Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedनाशिक होणार 'सायकल राजधानी'

नाशिक होणार ‘सायकल राजधानी’

डॉ. हितेंद्र महाजन, जागतिक कीर्तीचे सायकलिंग विजेते, नाशिक सायक्लिस्ट फाऊंडेशन

दररोजच्या जीवनातसुद्धा सायकलचा वापर करणे सोपे आहे. वातावरणही पोषक आहे. आपल्याला समाजात ‘सायक्लिस्ट हाच भारी’ ही प्रतिमा उभी करायची आहे. त्यातून आपोआपच बाकीचे प्रश्न सुटतील.

- Advertisement -

मी दवाखान्यात सायकलवर जातो. हा बदल प्रत्येकात झाला तर रस्त्यावर वाहने कमी होतील. धोका कमी होईल. जागा वाढेल. सायक्लिस्टला जागा मिळेल. सायकल ही अभिमानाची गोष्ट होईल. नाशिक शहर ‘सायकल कॅपिटल’ म्हणून उदयास येईल.

युरोपियन वा अमेरिकेसारख्या देशांतील शहरांत जसे सायकल मार्ग (सायकल ट्रॅक) आहेत, तसे मार्ग येत्या काळात नाशिकमध्ये असतील. यापुढेही सायकल चळवळीला चांगले पोषक वातावरण मिळेल, त्यामुळे सायकलिंग पुढे-पुढेच जात राहणार आहे. त्यामुळे पुढील 25 वर्षांत नाशिकला ‘सायकलचे शहर’ म्हणून पाहिले व ओळखले जाईल. त्यासाठी नाशिक सायक्लिस्ट फाऊंडेशन विविध पातळ्यांवर पाठपुरावा करीत आहे. त्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल. नाशिककरांचाही त्यात मोठा वाटा आहे.

पुढील 25 वर्षांत नाशिकची सायकल चळवळ चांगली असेल यात शंका नाही. त्याला बरीचशी कारणे आहेत. भारतात सायक्लिगंची सुरुवात नाशिकने केली आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ती ‘लीडरोल’मध्येच राहणार आहे. त्याचे कारण, नाशिक हेच असे शहर आहे की येथे जास्तीत जास्त सायकलस्वार (सायक्लिस्ट) आहेत. सायक्लिस्ट म्हणजे नुसते खेळाडूंपुरते मर्यादित नसते.

दैनंदिन जीवनात आवडीने सायकल चालवणार्‍या हौशी लोकांची संख्या खूप मोठी आहे. 2012 मध्ये मी सायक्लिगं सुरू केली तेव्हा सायक्लिस्टकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यावेळी सायकल चालवणार्‍यांना मानाचे स्थान नव्हते. सायकल म्हणजे ज्याच्याकडे काही पर्याय नाही तो सायक्लिस्ट, असे पाहिले जायचे, पण आम्ही दोघे भाऊ डॉक्टर असूनसुद्धा सायक्लिगंला वेगळे स्थान द्यायचे ठरवले.

आम्ही जागतिक स्तरावरची स्पर्धा जिंकून ते स्थान मिळवून दिले. त्यानंतर नाशिकमध्ये फार मोठी चळवळ उभी राहिली. पुढे नाशिक सायक्लिस्टने सायकलिंग फाऊंडेशन सुरू केले. त्याचे कारण नाशिकचे नागरिक चांगले आहेत. निसर्गानेही नाशिककरांना बरेच काही दिले आहे. चार-पाच किलोमीटरच्या अंतरात आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो. खरे तर आपल्याला येथेच सायकलिंगचा आनंद लुटता येतो.

नाशिक शहराची ठेवणच अशी आहे की, कुठल्याही ठिकाणापासून दुसर्‍या ठिकाणापर्यंतचे अंतर आठ-दहा किलोमीटरचे आहे. त्यामुळे दररोजच्या जीवनातसुद्धा सायकलचा वापर करणे फार सोपे आहे. वातावरणही पोषक आहे. नाशिकने स्पर्धकही भरपूर दिले आहेत. जागतिक, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरदेखील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे खेळाडू आणि हौशी या दोघांनीही नाशिकमध्ये पुढाकार घेतला आहे.

नाशिकला एक चांगला सायकल ट्रॅक व्हावा म्हणून पाठपुरावा सुरू आहे. आपल्याला समाजात ‘सायक्लिस्ट हाच भारी’ ही प्रतिमा उभी करायची आहे. त्यातून आपोआपच बाकीचे प्रश्न सुटतील. मी दवाखान्यात सायकलवर जातो. हा बदल झाला तर रस्त्यावर वाहने कमी होतील. धोका कमी होईल. जागा वाढेल. सायक्लिस्टला जागा मिळेल. सायकल ही अभिमानाची गोष्ट होईल.

ऑफिसला सायकल घेऊन जाणे ही अभिमानाची गोष्ट वाटेल. त्यातून इतरांना प्रेरणा मिळेल. खूप प्रकारच्या सायकली आहेत. त्या नाशिकला आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सायकलमुळेच आपल्याकडे ‘आयर्नमॅन’ स्पर्धा जिंकणारे स्पर्धक निर्माण झाले आहेत. ही ओळख होत चालली आहे. त्यातून नाशिक शहर ‘सायकल कॅपिटल’ म्हणून उदयास येईल.

एक उदाहरण सांगता येईल. माझा मुलगा सहा-सात वर्षांपूर्वी पाचवी इयत्तेत शिकत होता. ‘मी शाळेत सायकलवरच जाईन’ असे तो म्हणाला होता. ‘खुशाल जा, मात्र हेल्मेट घातल्याशिवाय नाही’, असे मी त्याला बोललो. ‘मला सर्व हसतील’ असे तो म्हणाला.

मी त्याला सांगितले, ज्यांना हसायचे त्यांना हसू दे! एक, दोन किंवा तीन दिवस हसतील. त्याने ते मान्य केले. हेल्मेट घालून सायकलवर शाळेत जायला लागला. एका महिन्याने त्यानेच प्रतिक्रिया दिली की, माझे मित्रसुद्धा आता हेल्मेट घालूनच सायकलवर येऊ लागले आहेत. म्हणजे बदल असा घडत जातो.

- Advertisment -

ताज्या बातम्या