किशोर कुमार स्मृति दिन विशेष; अढळ ध्रुवतारा

किशोर कुमार स्मृति दिन विशेष; अढळ ध्रुवतारा

डॉ. अरुण स्वादी

सहज मनात आलं, आभास कुमार गांगुली (Abhas Kumar Ganguly) म्हणजे किशोर कुमार (Kishore Kumar) आज हयात असते तर वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी गाणी म्हटली असती? आणि रसिक मंडळींना त्यांचं गाणं आवडलं असतं? मला वाटतं दोन्ही प्रश्नांची उत्तरं निश्चित पणे 'हो' हेच असेल.

कारण किशोर कुमारना जाऊन आता ३५ वर्ष झाली आहेत, पण त्यांची गाणी असलेले कार्यक्रम आजही सुपरहिट होतात. हाऊस फुल्ल होतात. सर्व नवीन हौशे, नवशे, गवशे आणि प्रथितयश गायक मंडळी किशोर कुमारची गाणी, त्यांच्या सुरात गाऊन वाहवा मिळवतात. काय जादू असावी ही बरे? खरंच ही कमाल आहे किशोर कुमारची, त्याच्या गायकीची आणि त्याबरोबरच त्या संगीतकारांची आणि गीतकारांची...!

किशोरकुमारच्या आवाजात अशी काही तरी जादू होती की, त्याचा आवाज अमीर आणि फकीर दोघांना तितकाच भावायचा. सहज गुणगुणायला त्यांचा आवाज सोपा वाटला तरी प्रत्यक्ष गाणं म्हणायला घेतलं तर ते किती अवघड असतं हे समजायचं. किशोरदांनी अवखळ गाणी म्हटली, उच्छृंखल गाणी म्हटली, विनोदी गाणी म्हटली, विडंबनात्मक किंवा मिश्किल गाणी म्हटली. रोमँटिक गाणी तर हजारोंनी म्हटली.

गमगीन गाणीसुद्धा भरपूर म्हटली. अगदी साधी पण हृदयापासून उमटणारी अशी कोमल व नितळ गाणी तर ते अमाप  गायले. काही लोकांना संख्याशास्त्र खूप आवडतं. त्यांच्यासाठी थोडी आकडेवारी सांगतो. किशोरदा फिल्मी व गैरफिल्मी धरून अंदाजे २,९०५ गाणी गायले. पाहिले गाणे त्यांनी म्हटलं ते १९४८ मध्ये 'जिद्दी' सिनेमासाठी 'मरने की दुवा' आणि त्यांचं शेवटचं गाणं पडद्यावर आलं १९८८ साली 'वक्तकी आवाज' चित्रपटातल्या द्वंद्वगीतात 'रे गुरु आ जाओ' या गाण्यात.

सुरुवातीला त्यांच्या गाण्यांवर के.एल. सैगल यांचा पगडा होता. सर्वांवरच होता म्हणा तो! त्यांचा आवाज ऐकून खेमचंद प्रकाश नावाचा त्या काळी एक गाजलेला संगीतकार म्हणाला, 'तू प्रतिसैगल होशील'! नशीब आमचं, त्याचे  भविष्य चुकले! नाही तर आमच्या पिढीलासुद्धा 'बाबुल मोरा'च ऐकत राहायला लागले असते. यात सैगलना कमी लेखायचा हेतू नाही. ते दैवी आवाज असलेले गायक होते, पण बदल हा प्रत्येक पिढीचा स्थायीभाव असतो एव्हढेच! किशोर कुमारनंतर कोण असा प्रश्न ते असतानाच विचारला जाई.ते गेल्यावर बरेच जण प्रती किशोर कुमार झाले, पण काळाच्या ओघात कुठे गेले हे कळलंच नाही. म्हणून वाटतं आज किशोर कुमार असते आणि गात असते तर कदाचित ते ज्यावेळी अचानक गेले त्यावेळी ज्या स्थानावर होते त्या स्थानावरच म्हणजे अव्वल स्थानावरच राहिले असते.

ज्या दिवशी किशोरकुमार गेले त्या दिवशी 13 ऑक्टोबर 1987 ला, त्यांचे मोठे भाऊ दादा मुनी म्हणजे अशोक कुमार यांचा वाढदिवस होता. किशोरने त्यांना ट्रीटसाठी आपल्या घरी बोलावलं होतं, पण दादा मुनींचे कुठेतरी शूटिंग चालू होतं .म्हणून दादा मुनी म्हणाले, 'मी येऊ शकत नाही'. किशोरकुमार म्हणाले 'मग मी आणि ऋषिकेश मुखर्जी आम्ही दोघे तुझ्याकडे येतो'.संध्याकाळची वेळ होती.

किशोरजी आपल्या बेड रूममध्ये बहुतेक आवरायला गेले आणि त्यांना तिथेच मेजर हार्टअटॅक आला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. त्यांची पत्नी लीना चंदावरकर, तिला पहिल्यांदा वाटलं, किशोरजी नेहमीप्रमाणे नाटक करत आहेत. तसेही ते मेल्याचे नाटक हुबेहूब करायचे आणि लोकांना टेन्शन द्यायचे. त्यात त्यांना खूप मजा यायची. असंच काहीतरी नाटक चाललंय, असं त्यांच्या पत्नीला वाटलं, पण काही क्षणात त्यांना हे लक्षात आलं की आज काहीतरी गडबड आहे. हे नाटक नाही, पण मेडिकल एड मिळण्यापूर्वीच किशोर कुमार यांचा मृत्यू झाला होता. ही गोष्ट खूप अनपेक्षित होती. त्यांचा छोटा चार-पाच वर्षांचा मुलगा सुमित किशोरजी चेष्टेत जे बोलायचे 'किशोर कुमार मर गया' हेच वाक्य नंतर आलेल्या प्रत्येकाला भाबडेपणाने सांगू लागला. किशोर कुमार नावाचं बॉलीवुड संगीतातलं महापर्व या दिवशी संपलं.

किशोरकुमार मूळचे मध्यप्रदेशातल्या खांडव्याचे! आपल्या या गावावर त्यांचे विलक्षण प्रेम होते .मुंबई सोडून इथे येऊन स्थायिक व्हायचं आणि दूध, जिलबी खायची हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं, पण विधीलिखित काही वेगळंच होतं. आज खांडव्यातलं किशोरजींचं घर मोडकळीला आलंय. एक खंडहर बनले आहे. मध्य प्रदेश सरकार काही इंटरेस्ट घेऊन तिथे किशोर कुमार यांचे स्मारक बनवेल ही शक्यता दिवसेंदिवस धूसर होत आहे. काही चमत्कार घडून तिथे स्मारक उभारले गेले असेल तर कल्पना नाही, पण एकूणच याविषयी आपल्या देशात अगम्य अनास्था आहे.

किशोर कुमार आपला भाऊ अनुपकुमार प्रमाणे शास्त्रीय संगीत शिकले नाहीत. तरीही शास्त्रीय संगीत गाणाऱ्यांच्या नकला ते लहानपणी झक्क करत. त्यामुळे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये खूप फायदा झाला. मात्र हा योगायोग आहे किंवा कसे हे माहीत नाही पण किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि मुकेश तिघेही शास्त्रीय संगीत शिकले नव्हते. या तिघांचाही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्या मानाने लवकर म्हणजे अकाली मृत्यू झाला. किशोरकुमारसाठी 'आराधना' हा चित्रपट मैलाचा दगड ठरावा. या चित्रपटातली त्यांची सगळी गाणी ठरली. राजेश खन्नाबरोबर त्यांचे एक वेगळेच इक्वेशन तयार झाले. ताज्या दमाचा नाटकी व रोमँटिक राजेश खन्ना आणि किशोर कुमार यांनी त्यानंतर एका पाठोपाठ एक हिट चित्रपट दिले. दोघेही खऱ्या अर्थाने सुपरस्टार झाले. फरक एवढाच होता की सुपरस्टार झाल्यावर राजेश खन्नाचे वागणे बदलले. तो स्वतःला देव समजू लागला.

अगदी एखाद्या हटयोग्यासारखं आपण पाण्यावरूनसुद्धा चालू शकतो, असे त्याला वाटू लागले. कालांतरानं त्याचा भ्रमनिरास  झाला. तो अपयशाच्या गर्तेत सापडला, पण यशाप्रमाणे हे अपयश त्याला पचवता आले नाही. किशोरदांनी मात्र अपयश पाहिलं होतं. त्यामुळे मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर त्यांचे पाय जमिनीवरच राहिले. यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत किशोरदांचं स्थान गायकांमध्ये नंबर वन हेच राहिले. 'आराधना'ची गाणी अप्रतिमच होती, पण त्यामुळे मोहम्मद रफी एकदम अडगळीला टाकला जावा, असं वेगळं त्यात काय होतं? किशोर कुमारने त्यापूर्वी असंख्य उत्कृष्ट गाणी गायली होती. तीही तेवढीच सदाबहार सदा सतेज होती. देव आनंद आणि त्याचं तर एक अतूट नातं होतं. सचिनदा संगीतकार असलेले त्यांची गाणी ही कायमची संस्मरणीय ठरावी अशी होती.

आजही इतक्या वर्षांनी मला प्रश्न पडतोय की रफीची इतक्या वेगाने ससेहोलपट कशी झाली? कदाचित त्याने आवाज दिलेले दिलीप कुमार शम्मी कपूर, राजेंद्र कुमार यासारखे नट उताराला लागले होते आणि प्रथम राजेश खन्ना आणि त्यानंतर अमिताभ बच्चन या ताज्या दमाच्या ,नव्या उमेदीच्या नटांनी सर्वोच्च स्थानाकडे प्रयाण केले असावे, ज्यांना किशोरदांचा आवाज जास्त सूट होत असावा. किशोर कुमार मस्त कलंदर होते. आपल्याच धुंदीत जगणारे होते. कोण काय म्हणतं याची फिकीर त्यांनी कधीच केली नाही. त्यांच्या लाईव्ह प्रोग्राममध्ये तर ते धमाल करायचे. कोल्हापूरला एक ऑक्टोबर 1984 ला खासबागेच्या मैदानावर त्यांचा किशोर कुमार नाईट कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमातली त्यांची एन्ट्री विलक्षण गाजली. ते त्यांच्या फॅमिलीसह पूर्ण कोल्हापुरी पेहरावात म्हणजे डोक्यावर मुंडासं घालून, अंगरखा, पायात कोल्हापुरी चपला घालून, बैलगाडीतून दिलीप कुमार स्टाईलने अवतरले.

उपस्थित लोकांनी तर टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून मैदान डोक्यावर घेतले. त्यानंतरही कार्यक्रमात लोकांना स्टेजवर बोलवून त्यांच्याबरोबर धांगडधिंगा करत त्यांनी गाणी म्हटली. कारकीर्दीच्या सुरुवातीला त्यांनी 'मेमसाब' नावाच्या एका सिनेमात काम केले होते. त्या सिनेमाचे पूर्ण मानधन निर्माता तलवारने दिले नाही. ५,००० रुपये राहिले होते. किशोर कुमारने काय करावे? हा माणूस मध्यरात्री तलवार राहायचे त्या सोसायटीत जायचा आणि खालून गाणं म्हणायचा 'अबे ओ तलवार; कब देगा मेरे ५,००० हजार'? सोसायटीचे सदस्य तलवारला विचारायला लागले, काय भानगडी आहे ही? नाईलाजाने मनाची नाही तर जनाची लाज वाटून तलवारने ते रुपये परत केले.

किशोरजी फारशा पार्ट्या करायचे नाहीत. त्यामुळे त्यांना चिकू म्हटले जाई,  पण ते स्वतःदेखील फारशा पार्ट्या अटेंड करायचे नाहीत. आपलं काम झालं की सरळ घरी निघून जायचे. घरी हॉरर फिल्म बघायचे. झाडांशी तासभर गप्पा मारायचे. त्यांनी झाडांना नावे पण ठेवली होती. आपल्या बंगल्याचे नाव त्यांनी 'ल्यूनाटिक असायलम' ठेवले होते.'मनोरुग्णांचे हॉस्पिटल'...!
त्यांच्या बेफिकीर स्वभावामुळे लोकांना वाटायचं ते आपल्या आवाजाची काळजी घेत नसावेत, पण हे खरे नव्हते. ते ड्रिंक्स घेत नव्हते. ते सिगरेटही ओढत नव्हते. आपल्या आवाजाची व्यवस्थित काळजी घ्यायचे. तब्येतीची मात्र तितकीशी काळजी घेतली नसावी. विशेषतः हृदयाचा त्रास सुरू झाल्यावर तरी...!

किशोरदांनी बहुतेक सर्व मोठ्या संगीतकारांकडे गाणी म्हटली, पण सचिन देव बर्मन आणि राहुल देव बर्मन या पितापुत्रांकडे त्यांनी म्हटलेली गाणी खूप लोकप्रिय झाली. आणि त्याचा क्लासही वेगळा होता. सचिनदांचा किशोर कुमार ब्ल्यू आइड बॉय होता. त्यांनी प्रथम देवानंद आणि नंतर राजेश खन्ना यांच्याबरोबर त्याची जोडी जमवली. पडद्यावर खूप वेळा वाटायचं, राजेश खन्ना स्वतःच गाणं म्हणतोय, किशोर नाही.

ही अशी किमया इतर संगीतकारांना म्हणावी तितकी साधली नाही. कल्याणजी-आनंदजींकडे किशोरजींनी खूप गाणी म्हटली. विडंबनात्मक किंवा चेष्टा मस्करीवाली गाणी त्यांनी या दोघांबरोबर छान गायली. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याबरोबरही त्यांची चांगली दोस्ती जमली. त्यामानाने शंकर जयकिशन बरोबर त्यांनी कमी काम केले, पण जयकिशनच्या शेवटच्या काळामध्ये किशोर कुमार यांनी म्हटलेले 'जिंदगी एक सफर है सुहाना' अमाप लोकप्रिय झाले. नौशादबरोबर त्यांचे सूत जमले नाही. सुरुवातीच्या काळात नौशाद मियोंने किशोरना 'तुला गाणे म्हणता येत नाही' असे सरळ तोंडावर सांगून त्याची भलावण केली होती.

तलत मेहमूद किशोरजींना गॅलरीसाठी गाणारा गायक म्हणायचे. ते मात्र असूयेपोटी...! सज्जाद हुसेन नावाचा एक चांगला संगीतकार किशोर कुमारचा आवाज 'पलीकडच्या फुटपाथवरून मित्र चालला असेल तर त्याला आवाज देण्यासाठी चांगला आहे' असे म्हटले होते. ठीक आहे, मोहम्मद रफीलाही ते भेंडी बाजारचा गायक म्हणायचे. जितने मुह उतनी बाते...! किशोर कुमारने म्हटलेल्या अजरामर गीतांचा उल्लेख या लेखात मुद्दाम केलेला नाही. कारण बहुतेकांना या महान गायकाची गाणी तोंडपाठ आहेत. ते स्वतः संगीतकार होते, निर्माता होते. निर्देशक होते आणि महत्त्वाचे म्हणजे गीतकारही होते.  'आ चल के तुझे मै लेके चलुं' हे गाणं त्याचं एक उत्तम उदाहरण! योडलिंग हा प्रकार बॉलीवूड संगीतात आणणारे आणि लोकप्रिय करणारे किशोर कुमार पहिलेच कलाकार! खरं तर हा स्पॅनिश किंवा इटालियन प्रकार, पण किशोरजींसारखं तसं गाणं कोणालाही जमले नाही. 'झुमरू'मधलं 'मै हू झूम झूम झूमरू' हे साठ वर्षांपूर्वीचे त्यांचे गाणे आजही चिरतरुण आहे.

एक अभिनेता म्हणून ते कुठेही कमी नव्हते. विनोदी भूमिका तर त्यांनी असंख्य केल्या, त्यांनी गंभीर रोल पण केले. दुर्दैवाने लोकांनी ते गंभीरपणे घेतले नाहीत. कालांतराने त्यांनी गायकीवरच लक्ष केंद्रित केले आणि आजवरच्या इतिहासातील 'लोकप्रिय गायक' ही उपाधी मिळवली.
आजपासून शंभर वर्षांनी काय परिस्थिती असेल माहित नाही, पण बॉलीवूड असेल आणि बॉलीवूडचे संगीत असेल तर मला शंभर टक्के खात्री आहे; किशोर कुमारची गाणी अशीच लोकांच्या ओठांवर असतील आणि मनामध्ये रुंजी घालत असतील. बॉलीवूडच्या इतिहासात किशोर कुमार यांचे स्थान आकाशातल्या अढळ ध्रुवताऱ्यासारखे असावे हा परमेश्वरी संकेत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com