नागली: आदिवासींचे मुख्य अन्न

नागली: आदिवासींचे मुख्य अन्न

खोकरविहीर । देवीदास कामडी | Khokarvehir

आदिवासी बहुल तालुक्यात (tribal area) पारंपरिक पद्धतीने नागलीचे पिक (Nagli crop) घेतले जाते. शेकडो वर्षांपासून डोंगर उतारावर नागलीची पेरणी केली जाते. नागली मध्ये हलकी व गरवी नागली असे प्रकार आहेत. हलकी म्हणजे लवकर पिक येणारी तर गरवी म्हणजे उशिराने पिक येणारी. हलकीमध्ये बेंद्री तसेच गरवी नागली मध्ये पांढरी सितोळी, विटकरी लाल रंगाची असते. सर्वच चविष्ट लागते.

शेकडो वर्षांपासून आदिवासींच्या (tribal) दैनंदिन जीवनातील आहारामध्ये नागलीचा (Nagli) समावेश आहे. त्यामुळे नागली हे आदिवासींचे प्रमुख अन्न मानले जाते. नाचणी किंवा नागली या धान्याला आदिवासी बोलीत ‘कणसरी देव’ असे म्हणतात. नाचणी हे पीक घेण्यासाठी खरीप हंगामात (kharif season) पेरणी करीता मार्च महिन्यांपासूनच झाडाचा पालापाचोळा, गुरांचे शेण (गोवर) जाळून ‘राब’ भाजणी केली पावसाला (monsoon) सुरुवात झाल्यानंतर जून महिन्यात भाजलेल्या राबामध्ये नागलीचे बी पेरले जाते. रोप वाढले की रोप खणून मशागत करून तयार केलेल्या जमिनीत चास अथवा प्रत्येक रोप ओल्या जमीनीवर टाकून पावसाळ्यात शेतात लागवड केली जाते.

पीक परिपक्क झाल्यानंतर कापणीच्या दिवशी नाचणीची म्हणजे कणसरा देवाची पुजा केली जाते. पुजेसाठी ह्या पीकाला आदिवासी कोंबड्या, बकर्‍यांचा नैवद्य दाखवितात. आदिवासी भाषेत कोंबडीला तलग अथवा टोळगी किंवा कोंबडाला टोळगा असे म्हणतात. मटनाचा स्वयंपाक शेतातच करतात. कणसरी देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर यथा योग्य शेतातच जेवणावर ताव मारतात. उरलेला नैवद्य घरी नेता येत नाही तो रानात म्हणजे शेतातच सोडून द्यावा लागतो. अशी आदिवासी बांधवांमध्ये (tribal community) श्रदधा आहे व नाचणी पिकाची कापणी व मळणी साधारण मार्च महिन्यात केली जाते.

मळणी झाल्यानंतर धान्याच्या राशीची पूजा खळ्यात लाल रंगाचा कोंबडा मारून केली जाते. कोंबड्याची मटन करुन शेतातच स्वयपाक करुन तिथेच भोजन केले जाते. मटण घरी नेता येत नाही नाचणीच्या धान्यामध्ये पळसाचे फुले टाकून पूजा केली जाते संपूर्ण पूजा झाल्यानंतर धान्य (grain) घरी नेतात. आशा आदिवासी समाजाच्या (tribal community) रूढी परंपरानूसार प्रत्येक वर्षी नाचणीचे (नागली) श्रदधेने पूजा केली जाते. आदिवासी भाषेत नागलीला नाचणी असेही म्हणतात. नागली हे पिक आदिवासीचे कुलदैवत आहे. सुरगाणा तालुक्यात (surgana taluka) 4270 हेक्टर क्षेत्रावर नागलीचे उत्पन्न घेतले जाते. राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी (शास्त्रीय नाव - इल्युसाईन कोरॅकोना) म्हणजेच नागली हे तृणधान्य पौष्टिक समजले जाते.

या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरच लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्ये असतात. नाचणीत असणार्‍या कॅल्शियमच्या विपुल साठ्यामुळे खेळाडू, कष्टाचे काम करणारे, वाढत्या वयाची मुले यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहार तज्ज्ञ देतात. नागली हे पीक दुर्गम,आदिवासी भागातील हलक्या व वरकस जमिनीत घेतात. नागली हे दुर्गम लोकांचे प्रमुख अन्नधान्य आहे. ते सर्व प्रकारच्या जमिनींत येणारे हे पीक आहे. नागलीचे बी मुठीने जमिनीवर फेकून पेरणी करतात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये नागलीचा वापर पुष्कळ प्रमाणात केला जातो आणि विशेष म्हणजे कष्टकरी वर्गात तो अधिक होतो. त्यामुळे त्यांचे स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी मदतच होते.

नागली पौष्टिक असल्याने आदिवासी गरोदर माता किंवा बाळंतीण झालेल्या मातेला नागलीची पेज दिली जाते. पुर्वीच्या काळी नागली हेच आदिवासींचे पारंपरिक धान्याचे वाण असल्याने आदिवासींचे पूर्वज (आजी - आजोबा यांचे वय 90 ते 100 वर्षांचे असून सुद्धा स्वतःचे काम ते स्वतः करत असत. नागलीमध्ये सर्वात जास्त कॅल्शिअम असल्याने नागली फार पौष्टिक आहे. फार चांगली आहे असं हल्ली आपण वारंवार ऐकतो पण नागली आणि त्याचे गुणधर्म याविषयी आपल्याला फार पूर्वीपासूनच माहिती आहे. आजकाल कोणत्याही खाद्यपदार्थांच्या दुकानात गेले की नागलीचे पीठ, सत्व किंवा पापड, बिस्किटे असे अनेक पदार्थ बघायला मिळतात. नागली तुरट, कडवट चवीची, पचायला हलकी, शक्तिवर्धक आणि गुणाने थंड आहे.त्यामुळे पित्तशामक, उष्णता करणारी आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप घाम आल्याने जो एक प्रकारचा अशक्तपणा येतो त्यासाठी नागली अत्यंत उपयोगी असा घरगुती उपाय आहे.

नागलीचे मीठ आणि हिंग मिसळून वाफवलेले सत्व ( उकड किंवा उत्तर महाराष्ट्राच्या भाषेत सांगायचे तर खिशी) किंवा दूध ,साखर टाकून केलेली खीर उन्हाळ्यात विशेषकरून घरातील लहान बळे किंवा वयस्कर उत्तम आहार आहे. नागली रक्तवर्धक आहे त्यामुळे स्त्रिया, गर्भवती यांनी नेहमी आहारात ठेवावी. नागलीमध्ये पिष्टमय पदार्थ कमी आणि प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्याने मधुमेही व्यक्तींनाही पथ्यकर आहे. हाडांची झीज कमी करणे, ताकत वाढवणे यासाठी नागली उपयुक्त आहे. आदिवासी बांधवांमध्ये आहारात पुर्वी मोठ्या प्रमाणात नागलीचा समावेश असल्याने लोकांमध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी सारखे आजार नव्हते. कारण आहारात नागली, उडीदाचे बेसन किंवा भुजा बिना तेलाचे तसेच मोहट्याचे तेल यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खुप असते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com