'स्वराभिषेक' पंडित जितेंद्र अभिषेकी

'स्वराभिषेक' पंडित जितेंद्र अभिषेकी

एक प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार व गायक म्हणून नावलौकिक असलेले पंडित जितेंद्र अभिषेकी यांची आज जयंती. गोव्यातल्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणार्‍या नवाथे यांच्या घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यामुळे जन्मजात त्यांना गायनाचा वारसा मिळाला. अगदी लहानपणापासून पंडीतजींचे कान संगीताच्या सुरांकडे टवकारायचे. संगीत ऐकलं की ते रडणं थांबवायचे. संगीताचा वारसा लाभलेला पंडीतजी मोठे होत असतांना संगीतातले स्वर आणि तबल्याचे बोल हेच त्याचे सवंगडी बनले.

पंडीत जितेंद्र अभिषेकींचे वडील कीर्तनकार असले तरी त्यांचाही शास्त्रीय संगीताचाही अभ्यास चांगलाच होता. त्यांच्याद्वारे पंडीतजींच्या बालमनावर कीर्तनातील अभंगाचे आपोआपच संस्कार झाले. वडिलांचे मधुर स्वर कानी पडूनच पंडीतजींच्या जडणघडणीला सुरुवात झाली. 14 व्या वर्षापर्यंत त्यांना वडिलांकडून संगीताची तालीम लाभली. दुर्गा, देस, काफी, खमाज असे संगीतातील विविध राग पंडीतजी वडिलांकडून शिकले. त्यामुळे लहानपणीच पंडीतजींना मूळ रागांची ओळख झाली. त्यावेळी गोव्यात पोर्तुगीजांचे राज्य होते. पोर्तुगीज शाळेत चार वर्षं शिक्षण घेतल्यानंतर तत्काळ महाविद्यालयात प्रवेश मिळत असे. त्यामुळे हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर म्हापुश्यात पोर्तुगीज कॉलेजमध्ये त्यांनी दोन वर्ष शिक्षण घेतले.

पंडीतजी सुरुवातीला गिरीजाबाई केळकरांकडे संगीत शिकण्यासाठी जात. पंडीतजींनी 4-5 वर्षे गिरीजाबाईंकडे संगीताचे धडे गिरवले. संगीतातील उच्च शिक्षणाच्या ओढीने पंडीतजी गोवा सोडून पुण्यात आले. एकूण 21 गुरुंकडून पंडीतजींनी संगीताचे ज्ञान आत्मसात केले. त्यांच्याद्वारे मिळालेले संस्कार आत्मसात करून त्यांनी स्वतःची स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. संगीताची आराधना सरू असतानाही त्यांनी शालेय तसेच महाविद्यालयीने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. संस्कृतचे पदवीधर झालेल्या पंडीतजींचे वाचनही अफाट होते. पंडीतजी पुढे मुंबईत आले. येथे त्यांनी मोठ्या भावाकडे राहून मुंबईतील भवन्स महाविद्यालयातून बीएचे शिक्षण पूर्ण केले.

मुंबईतील मुक्कामात त्यांनी आकाशवाणीत तब्बल 9 ते 10 वर्षं नोकरी केली. आकाशवाणीतील कोकण विभागात रुजू झाल्यानंतर पंडीतजींनी विविध कामे केली. येथे त्यांनी गाण्यांना चाली देणे, नाटके बसविणे, डबिंग करणे, गीतांचे गायन करणे याबरोबरच बातम्या आणि बातम्यांचे भाषांतर करणे अशी चौफेर कामे केली. येथेच त्यांना मोठमोठ्या गायकांची रेकॉर्ड्स ऐकणे, जुन्या लोकांची गाणी ऐकून त्यावर विचार करणे तसेच साहित्य वाचनाची गोडी निर्माण झाली. अशाप्रकारे पंडीतजींच्या व्यक्तिमत्वाला अधिक झळाळी मिळत होती.

पंडीतजींचे मराठी रंगभूमीसाठी दिलेले योगदानही मोलाचे आहे. 1964 साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकातील पदांनाही पंडीतजींनी संगीत दिले होते. त्यांच्या संगीत दिग्दर्शनातील प्रयोग प्रेक्षकांना, संगीत रसिकांना खूप आवडले. कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात पंडीतजींनी भैरवीने केली. संगीत दिग्दर्शनात हातखंडा असलेल्या पंडीतजींचा आवाजही प्रखंड गोडवा होता. त्यामुळे दुसर्‍यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणीत काम करत असताना त्यांची पु. ल. देशपांडेंसोबतची ओळख वाढली.

पुढे आकाशवाणीच्या बिल्हण या संगीतिकेत पु. लं. च्या संगीत दिग्दर्शनात मंगेश पाडगावकर लिखित गाणी पंडीतजींनी गायली. आकाशवाणीत कामाला असताना त्यांनी अनेक कोकणी गाण्यांना संगीत दिले. एवढेच नाही तर वैशाख वणवा या चित्रपटात दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले गोमू माहेरला जाते हो नाखवा हे गीतही त्यांनी म्हटले. 1986 मध्ये पंडीतजी पुण्यात स्थायिक झाले. 1986 ते 95 या काळात त्यांनी पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवात गायन केले. संगीतकलेची लाभलेली ही दैवी देणगी पंडीतजींनी स्वतःपूरती मर्यादित न ठेवता आपल्या शिष्यांनाही मुक्तहस्ताने बहाल केली. पंडितजींनी अनेक नाट्यपदांना चाली दिल्या. त्यामध्ये कट्यार काळजात घुसली व अमृत मोहिनी हे विशेष सांगता येतील. घेई छंद मकरंद या पदासाठी गायनशैली तर ईश्वरी देणगीच आहे. हे सर्वात्मका सर्वेश्वरा या पदावरुन प्रत्ययाला येते. हे पद म्हणजे नाट्यसंगीतातलं पसायदान आहे. काटा रुते कुणाला हे सुरांनो चंद्र व्हा या व अशा अनेक रचना त्यांनी केल्या.

पंडितजी त्यांच्या सांगीतिक कार्यामुळे आपल्यात अजरामर झाले. त्यांच्या स्वर अमृताचा अभिषेक रसिकजनांवर अखंडपणे होतोय. एक आदर्श गुरु, आदर्श शिष्य, संगीत दिग्दर्शक, थोर विचारवंत आणि माणूस म्हणूनही थोरच आहेत. मन मोहवणारं भावसंगीत, जुन्या सुरांना नवा साज देऊन जिवंत केलेली नाट्यसंगीतातली परंपरा हे सगळं हातचं राखून न ठेवता मुक्तहस्ताने वाटणारे गुरु त्यांच्या शिष्यांचे जीवनगाणे बनलेले आहेत. अशीच चुटपुट लावून पंडितजी 7 नोव्हेंबर 1998 रोजी हा इहलोक आणि संगीताचा न संपणारा खजिना देऊन आपल्यातून जरी गेेले असले तरी संगीताच्या रूपाने अजरामरच आहेत. शेवटी एकच म्हणता येईल सर्वात्मका सर्वेश्वरा या गाण्यातील परम भाव आणि कैवल्याच्या चांदण्याला या गाण्यातील आर्तता आपल्याला कधीही विसरणे शक्यच होणार नाही.

- वर्षा श्रीनिवास भानप

9420747573

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com