गावकुसातील लेकी-बाई...अजूनही मुक्त पंखांच्या प्रतीक्षेत!

गावकुसातील लेकी-बाई...अजूनही मुक्त पंखांच्या प्रतीक्षेत!

पुरुषोत्तम गड्डम

ज्यांना गरज आहे त्या महिलांना दिन ‘साजरा’ करण्याची उसंत नाही, आणि ज्यांना उसंत आहे, त्यांना काही फरक पडत नाही... हे वास्तव आहे !

आजही गावकुसातील किती महिलांना माता सावित्रीबाई फुलेंची जयंती ठाऊक आहे... एक स्त्री शिकली तर सारे घर कसे साक्षर होते! हा संदेश किती बायकांच्या कांठाळी पोहचला... महाराष्ट्रापेक्षा केरळ राज्यातील महिला साक्षरतेत अव्वल का? कितींना या विरोधाभासाचं कारण माहीती आहे... गावच्या राजकारणातील महिलांना केवळ भिंतीवरील पोपड्यासारखी वागणूक आजही काही महिला राजकारण्यांना का मिळते...? असे एक-ना-अनेक प्रश्न आज महिला दिनाच्या निमित्ताने चावडीवर उपस्थित करण्यासाठी प्रदिप्त झालो आहे. समाज, संस्कृती, कुटूंब आणि नैतिकता यांची काटेकोर बंधने फक्त आणि फक्त माय-माऊल्या म्हणूनच “ सातच्या आत घरात...” हा अलीखित नियम समस्त स्त्रीजातीलाच!

दुनिया की पहचान है औरत,

हर घर की जान है औरत,

बेटी, बहन, माँ और पत्नी बनकर,

घर-घर की शान है औरत!

... अशी आदरावली आज महिला दिनाच्या औचित्यावर जरी आपण कोकलत असलो तरी घराघरात आणि रस्त्या-चौकात खरचं प्रत्येकाची पुरूषी नजर नैतिक व सात्विक असते का? अशा प्रश्नावर किमान आजच्या दिनी प्रत्येकाने चिंतन करने गरजेचे आहे तरच खर्‍या अर्थाने महिला दिनाचे औचित्य साध्य होईल!

राजकारणातून पन्नास टक्के आरक्षण घेऊन समाजमनाच्या उंबरठ्यावर टाच मारू पाहणार्‍या महिलेसाठी अजूनही संघर्ष कमी नाही, आजही गावकुसातील पुरूषी मानसिकता महिलांबाबत कशी आहे. याची बोलकी उदाहरणे चावडीच्या वाचकांसाठी सादर...

प्रसंग पहिला - अगदी काही दिवसांपूर्वीच वर्तमानपत्रातील जाहीरातीची किरकोळ रक्कम वसुल करण्यासाठी एका शहरवजा खेडेगावातील ग्रामपंचायत कार्यालयात जाण्याचा योग आला. मात्र मासिक सभा सुरू असल्याच्या कारणास्तव शिपाई रावांनी आम्हाला थोडा वेळ बाहेरच बसवून ठेवले. अगदी दहा मिनिटात सभा गुंडाळली आणि सरपंचपतींनी आमचे मोठ्या गर्मजोशीत स्वागत केले... सरपंच पती थेट खुर्चीवर जाऊन विराजमान झाले. खुर्ची मागील भिंतीवर त्यांच्या सौभाग्यवती सरपंचांच्या नावाचा बोर्ड दिमाकात लटकत होता. इतरही सारे सदस्य खेळीमेळीच्या मस्त वातावरणात गप्पाष्टक झोडीत बसली होती. ग्रामसेवकाला पटविल्यानंतर सरपंचपतीराजांनी जाहीरातीची रक्कम आमच्या हातावर ठेवली आणि आम्ही कडकीचा नि:श्वास सोडला.. बोलता बोलता मी आणि मुद्दामहून महिला सक्षमीकरणाचा विषय छेडला... आणि गावागवात आम्ही महिलांना राजकारणात दुय्यम स्थान कसे दिले जाते याची काही मासलेवाईक उदाहरणे सुध्दा दिली. त्यावर सरपंचपतीसह उपस्थित सार्‍याच सदस्यपतींनीही उदारतेने दाद दिली. आणि सरपंच पतींनी त्यांच्या गावातील सदस्यांचा मोठेपणा वर्णन केला तो असा.. ते म्हणाले, ‘पत्रकार भाऊ आमचे गाव त्या मानाने खूप मस्त बरं का... आम्ही सारे निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन करतो. आता आमच्या पंचायतीमधील 11 सदस्यांपैकी सहा सदस्य महिला आहेत, अहो माझी सौभाग्यवती सरपंच आहे, पण आमच्या गावाच्या सरपंच आणि महिला सदस्या... वर्षभरातून एकदाही ग्रामपंचायतीकडे फिरकत नाही... खानदानी बाया आहे भाऊ आम्हा सर्वांच्या... आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, तुम्ही पाहिल असेल की आताच दहा मिनिटात मासिक सभा आटोपली, सर्व विषय गुण्यागोविंदाने मंजूर.. आणि आताच आमचा शिपाई, प्रोसेडींग बुक घेऊन आमच्या घरी गेलाय... सरपंच बाईसह इतर सदस्याही मुकाट्यानं सह्या करून देतील! असे बायांना विनाकारण त्रास द्यायचा कशाले? सरपंच पतीचे हे विचार ऐकून अस्मादिकांच्या राखीव मेंदूतला शीघ्र कवि जागृत झाला, आणि...

ग्रामपंचायतीच्या राजकारणाला

कुंकवाचा आधार आहे!

आणि सरपंच पतीराजांची

सौभाग्यावतींवर मदार आहे!

प्रसंग दुसरा - आटपाट एक गाव होतं... सुभानरावांचं खटलं गावात सर्वात मोठ होतं... पण, बटवारा संस्कृतीची कुर्‍हाळ कोसळली आणि पाच भावांचा पांडव वाडा क्षणात विखुरला... सार्‍यांची शेती आणि घरे वेगळी झाली. धाकट्या सर्जेरावांना एक मुलगा, एक मुलगी, सर्जाची मुलगी मोठी चुणचुणीत दहावीत गावातील शाळेत तिनं पहिला नंबर घेतला होता, तालुक्यातील कॉलेजातही बारावीत तिनं पहिला क्रमांक कायम ठेवला होता. पोरगी बारावी झाली आणि सर्जाची चिंता वाढली. ‘आधी लगीन लेकीचे’ म्हणत त्यानं पंचक्रोशी धुंडाळली, मुलीची स्वप्ने मोठी होती. ती मेडीकलला जाणार म्हणत होती. डॉक्टर बनण्याची आकांक्षा उराशी बाळगून होती. तिच्या आईला ती सारं मनातलं सांगतही होती. पण बाबांपुढे बोलण्याची तिची हिंमत नव्हती, आणि एक दिवस सर्जाने आनंदाच्या भरात बायकोला निर्णय सांगितला. जवळच्या खेड्यातील दहा एकरी बागायतदाराच्या एकुलता एक नववी नापास मुलगा, पोरीसाठी सर्जाने फायनल केला होता. मायचं काळीज तुटलं होतं, काय करावं तिला सुचत नव्हतं. नवर्‍यापुढे बोलायची सोय नाही, आणि पोरीच्या भविष्याचं काही खरं नाही... हे सारं ती जाणून होती.

तरीही हिंमत एकवटून ती सर्जाला म्हणाली ‘अहो.. आपली मुलगी लई हुशार आहे, डॉक्टर होईन म्हणते झालच तर मास्तर लोकपण पैशांची-पुस्तकांची मदत करतील म्हणतात... एव्हडी घाई काय आहे. अजून अठराची तर आहे आपली पोरगी...’ अशी बायकोची वकीली सुरू असताना सर्जाचा रूद्रावतार जागा झाला आणि दरवाजाआड लपून ऐकणार्‍या पोरीचा अन् तिच्या आईचाही नाईलाज झाला... आणि दहा एकरी नववी नापास नवरदेवाच्या घरी मुलीचं डॉक्टरकीचं स्वप्न भंगल?

वरील दोन्ही प्रसंगात थोड्याफार फरकाने समाजात घडताना दिसत असले तरी, प्रातिनिधीक आहे. कमीअधिक फरकाने ग्रामीण संस्कृतीमध्ये आजही स्त्रियांची परवड थांबलेली नाही. राजकारण, समाजकारण किंवा कुटूंब व्यवस्था अपवादात्मक स्थिती वगळता ग्रामीण भागात महिला जागृतीचा जागर असूनही पुरोगामी मनासारखा झाला नाही. काही प्रमाणामध्ये निवडक महिला गावातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असतीलही पण अशांची संख्या केवळ बोटांवर मोजण्याईतपतच आहे.

आठ मार्चला जागतीक महिला दिनानिमित्त महिलांचा आर्थिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील योगदाना निमित्त त्यांचे सामाजीक आत्मभान जागृत करण्याचा प्रयत्न केला जातो. खरे तर हा दिवस साजरा करण्यामागे उद्देश असा की, प्रत्येक स्त्रीने आपल्यावरील नात्यांच्या जबाबदारीचे वलय थोडके का होईना बाजूला सारून स्वत:कडे एक स्त्री म्हणून पाहिले पाहीजे. आपले स्वत्व:, स्वप्ने, ईच्छा, आकांक्षा यांना कुठेतरी वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न करावा. कारण ‘स्त्री’ ही त्याग, नम्रता, श्रध्दा व सुजाणपणाची मुर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाही, पारंपारीकरित्या पुरूषांची समजल्या जाणारी क्षेत्रे महिला काबीज करीत आहेत. मात्र... हे सारे शहरी-महानगरे भागातील बदलते चित्र आहे.

ग्रामीण भागातील ‘स्त्री’मन

ग्रामीण भागातील स्त्री आजही आर्थिकदृष्ट्या परावलंबी का? शिक्षणाचा विविध शाखांपासून वंचीत का? सत्तेत असली तरी अधिकारांचा वाटा तिच्या वाट्याला का येत नाही? चुल आणि मुल या संकल्पनेत तिला का जखडून ठेवण्यात येत आहे. सर्व पातळीवर तिला समान संधी का मिळत नाही? येथील स्त्री-पुरूष समानता केवळ बोलण्या पुरती किंवा कागदावर लिहीण्यापुरतीच मर्यादीत का?... असे प्रत्येक प्रश्न आजही ग्रामीण भागात उत्तराच्या प्रतिक्षेत आहेत. आजही बालिका असतांना तिच्या सुरक्षेची, संगोपनाची जबाबदारी वडीलांवर... तरूण झाल्यानंतर... भाऊ, काकांवर... विवाहानंतर.. नवर्‍यावर... म्हातारपणात मुलांवर... म्हणजे सतत अमरवेलीसारखी परावलंबीत्व आयुष्य ग्रामीण महिलांच्या वाट्याला येऊन बसले आहे. किमान या महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील प्रत्येकाने महिलांना आपले स्वाभावीक अधिकार देण्यासाठी आजपासूनच सुरूवात करावी.

*कुटूंबातील निर्णयांमध्ये, कुटूंबातील महिलांना सहभागी करावे.

*मुला-मुलींच्या जडण घडणीत महिलांचीही परवानगी घ्यावी.

*गृहीणी असलेल्या महिलांची मानसिकता समजून घ्यावी.

*कधी निगुतीने एखादा पदार्थ तयार केला तर मुक्तकंठाणे स्तुती कराल.

*महिलांच्या माहेर सदस्यांबाबत आपुलकीचा सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.

*संन्मानजनक शब्दांच्या माध्यमातून त्यांचा आत्मसन्मान करावा.

*राजकीय क्षेत्रात असल्यास स्वतंत्रपणे निर्णय घेऊ द्यावा.

*चार चौघांमध्ये मिसळू द्यावे, मनभर स्वातंत्र्य द्यावे.

*आर्थिक जबाबदारी घेण्याची इच्छा नसल्यास प्रोत्साहन द्यावे.

*नोकरदार महिलांची जबाबदारी व मानसिकता लक्षात घ्यावी.

*घरकामाची जबाबदारी केवळ तिची... ही मनोवृत्ती बदलावी.

*संसार दोघांचा... दोघांनीच सावरावा ही भावना असावी.

*कौटुंबीक हिंसाचार कुठेही घडणार नाही ही दक्षता घ्यावी.

या साध्या सरळ आणि सहज शक्य गोष्टी जरी आपण दैनंदिन जिवनात आचारल्या तरी खेड्या-पाड्यापर्यंत महिला दिनाचे फलीत पोहचले असे म्हणता येईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com