पर्याय पोषकता वाढवण्याचा

पर्याय पोषकता वाढवण्याचा

- डॉ.एच.एन.मिश्रा,

अन्नोत्पादन तज्ज्ञ

कुपोषणाच्या समस्येचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने खाद्यपदार्थांमधील पोषक घटक वाढविणे हा आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि तांत्रिकदृष्ट्या ठोस पर्याय आहे. भारतात तांदूळ हा लोकांचा प्रमुख आहार आहे आणि सर्व सामाजिक, आर्थिक वर्गांच्या लोकांच्या आहारात भाताचा समावेश असतो. लोहाच्या कमतरतेची समस्या आटोक्यात आणण्यासाठी तांदळात लोह तत्त्व, फोलिक अ‍ॅसिड आणि ब-12 जीवनसत्त्वाने युक्त करणे हा एक नवा आणि चिरस्थायी उपाय आहे.

आजारांपासून बचावाची आणि आजार झाल्यास त्यांच्याशी लढण्याची क्षमता आहारात असते. ही गोष्ट ओळखून इसवीसनाच्या 400 वर्षांपूर्वी हिप्पोक्रेट्स यांनी अशी संकल्पना मांडली होती की, आहार हेच आपले औषध आणि औषध हाच आपला आहार झाला पाहिजे. आधुनिक प्रगती आणि संशोधनातून ज्या निष्कर्षाला सबख पुरावे प्राप्त करतात तो म्हणजे, कार्यशील खाद्यपदार्थ आणि पोषण-औषधींमध्ये रोगप्रतिकारक संस्थेची प्रतिक्रिया कमी-अधिक करण्याची तसेच ती व्यवस्थित करून संसर्गापासून बचाव करण्याची क्षमता असते. संतुलित पोषक घटकांनी युक्त एक आरोग्यदायी आहार, नैसर्गिकरीत्या आणि पर्यावरणाच्या कारणाने उत्पन्न झालेल्या मुक्त कणांना निष्क्रिय करू शकतो. मुक्त कण शरीराच्या अनेक भागांत ऑक्सीडेटिव्ह तणावास कारणीभूत ठरतात आणि त्यामुळेच रोगजन्य परिस्थिती निर्माण होते आणि आधुनिक औषधे यामुळे झालेले नुकसान भरून काढते.

निरोगी आहारात असणारे अँटी ऑक्सिडेन्ट मुक्त कणांना निष्क्रिय करतात आणि पेशींचा र्‍हास रोखतात. म्हणजेच आजार सुरू होण्याआधीच तो रोखतात आणि त्यामुळे औषधांची गरजच राहत नाही. एका आरोग्यसंपन्न समाजाच्या निर्मितीत आहार महत्त्वाची भूमिका बजावत असतो आणि यापुढेही बजावत राहील.

विविधतेने युक्त तसेच संतुलित आहाराची अनुपलब्धता कुपोषणाकडे घेऊन जाणारी ठरते. त्यामुळे मानवी आरोग्य आणि शारीरिक परिस्थितीच्या बाबतीत विपरित परिणाम समोर येऊ शकतात. उदाहरणार्थ, बौद्धिक अकार्यक्षमता, जन्मजात अकार्यक्षम असणे, आंधळेपण आदी. कुपोषणाचे परिणाम केवळ मानकांपर्यंत मर्यादित नसतात, तर त्यामुळे उद्भवलेल्या शारीरिक आणि मानसिक आव्हानांमुळे उत्पादकता आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो. कुपोषण ही एक जुनी समस्या आहे आणि नेहमीच लोकप्रशासन आणि जनकल्याण यापुढील ती एक मोठे आव्हान ठरली आहे. भारतासारख्या विकसनशील देशाच्या आर्थिक समृद्धीत त्यामुळे अडथळे येतात.

मुले, महिला आणि दारिद्—यरेषेखालील जीवन जगणार्‍यांच्या दृष्टीने कुपोषण ही एक गंभीर समस्या आहे. 136 कोटी लोकसंख्येच्या या देशात ज्यांच्या आहार प्रणालीत कार्बोहायड्रेट हा प्रमुख घटक असतो, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी नैसर्गिकरीत्या विविधतापूर्ण आहार उपलब्ध करणे हे एक प्रचंड मोठे काम आहे.

अशा स्थितीत आहारात पौष्टिक घटकांचे प्रमाण विज्ञानाधारित दृष्टिकोनातून संतुलित करणे आवश्यक असते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लोकांमध्ये सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता रोखण्यासाठी आणि त्यांचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना उपलब्ध आहेत. या उपायांमध्ये जैविकरीत्या खाद्य उत्पादनांमधील पोषक घटकांत वाढ करणे आणि पूरक पोषक घटक यांचा समावेश आहे. खाद्य उत्पादने पोषक घटकांनी युक्त करणे ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यात सूक्ष्म विचार करून जीवनसत्त्वे, खनिजे आणि अन्य पोषक घटक अन्नधान्यात विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून अन्नधान्याची पोषण गुणवत्ता वाढू शकेल. जैविकरीत्या अन्नधान्य उत्पादनात पोषक घटक वाढवणे हा प्रजनन तंत्रज्ञानाचा एक प्रयोग आहे, ज्यात प्रमुख अन्नधान्यांमध्ये सूक्ष्म पोषक घटक वाढविले जातात. आहार पोषक घटकांनी युक्त करण्याची प्रक्रिया वेगळी असून, जैविकरीत्या अन्नधान्यात पोषक घटक वाढविणे ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि त्यासाठी पर्याप्त गुंतवणूक सुरुवातीस करणे आवश्यक असते.

आहार पोषक घटकांनी युक्त करण्याच्या प्रक्रियेसाठी प्रतिव्यक्ती प्रतिवर्ष अंदाजे खर्च 0.12 डॉलर इतका असतो, तर भारतात तांदळातील पोषक घटक जैविकरीत्या वाढविण्याचा खर्च 16,00,000 डॉलर प्रतिवर्ष (राष्ट्रीय स्तरावरील एकंदर खर्च) एवढा आहे. पूरक पोषक घटकांची पूर्तता करण्याच्या प्रक्रियेत अधिक प्रमाणात उपभोग वाढण्याची जोखीम असते. मात्र नियंत्रित प्रक्रियेअंतर्गत प्रमुख अन्नधान्यात पोषक घटकांचे प्रमाण वाढविण्याची प्रक्रिया हा पोषणासंबंधी सर्वांत कुशल आणि किफायतशीर मार्ग मानला जातो. युरोप आणि अमेरिकेसारख्या विकसित देशांत अन्नधान्य उत्पादनांमध्ये पोषक घटक वाढविण्याचा कार्यक्रम राबविल्याने गॉइटर, क्रेटिनिजम, पेलाग्रा आणि जेरोफथाल्मिया यांसारखे सूक्ष्म पोषक घटकांच्या आभावामुळे होणार्‍या आजारांवर यशस्वीरीत्या मात करणे शक्य झाले आहे. बालमृत्यूचा दर सर्वाधिक असण्यामागे हे आजार कारणीभूत असल्याचे मानले जात होते.

भारताची सुमारे 65 टक्के लोकसंख्या आहारातील प्रमुख म्हणून तांदळावर अवलंबून आहे. भारत हा तांदळाचा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वाधिक उत्पादक देश आहे आणि तांदळावर प्रक्रिया करणार्‍या गिरण्या (मिल) तांदळावर प्रक्रिया करताना त्याची एकूण पोषणाचे 10 ते 12 टक्के प्रमाण असणारे तुकडा तांदूळ सहउत्पादन म्हणून बाहेर काढतात.

तांदळाच्या सुदृढीकरणाच्या प्रक्रियेत या तुकडा तांदळाच्या दाण्यांचा उपयोग एक वाहक म्हणून आहारात कोणतेही परिवर्तन न करता मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत विशेषतः कमी उत्पन्नगटातील लोकांपर्यंत आवश्यक सूक्ष्म घटक पोहोचविण्यासाठी करतात.

तुकडा तांदळाचे दाणे दळून जो आटा तयार केला जातो तो जीवनसत्त्वे आणि खनिजे या घटकांच्या मिश्रणात (प्रीमिक्स) मिसळून नंतर त्या मिश्रणाला तांदळाच्या आकारासारख्या दाण्यांचे स्वरूप दिले जाते. सामान्यतः ते मिश्रण फोर्टिफाइड राइस कर्नेल (एफआरके) या नावाने ओळखले जाते. हे एफआरके एफएसएसएआय प्रक्रियेद्वारे सूक्ष्म पोषक घटकांची निर्धारित सांद्रता प्राप्त करण्यासाठी 1ः100 प्रमाणात सामान्य तांदळात मिसळले जातात.

आयआयटी खडगपूरने विकसित केलेल्या स्वदेशी प्रक्रियेने देशी तांदळाच्या तुलनेत एफआरकेचा रंग, घनत्व, आकार, कार्यात्मक आणि स्वयंपाकाशी संबंधित गुणांमधील अंतराशी संबंधित आधीपासून असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे. उत्सारणाची (एक्सट्रूजन) प्रक्रिया सूक्ष्म पोषक घटकांना अधिक उत्तम प्रकारे कायम राखते आणि त्यांना स्थिरता प्रदान करते.

ही प्रक्रिया सुदृढीकरण कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एक किफायती पर्याय प्रदान करते. या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एफआरकेची उत्पादन प्रक्रिया आणि सर्वसाधारण तांदळाशी त्याचे मिश्रण करण्याची प्रक्रिया यांच्यावर नियमित देखरेख, गुणवत्तेसंबंधी काळजी आणि नियंत्रण करण्याच्या दृष्टीने केल्या जाणार्‍या सुधारणात्मक उपायांच्या अंतर्गत संचालित केले गेले पाहिजे.

या सूक्ष्म पोषक घटकांचा खुराक कमी किंवा अधिक होऊ नये म्हणून जीएमपी, जीएचपीशी संबंधित उपयुक्त उपाय आणि मानके असायला हवीत. कोणत्याही अन्य अन्नप्रक्रिया उद्योगाप्रमाणे या कार्यक्रमात सातत्य कायम राखण्यासाठी कठोर मानके आणि नियम तसेच त्यावरील प्रभावी देखरेख महत्त्वाची ठरेल. विषाक्ततेच्या परिस्थितीपासून बचावासाठी सूक्ष्म पोषक घटकांचे अतिरिक्त सेवन टाळणे आवश्यक असून, त्यासाठी पोषक घटकांच्या सर्वोच्च स्तरासंबंधी मानकांची सूचना करण्यात आली आहे. सर्वोच्च प्रमाणापेक्षा थोड्या अधिक प्रमाणात सूक्ष्म पोषक घटकांचा उपयोग केल्याने प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका कमी असल्याचे दिसून आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com