भारतीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा

भारतीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा

- कमलेश गिरी

अनिवासी भारतीयांचा दबदबा हा अनेक काळापासून जगावर राहिला आहे. माहिती तंत्रज्ञान असो, क्रीडा क्षेत्र असो, राजकारण असो किंवा विज्ञान असो. अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस हे अलीकडील काळातील लक्षणीय उदाहरण आहे. नव्या पिढीतील अनिवासी भारतीय देखील यापासून मागे नाहीत. सध्या सिरिशा बांदला आणि समीर बॅनर्जी यांच्या कामगिरीवर वर्तमानपत्राचे रकाने भरले गेले आहेत. अवकाशात फेरी मारणारी सिरिशा आणि ज्यूनिअर विम्बल्डन जिंकणारा समीर या दोघांनी भारतीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

सिरिशा बांदलाचे नाव आता कोणाला सांगायची गरज नाही. कल्पना चावला आणि सुनीता विलियम्स यांच्यासारख्या अंतराळवीरांच्या यादीत सिरिशाचे नाव सामील झाले आहे. दुसरीकडे अमेरिकी युवा टेनिसपटू समीर बॅनर्जीने ज्युनिअर श्रेणीतील पुरुष एकेरीतील विम्बल्डन जिंकून इतिहास घडवला आहे. त्याने अंतिम सामन्यात अमेरिकेचाच व्हिक्टर लिलोव्ह याला पराभूत केले. सिरिशा आणि समीर यांच्यात एक साम्य आहे आणि ते म्हणजे ते मूळ भारतीय वंशाचे आहेत. अर्थात आतापर्यंत असंख्य भारतीयांनी देशाचे नाव अटकेबार नोंदवले आहे. भारतीय वंशांच्या नागरिकांची जगातील बहुतांश क्षेत्रात हुकुमत आहे. भारतातही प्रतिभावंतांची कमतरता नाही, परंतु त्यांची वेळेवर ओळख पटवली जात नाही आणि संधीही मिळत नाही. सिरिशा आणि समीर यांच्या कामगिरीचा सर्वच भारतीयांना अभिमान आहे.

काही जण या अभिमानाला आक्षेप घेऊ शकतात. यात अभिमान वाटण्यासारखे काय आहे, असे म्हणू शकतात. असा विचार हा संकुचित वृत्तीतून येऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे भारतीय नागरिक हे जगातील बहुतांश देशात विखुरलेले आहेत. अनिवासी भारतीयांची संख्या जगात सर्वाधिक आहे. भारतीय वंशज स्थानिक संस्कृती, विविधता, आचार विचार यांच्यात एकरुप झाले असले तरी भारतीय अस्तित्व पदोपदी जाणवते.

2020 च्या आकडेवारीनुसार 1.8 कोटी अनिवासी भारतीय हे जगभरातील विविध देशात वेगवेगळ्या समुदायात राहत आहेत. याबाबतीत जगातील मोठा गट म्हणून भारतीयांकडे पाहिले जाते. अनिवासी भारतीयांनी स्थानिक संस्कृती आत्मसात करण्याबरोबरच संबंधित देशाच्या विकासातही मोलाची भर घातली आहे. त्यांनी केवळ आपल्या जीवनाला सुखदायी केले नाही तर तेथील राजकारण, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्रातही आपला वरचष्मा सिद्ध केला आहे. आपल्याला केवळ त्यांच्या कामगिरीचे कौतुक करुन चालणार नाही तर आपले भारतीय नागरिक हे जगभरातील विविध देशांच्या प्रगतीशील आणि विविधतेने नटलेल्या समुदायाचे घटक आहेत, हे देखील पाहिले पाहिजे.

सिरिशा बांदलाचा जन्म 1987 मध्ये आंध्र प्रदेशात झाला. ती गुंटूरची रहिवाशी आहे. सिरशाचे आजोबा कृषी शास्त्रज्ञ आहेत. तिचे वडिल डॉ. मुरलीधर हे देखील स्वत: शास्त्रज्ञ आहेत. अंतराळात सफारी करणारी सिरिशा बांदला ही लहानपणापासूनच उड्डाण घेण्यासाठी आतूर होती. तिचे पालन पोषण टेक्सासच्या ह्यूस्टन येथे झाले आणि या कारणामुळे तिने रॉकेट आणि अंतराळ मोहीमा जवळून पाहिल्या. कल्पना चावलानंतर सिरिशा बांदला ही भारतात जन्म घेणारी दुसरी भारतीय अंतराळवीर आहे. त्याचबरोबर अंतराळात जाणारी ती चौथी भारतीय नागरिक ठरली आहे. सिरिशा बांदला ही व्हर्जिन गॅलेक्टि कंपनीच्या गर्व्हनमेंट अफेअर्स अँड रिसर्च आप्रेशनची उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. हे पद मिळवण्यासाठी तिने खूप मेहनत केली आहे. काही दिवसांपूर्वी रिचर्ड ब्रॅन्सन यांनी अंतराळात जाणार्‍या सहा लोकांच्या टीमची घोषणा केली होती. त्यात सिरिशा बांदलाचे नाव होते. तेव्हापासून ती चर्चेत आली.

रविवारी सहा मिनिटांचे उड्डाण करुन अंतराळ यान व्हर्जिन आर्बिटमध्ये परतले तेव्हा अब्जाधिश रिचर्ड ब्रॅन्सन यांनी जल्लोष केला. त्यांनी सिरिशाला आपल्या खांद्यावर उचलले. हे दृश्य सर्व भारतीयांना अनेक काळ स्मरणात राहिल.

आता बोलू समीर बॅनर्जीबद्दल. समीरचे आई वडिल हे भारतातच राहणारे आहेत. 1980 रोजी ते अमेरिकेला गेले आणि तेथेच राहिले. समीरची टेनिसप्रती आवड पाहून पालकांनी त्याला प्रोत्साहन दिले. अर्थात यावर्षी ज्यूनिअर फ्रेंचमध्ये समीरने फारसा प्रभाव पाडला नाही. पहिल्याच फेरीत तो स्पर्धेबाहेर गेला. परंतु त्याने हार मानली नाही. त्याने विम्बल्डनमध्ये पुरुष एकेरीतील ज्यूनिअर श्रेणीतील जेतेपद पटकावले. या विजयाने टेनिस क्षेत्रात दबदबा प्रस्थापित केला आहे. युकी भांवरी हा ज्यूनिअर श्रेणीतील जेतेपद जिंकणारा हा शेवटचा भारतीय होता. त्याने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती. सुमीत नागलने 2015 मध्ये व्हियतनामच्या ली होआंगबरोबर खेळत विम्बल्डन दुहेरी श्रेणीतील चषक जिंकले होते.

रामनाथन कृष्णन हे 1954 मध्ये ज्यूनिअर विम्बल्डन चॅम्पियनशिप जिंकणारे पहिले भारतीय होते. त्यांचा मुलगा रमेश कृष्णनने 1970 मध्ये ज्यूनिअर विम्बल्डन आणि ज्यूनिअर फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. लिएंडर पेसने 1990 मध्ये ज्युनिअर विम्बल्डन आणि ज्यूनिअर यूएस ओपन जिंकली होती. यानिमित्ताने एक गोष्ट सांगता येईल ती म्हणजे मुलांची रुची पाहूनच त्यांना आणखी प्रतिभावंत करणे गरजेचे आहे. भारतात अजूनही पाल्य हे पालकांच्या मानसिक दबावाखाली दबलेले आहेत. सिरिशा आणि समीर हे भारतीय मुलांसाठी आदर्श आहेत. काहीतरी करुन दाखवण्याचे वेड डोक्यात असायला हवे. आपल्याला या दोघांच्या कामगिरीचा खरोखरच अभिमान असून त्यांचे यश प्रेरणादायी आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com