आता डेंग्यूची दहशत

आता डेंग्यूची दहशत

एखादा संसर्गजन्य आजार पसरल्यानंतर एकमेकांवर दोषारोप करण्याची स्पर्धा लागते, हा प्रशासकीय बेफिकिरीचा (Administrative inconvenience) परिणाम आहे. भारतात दरवर्षी डेंग्यूचे (dengue) हजारो रुग्ण आढळून येतात आणि शेकडो लोक मृत्युमुखीही (Death) पडतात. परंतु असे असूनसुद्धा त्यापासून बचावाची पुरेपूर तयारी प्रशासन करते का? जगभरात डेंग्यूचा डंख झेलणार्‍या देशांमधील एकूण रुग्णसंख्येच्या 50 टक्के रुग्ण एकट्या भारतात आढळतात, यातच या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे.

भारतात दरवर्षी डेंग्यूचे हजारो रुग्ण आढळून येतात आणि शेकडो लोक मृत्युमुखीही पडतात. परंतु असे असूनसुद्धा त्यापासून बचावाची पुरेपूर तयारी प्रशासन करते का? जगभरात डेंग्यूचा डंख झेलणार्‍या देशांमधील एकूण रुग्णसंख्येच्या 50 टक्के रुग्ण एकट्या भारतात आढळतात, यातच या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेवर आधीच प्रचंड ताण आलेला आहे आणि तिसर्‍या लाटेच्या शंकेमुळेही सर्वत्र भीती कायम आहे. अशा स्थितीतच डेंग्यू, चिकुनगुणिया, विषाणुजन्य ताप आदी आजारांशी एकाच वेळी लढा देण्याची वेळ आली, तर आपली आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडून जाऊ शकते.

उत्तर प्रदेशनंतर दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश, हरियानासह देशातील अनेक राज्ये सध्या डेंग्यूच्या आजाराशी मुकाबला करीत आहेत. मध्य प्रदेशातच आतापर्यंत सुमारे तीन हजार रुग्ण आढळून आले आहेत. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद, मथुरा आणि आग्रा जिल्ह्यांमध्ये डेंग्यूमुळे शंभराहून अधिक मृत्यू झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, या क्षेत्रांमध्ये ‘डी-2’ या डेंग्यूच्या नवीन स्वरूपाचा प्रादुर्भाव झाला आहे आणि डेंग्यूच्या अन्य स्वरूपांपेक्षा तो अधिक घातक आहे. याचा संबंध ङ्गडेंग्यू शॉक सिंड्रोमफशीही जोडला जात आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या म्हणण्यानुसार, अनेक रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांत डेंग्यूच्या या घातक स्वरूपाचा फैलाव झाल्याच्या वास्तवाला पुष्टी मिळाली आहे.

तो खूपच वेगाने फैलावतो आणि प्राणघातक ठरू शकतो. या आजारात रुग्णाला ताप आल्यानंतर त्याचा रक्तदाब अचानक कमी होतो आणि त्यामुळे रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. याखेरीज प्लेटलेट्सवरही याचा परिणाम होतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अशा रुग्णांची त्वचा, अंगात ताप असतानासुद्धा थंड जाणवते.

शॉक सिंड्रोममध्ये रुग्णाला बेचैनी जाणवते आणि हळूहळू त्याची शुद्ध हरपते. त्याच्या हृदयाचे ठोके कधी अतिजलद गतीने पडतात तर कधी अगदी संथपणे पडतात. रक्तदाब कमी होत जातो आणि त्यामुळे रुग्णाला धक्का बसून त्याच्या महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होत जातो. अनेक वेळा शॉक सिंड्रोम झालेल्या रुग्णांना अशा वेळी रुग्णालयात नेले जाते, जेव्हा त्याची प्रकृती खूपच नाजूक बनलेली असते आणि तेव्हा त्याला वाचविणे अवघड होऊन बसते. अनेकदा डेंग्यूमध्ये पेशींमधून साइटोकाइन पदार्थ निघू लागल्याने रक्तवाहिन्यांना जोडणार्‍या कॅपिलरीतून रक्तस्राव होऊ लागतो आणि रक्तातून प्लाज्मा बाहेर येऊ लागतो. त्यामुळेच रुग्णाचा रक्तदाब कमी होतो.

प्लाज्माचा स्राव झाल्यानंतर फुफ्फुसे, हृदय आणि पोटाच्या वरील भागात तो जमा होऊ लागतो. एम्सच्या तज्ज्ञांच्या मते, सामान्यतः लोक डेंग्यूच्या रुग्णावरील उपचार त्याच्या शरीरातील प्लेटलेट्सच्या गणनेनुसारच करतात. परंतु त्याच्या प्लेटलेट्सवर लक्ष ठेवण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असते हेमेटोक्रिट आणि रक्तदाबावर लक्ष ठेवणे. हेमेटोक्रिट ही लाल रक्तपेशींच्या संख्येची टक्केवारी आहे.

पुरुषांमध्ये ती 45 आणि महिलांमध्ये 40 असते. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये याचा स्तर सामान्य स्तरापेक्षा अधिक वाढू लागला, तर त्याचा अर्थ असा की, रुग्णाच्या कॅपिलरीमधून रक्ताच्या प्लाज्माचा स्राव होऊ लागला आहे आणि हा जीवघेणा ठरू शकतो. कॅपिलरी म्हणजे अशा रक्तवाहिन्या असतात, ज्यांची भिंत डेंग्यूमध्ये अधिक जाळीदार होते. त्यामुळे प्लाज्माचा स्राव होऊन तो शरीरतच आसपास जमा होऊ लागतो.

या हंगामात दरवर्षी डेंग्यूची अशीच जीवघेणी दहशत पाहायला मिळते. परंतु तरीसुद्धा प्रशासन डेंग्यूला रोखण्यासाठी वेळेवर उपयुक्त पावले उचलत नाही. जेव्हा एकाएकी सर्व ठिकाणची परिस्थिती बिघडू लागते, तेव्हा गाढ झोपेतून प्रशासन खडबडून जागे होते. देशाच्या अनेक राज्यांमध्ये डेंग्यूचा प्रकोप पाहायला मिळतो. हजारो लोक पीडित होऊन रुग्णालयांत भर्ती होतात. त्यातील शेकडो लोक मृत्यूच्या जबड्यात ढकलले जातात.

डेंग्यू, चिकुनगुणिया आणि विषाणुजन्य ताप या वास्तविक नैसर्गिक आपत्ती नाहीत, तर प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा दुष्परिणाम आहेत. जर प्रशासन दरवर्षी साथ येण्यापूर्वीच औषधांची फवारणी करू लागले आणि त्याचबरोबर या आजारांना रोखण्यासाठी गंभीरपणे अन्य उपाययोजना केल्या, तर या आजारांपासून बचाव शक्य आहे. प्रशासनाच्या बेफिकिरीचाच परिणाम म्हणून अनेक राज्यांमध्ये अनेक भाग असे दिसतात, जिथे प्रत्येक गल्ली-मोहल्ल्यात, प्रत्येक कुटुंबात रुग्ण आढळतोच.

अर्थात दरवर्षी 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन पाळला जातो. हातात वेळ उपलब्ध असतानाच योग्य कार्यवाही व्हावी आणि डेंग्यूचा धोका कमीत कमी करावा, हा त्यामागील उद्देश असतो. परंतु जबाबदार लोकांच्या नाकर्तेपणामुळे दरवर्षी डेंग्यूची जीवघेणी दहशत आपल्याला झेलावी लागते आणि हीच जणू सर्वसामान्य नागरिकांची नियती बनली आहे. दरवर्षी जवळजवळ सर्व ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी चोख उपाययोजना केली गेल्याचे दावे केले जातात; परंतु डेंग्यूची जीवघेणी दहशत जेव्हा अचानक समोर उभी ठाकते, तेव्हा सर्व दावे फोल ठरतात आणि परिस्थिती बिघडल्यामुळे प्रशासनाच्या नाकी नऊ येतात.

अधिकांश ठिकाणी डासांची वाढ रोखण्यासाठी वेळेपूर्वीच समाधानकारक उपाययोजना केल्या जात नाहीत, हेच वास्तव आहे. त्यामुळेच सरकारी आणि खासगी रुग्णालयांतसुद्धा डासांच्या झुंडी फिरताना दिसतात आणि डेंग्यूच्या बरोबरीनेच चिकूनगुणिया, मलेरिया तसेच स्वाइन फ्लूचे रुग्ण दरवर्षी आढळून येतात.

डेंग्यू असो वा अन्य कोणताही संसर्गजन्य आजार असो, त्याचा प्रकोप वाढल्यानंतर खासगी प्रयोगशाळांमधून घाईगडबडीने चाचण्यांचे दर वाढविले जातात आणि अनेक ठिकाणी तर प्रशासनाशी हातमिळवणी करून या आजारांच्या चाचणीच्या आडून रुग्णांच्या नातेवाइकांची लूट करण्याचा खेळ बिनधास्तपणे खेळला जातो. दर तीन-चार वर्षांच्या अंतराने डेंग्यू एक महामारी म्हणून समोर उभा ठाकतो. सुमारे तीन वर्षांपूर्वी भारतात डेंग्यूचे एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण समोर आले होते.

तेव्हा एम्समध्ये डेंग्यूच्या दहा वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास केला गेला आणि त्यातून असे स्पष्ट झाले की, एम्समध्ये डेंग्यूमुळे होणार्‍या रुग्णांच्या मृत्यूचा दर सात ते दहा टक्के एवढा आहे. डेंग्यू आता दिवसेंदिवस इतका खतरनाक होत चालला आहे की, काही ठिकाणी तर रुग्णांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर हाल होतात. अनेक रुग्णांच्या शरीरातील अधिकांश अवयव काम करेनासे होतात आणि मग त्याचा मृत्यू होतो.

परिस्थितीचा अभ्यास करणार्‍यांचे असे म्हणणे आहे की, काही वर्षांपूर्वी डेंग्यूचा परिणाम वेगवेगळ्या अवयवांवर होण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागत असत. आता मात्र एका आठवड्याच्या आतच डेंग्यूचा परिणाम मूत्रपिंडे, यकृत आणि आतड्यांपर्यंत पोहोचतो आहे आणि शरीराचे ते अवयव काम करणे बंद करीत आहेत. सध्या अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की, डेंग्यूच्या रुग्णांनी रुग्णालये ओसंडून वाहत आहेत.

काही ठिकाणी तर एकेका बेडवर दोन-तीन रुग्णांना ठेवावे लागत आहे आणि नवीन रुग्णाला भर्ती करून घेण्यासाठी आता जागाच उरलेली नाही. कोरोना संसर्गामुळे आपली आरोग्य यंत्रणा आधीच मोठा भार सहन करीत आहे आणि तिसर्‍या लाटेची चिंताही कायम आहे.

अशा परिस्थितीत डेंग्यू, चिकूनगुणिया, विषाणुजन्य ताप आदी आजारांशी एकाच वेळी लढावे लागत असल्याने आरोग्ययंत्रणा पूर्णपणे कोलमडून जाऊ शकते. कोरोनापासून धडा घेऊन आपण काही शिकलो तर बरे होईल. कोरोनाने मुळातच आपल्या प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल खेलेली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com