बांगलादेशाकडून घ्यायचा बोध !

jalgaon-digital
5 Min Read

हेमंत देसाई, राजकीय विश्लेषक

सर्वविरोधकांना तोंड देऊन, प्रसंगी त्यांच्या मुसक्या आवळून शेख हसीना यांनी बांगलादेशमध्ये विकासाचा मार्ग प्रशस्त केला. विद्वेषाच्या फेर्‍यात सापडलेल्या देशात विकास साधण्याचे कठीण काम शेख हसीना यांनी करून दाखवले. बांगलादेशच्या भेटीनंतर मोदीजींनी या देशापासून स्फूर्ती घ्यावी.

करोनाने थैमान घालण्यास सुरुवात केल्यानंतर तब्बल सोळा महिन्यांच्या कालखंडानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला बांगलादेशचा दौरा चांगलाच चर्चिला गेला. त्यांच्या बांगलादेश भेटीत दोन्ही देशांदरम्यान दळणवळण, वाणिज्य, माहिती तंत्रज्ञान, क्रीडा आदी पाच करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. या दौर्‍यादरम्यान ‘भारत आणि बांगलादेशाला जगात स्थैर्य, प्रेम आणि शांतता हवी आहे. अस्थिरता, दहशतवाद वा अस्वस्थता नको आहे’, असे प्रतिपादन मोदी यांनी मतुआ समुदायाच्या सदस्यांपुढे बोलताना केले.

ओराकांडी हे हिंदू मतुआ समुदायाचे श्रद्धास्थान आहे. भारताकडून तिथल्या मुलींसाठी एक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू केली जाईल, अशी घोषणा मोदी यांनी केली. बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाषण करताना मोदींनी, आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केल्याचा दावा केला. मोदींच्या या वक्तव्यानंतर समाजमाध्यमांवरून या दाव्याच्या सत्यतेबद्दल शंका घेणारे अनेक विनोद झाले. प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत.

मोदी नेमके त्याच वेळी बांगलादेशमध्ये जातात आणि प. बंगालबद्दल भाषण देतात, हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन असल्याची टीका प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. गेल्या वर्षी ‘सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असला तरी नागरिकत्व कायद्याची गरज नव्हती,’ अशी टीका बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केली होती. बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमिन यांनीही या कायद्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीमुळे बांगलादेश आणि भारताचे संबंध बिघडले होते. या पार्श्वभूमीवर मोदींनी बांगलादेशला भेट देऊन वातावरण निवळवण्याचा प्रयत्न केला, असे म्हणता येईल. तरीदेखील मोदींच्या भेटीवेळी बांगलादेशमध्ये ठिकाठिकाणी निदर्शने झाली. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात सहाजण ठार झाले. मोदींच्या भेटीदरम्यान तिथल्या काही हिंदू मंदिरांवर हल्ले होण्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या. या घटनांना धर्मांधतेचा रंग देऊन दोन देशांमधल्या तणावात काडी टाकण्याचे प्रयत्न सुरू होतील. पण अशा वेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून भारताने बांगलादेशबरोबर संबंध सुधारण्यासाठी टाकलेल्या पावलांचा विचार करणे गरजेचे आहे.

बांगलादेशला पहिल्यापासून धर्मांध राजकारणाची पार्श्वभूमी होती. तरीदेखील शेख हसीना यांनी अत्यंत कठोरतेने त्या देशातल्या अशा प्रवृत्तींना मागे टाकण्याचा प्रयत्न केला हे लक्षात घेण्याजोगे आहे. ही मर्यादा लक्षात घेऊनच भारताला या देशाबरोबरचे संबंध सुधारावे लागतील. त्या देशात हिंदू मंदिरांवर हल्ले होणे ही बाब निषेधार्हच आहे. पण त्याची प्रतिक्रिया ताबडतोब आपल्या देशात उमटावी असे वातावरण तयार करणे चुकीचे होईल. अंतर्गत राजकारणात भारत-बांगलादेश संबंधाचे पडसाद किती उमटू द्यायचे याचा विचार करुनच राजकीय पक्षांनी पावले टाकायला हवीत.

गेल्या दशकभरात बांगलादेशने चमकदार आर्थिक कामगिरी बजावून, दक्षिण आशियाई देशांचे लक्ष वेधून घेतल्याचेही नाकारुन चालणार नाही. बांगलादेशचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा जास्त आहे. तिथला विकासदर आपल्यापेक्षा अधिक असून आर्थिक विषमतेचे प्रमाण कमी आहे. सामाजिक निर्देशांकाच्या अर्थात ‘सराउ’च्या संदर्भातही तो वरचढ आहे. 1971 मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या एक सप्तमांश इतकी परकीय मदत मिळत असे.

आज हे प्रमाण फक्त दोन टक्के आहे. म्हणजेच आता बांगलादेशला विदेशी मदतीच्या टेकूची गरज राहिलेली नाही. वित्तीय तूट, रोजगार, खास करून महिला रोजगार, विदेश व्यापार संतुलन या बाबतीत बांगलादेशची कामगिरी भारतापेक्षा चांगली आहे. भारतापेक्षा बांगलादेशच्या उत्पादन क्षेत्राचा ‘सराउ’मधला वाटा अधिक आहे. ‘सराउ’च्या तुलनेतली गुंतवणूक तसेच सार्वजनिक कर्ज यांच्या गुणोत्तराच्या संदर्भात बांगलादेश भारताच्या पुढे आहे.

शेख हसीना यांचा देश भारताच्या पुढे गेला आहे तर पाकिस्तानची काय कथा? अर्भक मृत्यूचे पाकिस्तानमधले सरासरी प्रमाण बांगलादेशच्या दुप्पट आहे. सर्व सामाजिक निर्देशांकाच्या बाबतीत पाकिस्तान बांगलादेशच्या अनेक कोस मागे आहे. बांगलादेश आता विकसनशील देश बनला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारातले त्याला मिळणारे काही लाभ कमी होणार आहेत. खास करून, प्रगत बाजारपेठा. विशेषतः युरोपियन युनियनमध्ये बांगलादेशच्या माल आणि सेवांना कोटामुक्त प्रवेश असे तसेच आयात शुल्क कमी असत वा पूर्णपणे माफ असत. बांगलादेशमधली साठ टक्के निर्यात ही युरोपियन युनियनमध्ये होते.

एकूण निर्यातीतला 80 टक्के वाटा हा कापड आणि कपडे यांचा आहे.असे असले तरी विशिष्ट क्षेत्रकेंद्रित निर्यात असल्याचा फटकाही बांगलादेशला बसू शकतो. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाबाबत भारत बांगलादेशच्या किंचित पुढे आहे. एकूण मानवी विकास निर्देशांकात बांगलादेशच्या तुलनेत भारताची कामगिरी किंचित सरस आहे. इथे हेदेखील लक्षात घेतले पाहिजे की, भारत स्वतंत्र झाल्यानंतर चोवीस वर्षांनी बांगलादेश अस्तित्वात आला. मुळातच हा देश धर्मवाद, दहशतवाद, गरिबी, बेकारी यांनी घेरलेला होता. या परिस्थितीला तोंड देऊन शेख हसीना यांनी बांगलादेशात विकासाचा मार्ग प्रशस्त केला. शिक्षण, आरोग्य, बचत, गुंतवणूक आणि उत्पादन या पंचसूत्रीवर भर देऊन विकास साधण्याचे कठीण काम करून दाखवले. बांगलादेशच्या या भेटीनंतर मोदीजींनी स्फूर्ती घेतली तर तोच त्यांचा खरा सत्याग्रह ठरेल!

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *