- सोनम परब

पूर्वीच्या चित्रपटगीतांप्रमाणे आजची गाणी लक्षात का राहत नाहीत? एवढेच नव्हे तर चित्रपटगृहातून बाहेर पडतानासुद्धा आपण ती गुणगुणत नाही.

याला अनेक कारणे आहेत. बदलत्या जमान्यात चित्रपटातील गाण्यांबरोबरच अल्बममधील गाण्यांचीही संख्या वाढली आहे आणि डिजिटल मीडियामुळे अनेक प्लॅटफॉर्मवरून संगीत ऐकले जात आहे. शिवाय, पूर्वी गाण्याच्या एकेका ओळीवर वादविवाद होत असत. तसा समर्पणभाव जपण्यास आजच्या इन्स्टंट जगात वेळ कुणाजवळ आहे?

गेल्या काही दशकांपासून हिंदी चित्रपटांमधील संगीताची सातत्याने घसरणच होताना दिसते आहे. एखाद्या चित्रपटातील एखादे गाणे आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर किमान तीन ते चार वर्षे लक्षात राहत असे, तो काळ गेला कुठे? आवारा हूँ, डम डम डिगा डिगा, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, ईचक दाना बीचक दाना, एक चतुर नार अशी सुपरहिट गाण्यांची जंत्रीच सादर करता येईल. परंतु आज एखादे चित्रपटगीत आपण जेव्हा चित्रपट पाहतो तेव्हाच पहिल्यांदा ऐकतो.

तेही चित्रपटगृहातून बाहेर आल्यानंतर नव्वद टक्के प्रेक्षकांच्या लक्षात राहत नाही. एवढेच नव्हे तर चित्रपटगृहातून बाहेर येताना आपण ते गाणे गुणगुणतसुद्धा नाही. यामागे काय कारण असावे? आजकाल एखाद्या चित्रपटात एकाहून अधिक संगीतकार असतात. कधीकधी पाच ते सहा संगीतकार असतात, हे यामागील कारण असावे, असे ङ्गमाचिसफ या गुलजार यांच्या सुपरहिट चित्रपटाला संगीत देणारे संगीतकार विशाल भारद्वाज यांचे मत आहे. हा असा ट्रेन्ड आहे, जो संगीतकाराची ओळखच हिसकावून घेतो, असे त्यांना वाटते. परंतु प्रत्येक काळात जशी चांगली आणि वाईट गाणी तयार होतात, तशीच आजकालही चांगली आणि वाईट दोन्ही प्रकारची गाणी तयार होतात, हे मात्र भारद्वाज आवर्जून नमूद करतात.

दुसरीकडे, संगीतकार सलीम मर्चंट सांगतात की, बॉलिवूडमधील संगीतात सध्या ओरिजिनॅलिटीचा म्हणजेच अस्सलतेचा अभाव आहे. ते म्हणतात, ‘रिमेक गाणी करण्याच्या मानसिकतेलाच माझा विरोध आहे. बॉलिवूडमधून टाइमलेस धुन आता गायब झाली आहे. ज्या गाण्यांना स्वतःचे व्यक्तित्व आहे, अशी गाणी एक रसिक म्हणून ऐकणे ही माझी गरज आहे. साठ आणि सत्तरच्या दशकात तयार झालेले अधिकांश ट्रॅक आजही आपली ओळख टिकवून आहेत. याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्यात कालातीत राहणारी गुणवत्ता आहे. आज संगीत रचना करणार्यांपैकी अगदी मोजक्या लोकांच्या अंगीच हे गुण आहेत. अर्थात केवळ सुरावटच सर्वांत महत्त्वाची असते असे नाही. अनेकदा स्वरसाज चांगला असतो; पण गाण्याचे शब्द वाईट असतात. गाणे हे या सर्वांचे मिश्रण असते. त्यामुळे गीतही चांगले असणे आवश्यकच आहे.

हरिहरन यांच्या म्हणण्यानुसार, चांगले संगीत व्यापक प्रमाणात देशभरात पोहोचवायचे असेल तर चांगल्या संगीताला प्रोत्साहन दिले जाण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या मते, जेव्हा संगीत लोकांना आनंद देते, तेव्हा ते चांगले असते. आजकालचे संगीत अनेकजण ऐकतात, याचा अर्थ संगीत आपले काम करीत आहे. याखेरीज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड संख्येने लोक संगीताचा आस्वाद घेत आहेत. या माध्यमाद्वारे लोक चालताना, धावताना किंवा काम करतानासुद्धा संगीत ऐकू शकतात आणि ऐकत आहेत. आजही चांगले गायक तयार होत आहेत. परंतु चांगल्या गाण्यांचा प्रचार योग्य प्रकारे होण्याची गरज आहे. चांगल्या गाण्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे. परंतु गाण्यांचे मार्केटिंग करण्यासाठी सर्वच निर्माते खर्च करतात असे होत नाही. हरिहरन यांच्या मते आज हिंदी चित्रपटांतील सर्वच गाणी लोकांच्या कानात घोळली जात नाहीत, याचे कारण म्हणजे, संगीत ऐकणार्या लोकांना पूर्वीप्रमाणे मनोरंजनासाठी केवळ एकच व्यासपीठ उपलब्ध नसून, वेबसिरीज, टीव्ही शो, इंटरनेट आदी माध्यमांमधूनही ते मनोरंजन विश्वाशी जोडले गेले आहेत. याखेरीज आपल्या देशातील संगीत क्षेत्र बर्याच अंशी बॉलिवूडवर अवलंबून आहे. तिथे दरवर्षी संगीताबरोबर शेकडो चित्रपट प्रदर्शित होतात. भारताच्या मनोरंजन उद्योगाचा संगीत हा महत्त्वाचा भाग आहे. गेल्या पाच वर्षांत चित्रपट उद्योगात खूप बदल झाले आहेत. रॅप गीते आणि रिमिक्स गीते यांची आज चलती असून, संगीतकारांच्या एका विशिष्ट स्थितीचे हे निदर्शक आहे. संगीतकार जुन्या-नव्याच्या मधला मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात असल्याचे यावरून जाणवते. त्यामुळेच जुन्या गाण्याचे नव्या रंगढंगात सादरीकरण करण्याचे आणि त्यातून रिमिक्स किंवा नवे पॉप अल्बम तयार करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत, यात फारसे आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. आदिती बुधाथोकी ही एका म्यूझिक व्हिडिओमध्ये दिसणार असून, अमाल मलिक यांनी हा व्हिडिओ तयार केला आहे. चित्रीकरण दुबईत झाले आणि गाण्याची निर्मिती प्रमुख म्यूझिक कंपनीद्वारे करण्यात आली आहे. आदितीचे सोशल मीडियावर फॉलोअर्स मोठ्या संख्येने आहेत आणि आदिती यापूर्वी ङ्गहवा बनकेफ या म्युझिक व्हिडिओत दिसली होती. नेपाळमध्ये राहणार्या आदितीने हळूहळू आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावले आणि दिवसेंदिवस ती अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. अमाल हे एक निर्माते असून, उत्कृष्ट संगीतासाठी ते प्रसिद्ध आहेत.

आदिती म्हणते, ङ्गङ्घतू मेरा नही हे गाणे प्रेमात फसवणूक झाल्यानंतरची मानसिक अवस्था दर्शविते. प्रेमभंग हा गाण्याचा विषय आहे आणि त्या गाण्याची अभिव्यक्ती (एक्सप्रेशन) जास्तीत जास्त मिळतेजुळते आहे. तू मेरा नही हे गाणे श्रोत्यांना खूपच आवडते आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. व्हिडिओमध्ये जे दर्शविले गेले आहे, ते प्रभावी ठरले आहे. दुबईमध्ये गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानच्या काही सुखद आठवणी आहेत. मला या गाण्याचा एक भाग होता आले, याचा मला आनंद वाटतो.फफ आदिती आणि अमाल यांच्यादरम्यान उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळते. या गाण्याप्रमाणेच ‘याद पिया की आने लगी’ हे गाणे टी-सिरीज कंपनीकडून रिमिक्स स्वरूपात आले असून, दिव्या खोसला कुमार आणि टीव्ही स्टार शिविन नारंग यांच्यावर ते चित्रित करण्यात आले आहे. अक्षयकुमार, सलमान खान आदी बड्या कलावंतांवर चित्रित केलेले चित्रपट चांगला परतावा देत नसताना टीव्ही कलावंतांवर पॉप गाण्यांचे अल्बम चित्रित का करू नयेत, अशी मानसिकता तयार झाली आहे. चित्रपटाच्या गाण्याऐवजी केवळ एखाद्या अल्बममधील युगुलगीताच्या चित्रीकरणासाठी थेट दुबईला जाण्याची हिंमत वीस वर्षांपूर्वी कुणी दाखविली असती का?

जुन्या काळात गाणे तयार करताना प्रत्येक ओळीवर मेहनत घेतली जात असे. उदाहरणार्थ, श्री 420 चित्रपटातील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या गाण्यातील एका ओळीवर वादविवाद झाले होते. शब्द लिहिले होते, ङ्गरातें दसों दिशाओं की दोहराएगी कहानियाँ.फ या ओळीवर सखोल चर्चा झाल्यानंतरच ती कायम ठेवण्यात आली. पूर्वी गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक असे सगळे एकत्र बसून गाणे ओके करीत असत. आर. सी. बोराल, नौशाद, शंकर जयकिशन, एस. डी. बर्मन, ओ. पी. नय्यर, कल्याणजी आनंदजी, रवी, रोशन, खय्याम साहेब, आर. डी. बर्मन, चित्रगुप्त, सरदार मलिक, इकबाल कुरेशी, उषा खन्ना आदी संगीतकार हाच मार्ग अवलंबत असत. आजही जुनी गाणी ऐकल्यास एकेक शब्द बारकाईने ऐकावासा वाटतो. काही गाणी तर अजरामर झाली असून, आजही ती ऐकू येतात तेव्हा खूपच आनंद होतो. एकाच गाण्याचे बोल अनेकदा लिहून घेतले जाण्याचाही एक जमाना होता. ङ्गमुघले आजमफमधील ङ्गप्यार किया तो डरना क्याफ गाण्यामध्ये के. असिफ यांनी शकील बदायूं आणि नौशाद साहेब यांच्याकडून 100 वेगवेगळे मुखडे लिहवून घेतले होते आणि नंतरच त्या गाण्याला मान्यता दिली होती. आजकाल असे होऊ शकते का? पूर्वीचा समर्पणभाव जपण्यास आजच्या इन्स्टंट जमान्यात कुणाकडे वेळ आहे का? त्यामुळेच गाणी येतात आणि जातात.