Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedनीला सत्यनारायण अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

नीला सत्यनारायण अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

श्रीमती नीला सत्यनारायण यांच्यातल्या विविध पैलूंना लहानपणापासूनच आकार मिळत गेला होता. शालेय जीवनापासूनच त्यांची आणि कवितांची गट्टी जमली होती. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी संगीताचे धडे गिरविले होते.

वडिलांच्या बदलीमुळे मुंबई, नाशिक, पुणे, दिल्ली मग पुन्हा मुंबई असा त्यांचा प्रवास झाला. दिल्ली विद्यापीठातून बी.ए. तर पुणे विद्यापीठातून एम.ए.ची पदवी प्राप्त केली. जुलै 1972 मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली होती. ठाणे जिल्ह्यातून त्यांनी आपल्या प्रशासकीय कारकीर्दला प्रारंभ केला. त्यानंतर त्यांचा मंत्रालयात कृषी व सहकार, सामाजिक कल्याण, सांस्कृतिक व युवाकार्य, वैद्यकीय शिक्षण व औषधे, नगरविकास, अन्न व नागरीपुरवठा, सांस्कृतिक व पर्यटन, वस्त्रोद्योग, महिला व बालविकास, माहिती व जनसंपर्क, सामान्य प्रशासन, गृह, वने, महसूल अशा विविध विभागांची जबाबदारी सांभाळत अप्पर मुख्यसचिव पदापर्यंत प्रवास झाला. जून 2009 मध्ये या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या वर राज्यनिवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली.

- Advertisement -

राज्य निवडणूक आयोगही सांविधानिक संस्था आहे. या संस्थेच्या प्रमुख पदाच्या जबाबदारीचे भान आणि महत्व राखले किंबहुना त्यात त्यांनी भरच घातली आहे. त्याच्या काळात राज्य निवडणूक आयोगाने अनेक महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. आयोगाचे अद्ययावत संकेतस्थळ, मतदारांसाठी हेल्पलाईन, तळमजल्यावर मतदान केंद्रे, ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंगांसाठी मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था, वृद्ध आणि गरोदर महिलांना रांगेत थांबावे लागू नये म्हणून प्राधान्य, प्राण्यांच्या क्रुरपणे वापरावर निर्बंध अशा अनेक सुधारणा त्यांनी केल्या.

निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी संविधानातील तर तुदींचा केवळ शाब्दिक अर्थ न घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून महिलांना सामाजिक व राजकीय दृष्ट्या सक्षम करण्यासाठी क्रांति ज्योती योजना सुरू केली आहे. प्रथमच निवडून आलेल्या ग्रामपंचायत महिला सदस्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि इतर महिलांनीही त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन स्वत: पुढे यायला हवे, हा त्यामागचा उद्देश आहे. क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांचे शिक्षण आणि त्यांच्या सबली करणासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण म्हणून श्रीमती सत्यनारायण यांनी या प्रकल्पाला क्रांति ज्योती हे नाव दिले होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना आता 50 टक्के आरक्षण मिळाले आहे. ग्रामीण भागातील महिलांनाही सार्वजनिक जीवनात आत्मविश्वासाने वावरता यावे, यादृष्टीने प्रथमत: आयोगाने ग्रामपंचायतींच्या महिला सदस्यांसाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली आणि दहा जिल्ह्यांत अंमलबजावणी सुरू केली. संपूर्ण कुटुंबाचा डोलारा व्यवस्थितपणे सांभाळू शकणारी महिला ग्रामपंचायतींचाही कारभार व्यवस्थितपणे पाहू शकते. त्यासाठी त्यांना केवळ प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. हाच विचार श्रीमती सत्यनारायण यांनी प्रत्यक्षात आणला होता.

श्रीमती सत्यनारायण यांचा प्रशासकीय सेवेतील कृतीचा आणि कर्तृत्वाचा आलेख कायम उंचावतच राहिला आहे. त्याचवेळी त्यांच्यातील संवेदनशील कवयित्री, संगीतकार आणि लेखिका कायम सजग राहिली आणि घडत ही गेली. शांत, सयंमी आणि नि:श्चल व्यक्तिमत्वाच्या श्रीमती सत्यनारायण यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून कुठलीही बारीकसारीक घटना किंवा प्रसंग निसटणे केवळ अशक्य असते. प्रत्यक्ष कृती, गतिशील स्वभाव आणि निरीक्षण क्षमतेमुळे त्यांचे आयुष्य अधिकच समृद्ध होते गेले. त्यांची ही समृद्धता कधी कविता, कथा तर कधी कादंबरीच्या रुपाने व्यक्त होत राहिली.

आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतील अनुभव जन्य ज्ञान आणि माहिती वाचकांबरोबर शेअर करताना श्रीमती सत्यनारायण यांच्या सर्जनशीलतेतून रात्र वणव्याची ही कादंबरी साकारली आहे. प्रशासकीय कारकीर्द सांभाळतांना हळव्या मनाच्या या संवेदनशिल लेखीकेने, मराठी, हिन्दी, इंग्रजी भाषेत 13 पुस्तके लिहीली आहेत. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या कामाचा ठसा आणि साहित्यातून मांडलेले विचार दिर्घकाळ आपल्या सोबत राहतील, हे खरे.

(लेखक राज्य निवडणूक आयुक्त सहायक आयुक्त (जनसंपर्क) यापदावर कार्यरत आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या