एमएमआर लस : नवा दिलासा ?
फिचर्स

एमएमआर लस : नवा दिलासा ?

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

गोवर, गालगुंड आणि कांजिण्या यांसाठी दिली जाणारी एमएमआर लस कोविड-19 चा मुकाबला करण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट करणारे अनेक आधार मिळाले असून, त्यावर अधिक संशोधन आणि प्रयोगांची गरज आहे. गोवर आणि कोरोना यांच्या विषाणूंची रचना आणि कार्यपद्धतीत साधर्म्य आढळून आले असून, आफ्रिका खंडातील देश, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील ज्या प्रांतात एमएमआरचे लसीकरण झाले होते, तिथे कोरोनामुळे जीवितहानी होण्याचे प्रमाण नगण्य आढळले आहे.

प्रा. विजया पंडित

कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी एक नवा आशेचा किरण शास्त्रज्ञांना गवसला आहे. एमएमआर लस ज्यांना टोचली आहे, त्यांच्यात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी असल्याचे आढळले असून, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही लस उपयुक्त ठरू शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. एमएमआर लस ही गोवर, गालगुंड आणि कांजिण्या या आजारांसाठी दिली जाते. विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे होणारा संक्रमणाचा आवेग (सेप्टिक इन्फ्लेमेशन) या लसीमुळे रोखले जाते, असे संशोधकांना आढळून आले आहे. सर्वसाधारण रोगप्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तीला एमएमआर लस टोचल्यास कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि कोविड-19 चा सर्वाधिक धोका असणार्‍यांसाठी, विशेषतः आरोग्य कर्मचार्यांसाठी ही लस उपयुक्त ठरू शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. ‘अमेरिकन सोसायटी ऑफ मायक्रोबायोलॉजी’तर्फे प्रकाशित होणार्‍या ‘एम-बायो’ या नियतकालिकात यासंदर्भातील वृत्तांत प्रकाशित झाला आहे. एमएमआर लसीची चाचणी आत्यंतिक धोका असणार्‍या लोकसंख्येवर घेतल्यास, कमीत कमी धोका आणि जीव वाचविण्याच्या दृष्टीने अधिकाधिक फायदा मिळू शकेल, असे लुइझियाना युनिव्हर्सिटी हेल्थ स्कूलचे असोसिएट डीन फॉर रिसर्च डॉ. पॉल फिडेल यांनी म्हटले आहे.

गोवर, गालगुंड आणि कांजिण्या या आजारांवर बहुगुणी ठरलेली ही लस टोचून घेतल्यास कोणताही अपाय होण्याची शक्यता नाही; शिवाय या तीन आजारांव्यतिरिक्त कोविड-19 च्या विषाणूंशी लढण्याची अतिरिक्त ताकद मिळू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत हाती असलेले पुरावे असे दर्शवितात की, क्षीणीकृत लस एखादा विशिष्ट विषाणूच नव्हे तर ज्यासाठी लस तयार केली आहे, तो वगळता कोणत्याही धोकादायक विषाणूशी लढण्यासाठी उपयुक्त ठरते. कारण ती रोगप्रतिकारक पेशींना बळकट करून विषाणूंशी लढण्यासाठी तयार करते आणि संबंधित व्यक्तीला तशाच प्रकारच्या अनेक संसर्गांपासून वाचवू शकते. क्षीणीकृत केलेले जिवंत विषाणू शरीरात सोडणार्‍या कोणत्याही लशीचा उद्देश जिवंत विषाणूंशी लढण्याची ताकद पेशींमध्ये निर्माण करणे हा असतो. अशा प्रकारच्या लसींमुळे ‘प्रशिक्षित सैनिक पेशी’ तयार होतात आणि या पांढर्‍या पेशी अस्थिमज्जेत (बोन मॅरो) पूर्वचिन्हित झाल्या असता, घातक प्रकारच्या विषाणूंशी लढण्याची अधिक क्षमता प्रदान करतात. न्यू ऑर्लिन्स येथील ट्यूलेन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील प्राध्यापक डॉ. मायरी नॉव्हेर यांच्या प्रयोगशाळेत डॉ. फिडेल यांच्या सहकार्याने झालेल्या संशोधनात जिवंत विषाणूंची एमएमआर लस दिल्यास घातक आजारांशी लढण्याची शक्ती श्वेतपेशींमध्ये येते, हे स्पष्ट झाले.

फुफ्फुसाचा वाढता संसर्ग हे कोविड-19 मुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमुख कारण ठरले आहे. परंतु हा संसर्ग वाढण्यापूर्वीच विषाणूचा प्रतिकार झाल्यास कोरोनामुळे मृत्यू होत नाही, याचे एक उदाहरण अमेरिकेत नुकतेच पुढे आले आहे. यूएसएस-रूझवेल्ट या जहाजावरील 955 खलाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती; मात्र त्यातील फक्त एकाच खलाश्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.

उर्वरित खलाश्यांना सौम्य लक्षणे जाणवली; मात्र रुग्णालयात न जाताच ते बरेही झाले. नौदलात भर्ती होत असतानाच सर्व खलाश्यांना एमएमआर लस दिली जाते. त्यामुळेच या खलाश्यांमध्ये कोविड-19 विरुद्ध लढण्याची रोगप्रतिकार शक्ती विकसित झाली असावी, असे मानले जाते. त्यांच्या पांढर्‍या पेशींमध्ये एमएमआरव्यतिरिक्त अन्य विषाणूंचाही निकराने प्रतिकार करण्याची ताकद निर्माण झाल्यामुळेच कोरोनाचा त्यांच्यावर परिणाम झाला नाही, असे मानण्यात येते. या वास्तवाला पुष्टी देणारा आणखी एक पुरावा म्हणजे, लहान मुलांना कोविड-19 ची लागण झाल्यास त्यांच्यातील मृत्युदर कमी दिसून येतो. वयस्क व्यक्तींचा ज्या प्रमाणात मृत्यू कोविड-19 मुळे जगभरात झाला, तेवढा लहान मुलांचा झाला नाही. अनेक मुले कोरोनाला पराभूत करून घरी परतली. याचेही कारण लहान मुलांना दिली जाणारी एमएमआरची लस हेच आहे, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. डेंगी, स्वाइन फ्लू आदी आजारांना लहान मुले मोठ्या संख्येने बळी पडली; मात्र कोरोनामुळे मुलांचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळेच एमएमआर लस कोविड-19 चा प्रतिकार करू शकते का, याची वैद्यकीय चाचणी करावी, अशी सूचना संशोधकांनी केली असून, प्रतिकारशक्ती वाढविण्यास ही लस उपयुक्त असल्याचे मान्य झाल्यास अनेकांचा प्राण वाचविणे शक्य आहे. अनेकांच्या शरीरात सौम्य लक्षणे दिसताच एमएमआर लशीमुळे मिळालेली प्रतिकारशक्ती काम करू लागेल आणि कोविड-19 च्या विषाणूंचा शरीरात होत असलेला प्रसार वेळीच आटोक्यात येईल.

आफ्रिकेतील मादागास्कर या देशात गेल्या काही वर्षांत गोवरची साथ मोठ्या प्रमाणावर पसरली होती. तेथे एमएमआरचे लसीकरणही त्यामुळे सुमारे सत्तर लाख लोकांना करण्यात आले. आज कोरोनामुळे या देशात एकही मृत्यू झालेला नाही. त्यामुळेच या लशीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. शास्त्रज्ञांच्या मते गोवर आणि कोरोना यांच्या विषाणूंच्या रचनेत काहीसे साधर्म्य आहे. शरीरात हल्ला करण्याची आणि आजार पसरविण्याची दोन्ही विषाणूंची कार्यपद्धतीही एकच असल्याचे दिसून आले. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया अशा काही देशांमध्ये एमएमआरची लस प्रौढ व्यक्तींनाही दिली जाते. या देशांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा कमी आहे आणि मृत्यूचे प्रमाणही कमी आहे. ऑस्ट्रेलियात 1965 नंतर जन्मलेल्या सर्वांना एमएमआर लस देण्यात आली. ही लस दिल्यानंतर दहा ते पंधरा वर्षांनी लसीची परिणामकारकता कमी होत असल्याचे दिसून आल्यामुळे हा निर्णय घेतला होता. अमेरिकेच्याही एका प्रांतात एमएमआरची लस देण्यात आली असून, तिथे कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. कोविड-19 चा प्रादुर्भाव आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास एमएमआरची लस उपयुक्त ठरत असावी, असा कयास त्यामुळेच बांधण्यात येत आहे.

न्यूझीलंडमध्ये गेल्या दोन वर्षांत एमएमआरची लस लोकांना देण्यात आल्यामुळे तेथे कोरोनाची साथ आटोक्यात राहिल्याचे मानले जाते. तसेच युगांडा, रवांडा या देशांमध्येही कोरोनामुळे झालेले मृत्यू अत्यल्प आहेत. भारतात ही लस 15 वर्षांखालील शाळकरी मुलामुलींना देण्यात आली आहे. त्यामुळे या वयोगटातील मुले कोरोनाचा ताकदीने मुकाबला करून घरी परतली असावीत, असे म्हणण्यास जागा आहे. ताज्या प्रयोगांमधून काही बाबी समोर आल्या असून, त्यावर अधिक संशोधन होण्याची गरज शास्त्रज्ञांच्या वर्तुळातून व्यक्त होत आहे. एमएमआरची लस देताना जिवंत विषाणू क्षीण करून शरीरात सोडण्यात येतात. त्यामुळे पांढर्या पेशी सक्रिय होऊन त्या घातक विषाणूंशी लढण्यास सक्षम होतात. ही सक्षमता कोविड-19 ला रोखण्यात प्रभावी ठरत असेल, तर खरोखरच या लशीवर अधिक संशोधन व्हायला हवे.

गोवर आणि कोरोनाच्या विषाणूंच्या रचनेत साधर्म्य आढळले आहेच; शिवाय दोन्ही विषाणू एकाच रिसेप्टारवर आक्रमण करतात. हे साधर्म्य लक्षात घेऊन भारतात अधिक संसर्ग असलेल्या ठिकाणी एमएमआरची लस दिल्यास साथ आटोक्यात येऊ शकते, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनावर लस शोधून काढण्याचे प्रयत्न प्रगत देशांमध्ये सुरू आहेत. तथापि, त्या प्रयत्नांना अद्याप म्हणावे तसे यश आलेले नाही. शिवाय, ही लस तयार होण्यास अजून वर्षभराचा कालावधी लागेल, असेही सांगितले जाते. कोरोनाचा विषाणू सतत स्वतःचे स्वरूप बदलत असल्यामुळे लस तयार झालीच तरी विषाणूच्या बदललेल्या स्वरूपावर ती किती प्रभावी ठरेल, याबद्दही अनेकजण साशंकता व्यक्त करतात. परंतु एमएमआरची लस तयार असून, ज्या देशांमध्ये ती मोठ्या प्रमाणावर दिली गेली, तेथे मृत्यूचे प्रमाण कमी आढळल्याने या दिशेने संशोधन आणि प्रयोग झाल्यास मोठा दिलासा मिळू शकेल, असे संशोधकांचे म्हणणे असून, अनुभवही त्याला पुष्टी देणारे आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com