जाणून घ्या आरोग्यासाठी सर्वात चांगले खाद्यतेल कोणते?

जाणून घ्या आरोग्यासाठी सर्वात चांगले खाद्यतेल कोणते?

कोणतेही अन्नपदार्थ बनवताना तेलाचा वापर अनिवार्य असतो. आपण ग्रहण करणार्‍या अन्नाला स्निग्धता असणे आवश्यक असते. ही स्निग्धता तेलातून मिळते. आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांत तेलाचा वापर योग्य प्रमाणातच करणे गरजेचे असते, त्याच बरोबर योग्य तेलाची निवडही करता यायला हवी.

प्रदेशवार शेतात ज्या तेलबियांचे उत्पादन घेतले जाते त्यापासुन (तेलबियांपासून) तयार होणार्‍या तेलाचा वापर स्वयंपाकासाठी केला जातो. संपुर्ण भारतात शेंगदाणा तेल हे जास्त प्रमाणात वापरले जाते. परंतु दक्षिण भारतात खोबरेल तेल वापरले जाते तर मोहरीच्या तेलाचा वापर उत्तर भारतात केला जातो.

देशात भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन याची जास्त प्रमाणात पिके घेतली जातात. त्याखालोखाल करडई, मोहरी ही पिके घेतली जातात.

तेल ज्या तेलबियांपासून बनवले जाते त्या बियांचे गुण त्या तेलात उतरतात. ते गुणधर्म पाहूया

1) शेंगदाणा तेल - भुईमुगाच्या शेंगापासून घेतले जाणारे शेंगदाणा तेल (गोडेतेल) याचा आहारात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या तेलात सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे,

अँटी-ऑक्सिडेंट्स असतात ते शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करतात.

2) सूर्यफूल तेल - हे तेल सूर्यफूलाच्या बियांपासून तयार होते या तेलात जीवनसत्व जास्त प्रमाणात असते, हे हृदयासाठी हितकारक असते.

3) सोयाबीन तेल - या तेलाचा वापर शेंगदाणा तेलाच्या खालोखाल केला जातो.

सोयाबीन तेलात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.

4) राईस ब्रान तेल - हे भाताच्या कोंड्या पासून बनवलेले असते यात ई जीवनसत्त्व आणि अँटी-ऑक्सिडेंट चे प्रमाण जास्त असते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून रोग प्रतिकारक शक्ती वाढवते.

5) तीळ तेल - थकवा कमी करणारे, कॅल्शियमचे जास्त प्रमाण असणार्‍या या तेलाचा, औषध म्हणून जास्त वापर होतो.

6) करडई तेल - हे तेल मधुमेहींसाठी उपयुक्त असते कारण ते रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. तरीही या तेलाचा वापर प्रमाणातच करावा.

7) मोहरी तेल - हे तेल शरीरात उष्णता निर्माण करते म्हणून ते थंड प्रदेशात म्हणजे उत्तर भारतात वापरले जाते.

8) खोबरेल तेल - महाराष्ट्रात नारळापासून काढलेले तेल केसांसाठी वापरतात परंतु दक्षिण भारतामध्ये या तेलाचा खाण्यासाठी वापर करतात.

*आरोग्यासाठी तेलाचा वापर*

हे तेलाचे गुणधर्म पाहिले. परंतु स्वयंपाकात कोणत्या तेलाचा वापर करावा याचा प्रश्‍न गृहिणींना पडतो. शिवाय डॉक्टर ही आरोग्यासाठी तेलाचा आहारात कमी वापर करा असा सल्ला देतात. परंतु सगळ्यात तेलात फॅट्स असतातच. ज्या तेलात एंटीऑक्सीडेंट आणि विटामिन्स असतील अशा तेलाची निवड करावी. सेंद्रिय, रिफाईन न केलेले तेल घाण्यावरचे तेल शक्यतो आहारात वापरावे. रिफाईन तेलात शुध्दिकरणाच्या वेळी रसायनांचा वापर केला जातो ती रसायने आरोग्यास घातक असतात, म्हणून शक्यतो लाकडी घाण्यावर तयार केलेले केमिकल ची प्रक्रिया न केलेल्या तेलाचा आहारात वापर करावा.

आरोग्यच्या दृष्टीने शेंगदाणा तेल, सुर्यफुल तेल आणि ई व्हिटॅमिन युक्त राईस ब्रान तेलाचा वापर आलटून पालटून करावा म्हणजे प्रत्येक वेळी दोन महिन्यांनी तेल बदलावे आणि केमीकल विरहीत लाकडी घाण्यावरचे तेल वापरावे.

मी स्वतः सुर्यफुल तेल आणि राईस ब्रान तेलाचा वापर करते क्वचित शेंगदाणा तेल वापरते. भरपुर प्रमाणात प्रथिने मिळणारा सोयाबीन तेलाचा ही वापर आरोग्यास हितकारक आहे.

‘अति वर्जते’ असं म्हणतात. त्यामुळे आरोग्यासाठी आमटी, भाजी मध्ये तेलाचे प्रमाण कमी असावे. अगदी नेहमी चमचमीत खाण्याची सवय आरोग्यास घातक असते.

*तळणाचे पदार्थ कमी खावे.

*एकदा तळून शिल्लक राहिलेले तेल पुन्हा पुन्हा वापरू नये.

सुर्यफुलाचे तेल, राईस ब्रान तेल, आणि शेंगदाणा तेलाचा योग्य प्रमाणात वापर आरोग्य चांगले राखण्यास नक्कीच मदत करेल.

क्वोरा (Quora) या प्रश्‍न-उत्तरांच्या एका संकेतस्थळावर प्रशांत ननावरे यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सुप्रिया जाधव यांनी ही माहिती दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com