नाशिककरांनी घेतला समाजसेवेचा वसा

jalgaon-digital
4 Min Read

नाशिक | रवींद्र केडीया | Nashik

नाशिक औद्योगिक क्षेत्रात (Nashik Industrial Sector) आपण व्यवसाय करीत असताना समाजासाठी आपल्या कामगारांच्या कुटुंबीयांसाठी काही योगदान देण्याचे उद्देशाने 2003 साली बॉस लिमिटेड, एपकॉस, टिडीके, टीकेईएस यासह विविध उद्योगांना एकत्रित येत पहिली रन घेतली.

यावेळी साडेसात हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता. यातून 16 लाख रुपयांचा निधी (fund) जमा झाला होता. या निधीच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांना मदतीचा हात देण्याचा निर्धार करण्यात आला. यात अनेक संस्थांना पायाभूत सुविधा बांधून देणे, शैक्षणिक क्षेत्रासाठी (education sector) आवश्यक असणारी सामग्री उपलब्ध करून देणे अथवा दिव्यांगांसाठी (handicapped) मदतीचे साहित्य उपलब्ध करून देणे यासह विविध क्षेत्रात काम उभे राहू लागले.

या कार्याने प्रारंभही झाला असला तरी टप्प्याटप्प्यात अनेक हात जोडले गेले. नाशिककरांच्या (nashik) सहयोगाची अपेक्षा धरत टी-शर्ट च्या माध्यमातून नागरिकांच्या निधीचा खारीचा वाटा यात घेण्यात आला. त्यामुळे कळत नकळत एक रंगी टी-शर्ट घातला. आपणही या समाजसेवेच्या महायज्ञात सहभागी आहोत, ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजू लागली. त्यामुळे साडेसात हजार राहून वीस हजारांचा टप्पा अल्पावधीत पार पडला. केवळ जनसामान्यांची नव्हती तर देणगीदारही हिरीरीने पुढे आले.

गेल्या पंधरा वर्षांत 16 लाखांवरून सामाजिक कार्यासाठीचा निधी कोटीच्या घरात पोहोचला होता. निधी संकलन करणे अथवा रन घेणे हे जरी यशस्वी ठरत असले तरी या पैशांचा योग्य विनियोग करण्यासाठी राबवली जाणारी यंत्रणा अतिशय किचकट आणि पूर्णवेळ सेवेची ठरलेली आहे. यामुळे आपल्या नोकरीच्या वेळे व्यतिरिक्त या कामावर लक्ष देऊन ते पूर्ण करण्यासाठी कामगारही आपले योगदान देत आहेत. कार्यक्रमांसाठी येणारा खर्च अथवा उपक्रम राबवण्यासाठी लागणारी हा कंपनी आपल्या खर्चातून देत असते. त्यामुळे समाज कार्यासाठी मिळालेली देणगी पुरेपूर सामाजिक कार्यासाठी वापरली जात असल्याने यातील पारदर्शक व प्रामाणिकता प्रकर्षाने दिसून आली आहे.

केवळ मदतीचा हात उभा करणे एवढाच उद्देश नसून लोकांना स्वावलंबी करण्यासाठी उपाययोजना करण्याचाही उद्देश यातून स्पष्ट होत आहे. अनेक खेड्यांमधील वॉटर टेबल यावा, यासाठी ठिकठिकाणी बंधारे बांधून पाणी आडवा, पाणी जिरवा या उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे. दूरवरच्या दुर्गम भागातील वसाहतींमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center), शैक्षणिक सुविधा (Educational facility) उभारण्यात ‘नाशिक रन’ (Nashik run) अग्रेसर राहिले आहे.

दरवर्षी केल्या जाणार्‍या आढाव्यात जमा झालेल्या रकमेची वासलात लावणे हे मोठे काम आयोजन समितीकडे असल्याने आलटून-पालटून बॉस व एपकॉस, टीडीके हे व्यवस्थापनाची जबाबदारी घेत आहेत. या कालावधीत उपक्रमासाठी लागणारा वेळ त्याच्या पूर्णत्वासाठी व पाहणीसाठी लागणारा खर्च हा कंपनी उचलत असते. त्यामुळे खर्‍या अर्थाने या उद्योग समूहांच्या पदाधिकार्‍यांनी नाशिक परिसरातील उपेक्षितांना मदतीचा हात देण्यासाठी हा शिवधनुष्य उचलला आहे.

धावपटूंनाही घेतले दत्तक

नाशिक रनच्या माध्यमातून केवळ गरजूंना मदत देणे, हा उद्देश असल्याने जिल्ह्यातील धावपटूंनाही बळ देण्याचे काम नासिक रनने केलेले आहे. त्या माध्यमातून कविता राऊत व तिच्या सहकार्‍यांना ‘नाशिक रन ’ने दत्तक घेतले आहे. या खेळाडूंना द्यावा लागणारा पौष्टिक आहार स्पर्धेच्या तयारीसाठी लागणारे साहित्य व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागासाठी आवश्यक असणार्‍या गोष्टींसह प्रशिक्षक प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याचा या पाठबळात समावेश आहे.

परदेशी पाहुण्यांनाही आकर्षण

या उपक्रमात गेल्या काही वर्षात जमिनीतूनही पाहुण्यांचा सहभाग वाढू लागला आहे. या देशांतून आपला वाढदिवस साजरा करण्याऐवजी उपेक्षितांच्या मदतीसाठी देणगी देण्याची पद्धत जोर धरू लागली आहे. त्या माध्यमातूनही लाखो रुपयांचा निधी या महायज्ञासाठी जमा होत आहे. केवळनिधी देऊनच नव्हे तर स्वतः यामध्ये सहभागी होऊन अनेक परदेशी पाहुण्यांनी या उपक्रमाला आपली पहिली पसंती दर्शवली आहे. केवळ भारतात आलोय म्हणून सहभागी होणारे नव्हे तर आपल्या देशातून ‘नाशिक रन’साठी भारतात येण्यातून त्यांचे या ‘रन’ विषयीचे प्रेम अधोरेखित होत आहे.

जानेवारी अ‍ॅथलेटिक महोत्सवाचा महिना

जानेवारी महिन्यातील दुसर्‍या आठवड्यात गेल्या तेरा वर्षांपासून नाशिक चॅरीटेबल ट्रस्ट माध्यमातून दौडचे आयोजन केले जाते. या माध्यमातून नागरिकांना जोडण्यासाठी समान टी-शर्ट चा वापर केला जातो. तत्पूर्वी मविप्रच्या माध्यमातून मविप्र मॅरेथॉन घेतली जाते. त्यापाठोपाठ पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून मॅरेथॉन आयोजन केले आहे. नाशिकरोडला रात्रीची रन घेण्यात आली होती. विविध संघटनांच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा व क्रिकेटचे सामने खेळले जात असल्याने जानेवारी महिना हा खर्‍या अर्थाने मैदानी खेळात अ‍ॅथलेटिक्स महिना ओळखला जाणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *