लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया!

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया!

राजू देसले

दिवाळीशी नाते तसे बालपणापासूनचे. शाळेत असताना दिवाळीसाठी मामाच्या गावाला जाण्याचा मधाळ आनंद काही औरच असायचा. शालेय जीवनात पाठ्यपुस्तकात एक कविता होती. त्यातून अलगद कळत गेले की उजेडाशी आपले नाते किती आदिम आहे.

आधी होते मी दिवटी

शेतकर्‍यांची आवडती

झाले इवली मग पणती

घराघरातून मिण मिणती...

प्रकाशाशी नाते सांगणारी ही दिवटी प्रत्येकाच्या मनामनांत उजेड पेरत जाते आणि त्यासाठी निमित्त असते दिवाळी सणाचे. आपुलकीची, जिव्हाळ्याची ओल घेऊन येणारा हा सण प्रेमाचा हुंकारच व्यक्त करतो.पवित्रता, मांगल्याची जोपासना करत, निरांजनाला प्रकाशस्वर प्रत्येकाचे आयुष्य उजळून टाकतो.

लाविते मी निरांजन

तुळशीच्या पायापाशी

भाग्य घेऊनिया आली

आज धनत्रयोदशी

आली दिवाळी-दिवाळी

बाळ कोल्हटकर

‘सप्तरंगाची उधळण करणारी ही दिवाळी सप्तरंगात न्हाऊन येते’ आणि नव्या उत्कर्षाच्या क्षणांना चांदण्यांचे घुंगरू बांधून जाते. रोजच्या जीवन व्यवहारातल्या कटू अनुभवांना विसरायला भाग पाडते आणि आतला सकारात्मकतेचा सूर आळवण्यास शब्द ताल देते.

‘नक्षत्रांचा साज लेऊनी’

रात्र अंगणी आली

दीप उजळले नयनी माझ्या

ही तर दीपावली.

मधुसूदन कालेलकर

बहीण-भावाच्या नात्याची वीण उसवणारी आणि नाते दृढ करणारी दिवाळी भाऊबीजेच्या रूपाने लोकगीतातून समोर येते.

‘दिवाळीच्या दिवशी

माझ्या तारामध्ये मिरे

असे ओवाळीले

मायबाई तुझे हिरे’

मायेच्या या हिर्‍यांना प्रेमाचे कोंदण असते आणि आभाळभर मायेची बोटे इडा-पीडा टळो असा सहज आशीर्वाद देऊन जातात. या नात्यात निरपेक्षपण गलबलून येणार्‍या आठवणींचा झोका असतो. बहीण सासुरवाशिण झालेली असते. तिला भावाच्या आठवांची हुरहूर लागून राहते.

लखलख चंदेरी

तेजाची न्यारी दुनिया

झळाळती कोटी ज्योती या

शांताराम आठवले

लखलखणार्‍या चंद्राचे वरदान लाभलेली ही विलक्षण आणि असंख्य ज्योतीचा प्रकाश घेऊन येणारी दिवाळी आकाशाचे नयन विभोर अंगण उजळते आणि ती प्रकाश किरणे मनांवर गोंदून जाते.

माणसाच्या मनाच्या पटलावर अविवेकाचा काळाकुट्ट अंधार तयार झाला आहे तो दूर करण्यासाठी विवेकाचा नंदादीप मी ठेवतो तो म्हणजे दिवाळीचा आनंद असे संत ज्ञानेश्वर आपल्या ओवीतून सांगतात.

मी अविवेकाची काजळी

फेडोनी विवेक दीप उजळी

ते योगिया पाहे दिवाळी

निरंतर

संत ज्ञानेश्वर

संत जनाबाईंनी साक्षात परमेश्वराला दिवाळीचे निमंत्रण दिले आहे आणि त्यातून ईश्वर भक्तीचे प्रेम व्यक्त केले आहे.

आनंदाची दिवाळी

घरी बोलवा वनमाळी

घालीते मी रांगोळी

गोविंद गोविंद

संत जनाबाई

संत साहित्यातून लोकसाहित्यातून जात्यावरच्या ओव्यातून माय-माऊलींनी दिवाळी सणाची महती कथन केली आणि आणि अजूनही हा झरा वाहतच आहे. समाजमनाच्या उत्सवी जगण्याचे प्रतिबिंब कला-साहित्यातून अनेक वर्ष उमटत आहे आणि त्यातून ही परंपरा जोपासण्याचे कार्यच होत आहे.

Related Stories

No stories found.