नवरंग स्त्री मनातले : रंग आत्मिक समाधानाचा

नवरंग स्त्री मनातले : रंग आत्मिक समाधानाचा

दुर्गेचे रूप सातवे करूया काल रात्रीची पूजा,

आज नवरात्रोत्सवातील सातवी माळ. या माळेचा रंग माझ्या स्त्री मनातल्या सातव्या माळेचा आजचा  रंग जरा वेगळाच... काल रात्री नवरात्रोत्सवानिमित्त वैशाली सामंत आणि स्वप्निल बांदोडकर यांच्या गीतांचा बहारदार कार्यक्रम पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. कार्यक्रमातील गीतांचा आनंद घेत असताना सुख म्हणजे काय असतं? ते जाणवत होतं. कार्यक्रमाच्या त्याठिकाणी असलेला तो उत्साह, झगमगाट, आतिषबाजी सर्व काही पाहून प्रत्येकाच्या चेहर्‍यावरचा आनंद, रंगमंचावरील परफॉर्मन्स या सर्वांना पाहून बाहेरच जग विसरायला होत होतं. 

वैशाली सामंत यांचं ती गुलाबी हवा, वेडं लावी जिवा, वेड लावून गेली होती... त्यानंतर त्यांनी गायलेलं जे गाणं  खेळू झिम्मा ग झिम्मा ग झिम्मा गं, खेळू झिम्मा गं झिम्मा पोरी झिम्मा गं. या गीतातून तर स्त्रियांच्या आयुष्यात त्यांना अखंड कसा झिम्मा खेळावा लागतो. याचीही जाणीव झाली. कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर एवढी गर्दी पाहून एवढेच जणू आपले विश्व असं वाटू लागलं. मनावर समाधान, आनंद रेंगाळत होताच, पण जेव्हा गर्दी निवळली आणि त्या आभासी रंगीत विश्वातून बाहेर पडलो. तेव्हा आपलं खरं विश्व समोर आलं. कार्यक्रमाला उशीर झाल्याने बाहेरूनच काहीतरी खाऊन जावं म्हणून एका स्टॉलकडे वळलो. नाश्ता करत होतो, तेवढ्यात एक अगदी कमी वयातली पण आई झालेली बाई छोट्या मुलीला कडेवर घेऊन आली. आमच्याकडे केविलवाणी पाहू लागली. ती मुलगी तिच्या खांद्यावर झोपी गेली होती. मी थोडावेळ दुर्लक्ष केलं. वाटलं हिच्या हातावर पाच दहा रुपये द्यावेत, पण इतक्या रात्री पैसे घेऊन ही काय करणार? आणि असं कोणाला भिकेच्या स्वरूपात पैसे द्यायचे नाहीत?  हे ही मनाला चाटून गेलं. मी असा सगळा विचार करत असतानाच माझ्या मिस्टरांनी त्या स्टॉलवाल्यांना सांगितले, त्यांना एक बदाम शेक दे. मला आश्चर्य वाटलं. आपल्या डोक्यात का नाही आले हे सगळं? त्या स्त्रीने हे ऐकलं होतं. ती लगेच तिथेच खाली बसली. त्या छोट्या मुलीला ती उठवू लागली. तिच्या चेहर्‍यावर तो आनंद, तिच्या मनाचं समाधान पाहून त्याक्षणी माझ्या डोळ्यात पाणी आले. तिथून बाहेर पडताना मात्र आमच्या दोघांच्याही चेहर्‍यावर मानसिक समाधानाच तेज विलसत होतं.
मनाला वाटून गेलं अरे हाच तर आपल्या मनातल्या सातव्या माळेचा रंग आत्मिक समाधानाचा !

सौ. अनिता अनिल व्यवहारे, श्रीरामपूर.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com