‘लढाई’ला नवे बळ

‘लढाई’ला नवे बळ

गेल्या दोन वर्षांपासून देशातच नव्हे तर जगात कोरोनाने सर्वांची झोप उडवली आहे. कोरोनाची पहिली, दुसरी आणि आता तिसर्‍या लाटेचे संकट आपल्या दारासमोर येऊन उभे राहिलेे आहे. संसर्गाला रोखायचे असेल तर लसीकरण हे सर्वात मोठे शस्त्र ठरू शकते. आता पाल्यांचेही लसीकरण सुरू झाल्याने कोरोना लढाईला आणखी बळ मिळाले आहे. पालकांनी सजगतेने पाल्यांना लस देण्याबाबत पुढाकार घ्यावा, जेणेकरून कोरोनाचा प्रभाव लवकर कमी होईल.

भारतातील नागरिकांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना ज्या रितीने केला, ते पाहता तिसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यासाठीही भारतीय नागरिक सज्ज आहेत, असेच चित्र आहे. देशवासीय आणि कोरोना वॉरियर्स हे दोन वर्षांपासून सातत्याने संघर्ष करत असून विपरित परिस्थितीतही धाडसी काम करत आहेत. दोन वर्षात कोरोनामुळे देशातील असंख्य नागरिकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे. तरीही जीवनचक्र कधीही थांबले नाही. हे चक्र थांबले तर सर्वच जण बुडतील. म्हणूनच सक्रिय राहणे हे जीवनाचे दुसरे नाव आहे. सकाळ-संध्याकाळपर्यंत कार्यरत राहिल्यास लांबचा पल्ला गाठणे शक्य आहे.

सद्यस्थितीत जग कोरोनाचा नवीन अदृश्य अवतार ओमिक्रॉनचा सामना करत आहे. भारतात देखील ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत चालले आहे. परंतु भारतीयांच्या चेहर्‍यावर फारशी भिती दिसत नाही. अर्थात त्याचे संपूर्ण श्रेय हे यशस्वीपणे राबवण्यात येणार्‍या लसीकरण अभियानाचे आहे. अन्य देशांच्या तुलनेत सर्वात वेगाने लसीकरण भारतात होत आहे आणि यात कोणीही शंका घेण्याचे कारण नाही. 30 डिसेंबरपर्यंत भारताच्या सुमारे 64 टक्के लोकांना कोरोनाचे दोन्ही डोस मिळाले आहेत आणि तब्बल 90 टक्के लोकांना एक तरी डोस मिळाला आहे. संपूर्ण लसीकरणाचे ध्येय साध्य करण्यासाठी आणखी बराच काळ लागू शकतो. यादरम्यान नवीन वर्षात 2022 मध्ये चांगली बातमी आली आणि ती म्हणजे 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाला प्रारंभ झाला. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी सुमारे 40 लाखांहून अधिक मुलांनी लशीचा पहिला डोस घेतला. मुले आणि पालकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवत कोरोनाविरोधाच्या लढाईत मोठी मजल मारली आहे.

15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी एक जानेवारीपासून स्लॉट बुकिंगला सुरवात झाली. पहिल्या दिवशी तब्बल 3 लाख मुलांची नोंदणी झाली. या मोहिमेनुसार 15 ते 18 वयोगटातील 10 कोटी मुलांना डोस देण्यात येणार असून पहिल्या दिवशीचा वेग पाहता ही मोहिम लवकरच यशस्वी ठरेल, असे संकेत मिळत आहेत. मुलांना केवळ भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनच दिली जाणार आहे. लस घेण्याबाबतची नोंदणी कोविन अ‍ॅप किंवा संकेस्थळावर करणे गरजेचे आहे. कोविन अ‍ॅप अतिशय सक्षम असून ते वयोमानानुसार डोस निश्चित करण्याचे काम करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबरला माजी पंतप्रधशन अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मुलांना लस देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर 60 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना आणि कोरोना वॉरियर्सना देखील बूस्टर डोस देण्याची घोषणा केली. ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग पाहता आणि लहान मुलांना संभाव्य धोका लक्षात घेता पालकांच्या चिंतेत एकप्रकारे भर पडली. शाळा आणि कॉलेज बंद केल्याने आणि आणखी कडक निर्बंध घातल्याने प्रत्येक जण पाल्यांची काळजी करत आहे. मुलांना लस नसल्याने त्यांना शाळेत पाठवण्याबाबत दिरंगाई केली जात होती. पण आता मुलांचे लसीकरण सुरू झाल्याने पालकांची चिंता काही अंशी कमी झाली. त्याचवेळी शिक्षण संस्थांना देखील स्थिती सामान्य करण्यास मदत मिळेल.

मुलांच्या लसीकरणाने देशवासीयांचा आत्मविश्वास आणखी वाढेल. पालकांनी देखील कोणत्याही अफवांना बळी पडू नये. त्यांनी देखील जबाबदारीचे भान राखून पाल्यांना लवकरात लवकर लस देण्याबाबत आग्रही राहणे गरजेचे आहे. यात थोडाही निष्काळजीपणा दाखवू नये. भारत बायोटेकने 2 ते 18 वयोगटापर्यंतच्या मुलांना कोव्हॅक्सिनच्या फेज-2, फेज-3 च्या चाचणीचे रिझल्ट जारी केले. या चाचणीत मुलांमध्ये सुरक्षित आणि सहन करण्याजोगे आणि रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाल्याचे निदर्शनास आले. या चाचणीत 374 मुलांत खूपच किरकोळ प्रमाणात किंवा कमी प्रमाणात गंभीर लक्षणे दिसली. त्यापैकी 78.6 टक्के मुले एका दिवसांत बरे झाले. कोरोना प्रतिबंधक लशीचे कोणतेही दुष्परिणाम मुलांवर दिसले नाहीत. मुलांत वयस्करांच्या तुलनेत सरासरी 1.7 टक्के अधिक प्रतिपिंडे होत असल्याचे निदर्शनास आले.525 मुलांवर कोव्हॅक्सिनची चाचणी घेण्यात आली. त्यांना 0.5 एमएलचे दोन डोस देण्यात आले. हे प्रमाण वयस्करांना देण्यात आलेल्या लशीएवढेच आहेत.

आता भारत बायोटेक आणि वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसन हे एकत्र येऊन नेजर व्हॅक्सिन तयार करत आहेत. नेजल व्हॅक्सिनचा सिंगल डोस असेल आणि तो नाकावाटे दिला जाईल. ही लस देखील नवीन वर्षात येईल. लसीकरणानंतर लोक मानसिकदृष्ट्या आणि शारिरीकदृष्ट्या स्वत:ला सुरक्षित समजतील. पालकांची देखील मुलांप्रती असणारी जोखीम अणि चिंता यापासून काही प्रमाणात मुक्ती मिळेल. कोरेानासारख्या संकटकाळात जीवन सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी लस घेणे गरजेचे आहे. पालकांनी कोणत्याही भितीविना मुलांना लस द्यावी. अर्थात पहिल्या दिवशीचा उस्फूर्त प्रतिसाद पाहता पालक मुलांचे संपूर्ण लसीकरण करतीलच, असे वातावरण तयार झाले आहे. याशिवाय सामाजिकरित्या वावरताना जबाबदारीने आचरण करणे गरजेचे आहे. कोविडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. हीच सवय मुलांना देखील लावावी. आपल्याला तिसर्‍या लाटेचा मुकाबला सामूहिक इच्छाशक्तीमधून करायचा आहे.यात आपण यशस्वी ठरलो तर कोरोना संसर्गावर एक प्रकारे मात केल्यासारखे होईल. म्हणून आपल्याला धैर्याने पुढे जावे लागेल.

Related Stories

No stories found.