आहे मनोहर तरी...
फिचर्स

आहे मनोहर तरी...

विशेष लेख : वेध मराठी मुलखाचा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मुंबई | किशोर आपटे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही भाजप नेत्यांसह नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट राज्यातील साखर कारखानदारीच्या प्रश्नांसंबधी असल्याचे सांगण्यात आले.

मात्र, जे काम राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी करायचे ते काम विरोधी पक्षनेते करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली जाणे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधणे याची संगती कशी लावायची? सत्तेत असूनही आघाडीचे नेते का उदास आहेत?

गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर अखेरीस सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा जीव काही सत्तेत रमत नाही, असे त्यांच्या वारंवारच्या वक्तव्यांवरून लक्षात येते. सुनीता देशपांडे यांच्या ‘आहे मनोहर तरी, गमते उदास’सारखी या नेत्यांची सत्तेत असून तगमग होत असावी. काही दिवसांपासून राजस्थानात सत्तारूढ काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्या बंडखोरीच्या बातम्या येत आहेत.

मात्र या बातम्या येण्याआधीपासूनच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आघाडी सरकार पडणार असल्याच्या ‘तारीख पे तारीख’ स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे आघाडीच्या नेत्यांना रात्रीची झोपही येत नाही म्हणे! या पार्श्वभूमीवर शेतकरी-साखर उद्योगांच्या समस्यांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. नंतर कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रामविलास पासवान यांनाही भेटून मागण्यांचे निवेदन सादर केले.

मोगलांच्या घोड्यांना म्हणे पाण्यातही ‘धनाजी-संताजी’ दिसत. तसे सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांना फडणवीसांचे काहीतरी राजकीय कारस्थान सुरू आहे असे वाटत राहते. या घडामोडींमागे रखडलेले ‘ऑपरेशन लोटस’ आता येत्या काही दिवसांत राबवले जाईल, अशाही शक्यता वर्तवल्या जात आहेत.

ही शक्यता कोण व्यक्त करीत आहेत तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत! वारंवार सरकार पाडण्यावरून त्यांची वक्तव्ये येत राहतात. आता त्यांच्या साथीला प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सांवत, महिला आणि बालविकास मंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळही सरसावले आहेत.

राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपने पाचशे कोटी रूपयांची तरतूद केली असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. तर राज्यातील भाजपचे मोठे नेते काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असे विधान अ‍ॅड. ठाकूर यांनी केले आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानीही अशाच आशयाचे जाहीर वक्तव्य केले आहे.

भाजपचे 18-20 आमदार संपर्कात असल्याच्या या वक्तव्यांचा अर्थ भाजपत गेलेल्या पूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. भाजपकडे आता सत्ता नसल्याने योग्य संधी मिळताच ते घरवापसी करू शकतात.

काही प्रमाणात ही बाब खरीदेखील आहे. कारण भाजपचा सत्तेचा सारीपाट नोव्हेंबरअखेर शरद पवार यांच्या ‘बारामतीच्या करामती’ने उधळला गेला. त्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-कॉग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले.

मात्र हे सरकार सहा महिनेसुध्दा चालणार नाही, असे भाकित भाजप नेते करीत होते. प्रत्यक्षात अनेक अग्निपरीक्षा देत गेल्या सहा महिन्यात हे सरकार खुर्चीत मजबूतपणे बसलेच आहे.

सध्या ‘करोनाचे संकट असल्याने किमान पुढील दोन महिने तरी राज्यातील भाजप नेत्यांना सरकार पाडण्याची कोणतीही कवायत करता येणार नाही. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात सरकार पाडण्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत, असे सांगितले जात आहे.

शेतकर्‍यांपुढील आणि साखर उद्योगांसमोरील विविध प्रश्न हा बारामतीच्या काकांचा जिव्हाळ्याचा विषय! केंद्र सरकारकडून मदतीची मागणी करण्यासाठी ते वारंवार त्यांचे स्वयंघोषित शिष्योत्तम प्रधानसेवक यांना पत्रे पाठवत राहतात, पण माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची या प्रश्नावर भेट घेतली म्हणे! काय गंमत आहे पाहा! इतके दिवस शेती आणि साखर उद्योगांचे प्रश्नही केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येतात हे कुणालाच कसे माहिती नव्हते?

पण यानिमित्ताने देवेंद्रजींच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन अमितभाईनी दिले आहे. त्यानंतर फडणवीसांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि रामविलास पासवान यांची भेट घेतली.

मागण्यांचे सविस्तर निवेदन त्यांना सादर केले. महत्वाचे म्हणजे या भेटीवेळी अनेक वर्षे राज्याचे सहकार पणनमंत्री राहिलेले हर्षवर्धन पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांचे सुुपुत्र विनय कोरे, धनजंय महाडिक, जयकुमार गोरे, पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते. दिल्लीतील माध्यमांशी फडणवीस दिलखुलास बोलले.

शेतकर्‍यांना एफआरपी मिळायला हवी आणि साखर उद्योगसुद्धा चालला पाहिजे, या हेतूने साखर उद्योगातील अडचणी अमित शहा यांच्यापुढे मांडल्याचे त्यांनी सांगितले. साखर उद्योगांना पॅकेज द्यावे, एमएसपी, कर्जाचे पुनर्गठन, सॉफ्ट लोन आदी मागण्या गृहमंत्र्यांकडे केल्या, असेही फडणवीसांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने अतिशय चांगले इथेनॉल धोरण तयार केले आहे. त्याच्या विस्ताराबाबतसुद्धा यावेळी चर्चा केली. केंद्र सरकारकडून साखर उद्योगांसाठी काही चांगले निर्णय लवकरच घेतले जातील, अशी आशा फडणवीसांना आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या सर्व प्रश्नांवर समाधानकारक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने खरे तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समाधान मानायला हवे.

कारण त्यांचे रखडलेले मोठे काम राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न करून सरकारला मदतच केली आहे, पण सत्ताधारी नेत्यांना राज्याच्या शेतकरी आणि साखर कारखानदारीच्या त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर विरोधकांनी केलेल्या कामगिरीचे जराही कौतुक नसावे? सध्या राज्याचा आर्थिक गाडा रूतला असताना सहकारातील कारखानदारी क्षेत्राला काही नवी दिशा देण्याचा प्रयत्न विरोधक करतात. त्यावर सरकारचा दृष्टिकोन नकारात्मक असावा हे काही योग्य नाही.

आघाडी नेत्यांची नकारात्मकता

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज लढवय्या नेते छगन भुजबळ यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील भाजप आमदार फुटू नयेत यासाठीच देवेंद्र फडणवीस आणि अन्य वरिष्ठ नेत्यांकडून सत्ता परत येण्याचे ‘लॉलीपॉप’ स्वपक्षीय आमदारांना दाखवले जात आहे.

दिल्लीत केंद्रीयमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली; यावर भुजबळ यांनी खोचक टिप्पणी केली. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालणार आहे. या काळात भाजप आमदारांनी चुळबूळ करू नये म्हणूनच वरिष्ठांकडून सत्तेची स्वप्ने दाखवली जात असावे, असे भुजबळ म्हणाले.

भुजबळ कसलेले नेते आहेत. शिवसेनेच्या काळापासून त्यांच्या राजकीय शक्ती आणि युक्तींचा परिचय महाराष्ट्राने घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यात अजिबात तथ्य नाही असे म्हणता येणार नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपत जाण्याची लाट आली होती. त्यात अन्य पक्षांतील सुमारे चार डझन नेते भाजपवासी झाले होते.

त्या सर्वाना ‘सत्तेविना करमेना’ झाले होते. म्हणून ते तिकडे गेले आणि नंतर पवार साहेबांनी ‘भाजपची सतरंजी’ ओढून घेत उध्दव ठाकरेंना मुत्री केले. त्यामुळे नारायण राणे, विखे-पाटील, मोहिते-पाटील, पिचड यांसारख्या दिग्गज गणल्या जाणार्‍यांची राजकीय गोची झाली आहे. भाजपत काँग्रेससारखे वातावरण नसते.

तेथे आदेश असेल तसे राहावे लागते. त्यामुळे या सार्‍यांची अधिकच घुसमट होत असेलही. भुजबळ यांच्या संपर्कात असलेल्या या दिग्गजांनी त्यांना ही ‘मन की बात’ कदाचित सांगितली असेलही. त्यामुळे भुजबळ म्हणतात ते अगदीच असत्य म्हणता येणार नाही, पण तरीही सत्ताधार्‍यांना ‘लोटस’ची भीती का वाटते? हा खरा प्रश्न आहे.

दिल्लीत फडणवीस-शहा यांची भेट घडत असताना त्या दरम्यान शिवसेनेच्या खासदारांची बैठक ‘वर्षा’वर झाली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या खासदारांची मते जाणून घेतली. राजकीय प्रादूर्भाव होणार नाही, कारण आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत. आमचे सरकार 5 वर्षे टिकेल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील, असा ठाम विश्वास खासदार संजय राऊत यांनी बैठकीनंतर दिली.

फडणवीस दिल्लीत गेले आहेत. त्याच्याशी आमच्या बैठकीचा काहीही संबंध नाही. राजकीय घडामोडी काहीही सुरू नाहीत. सबकुछ आलबेल है और आलबेल रहेगा, असे राऊत म्हणाले. मग खासदारांची बैठक कशासाठी? हा प्रश्न साहजिकच होता. कोकणात गणपती उत्सवाबाबत काय भूमिका घ्यावी?

बर्‍याच कालावधीनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला म्हणून शिवसेनेचे खासदार एकत्र आले. याशिवाय चर्चेचा मुख्य विषय ‘करोना’वरील उपाययोजना’ हा होता, असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले.

राज्याच्या महिला आणि बालकल्याणमंत्री, कांग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी तर भाजपच्या 105 आमदारांपैकी काही आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत. त्यांची नावे सार्वजनिकपणे घेतल्यास राजकीय भूकंप होईल, असा दावा केला. राजस्थानात भाजपकडून सुरू असलेल्या राजकारणावर त्यांनी सडकून टीका केली.

भाजपची सत्तेची भूक इतकी वाढली आहे त्यासाठी ते घाणेरडे राजकारण करीत आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थिर असल्याचेही ठाकूर म्हणाल्या. ट्विटरवर एक व्हिडीओ संदेश पाठवून ठाकूर यांनी देवेंद्र फडणवीसावर शाब्दिक हल्ला चढवला. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी भाजपत प्रवेश केला आहे. भाजपच्या 105 आमदारांपैकी किती जण मूळचे भाजपचे आहेत?

जे नाहीत ते नेहमीच भाजपबरोबर राहतील का? याबाबत संशोधन करावे लागेल, असाही सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे. महाराष्ट्राने देशाला राजकारणाचे नवे सूत्र दिले आहे. ते नक्कीच सफल होईल, असा विश्वासही ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. आघाडीचे नेते म्हणतात त्याप्रमाणे इतर पक्ष फोडणार्‍या भाजपलाच महाराष्ट्रात गळती लागण्याची कितपत शक्यता आहे ते येत्या काळात कळू शकेल.

(लेखक ‘देशदूत’चे मुंबई प्रतिनिधी आहेत.)

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com