमध्ये ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले.

शालेय अध्यापनाचे काम करत असतानाच गुरुजींवर छात्रालय प्रमुखांची जबाबदारी येऊन पडली. गुरुजींचा बहुतांशी वेळ विद्यार्थ्यांच्या सानिध्यात जात असे. गुरुजी, छात्रालयात असलेल्या विद्यार्थ्यांचे आई-बाप, भाऊ, मित्र होते. कोणत्याही वयाच्या विद्यार्थ्यांशी ते सहज संवाद साधत. त्यास आपलंस करून टाकत. छात्रालयात विद्यार्थी खर्‍या अर्थाने घडवता येतो, हे गुरुजींनी पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना मायेने स्वावलंबन, सचोटी, सहकार्य, स्वाभिमान, देशाभिमान व बंधुभाव या गोष्टी शिकविल्या. शिक्षक म्हणजे वेगळा प्राणी, असे ते समजत नसत. खोटी प्रतिष्ठा कुरवाळत बसण्यापेक्षा, मुलांमध्ये मुलांसारखे होऊन राहण्यात त्यांना आनंद वाटे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही त्यांच्याबद्दल उगाच भीती वाटत नसे. त्यांचे कार्यालय विद्यार्थ्यांनी सतत गजबजलेले राही. त्याकाळी शिक्षकांना विद्यार्थी दचकून असत. ती भीती गुरुजींनी सहज दूर केली होती. छात्रालयात प्रभातसमयी, गुरुजी सर्वांना प्रेमाने उठवीत. त्यांना हवं नको ती चौकशी करीत. आजारी विद्यार्थ्यांची सेवा सुश्रुषा करीत. वेळप्रसंगी त्यांचे मल-मूत्रही आवरीत. मायच्या प्रेमाची पखरण करणार्‍या शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांना प्रेम, आपुलकी, ममता वाटली नाही, तर नवलच नाही का ? मात्र, अशाही परिस्थितीत काही टार्गट, आळशी विद्यार्थीही असत. गुरुजी त्यांना शिक्षा न करता, त्यांची कामे स्वतः करून टाकीत. यातून विद्यार्थी वरमायचे, शरमायचे. मग ते गुरुजींची माफी मागत. अशाप्रकारे गुरुजी दगडातही देवपण आणीत असत. गुरुजी स्वतः कष्ट सोसत. स्वतःहून सर्वांना समजून घेत. समजून सांगत. यातून विद्यार्थ्यांमध्ये आपोआप सुधारणा दिसून येत असे. संयम हा गुरुजींचा महत्त्वाचा गुण. त्यामुळे आपल्या शिकवण्याच्या तत्काळ परिणामांची, त्यांना अपेक्षा नसे. ते वाट पाहायला तयार असत. मात्र, गुरुजी काही वेळा संतापत. संतापले म्हणजे त्यांच्या संताप वरच्या श्रेणीचा असे. अशावेळी ते स्वतःला शिक्षा करुन घेत. अबोला धरत. ही शिक्षा मुलांना सहन होत नसे. ते तात्काळ गुरुजींची माफी मागत.

विद्यार्थ्यांशी सर्वार्थाने एकरूप झाला, तोच खरा शिक्षक. असे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची मनं वाचू शकतात. त्यांचा आनंद, त्यांचे दुःख, त्यांच्या अडचणी, आशा-अपेक्षा जाणून घेऊ शकतात. त्यावर उपायही करतात. त्यांच्या भविष्याला आकार देतात. साने गुरुजी असेच शिक्षक होते. त्यांनी अनेकांच्या अडचणी ओळखल्या. त्या सोडविल्या. कुणाच्या शाळेचे फी दरमहा भरली. कुणाच्या पुस्तकांचा खर्च उचलला. कित्येकांची जेवणाची सोय केली. अनेकांची प्रत्यक्ष सेवा केली. यासाठी, त्यांनी स्वतःच्या खर्चावर मर्यादा घातल्या. पोटाला चिमटा दिला. मात्र, कुणालाही हिरमुसलं होऊ दिलं नाही. यामुळे, त्यांच्या पगारातील फार थोडा भागच त्यांच्या वाट्याला येई. त्यातही ते आनंदी राहत असत. त्यांचा आनंद भौतिक गोष्टींवर अवलंबून नव्हता. तो त्यांच्या स्वतःच्या मनाच्या निर्मळतेवर अवलंबून होता.

साने गुरुजी विद्यार्थ्यांवर वेगवेगळे प्रयोग करीत. शाळा आणि छात्रालय हे विद्यार्थ्यांना संस्कार आणि ज्ञानाची दीक्षा देणारी प्रयोगशाळा आहे, असे ते मानत. निसर्ग हा खरा शिक्षक असून, ज्ञानदानाचे कार्य चार भिंतीच्या वर्गात बसून करण्याचे काम नाही, अशीही त्यांची धारणा होती. नव्हे, तसा त्यांना विश्वास होता. म्हणून, वर्गात शिकवीत असतांना एखाद्या वेळी पाऊस सुरू झाला, तर ते शिकवणं थांबवून, मुलांना निसर्गाच्या वर्षाधारांच्या नृत्याविष्कार पाहायला मुक्त सोडू देत. त्यांच्या अशा वागण्यात कामचुकारपणा नव्हता. याची वरिष्ठांनाही कल्पना होती. गुरुजी जे करतील, ते चांगलेच करतील आणि त्यात विद्यार्थ्यांचे हितच दडलेले असेल, असा विश्वास त्यामागे असायचा.

शिकवत असतानाच, गुरुजी विद्यार्थ्यांना समतेची शिकवण देत. अतिशय छोट्या छोट्या, साध्या साध्या प्रसंगातून महामंत्र देण्याची कला त्यांच्या ठाई होती. एखाद्या विद्यार्थ्याने आणलेला डबा अथवा खाऊ ते इतरांना वाटत. अशावेळी त्या निष्पाप लेकरांना जात-पात, धर्म, पंथ शिवू शकत नसे. आपला खाऊ दुसर्‍याला देण्यासाठी लागणारी मनाची विशालता, अशा प्रसंगातून गुरुजी विद्यार्थ्यांत निर्माण करीत. उच्च-निच्च हा भेदाभेद त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये येवू शकला नाही. जगात फक्त एकच धर्म असून तो फक्त प्रेम करणं शिकवतो, असं गुरुजी म्हणत. या उदात्त विचारातून त्यांच्या, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीन पददलीत, तया जावून उठवावे.! या प्रार्थनेचा जन्म झाला. त्यांच्या शाळेतील गड्यासाठी त्यांनी सोसलेले कष्ट, मुलांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले होते. त्याच्या अंत्यसमयी त्याला बंधू मानून गुरुजींनीच अग्निडाग दिला. यापेक्षा विशाल बंधुप्रेमाचे उदाहरण मुलांना कुठे दिसणार होते. अशा दीपस्तंभासारख्या शिक्षकांची शिकवण, मुले कशी विसरतील. असे प्रसंग, अशा घटना विद्यार्थ्यांच्या मनःपटलावर प्रकाश टाकत. आणि अनपेक्षित पणे त्यांना दिव्य ज्ञानाचा लाभ होई. कृतीतून विद्यार्थी धडा शिकत. धन्य ते विद्यार्थी. धन्य ते शिक्षक. असा शिक्षक पुन्हा होणे नाही.

तो काळ स्वातंत्र्यसंग्रामाचा काळ होता. गुरुजींसारख्या सहनशील व्यक्तीलाही पारतंत्राची जोखड झुगाराविशी वाटत होती. त्यांना शाळा आणि छात्रालयाचे क्षेत्र मर्यादित व बंदिस्त वाटू लागले होते. स्वातंत्र्यलढ्यात आपणही खर्‍या अर्थाने सहभागी व्हावे, असे त्यांना वाटले. त्यांनी पूज्य बापूजींची आज्ञा आणि दिक्षा घेवून स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. 29 एप्रिल 1930 साली गुरुजींनी शाळा सोडली. ते स्वातंत्र्यसैनिक झाले. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. देशात शेतकर्‍यांचे राज्य यावे, असे त्यांना वाटे. देशात स्वातंत्र्याचे वारे वहात होते. सारा देश पेटून उठला होता. गुरुजींनीही आपली शब्दांची मशाल पेटवली. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. शेतकर्‍यांच्या राज्यासाठी, लावू पणाला प्राण.! असे सूर गुंजू लागले. विविध ठिकाणी सभा रंगू लागल्या. माणसं पेटू लागली. देशभक्तीने प्रेरित होऊ लागली. स्वातंत्र्यसंग्रामात झोकून देऊ लागली. यामागे उभी होती एक संयमित, अबोल, अमोघ शक्ती. सेनानी साने गुरुजी. एका आदर्श शिक्षकाचे, एका राष्ट्रप्रेमी स्वातंत्र्यसैनिकात रूपांतर झाले होते. वेळप्रसंगी शिक्षकाला आपली भूमिका बदलवता आली पाहिजे, हेच गुरुजींनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिले.

– ‘देवरुप’, नेताजी रोड, धरणगाव, जि.जळगाव.

- Advertisment -

ताज्या बातम्या