Friday, May 10, 2024
HomeUncategorizedनाशिकला विकासाच्या भरपूर संधी

नाशिकला विकासाच्या भरपूर संधी

सुलक्षणा महाजन, नगररचना तज्ञ

विकासाच्या बाबतीत नाशिकला अनेक संधी उपलब्ध आहेत. तशी अनुकूलता नाशिक परिसराला लाभलेली आहे. मात्र त्या संधींचा लाभ उठवण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तशी दृष्टी असलेले तरुण आणि भविष्यवेधी नेतृत्व महापालिकेत निवडून जायला हवे.

- Advertisement -

नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी नाशिक महापालिका स्वतंत्र व स्वायत्त असणे आवश्यक आहे. महापालिकेवर स्थानिकांचे, विशेषत: सुशिक्षित तरुण आणि भविष्यवेधी लोकांचे नियमन व नियंत्रण असणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास सर्वांगीण विकास साधता येणार नाही. नाशिकच्या विकासाची दिशा शोधायची असेल तर नाशिकला विकास कसा करायचा; हा विचार करण्याचे स्वातंत्र्य आधी नाशिक महापालिकेला असावे. आजतरी तसे स्वातंत्र्य असल्याचे दिसत नाही.

सध्या स्वातंत्र्य आहे असे गृहित धरले तर ‘स्वॉट’ (एसडब्ल्यूओटी) अ‍ॅनालेसेस करतात. एस म्हणजे ‘स्ट्रेन्थ’, डब्ल्यू म्हणजे ‘विकनेसेस’, ओ म्हणजे ‘अ‍ॅपॉर्च्यूनिटी’, टी म्हणचे ‘थ्रेटस’! विकासाचा विचार करताना जसा आपल्या स्ट्रेन्थचा विचार करायचा तसा आपल्याला रिलेट होऊन कमतरतांचाही विचार करायचा असतो. तो करायचा झाल्यास नाशिकचे स्ट्रेन्थ म्हणजे इथले हवामान! आता पायाभूत सेवा काही प्रमाणात आहेत. आता नियोजन केले तर पाणी आणि वाहतूक उत्तम करता येऊ शकते. आर्थिक विकासाचा विचार करता नाशिकला खूप संधी आहेत. त्या संधी म्हणजे येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे.

येणार्‍या काळात आरोग्याला फार महत्त्व असणार आहे. या विद्यापीठाने नियोजन केल्यास राज्यात किती महाविद्यालये पाहिजेत? किती प्रकारचे डॉक्टर्स पाहिजेत? नर्सेस पाहिजेत? किती प्रकारचे पॅरामेडिकल पाहिजे? हा हिशोब करून तेवढी महाविद्यालये तयार केली पाहिजेत. मुख्य म्हणजे आरोग्य विद्यापीठाने स्वायत्तपणे ‘महाराष्ट्राचे आरोग्य’ ही मध्यवर्ती कल्पना ठेवल्यास महाराष्ट्रासाठी आरोग्याचे नियोजन करण्याची जबाबदारी उचलायला पाहिजे.

ते करण्यासाठी विद्यापीठात स्वतंत्र खाते करता येईल. त्यातून संशोधन कसे करायचे? आरोग्यसेवेचा विस्तार कसा करायचा? म्हणजे आरोग्याचे नियोजन केंद्र नाशिकला करता येईल. कारण आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये आहे. असे केल्यास प्रत्येक जिल्ह्यासाठी व तालुक्यासाठी कसे नियोजन करायचे ते नाशिकमधून करता येईल.

आतापर्यंत नियोजनाचे केंद्र फक्त मुंबई असायचे. आता आरोग्याच्या सेवेचे केंद्र नाशिकला यायला हवे. त्यामुळे नाशिकमध्ये मंत्री नको तर स्वतंत्रपणे आरोग्यसेवक, डॉक्टर, संशोधक यांनी आरोग्यसेवेचे नियोजन करून त्याच्या निर्मितीचे केंद्र नाशिक करायला हवे. ते होऊ शकते. हे करतानाच नाशिकमध्ये आरोग्य संशोधन केंद्र होऊ शकते. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन होऊ शकते.

कारण विद्यापीठाकडे जागा उपलब्ध आहे. विद्यापीठाकडे स्वायत्तता आहे. नाशिकला आधीच सरकारी तसेच खासगी दवाखाने-रुग्णालये आहेत. डॉक्टरांचे एक केंद्र नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात उभे राहू शकते. ते संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करू शकते. म्हणजे ही नाशिकची जी क्षमता (स्ट्रेन्थ) आहे त्यावर आणखी इमले चढवायचे. जो पाया घातला गेला आहे त्यावर अधिक मजले चढवता येणे शक्य आहे.

त्याला विकास म्हणता येईल. दुसरा पाया आहे तो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा! मुक्त विद्यापीठाद्वारे उपयुक्त शिक्षण व अभ्यासक्रम राबवले जातात. परंतु त्याबद्दलही स्वायत्तता नाही. सरकारी अधिक्षेप जास्त आहे. त्यामुळे शिक्षणाचे, बाह्य शिक्षणाचे केंद्र व संशोधन केंद्र म्हणून या विद्यापीठाचा विचार करता येईल.

येत्या काळात कमकुवतपणा (विकनेस) असा आहे की, डिइंडस्ट्रालाईझेशन होण्याची शक्यता खूप आहे. नाशिकमध्ये खूप उद्योग आहेत, पण त्यांचे कॉन्सन्ट्रेशन होण्याची शक्यता नाही. अनेक कंपन्या दुसरीकडे जाऊ शकतात. हा कमकुवतपणा आहे. मुंबईचा औद्योगिक विकास खुंटला. त्यानंतर येथील कंपन्या बंद पडल्या. काही बाहेर गेल्या. त्यावेळी त्या जमिनीचे काय करायचे याचे नियोजन न झाल्याने मुंबई वेडीवाकडी वाढली.

मुंबईचे प्रश्न गंभीर झाले. तशी परिस्थिती नाशिकमध्ये येऊ शकते. नाशिकला धोका दोन गोष्टींचा आहे. उद्योग बाहेर जातील आणि खेडोपाडी पसरतील. आधीच नाशिकमध्ये उद्योगांचे आता सॅच्युरेशन आहे. डिइंडस्ट्रालाईझेशन होईल. येणार्‍या काळात उत्पादन कमी-कमी होत जाणार आहे. सेवाक्षेत्र वाढत जाणार आहे.

त्यामुळे ज्या औद्योगिक जमिनी आहेत, त्यावर उत्पादक आणि संशोधन या दोन म्हणजे आरोग्यसेवेला पूरक संशोधन केंद्र व आरोग्यसेवेला पूरक काही कारखानदारी, खासगी किंवा सरकारी पातळीवर होऊ शकते. प्रशिक्षण महाविद्यालये नाशिकला होऊ शकतात. डिइंडस्ट्रीलायझेशननंतर काय करता येईल त्या जमिनीचे याचा विचार आतापासून केला पाहिजे. तरच भविष्यात मुंबईसारखी विकृती नाशिकला न येता सर्वप्रकारे विकास करता येईल.

सध्या नाशिकला एकलहरे केंद्र आहे, पण येत्या काळात पर्यावरणाच्या दृष्टीने कोळसा वापरणे धोकादायक होणार आहे. सौरऊर्जैचा वापर वाढत जाणार आहे. त्यावेळी एकलहरे केंद्राचे सौरऊर्जा केंद्र म्हणून रुपांतर करता येईल. त्या जमिनीचा वापर एक ऊर्जा संशोधन केंद्र म्हणून करण्यासाठीही होऊ शकतो. नाशिकपुरती पूर्ण ऊर्जा एकलहरेत निर्माण होते. ते वीज केंद्र वेगळ्या पद्धतीने डिझाईन करायला हवे.

त्यात इंधन स्वच्छ असेल आणि प्रदूषण नसेल. असे इंधन करता येऊ शकते. हा झाला औद्योगिक आणि उद्योगनिर्मितीचा विषय! नाशिकची स्ट्रेन्थ आहे; जी लोकांना कधी समजत नाही. ती म्हणजे अतिशय अत्याधुनिक शेती (अ‍ॅडव्हान्स अ‍ॅग्रिकल्चर)! म्हणजे अर्बन अ‍ॅग्रिकल्चर! नागरी भागाच्या संलग्न परिसरात ‘अ‍ॅडव्हान्स अ‍ॅग्रिकल्चर’ हा भविष्यातला एक महत्त्वाचा विषय होणार आहे. उदा. आता सिंगापूरमध्ये मोठ्या प्रमाणात बायोटेक्नॉलॉजीचे संशोधन व बायो-अ‍ॅग्रिकल्चरचे संशोधन करून वेगळ्या प्रकारेे अन्नधान्य आणि फळभाज्यांचे उत्पन्न करता येते; म्हणजे ग्रीनहाऊसेसमध्ये. नाशिकमध्ये तशा शेतजमिनी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. या जमिनी अर्बन अ‍ॅग्रिकल्चरला वापरल्यास त्यातून रोजगार उत्पन्न होतील. अतिशय जास्त शेती उत्पन्न होऊ शकेल. निर्यात होऊ शकते. आजूबाजूूच्या क्षेत्रातील सर्व द्राक्ष बागायतदारी वापरात येईल.

आयात-निर्यातीला जे महत्वाचे संशोधन आहे त्यातून नाशिक शेती संशोधन केंद्र म्हणून नाशिक पुढे येऊ शकते. यानंतर यात विचार केला तर धोके! नाशिकमधील उद्योग निघून गेले तर भांडवल निर्माण करण्याची क्षमता असणारे नवे लोक यावे लागतील. त्यामुळे येणार्‍या लोकांसाठी वाहतूक सेवा, पाणी व्यवस्था आणि सांडपाणी व्यवस्था अतिशय महत्वाची ठरेल.

आज त्या दृष्टीने फार वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन. तो धोकाही आहे. कारण या वर्षी पाऊस पडेल, पण पुढच्या वर्षी पडेलच असे नाही. शहरासाठी पाणी व्यवस्था आवश्यक आहे. पाणी आणि सांडपाणी या दोन्हीत रेन वॉटर हार्वेस्टिंग आले. पाणी कन्झर्वेशन आले व पाण्याचा पुनर्वापरदेखील आला. त्यावर लक्ष पुरवावे लागेल. ते केल्यास नाशिकच्या वाढत्या उद्योगांना पाणीपुरवठा कमी पडणार नाही व पर्यावरणीयदृष्ट्या फायदा होईल.

सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून तेही वापरता येईल. शेतीलाही सॉलिड वेस्ट म्हणजे घनकचरा आणि सांडपाणी शहराच्या हद्दीतच पुरवल्यास त्याचाही फायदा होऊ शकेल. जगात जी पुढारलेली शहरे जी आहेत ती असे प्रयोग करीत आहेत. येणार्‍या काळात नाशकातही करायला हवे.

अचानक लोकसंख्या वाढली तर काय होईल? वाहतूकसेवा आतासारखीच बेशिस्त राहिली तर शहर नीटपणे वाढणार नाही. त्यामुळे वेगवान आणि स्वच्छ बसवाहतुकीवर लक्ष द्यावे लागेल. हे केले नाही तर नाशिकच काय, कोणतेही शहर टिकू शकणार नाही. गावातही अनेक हेरिटेज ठिकाणे आहेत. तेथेही चांगले वाडे पाडून वेड्यावाकड्या इमारती बांधली जातात. त्यासाठी हेरिटेज कन्झर्वेशन व त्याच्या रिकन्स्ट्रक्सनसाठी वेगळा विचार नाशिकला होयला पाहिजे.

सर्वत्र घाट आहेत. देवळे आहेत. पंचवटीतील जुने भाग आहेत. वाडे आहेत. चांदवडकर लेनसारख्या जुन्या वस्त्या आहेत. या सगळ्यांचे सुयोग्य प्रकारे हेरिटेज एरियाचे रिडेव्हलपमेंट व रिकन्झर्वेशन व संवर्धन करावे लागेल. अन्यथा नाशिकचे वैभव कधी लयाला जाईल ते कळणार नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने अतिगर्दी जमवणे चुकीचे आहे. हे आता ‘करोना’च्याच काळातच नाही तर येत्या काळात सिंहस्थ कुंभमेळ्यासारखे जे कार्यक्रम आहेत त्याचे नियोजन कसे करायचे? नियंत्रण कसे घालायचे? याचा विचार धर्माचे अवडंबर न करता करावाच लागेल. नाहीतर रोगराईने नाशिक शहर नादुरूस्त होईल.

येणार्‍या काळात नव्या पिढीला या धर्माबाबत काही आक्षेप राहील असे वाटत नाही. कारण वैज्ञानिक दृष्टी शक्यतो वर वाढवावी, असाच आहे. हा काळ चुकीचा आहे. धर्माच्या नावाने राजकारण केले जात आहे. कायमचे राहणार नाही. त्यामुळे धर्माबद्दलही पुनर्विचार करून हेरिटेल व्हॅल्यू महत्त्वाची आहे, पण याचा अर्थ गर्दी जमवून जे काही होते त्याचा ताण शहरीकरणावर पडतो. ते लक्षात घेऊन यात्रेसंबंधीही केवळ नाशिकलाही सर्वच तीर्थस्थानांचा विचार करायला हवा. अर्थात हा खूप दूरचा विचार आहे. अजून आपला समाज मागास आहे. बदलाला तयार नाही, पण नागरीकरणाच्या विचारात तो फार दूरचा नसेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या