Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedवर्ष नवे, आव्हाने नवी!

वर्ष नवे, आव्हाने नवी!

– विनायक सरदेसाई

आधुनिक जगाच्या इतिहासात आलेल्या कोरोना विषाणू संक्रमणाच्या महासंकटाने 2020 या वर्षावर आलेली काजळी काहीशी कमी होत जात 2021 या नव्या वर्षात आपण प्रवेश केला. भारतासाठी हे वर्ष अनेक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.

- Advertisement -

नव्या वर्षात अनेक आव्हानांचा डोंगर देशापुढे आहे. भारतीय अर्थव्यवस्था कोरोना संकटातून बाहेर पडली असली तरी महागाई, इंधनदरवाढीच्या आव्हानांनी चिंतेत भर घातली आहे. चीनी संकटाची टांगती तलवारही कायम आहे. अशातच चालू वर्षी पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम रंगणार आहे. एकंदरीत, येणारा काळ कसोटीचा आणि कस लावणारा आहे.

जुने जाऊद्या मरणालागुनी,

जाळूनी किंवा पुरुनी टाका

ही भावना मनात घेऊनच अवघ्या जगाने 2021 या नव्या वर्षात प्रवेश केला. कारण 2020 हे वर्ष जगाच्या आधुनिक इतिहासातील एक महाभयानक वर्ष ठरले. कारण विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीनंतर चंद्रावर वस्तीला जाण्याचे इमले रचणार्‍या मानवाला केसांपेक्षा 900 पट लहान असणार्‍या एका विषाणूपुढे अक्षरशः हात टेकावे लागले. जागतिक अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडून गेली. बेरोजगारी उच्चांकी पातळीवर गेली. नवे सामाजिक प्रश्न निर्माण झाले. जीवनाच्या सर्व अंगांवर या विषाणू महासंकटाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम झालेले दिसले. वर्ष संपता संपता कोरोनावरील लसींच्या आगमानाच्या सुवार्ता आल्या आणि नव्या वर्षासाठी आशादायक चित्र निर्माण झाले. 2020 मधून 2021 मध्ये झालेला प्रवेश हा केवळ एक वर्ष संपून दुसरे वर्ष एवढ्या पुरता मर्यादित नसून आता नवे दशक सुरु झाले आहे. कोणत्याही प्रवासाला निघताना ज्याप्रमाणे आपण रस्त्याचा, तेथील परिस्थितीचा अदमास घेतो; त्याचप्रमाणे या नव्या दशकातील प्रारंभीच्या वर्षाची वाटचाल करताना समोरील आव्हानांचा वेध घेणे आवश्यक आहे.

कोरोनाचे काय होणार?

नव्या वर्षांत पदार्पण करताना लसीमुळे आशावाद पसरला असला तरी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे चिंतेतही भर पडली आहे. विषाणूंमध्ये म्युटेशन किंवा जनुकीय बदल होणे ही बाब नवी नाही. पण ब्रिटेनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रसार पूर्वीच्या विषाणूपेक्षा 70 टक्के अधिक होत असल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आणि सूक्ष्मजीवशास्रातील तज्ज्ञ या म्युटेशनमुळे लसींवर परिणाम होणार नाही; उलट लसीकरण मोहीम वेगाने चालवली पाहिजे असे सांगत आहेत; परंतु जगभरातील स्थिती लक्षात घेता प्रमुख लसींचे साईड इफेक्टस्ही दिसून येत आहेत. त्यामुळे लसीकरण हा हुकमी एक्का असला तरी तो वापरण्यातील जोखीमही मोठी आहे. दुसरीकडे, संपूर्ण अर्थव्यवस्था अनलॉक झाल्यानंतर आता शाळांची घंटाही वाजणार आहे. अशा स्थितीत योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही तर संक्रमण वाढण्याची टांगती तलवार कायम आहे. सुदैवाने, भारतात आजमितीला कोरोना संक्रमणाचा आलेख घसरणीला लागला आहे. अनेक कोविड सेंटर्स रुग्णांअभावी बंद केली जात आहेत. अशीच स्थिती पुढेही कायम राहायची असेल आणि कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडायचे असेल तर शासन-प्रशासनाकडून देण्यात येणार्‍या निर्देशांचे नागरिकांकडून काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. तसेच परदेशातून येणार्‍या सर्वच प्रवाशांच्या तपासण्यांबाबत जराही ढिलाई होता कामा नये. तरच 2021 च्या मध्यापर्यंत आपल्याला लसीच्या साथीने खर्‍या अर्थाने ङ्गन्यू नॉर्मलफ आयुष्य जगता येईल. याबाबतचे भाकित कुणालाच वर्तवता येणार नाही. त्यामुळे आपण ङ्गहोप फॉर द बेस्ट, बट प्रिपेअर फॉर द वर्स्टफ या नीतीनुसार वाटचाल करणे क्रमप्राप्त आहे. कोरोनाचा धडा घेऊन आणि येणार्‍या दशकभराचा विचार करुन आरोग्यव्यवस्थेत क्रांती घडवून आणण्यासाठी ठोस आणि भरीव पावले निधीची तरतूद करुन टाकणे गरजेचे आहे.

रोजगारसंधींचा सुकाळ

कोरोना महामारीचा शिरकाव होण्यापूर्वीच देशात बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कोरोनाने उद्योगधंदे संकटात सापडल्याने रोजगाराची दैना उडाली. गेल्या 8-9 महिन्यात एकीकडे बेरोजगारांची संख्या कमालीची वाढलेली आहे, तर दुसरीकडे अस्तितत्त्वात असलेल्या नोकर्‍यांमधील नोकरदारांना पगारकपातीचा सामना करावा लागत आहे. तथापि, 2021 हे वर्ष रोजगाराच्या दृष्टीने सकारात्मक असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. याचे कारण लॉकडाऊननंतरच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था वेगाने घोडदौड करत आहे. तसेच रोजगारनिर्मितीत महत्त्वाचा वाटा असणार्‍या सेवाक्षेत्रातील संधी विस्तारल्या आहेत. अद्याप पर्यटन आणि हॉटेल इंडस्ट्री, तसेच बांधकाम क्षेत्र यांची स्थिती नाजूक असली तरी साधारण चालू वर्षाच्या मध्यावधीपर्यंत या क्षेत्रातही सुधारणा होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी शक्यता आहे. अर्थातच, कोरोनामुळे बदललेल्या परिदृश्यात कामाचे, रोजगाराचे स्वरुप बदलणार आहे. वर्क फ्रॉम होम, फ्री लान्सिंगच्या कामांची संख्या चालू वर्षी वाढत राहील, असे दिसते. तसेच ऑटोमेशनला चालना दिली जात असल्याने नव्या कौशल्यांचे रोजगार निर्माण होतील. असेही नव्या दशकाचा विचार केल्यास आता कृत्रिम बुद्धीमत्ता, रोबोटिक्स यांचे युग अवतरणार आहे. त्यादृष्टीने कौशल्यविकासाला आधुनिकतेची जोड देणे गरजेचे आहे. आज जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष भारताकडे आहे. येणार्‍या काळात भारतात मोठी गुंतवणूक होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यातून रोजगारनिर्मितीची स्थिती निश्चितच सुधारताना दिसेल. दुसरीकडे एका सर्वेक्षणानुसार 87 टक्के कंपन्यांनी 2021 मध्ये कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीच्या योजना आखल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वेतनाच्या आघाडीवरही दिलासादायक स्थिती आहे. केंद्र सरकारकडून आत्मनिर्भर भारत मिशन वेगाने पुढे नेले जात आहे. त्याचा प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. याचा फायदा घेत नवतरुणांनी देशात आयात होणार्‍या वस्तूंच्या निर्मितीबाबत संशोधन आणि पुढाकार घेतल्यास त्यांचे भविष्य निश्चित उज्वल असेल.

महागाईचे आव्हान

महागाई हा घटक सर्वसामान्यांसाठी अत्यंत संवेदनशील असतो. कारण त्याच्या जगण्यावर याचा परिणाम होतो. मोदी सरकारच्या कार्यकाळाचा विचार करता गेल्या 5-6 वर्षांत महागाई बर्‍याच प्रमाणात नियंत्रणात राहिली. तथापि, कोरोनानंतरच्या काळात सर्वसामान्यांचे खिसे रिकामे झालेले असतानाच महागाईनेही डोके वर काढले आहे. नोव्हेंबर महिन्यात महागाई निर्देशांक 6.93 वर पोहोचला होता. आजघडीला बाजारात खाद्यतेलापासून भाज्या आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती लक्षणीयरित्या वाढलेल्या दिसताहेत. टाळेबंदीमुळे विस्कळित झालेली उत्पादनसाखळी हे यामागील एक कारण असले तरी दुसरे कारण आहे ते इंधनदरवाढीचे. पेट्रोल-डिझेलचे भाव शंभरीच्या दिशेने निघाले आहेत. यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमती वधारत जाणार आहेत. कारण तेलाला असणारी मागणी सहा दशलक्ष बॅरल प्रतिदिन इतकी असेल, असा अंदाज आहे. तेलउत्पादक देशांनी उत्पादनकपात आणखी तीन महिने कायम ठेवण्याचे ठरवले आहे. तशातच डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होत चालला आहे. त्यामुळे चालू वर्षी भारतीय बाजारात पेट्रोलने शंभरी पार केल्यास नवल वाटायला नको. जोडीला गॅस सिलिंडरच्या किमतीही वाढत चालल्या आहेत. एकट्या डिसेंबर महिन्यात घरगुती वापराच्या सिलिंडरची किंमत100 रुपयांनी वाढली. येणार्‍या काळात सिलिंडरही आणखी महाग होत जाईल. वास्तविक, गेल्या पाच वर्षांत कच्च्या तेलाच्या किमती त्याआधीच्या पाच वर्षांशी तुलना करता अत्यंत नीचांकी पातळीवर गेल्या होत्या. पण सरकारने याचा फायदा नागरिकांना न देता आपली आर्थिक तूट भरुन काढण्यात धन्यता मानली. इंधनावरील करांचा बोजा कमी करण्याची मागणी आताच्या स्थितीत करता येणार नाही. कारण कोरोनामुळे शासनाचा खर्च प्रचंड वाढला असून उत्पन्न आक्रसले आहे. इंधन ही सरकारला उत्पन्न देणारी कामधेनू आहे. त्यामुळे यापुढील काळात इंधनदरांचा चढता आलेख कायम राहील. अशा स्थितीत महागाईचा भडका उडण्याच्या दाट शक्यता आहेत. याबाबत केंद्र सरकारने पावले उचलली नाहीत तर त्याची मोठी किंमतही मोजावी लागू शकते.

दिशादर्शक निवडणुका

चालू वर्षी देशातील तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, असाम आणि पुदुच्चेरी या राज्यात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम रंगणार आहे. या निवडणुका त्या-त्या राज्यांबरोबरच राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनेही दिशादर्शक असणार आहेत. यातील पश्चिम बंगालमधील निवडणुकांकडे विशेष लक्ष असेल. गेल्या 10 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जींना यंदा भाजपाकडून मोठा शह मिळण्याची शक्यता आहे. ममतांचे एकामागून एक साथीदार भाजपात प्रवेश करत आहेत. तसेच भाजपाचे सर्व बडे नेते आणि खुद्द पंतप्रधान मोदी यांनीही आपला सर्व फोकस या राज्याकडे वळवला आहे. 2019 च्या लोकसभेला मिळालेल्या यशामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अन्य राज्यांत पिछेहाट झाल्यास ती कसर भरुन काढण्यासाठी भाजपाने पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळातील आपल्या विस्तारावर अधिक भर दिला आहे. यंदा प्रथमच जयललिता आणि करुणानिधी या नेत्यांच्या पश्चात तामिळनाडूतील निवडणुका पार पडणार आहेत. तेथील सत्तेची पोकळी भरुन काढण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. केरळ हे डाव्या पक्षांची सत्ता असलेले देशातील एकमेव राज्य आहे. पण तेथील एलडीएफला काँग्रेससोबत आघाडी केलेल्या युडीएफबरोबरच भाजपाकडूनही अनेक जागांवर आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे येणारी निवडणूक डाव्या पक्षांसाठी अस्तित्त्वाची लढाई असेल. या निवडणुकांमध्ये धार्मिक ध्रुवीकरणाबरोबरच केंद्र-राज्य संबंध, एनआरसीसारखे मुद्दे प्रकर्षाने चर्चिले जातील. या चारही राज्यांत जर भाजपाने मुसंडी मारली तर 2024 ची लढाई भाजपासाठी सुकर होणार यात शंका नाही.

चीन-पाकिस्तानचे आव्हान

देशांतर्गत उभ्या ठाकलेल्या समस्यांवर मात करत असतानाच सरकारला सामरीक दृष्ट्याही 2021 हे वर्ष कसोटीचे असणार आहे. अलीकडेच लदाखमधील स्थिती जैसे थे असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. चीनबरोबरच्या चर्चेतून कोणताही तोडगा निघत नाहीये आणि दुसरीकडे चीन सातत्याने सीमेवरील आपली कुमक व तैनाती वाढवत चालला आहे. पाकिस्तानला हाताशी धरुन चीनला भारताला धडा शिकवायचा आहे. सामरीक विश्लेषकांच्या मते, चीन चालू वर्षांत एखादे छोटेखानी युद्ध छेडण्याची दाट शक्यता आहे. कारण आज कोरोनानंतरच्या रचनेत भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा उजळून निघाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थाही कोरोना संकटातून सावरुन वेगाने पुढे जात आहे. चीनला आर्थिक शह देण्यासाठी भारताने सर्व पातळ्यांवर जय्यत तयारी सुरु केली आहे. त्यामुळे एकीकडे सायबर हल्ले, शेजारील देशांच्या मदतीने कुरघोड्या करणे या माध्यमातून भारतविरोधी कारवाया करतानाच संधी साधून एखादी मोठी आगळीक चीनकडून केली जाईल, अशी दाट शक्यता आहे. अशा वेळी अमेरिकेची भूमिका काय राहील हे पाहणे आवश्यक आहे. ट्रम्प यांच्याप्रमाणे जो बायडेन हे चीनबाबत आक्रमक असल्याचे अद्याप तरी दिसून आलेले नाही. त्यामुळे भारतानेही आपली सामरीकसज्जता वाढवण्यावर भर दिला आहे. जर भारत-चीन यांच्यात युद्ध झाले तर त्या युद्धाने 2021 चे सर्व चित्रच पालटून जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या