Saturday, May 11, 2024
HomeUncategorizedएनएमआरडीए : विकासाची 'स्मार्ट' पाऊलवाट

एनएमआरडीए : विकासाची ‘स्मार्ट’ पाऊलवाट

प्रतिभा भदाणे, सहसंचालक, नगररचना तथा नियोजनकार एनएमआरडीए

नाशिक शहरासोबतच त्याच्या आजूबाजूच्या परिसराचाही विकास होणे तेवढेच गरजेचे आहे. उद्योगधंदे व व्यवसायांचा विचार, रोजगारवृद्धीतून स्थानिकांना विकासाच्या संधी उपलब्ध करणे ही व्यापक संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून ‘नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ची (एनएमआरडीए) स्थापना करण्यात आली आहे. शहरविकासाची कामे करणे व विकासाचा शाश्वत पर्याय उपलब्ध करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

- Advertisement -

सुवर्ण त्रिकोणातील एक शहर ही नाशिकची ओळख! मागील काही दिवसांत ‘कुंभनगरी’ ते जगाची ‘वाईन कॅपिटल’ ही झपाट्याने बदललेली नाशिकची जरा हटके ओळख! अलीकडच्या काही वर्षांत नाशिक शहराने त्याची वेस ओलांडली आहे.

शहराचा झपाट्याने चौफेर विकास होत आहे. दहा ते पंधरा किलोमीटर शहराचा परिघ वाढत आहे. महापालिकेकडून विकास आराखड्यातून नियोजनबद्ध विकास सुरू आहे. शहराची लोकसंख्या 20 लाखांवर पोहोचली आहे. ‘स्मार्ट सिटी’त नाशिकचा समावेश झाला आहे.

त्यामुळे नाशिकला सर्वांगीण विकासाचे कोंदण लाभणार आहे, पण नाशिक शहरासोबतच त्याच्या आजूबाजूच्या परिसराचाही विकास होणे तेवढेच गरजेचे आहे. उद्योगधंदे व व्यवसायांचा विचार, रोजगारवृद्धीद्वारे स्थानिकांना विकासाच्या संधी उपलब्ध करणे ही व्यापक संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून ‘नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ची (एनएमआरडीए) स्थापना करण्यात आली.

शहरविकासाची कामे करणे व विकासाचा शाश्वत पर्याय उपलब्ध करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. प्रारंभी विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांच्याकडे प्राधिकरणाची जबाबदारी होती. नाशिक महानगर विकासाच्या विविध योजना, प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी नाशिक महानगर प्रदेश प्राधिकरण अर्थात ‘एनएमआरडीए’ची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणाचा उद्देश, त्याची रचना, चतु:सीमा आणि त्यासाठी विविध घटकांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांत शहरीकरणाचा वेग प्रचंड वाढत आहे. एका अभ्यासानुसार सध्याच्या शहरीकरणाचा 3.5 टक्के क्षेत्राचा असलेला वेग 2050 पर्यंत 10 टक्के क्षेत्रापर्यंत विस्तारणार आहे. ते लक्षात घेऊन प्राधिकरणाची संकल्पना आकारास आली आहे. मुंबई, पुणे, नागपूरनंतर नाशिकमध्ये या प्राधिकरणाची स्थापना झाली.

जागतिक पातळीवर काही देशांकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीसाठी निधी उपलब्ध आहे. परंतु त्यांना योग्य पर्याय मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन प्राधिकरणाच्या अखत्यारीतील क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी सोयी-सुविधांची उपलब्धता करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. विकासाचे प्रारूप मांडताना एखाद्या शहराची संकल्पना उचलणे अभिप्रेत नाही.

या भागातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढवणे, जागेचा वापर करण्याचे मापन, नियोजन, जागांची उपलब्धता यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाणार आहे. नाशिक शहरासाठी महापालिका अस्तित्वात आहे. महापालिका कार्यक्षेत्रात ‘एनएमआरडीए’चे काम राहणार नाही. एनएमआरडीएसाठी शासनाने 2649.94 चौरस किलोमीटरचे क्षेत्र निश्चित केले आहे.

या क्षेत्राचा नियोजनबद्ध सर्वकष विकासाच्या दृष्टिकोनातून काम करण्याची प्राधिकरणावर जबाबदारी आहे. या प्रक्रियेत शासन-प्रशासन व प्राधिकरणाला योग्य दिशा दाखवण्यासाठी विविध संघटनांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नाशिकचा विचार करता औषधनिर्मिती व संरक्षण क्षेत्रातील उद्योगांना पोषक वातावरण आहे.

जगातील बाजारपेठेत भारतातून मोठ्या प्रमाणात औषधांची निर्यात केली जाते. केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रातील उद्योगांना चालना देण्याचे धोरण ठेवले आहे. नाशिकला संरक्षण दलाशी संबंधित अस्थापनांचे सान्निध्य लाभले आहे. त्याच्यासह अन्नप्रक्रिया उद्योगांचा विचार प्रामुख्याने करता येईल.

उद्योगांची उभारणी करताना ते पुढील काही पिढ्या सक्षमपणे कार्यरत राहतील याचा विचार होईल. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हादेखील नाशिकच्या प्राधिकरण क्षेत्राच्या विकासाला गती देणारा ठरणार आहे. एनएमआरडीच्या कार्यक्षेत्रात नाशिक मनपाचे क्षेत्र वगळून इतर भागाचा समावेश होतो. त्यात त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड, इगतपुरी, नाशिक आणि सिन्नर या तालुक्यांतील काही गावांचा समावेश आहे.

दृष्टिक्षेपात ‘एनएमआरडीए’

* नाशिक जिल्हा क्षेत्रफळ : 15,530 स्क्वेअर किलोमीटर

* तहसील कार्यालय – 13

* एनएमआरडीए विकास क्षेत्र – 18 टक्के

* एनएमआरडीएच्या अखत्यारीतील सीमा (नाशिक शहर आजूबाजूचा परिसर) पूर्व – 30 किमी निफाड, पश्चिम – 36 किमी त्र्यंबकेश्वर, उत्तर – 24 किमी दिंडोरी, दक्षिण – 36 किमी इगतपुरी.

* एनएमआरडीएचे एकूण क्षेत्र 2649.14 स्केअर किलोमीटर

* एकूण खेडी – 275

* तालुकानिहाय समाविष्ट खेडी: नाशिक 81, निफाड 47, सिन्नर 33, दिंडोरी 32, त्र्यंबकेश्वर 35, इगतपुरी 47.

विकासासाठी आवश्यक घटक

नाशिक शहर व एनएमआरडीएच्या समाविष्ट होणार्‍या भूभागाचे महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे पाण्याची मुबलक उपलब्धता, उपजाऊ मृदा व कुशल मनुष्यबळाची उपलब्धता ही जमेची बाजू ठरतात. हा भाग कृषी व त्या निगडीत उत्पादने यासाठी ओळखला जातो.

द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुले यांचे उत्पादन व त्याची निर्यात यासाठी हा भाग प्रसिद्ध आहे. हा सर्व प्रदेश ऐतिहासिक स्थळे व मंदिरे, लोककला व परंपरा यासाठीदेखील ओळखला जातो. या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करून पर्यटनस्थळांचा विकास केल्यास देशासह जगभरातील पर्यटकांची पावले इकडे वळतील.

नाशिकसह निफाड, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी व सिन्नर येथील विकासामुळे अर्थकारणाला गती मिळेल. त्यातून विकासाचा वारु चौफेर उधळू शकतो. या ठिकाणी फार वेगळे काही करावे लागेल असे नाही. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथील परिसराला निसर्गसौंदर्याचे कोंदण लाभले आहे तर निफाड, दिंडोरीतील द्राक्षबागा व वाईनरी ही विकासासाठी ‘कि पॉईंट’ आहेत.

‘एनएमआरडीए’मध्ये समाविष्ट भागात उद्योगधंदे स्थापना व व्यापार उदिमाला चालना देता येईल. रसायने व औषध निर्मिती, ऑटोमोबाईल हब, इलेक्ट्रानिक वस्तूंचे उद्योग यासाठी पोषक वातावरण आहे. दळणवळणाच्या सुविधेनेदेखील हा परिसर भौगोलिकदृष्ट्या योग्य आहे. ‘टुरिझम इंड्रस्टी’ला येथे मोठा वाव आहे.

गोदावरीचे वरदान

जगातील प्रमुख व प्राचीन शहरे ही नदीकाठावर उदयास आल्याचे पाहायला मिळते. जगातील अनेक संस्कृती नदीकाठी बहरल्या. नाशिक शहराच्या विकासात गोदामाईचे योगदान महत्त्वाचे ठरते. धार्मिक, पर्यटन, उद्योगधंदे या सर्व क्षेत्राचा विकास गोदामाईमुळे झाला. नाशिकच्या विकासासाठी गोदामाई वरदान ठरली.

‘एनएमआरडीए’चा विचार करता या भागात गोदावरी, दारणा, वालदेवी, आळंदी या नद्या वाहतात. या क्षेत्रात अनेक छोटी-मोठी धरणे आहेत. शेतीचा व्यावसायिकदृष्ट्या विकास करण्यासाठी व सिंचन प्रकल्प राबवण्यासाठी नदी व धरणांचा उपयोग करून घेणे शक्य आहे. पाण्याची विपुल उपलब्धता ही जमेची बाजू आहे.

दळणवळणाचे विस्तीर्ण जाळे

नाशिक व त्याच्या आजूबाजूचा म्हणजे एनएमआरडीएचे क्षेत्रात पायाभूत सुविधांचे जाळे आहेत. येथून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. तर चार राज्य महामार्ग येथून जातात. यामुळे अंतर्गत दळणवळण सुलभ झाले आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसराचा झपाट्याने विकास झाला आहे.

राज्याची आर्थिक राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर या महाराष्ट्राच्या दोन टोकांना जोडणार्‍या समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. इगतपुरी व सिन्नर या दोन तालुक्यांतून हा महामार्ग जात आहे. त्यामुळे आजूबाजूचा परिसर आर्थिकदृष्ट्या विकसित होणार आहे.

विकासाच्या संधी

कृषिपूरक उत्पादन उद्योग, उत्तम वातावरण, सुपीक जमीन, सिंचन व्यवस्था, पाण्याची उपलब्धता यातून येथे कृषी उत्पादनावर आधारित उद्योगधंदे सुरू करता येतील.

वाइनरी : निफाड आणि दिंडोरी येथील द्राक्षबागा ही नाशिकची ओळख! दरवर्षी अमेरिका, युरोप, आखाती देशांत येथून द्राक्षनिर्यात केले जाते. यासाठी शेतकर्‍यांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे. द्राक्षांपासून येथे तयार केली जाणारी वाईन जगप्रसिध्द आहे. येथे वाइनरी उद्योगासाठी मोठी संधी आहे.

पर्यटन उद्योग : जगभरात पर्यटन उद्योग (टुरिझम इंडस्ट्री) झपाट्याने वाढत आहे. पर्यटनामुळे अर्थकारणाला चालना मिळत असून त्यातून रोजगार उपलब्ध होतो. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, निफाड व दिंडोरी येथे पर्यटन विकासाच्या अमाप संधी उपलब्ध आहेत. त्र्यंबक व इगतपुरी येथील नद्या, पर्वत, धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. साहसी पर्यटनात बोटिंग व ट्रेकिंगच्या दृष्टीने वरील ठिकाणांना भवितव्य आहे. पर्यटन वाढले म्हणजे हॉटेल व हॉस्पिटॅलिटी सेक्टर विकासाला प्रचंड संधी आहेत.

आरोग्यवृद्धी केंद्र : उत्तम हवामान, निसर्गसौंदर्य व हिरवाई ही नाशिकची मुख्य आकर्षणे आहेत. त्यामुळे आरोग्यवृद्धीसाठी अनेक रुग्ण नाशिकला वर्षातून काही दिवस मुक्कामी असतात. ते बघता निसर्ग उपचार केंद्र, योगधाम, मेडिटेशन व वेलनेस सेंटर यासाठी परफेक्ट लोकेशन आहे. त्या दृष्टिकोनातून त्याचा विकास गरजेचा आहे.

एज्युकेशन हब : पुणे आणि मुंबईनंतर चांगल्या शिक्षणासाठी विद्यार्थी व त्यांचे पालक नाशिकला पसंती देतात. मागील काही वर्षांत अनेक मोठे व नामवंत शैक्षणिक संस्थांनी नाशिकलगत महाविद्यालये, युनिव्हर्सिटी स्थापन केल्या. त्यात मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी उच्चशिक्षण घेत आहेत. ‘एज्युकेशन हब’ बनण्याची नाशिकची नक्कीच क्षमता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या