नाशिकमध्ये स्मार्ट आणि बहुमजली पार्किंग

देशदूत वर्धापनदिन विशेष लेख
नाशिकमध्ये स्मार्ट आणि बहुमजली पार्किंग

नाशिक शहरातील वाहतूक जाम आणि पार्किंगची समस्या गंभीर आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेतील रस्ते अरुंद आहेत. ही समस्या निकालात काढण्यासाठी संभाव्य उत्पन्नाचा विचार करून स्मार्ट सिटी कंपनीकडून निविदा प्रक्रिया राबवून शहरातील स्मार्ट पार्किंगचे काम देण्यात आले आहे. शहरात 33 ठिकाणी पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे...

नाशिक शहराची लोकसंख्या 14 लाखांच्या आसपास असली तरी अलीकडच्या काळात वाढती नागरी वस्ती लक्षात घेता लोकसंख्या ही 20 ते 22 लाखांपर्यंत गेली असल्याचे सांगितले जात आहे. शहर मोठ्या प्रमाणात वाढत असताना शहरातील मुख्य बाजारपेठांतील रस्ते मात्र अरुंदच असल्याने शहरात वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून बहूमजली वाहनतळाचा प्रस्ताव पुढे आला होता. यात मध्यवर्ती बस स्थानकालगत असलेल्या भूमि अभिलेख कार्यालयालगत जागेत, जुना घास बाजार, सुंदर नारायण मंदिरालगत गोदाकाठालगत बहुमजली पार्किंग करण्याचा प्रस्ताव होता.

हे दोन्ही प्रस्ताव बाजूला पडून आता रविवार कारंजा भागातील महापालिकेच्या जुन्या व्यापारी संकुलाच्या जागेवर व राजीव गांधी भवनातील रामायण निवासालगत अशा दोन ठिकाणी बहुमजली पार्किंगचा प्रस्ताव आहे.

नंतर पार्किंगच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून पाहण्याची गरज निर्माण झाली. याच उद्देशाने अत्याधुनिक शहराच्या धर्तीवर स्मार्ट पार्किंगचा पर्याय स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून समोर आला. संभाव्य उत्पन्नाचा विचार करून स्मार्ट सिटी कंपनीकडून निविदा प्रक्रिया राबवून शहरातील स्मार्ट पार्किंगचे काम देण्यात आले आहे.

शहरात 33 ठिकाणी पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. यात ऑन स्ट्रीट पार्किंग प्रकारात शहरातील काही प्रमुख रस्त्यांच्या बाजूला नियोजित पद्धतीने वाहने पार्किंग करणे (रस्त्याच्या बाजूला दुचाकी - चारचाकी वाहनांना जागा निश्चित करणे) अशी 5 ठिकाणी नियोजन करण्यात आले आहे. ऑन स्ट्रिट प्रकारात पार्किंग करता एकच आत येणारे व बाहेर जाणारे अशा जागेत नियोजन पद्धतीने जागा उपलब्ध करून पार्किंगसाठी देता येते.

या पार्किंगचे आधुनिकीकरण व संगणकीकरण करण्यात आले असून एकूण 28 ठिकाणी या पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. याठिकाणी प्रतितास वाहनतळ शुल्क (दरनिश्चिती) वसूल करण्यात येत आहे.

या स्मार्ट पार्किंगच्या माध्यमातून नागरिकांना अ‍ॅपद्वारे ऑन लाईनद्वारे कोणत्या ठिकाणी वाहनासाठी जागा रिक्त आहे हे कळते व त्याच भागात वाहन पार्किंगसाठी जाता येणार असून वेळेची बचत होणार आहे. या स्मार्ट पार्किंगच्या माध्यमातून महापालिकेत 1 कोटी इतके उत्पन्न अपेक्षित आहे. अशाप्रकारे स्मार्ट पार्किंगच्या माध्यमातून शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून वाहनचालकांना शिस्त लावण्यास मोठी मदत होणार आहे.

घन कचरा व्यवस्थापनात नाशिक पुढेच

मेलहोम आयकॉस (चेन्नई) व आयकॉस लोथेलियर (पुणे) यांच्याकडून चालविण्यात येत असलेल्या खत प्रकल्पांचे काम राज्यातील महापालिकांच्या तुलनेत उजवे आहे. सन 2016 मध्ये हरित लवादाने एका याचिकेवरून नाशिक महापालिका क्षेत्रातील नवीन बांधकामांच्या परवानगी रोखण्याचा निर्णय दिल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले होते.

तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी ही बाब गांभीर्याने घेत महापालिकेच्या खत प्रकल्पांचे खासगीकरणाचा निर्णय घेतला. नंतर या दोन खासगी कंपन्याकडून आता खत प्रकल्पात दररोज येणार्‍या 550 ते 600 टन कचर्‍यांचे नियोजन केले जात जात आहे. घंटागाड्याकडून येत असलेल्या वर्गीकृत कचर्‍यावर कल्चर, सॅनिटायझर फवारुन दुर्गंधी कमी करून तीन दिवस प्रक्रिया करून त्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती केली जात आहे. कमी दरात याठिकाणाहून खत उपलब्ध करून दिले जात आहे.

दरवर्षी खत उत्पादन क्षमता वाढविण्यात येत आहे. कचर्‍यातील प्लास्टिक व आरडीएफपासून एलडीओ ऑईल तयार केले जात आहे. तसेच खत तयार झाल्यानंतर अविघटनशील कचरा लॅडफिलवर टाकला जात आहे. या कचर्‍याच्या विविध थरावर हिरवळ लावण्याचे काम करण्यात आले आहे.

तसेच केंद्र व जर्मन सरकारच्या संयुक्त विद्यमाने घनकचर्‍यापासून वीजनिर्मितीचा वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प महापालिकेने कार्यान्वित केला आहे. यात दररोज 15 - 20 मेट्रिक टन ओला कचरा (हॉटेल वेस्ट) व 10 - 15 किलोलीटर सार्वजनिक शौचालयातील मलजलावर प्रक्रिया रुन मिथेल गॅसद्वारे दररोज सरासरी 700 युनिट वीजनिर्मिती केली जात आहे.

तसेच कन्स्ट्रक्शन व डिमॉलीशन वेस्ट संकलन, वाहतूक व प्रक्रिया करून त्यापासून विविध उत्पादने करण्यासाठी 100 मे. टन प्रतिदिन क्षमता असलेला प्रकल्प पीपीपी तत्वावर कार्यान्वित करण्यात आला आहे. अशाप्रकारे राज्यात एक आदर्शवत कचरा प्रकल्प म्हणून नाशिक महापालिकेकडून चालविला जात आहे. अजून पुढच्या काळात घनकचरा व्यवस्थापनात येणार्‍या नवनवीन तंत्र वापरण्याची तयारी महापालिकेकडून करण्यात आली आहे.

सुरक्षित व राहण्यायोग्य शहराचे नियोजन

परदेशात शहरात सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते, याच पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात 800 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून या कामास प्रारंभ झाला आहे. नाशिक महापालिका व शहर पोलीस आयुक्तालय यांच्या संंयुक्त विद्यमाने स्मार्ट सिटी अंतर्गत महाआयटी यांच्याकडून 160 कोटी खर्चाच्या या सीसीटीव्ही व कॅमेरे व कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रुम या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे.

स्मार्ट सिटीकडून तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात शहरात 3200 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यापैकी पहिल्या टप्प्यात सीबीएस चौक आणि मेहेर चौक अशा ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

तसेच सामाजिक दायित्व म्हणून सराफ बाजारात देखील सराफ असोसिएशनच्या मदतीने सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. पंचवटीतील विभागीय कार्यालयातील स्मार्ट सिटी कार्यालयात कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रुमचे काम पूर्ण झाले असून या कंट्रोल रुमची 4000 सीसीटीव्ही कॅमरे जोडण्याची क्षमता आहे.

स्मार्ट सिटी कंपनीकडून 800 कॅमेरे बसविण्यात आल्यानंतर पुढच्या काळात सीएसआर अंतर्गत सीसीटीव्ही बसविण्यात आवाहन करण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com