Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedदिल्ली वार्तापत्र : व्हीआयपी आणि नागरिकांचे सरंक्षण

दिल्ली वार्तापत्र : व्हीआयपी आणि नागरिकांचे सरंक्षण

नवी दिल्ली | सुरेखा टाकसाळ

देशाचे संरक्षण ही कुठल्याही सरकारची पहिली जबाबदारी असते, तसंच देशातील नागरिकांची सुरक्षाही. कारण देश म्हणजे केवळ भौगोलिक सीमांतर्गत प्रदेश नसतो. नागरिकांशिवाय देश असूच शकत नाही…

- Advertisement -

सिनेनटी कंगना रनौत हिने सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या वादात उडी मारली आणि तेव्हापासून तिच्या स्वत:भोवती काही ना काही वादाचा भोवरा फिरतच आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला काही निर्माते दिग्दर्शक यांचे कंपू जबाबदार असल्याचे विधान केल्यानंतर कंगनाने आपला मोर्चा ड्रग माफिया व रिया चक्रवर्ती यांच्याकडे वळवला आणि त्या अनुषंगाने रणवीर कपूर, करण जोहर इत्यादींवरही वार करण्याचे तिने सोडले नाही व वादंगाला धार चढवली ती राज्यकर्ते शिवसेना व मुंबई पोलीस यांच्यावर शाब्दीक तोफ झाडून मुंबई म्हणजे पीओके झाली आहे,’’ या कंगनाच्या वक्तव्यावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया आल्या आणि शेवटी हे सर्व कंगनावरच शेकले.

वैयक्तिक अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देशात आहे. परंतु त्याच्या काही लक्ष्मणरेषाही आहेत. कंगनाच्या आरोपामुळे चिडलेल्या शिवसेनेने मुंबई महापालिकेला हाताशी धरून तिच्या बांद्रा येथील ऑफिसवर धाड घातली.

आणि ‘अनधिकृत’ बांधकाम पाडून टाकले. त्याबरोबर, मुंबई व महाराष्ट्रात नवीन राजकीय बेंडे फुटली. कंगनाची बाजू घेत भाजपने, शिवसेना व मुंबई महापालिका या महानगरातील इतर अनेक अनधिकृत बांधकामांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे. व दाऊदसारख्या गँगस्टरला पाठीशी घालत आहे.

असा आरोप केला. संतप्त शिवसैनिकांनी, ‘‘कंगनाने मुंबईत परत येऊ नये. आम्ही तिला येथे येऊ देणार नाही.’ अशा धमक्या दिल्या आणि एक महिला विरुद्ध शिवसेना असा डाव रंगला. तशातच केंद्र सरकारने कंगनाला ‘वाय प्लस’ सुरक्षा देऊन राज्यात महाआघाडी सरकार स्थापनेपासून सुरू असलेल्या भाजप विरुद्ध शिवसेना या भडकणार्‍या आगीत तेल घातले.

इकडे दिल्लीत ‘‘बॉलीवूड म्हणजे गटार आहे.’’ या भोजपुरी अभिनेता खासदार रवी किशन (भाजप) यांच्या वक्तव्यावर व कंगनाने अंमली पदार्थावरून समस्त सिनेसृष्टीतील कलाकारांवर चढवलेल्या हल्ल्याचा, खा. जया बच्चन यांच्या भूमिकेवर शिवसेनेने मराठी अस्मिता हा प्रतिष्ठेचा मुद्दा केला होता.

अखेर, अमिताभ बच्चन यांनी बाळासाहेब ठाकरे यांची वैयक्तिक भेट घेऊन माफी मागितल्यानंतर प्रकरण शांत झाले होते! आज राजकीय कुरघोडी करण्याच्या नादात राज्य सरकारने बच्चन कुटुंबियांची राज्य सुरक्षा वाढवून कंगनाच्या वाय प्लस सुरक्षेला तोड दिली आहे. प्रश्‍न कोणत्या सरकारने कुणाला किती वैयक्तिक सुरक्षा प्रदान करावी हा नाही.

सुरक्षा कवच देण्याचे काही नियम व निकष कायद्यानुसार ठरविण्यात आलेले आहेत. काही वेळेला, व्यक्तीचे सामाजिक स्थान, त्याचे/तिचे देशासाठी किंवा समाजासाठी योगदान किंवा मौलिक कामगिरी, त्याकरता देखील वैयक्तिक सुरक्षा कवच दिले जाते. परंतु प्रत्येक वेळी ते लायक किंवा पात्र व्यक्तीला दिले जातेच असे नाही.

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी प्रभूतींना समाज कंटकांकडून वारंवार धमक्या मिळवूनही सुरक्षा काही लाभली नाही. ते मारले गेले. मेलेल्या जनावरांची कातडी कमावणार्‍या चार दलित युवकांना काही वर्षांपूर्वी सूरतमध्ये बेदम मारहाण होत असतांना देखील पोलिसांनी बोटही उचलले नाही.

हे कटू सत्य आहे. परंतु सोशल मिडियावर ट्रोल झालेल्या कंगनाला तडकाफडकी वाय प्लस सुरक्षा देण्यात आली. हे देखील कटू सत्य आहे. अनेक नियमांना धाब्यावर बसवून देशात अनेक ठिकाणी अनेक पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात पायी किंवा वाहनांवर जाणार्‍या, क्वचित कधी मास्क न घातलेल्या अनेक लोकांना लाठ्यांनी मारहाण केली.

मात्र, कर्नाटकमध्ये एका मंत्र्याने लवाजम्यासकट मंदिरात जाऊन, तेथील कुंडामध्ये उघडाबंब होऊन डुबक्या मारल्या आणि सोशल डिस्टसिंग, पर्यावरण इत्यादींचा धज्जा उडवला. पण, त्यावर काही कारवाई केली गेली नाही.

अशी नियमांची पायमल्ली केल्याची कितीतरी उदाहरणे गावोगावी, शहरोाहरी सापडतात. एकीकडे ‘‘र्ठीश्रश ेष ङरु’ चा घोष करत असतांना, कितीतरी नियम धाब्यावर बसवून राज्यकर्ते, पुढारी, गावागावातील बडी धेंडे वागत व वावरत असल्याचे दिसते.

कायदा सर्वांसाठी समान असतो. पण सर्वसामान्यांसाठी नसतो. हॉस्पीटलमध्ये भरती केलेल्या नातेवाईक किंवा कार्यकर्त्यांसाठी धुडगूस घालून डॉक्टरांना मारहाण करण्याचे इतके प्रकार घडले आहेत की, त्यावर कायदा करावा लागला.

परंतु, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, काळवेळाची बंधने न पाळता लाखो करोनाग्रस्तांना मदत करणार्‍या डॉक्टर्स, नर्सेस यांना कुठलेही सुरक्षा कवच कुठल्याही सरकारने दिले असल्याचे तुम्ही ऐकले आहे?

मुंबईतील एका प्रख्यात हॉस्पीटलमधील वैद्यकीय कर्मचार्‍यांनी त्या हॉस्पीटलच्या व्यवस्थापनाविरुद्ध जाऊन, याबाबत पब्लिक स्टँड, घेतला आवाज उठवला. व नोकरी गमावण्याचा धोका पत्करला. त्यांच्यामागे कोण उभे राहिले?

कारण उघड आहे. त्यापासून राज्यकर्त्या पक्षाला प्रसिद्धी झोतात येण्यासाठी निवडणूक प्रचारासाठी मदत मिळण्यासारखे नाही. कंगना रानौत, बच्चन परिवार इत्यादी सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात व माध्यमात वावरणारी मंडळी वादग्रस्त किंवा वादातीत! त्यामुळे त्यांना आपल्या पंखाखाली घेणे त्यांच्या पाठीशी राहणे, हे त्यांना फायद्याचे वाटते. सोईचे ठरते.

- Advertisment -

ताज्या बातम्या