Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedश्री क्षेत्र निझर्णेश्वर

श्री क्षेत्र निझर्णेश्वर

मनोलीकडील नेमबाई परिसराकडून भगवान शंकर व पार्वतीचे आगमन कोकणगाव ता. संगमनेर पासून पुर्वेला एक मैल अंतरावरील सनकडी पर्वतावर झाले. या पर्वतावर त्यांचे पाय उमटलेले आहेत. तसेच या पर्वताच्या उत्तरेला पायथ्याजवळ भगवान शंकरास दही-भाताची उलटी झाली व दोघांनीही या ठिकाणी विश्रांती घेतल्याची अख्यायिका आहे. येथे विश्रांती केल्याने सुरुवातीस तेथेच छोटेसे मंदीर बांधलेले आहे.

काही कालावधीनंतर पांडवांनी सनकडी व बनकडी या सह्याद्री पर्वतांच्या रांगामध्ये निर्झराच्या कडेला यज्ञयाग करुन शिवलिंगाची स्थापना केली. निर्झराच्या म्हणजेच ओढ्याच्या कडेला असल्याने या देवस्थानास ‘निझर्णेश्वर’ असे नाव पडले असे म्हटले जाते. चहुबाजूने पर्वत, अगदी निसर्गरम्य वातावरण, दर्‍या- खोर्‍या भरपूर झाडे, झुडपे व प्रसन्न वातावरण लाभलेला हा निझर्णेश्वराचा परिसर. कालांतराने पांडवांचे जवळच असलेल्या जोर्वे गावाकडे प्रस्थान झाले. या ठिकाणी पांडव आणि जरासंघाचे युद्ध झाले. यात जरासंधाचा वध झाला. जरासंघाचा वध करुन पांडव कोल्हेवाडी येथील डोंगरावर विसाव्यासाठी गेले. या ठिकाणी श्रीकृष्ण पांडवांच्या भेटीसाठी आल्याने या परिसरात गोधन मोठ्या प्रमाणात असून आजही दुधामुळे जणू या परिसरात गोकुळ अवतरल्याचे दिसते.

- Advertisement -

श्री क्षेत्र निझर्णेश्वर मंदिराचे बांधकाम अहिल्याबाई होळकर यांच्या काळात निमगावजाळी येथील सरदार त्रिंबकजी डेंगळे यांनी केलेले आहे. मंदिराच्या परिसरात तत्कालीन बारवा सुद्धा आहेत. चहुबाजुने चार दरवाजे तर पुर्वेस प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा आहे. 1891 साली सदगुरु गंगागिरी महाराज फिरत फिरत या परिसरात आले आणि परिसर पाहुन भारावून गेले. ग्रामस्थांना बोलावून या ठिकाणी सप्ताह घेण्याचा मनोदय व्यक्त केला. ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील जनतेने त्यास उदंड प्रतिसाद दिला. या परिसरात पाण्याची कमतरता होती. अनुयायांनी आपल्या गुरुंच्या आज्ञेनुसार गंगेतून पालखीत पाणी आणून मंदीर परिसरातील बारवेत टाकून पाणी टंचाईवर मात करत सप्ताह यशस्वीरित्या पार पडला.

सप्ताह चालु असतांना तुपाची कमतरता निर्माण झाली. महाराजांनी बारवेतून पाणी घेतले आणि त्याचे तुपात रुपांतर झाले. आणि दैवी शक्तीने तुपाची उणीव सुद्धा दूर झाली. रुढी परंपरेनुसार आजही हा सप्ताह नियमित सुरु आहे. याकामी कोकणगाव परिसरातील ग्रामस्थ व भक्तांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळत असते. थोर संत, महंतांच्या परिस स्पर्शाने पवित्र झालेल्या या परिसरात साईबाबाही वास्तव्यास होते. या ठिकाणी श्री संत कैकाडी महाराज, रामराव महाराज देसाई व कोंडाजी काका यांनीही अधिक मासात या ठिकाणी सप्ताह केलेले आहेत.

पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील व त्यांच्या संपूर्ण परिवाराची श्री क्षेत्र निझर्णेश्वरावर नितांत श्रद्धा कै. बाळासाहेब विखे पाटील यांनी विखे पाटील कारखान्याच्या वतीने मोठा बंधारा बांधलेला असून 1972 साली महाशिवरात्रीच्या दिवशी या परिसरात रहीमपूर येथून विज उपलब्ध करुन या परिसराला तिमिरातून तेजाकडे नेण्याचे महान कार्य केले. खासदार निधीतून संगमनेर-लोणी हायवे पासून मंदिरापर्यंत डांबरी रस्ता तयार करुन दिला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पा. सहकारी साखर कारखान्याच्या वतीने परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करुन त्यांना जतन करण्यासाठी बैलगाडीने पाणी उपलब्ध करुन देवून स्वखर्चाने कर्मचारी नियुक्त करुन त्यांचे रक्षण करुन परिसराचे नंदनवन करण्याकामी मोलाचे योगदान दिले.

खासदार विखे यांचे इच्छेनुसार 1977 साली मंदिराच्या कारभारासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली. संपूर्ण विखे परिवाराचे श्रद्धास्थान असल्याने या परिवाराने या परिसराच्या विकासासाठी कधीच हात आखडता घेतला नाही. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांचेवतीने भक्तनिवास, कमान, पॅगोडा, टॉयलेट, पाण्याची टाकी तर माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने पेव्हींग ब्लॉक, स्ट्रिट लाईट, टॉयलेट इत्यादी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. आजही त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिसराचा विकास सुरु आहे.

1932 साली कै. काशिनाथ सदाशिव काशिद यांनी कोकणगाव व पंचक्रोशीतील भक्तांच्या मदतीने या मंदिराचा जिर्णोद्धार केला, तसेच निमगावजाळीचे शिवभक्त शिवाजी सखाराम जोंधळे यांनी मंदिराच्या आतील परिसरात फरशीकामी बहुमोल सहकार्य केले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या कन्या सौ. दुर्गाताई तांबे यांनी आपल्या वडीलांना एका लाकुडतोड्याची कथा ऐकविली त्यातून प्रेरणा घेऊन भाऊसाहेब थोरात यांनी दंडाकारण्याची चळवळ उभी केली आणि संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याच्यावतीने या परिसरात दंडकारण्य चळवळीतून अनेक झाडांच्या बियाणांची लागवड केली गेली. यातून या परिसराचा निसर्ग फुलतच गेला आहे.

येथे मौनगिरी संत जनार्दन स्वामींनी आपल्या असंख्य अनुयायांसह अनुष्ठान देखील केलेले आहे. तसेच शांतीगिरी महाराज यांचेही भव्य अनुष्ठान या ठिकाणी झालेले आहे. 1991 साली सराला बेटाचे मठाधिपती महंत नारायणगिरी महाराज यांचा 100 वा भव्य-दिव्य सप्ताह कोकणगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ भक्त व विश्वस्तांच्या सहकार्याने याच परिसरात संपन्न झालेला आहे.

श्री क्षेत्र देवगड, ता. नेवासा येथील किसनगिरी महाराजांनी सुद्धा येथे भेट दिलेली आहे. नेवासा येथील श्री उद्धव महाराज व सराला बेटचे महंत मठाधिपती श्री रामगिरी महाराज यांच्या हस्ते 2017 साली श्री गणपती, हनुमान, सावित्री, लक्ष्मी, विठ्ठल व रुख्मिनीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे.

26 डिसेंबर 2012 रोजी मंदिराच्या मुख्य गाभार्‍यातील प्राचीन शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे सूचनेनुसार महामंडलेश्वर शिवानंद गिरीजी महाराज मंंझुर यांचे हस्ते व राक्षस भवनचे पोपट गुरु यांच्या होम हवनाने व मंत्रोच्चाराने पार पडला.

माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनीही या परिसराचे रुपडे पालटण्यासाठी आमदार निधीतून पेव्हींग ब्लॉक, सभामंडप, रस्त्याचे डांबरीकरण करुन योगदान दिलेले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे वतीने मंदिर फाट्यावर कमान उभारलेली आहे. कोकणगाव-शिवापूर व निझर्णेश्वर परिसरातील जनता व भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी रहिमपूर येथून राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाईप लाईनसाठी प्रस्ताव करण्यासाठी पंचायत समिती संगमनेर, जिल्हा परिषद सदस्या पद्माताई थोरात, महेंद्र गोडगे, बेबीताई थोरात, कोकणगावचे सरपंच शरद थोरात, ग्रामसेवक नागरे यांनी मोलाचे योगदान दिले. तर या प्रस्तावास मंजुरी देवून तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी मंजुरी देवून मोठे योगदान दिले. सध्या हे काम वेगाने सुरु आहे.

दरवर्षी येथे श्रावण महिन्यात दर सोमवारी मोठी यात्रा भरत असते. या काळात या परिसरात अहमदनगर, नाशिक व औरंगाबाद या जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्यावतीने येथे चोख बंदोबस्त ठेवला जातो. तसेच कोकणगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच विश्वस्तांचेही बहुमोल सहकार्य मिळत असते. मंदिराचे अध्यक्ष एकनाथ नाना जोंधळे, विश्वस्त, ग्रामस्थ यांच्यावतीने परिस्थितीवर सतत लक्ष असते. तर होम, हवन, पुजा, आर्चा, विवाह तसेच अभिषेक व आरतीसाठी शरद कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते. मंदिर परिसराच्या विकासासाठी परिसरातील तसेच वेगवेगळ्या ठिकाणाहून येणार्‍या भाविकांची देणगीच्या स्वरुपात मोठी मदत मिळत असते. निझर्णेश्वर मंदिराच्या फाट्यावर यु.पी.चे महंत सिताराम बाबा, कचरु गेणू शिंदे, शिवापूरचे माजी पोलीस पाटील माधव पारधी, अध्यक्ष एकनाथ जोंधळे, वनविभागाचे कर्पे यांच्यावतीने संकटमोचन हनुमान मंदिर स्थापन केले आहे. या ठिकाणी भजन किर्तनासाठी श्री निझर्णेश्वर भजनी मंडळ, अडबंगीनाथ भजनी मंडळ व हनुमान महाराज भजनी मंडळाचे सतत सहकार्य लाभत असते.

– आनंदा जोंधळे

9765495416

- Advertisment -

ताज्या बातम्या