Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedएक अद्भुत संतकवी कबीर महाराज

एक अद्भुत संतकवी कबीर महाराज

द्वारकाधीश दिगंबर जोशी

मध्ययुगीन काळात भारतामध्ये भक्ती सांप्रदायाची एक अभूतपूर्व लाट आली. यामध्ये अनेक क्रांतिकारी संत कवी होऊन गेले. त्यांनी ईश्वराविषयी भावा वस्थेचा प्रचार व प्रसारही मोठया प्रमाणात केला. आपल्या गोड, अर्थपूर्ण आणि सामान्यांच्या भाषेत रचलेल्या भक्तीरचनांकरवी त्यांनी धर्माला अगदी सर्वसामान्यांच्या दारी आणून बसवले. त्यांनी भक्ती संगीताची एक सनातन परंपराच निर्माण केली. त्यांच्या रचना आजही सर्व भारतभर गाईल्या जातात.त्यांच्या पैकी कबीरदास हे एक असेच अद्भुत संत कवी होय.यांचा सर्व भारत भर प्रभाव आहे.,एवढेच नव्हे तर हिंदू आणि मुस्लिम समाजही त्यांच्या कडे सारख्याच आदराने पाहतो.

- Advertisement -

कबिरांचा जन्म आणि मृत्यू या दोन्ही घटना दैवी घटनाच वाटतात.1440 मध्ये बनारसला नीरु नावाच्या एका अपत्यहीन मुस्लिम विणकरांना एक सुहास्यवदन बालक एका तळ्यामध्ये कमळाच्या पानावर अंगठा चोखत पहुडलेले दिसले. तो त्या बालकाजवळ गेला आणि बाबा म्हणून जणू काही त्या बालकाने त्याचे स्वागतच केले. त्याला उचलून छातीशी धरून नीरु घरी घेऊन आला. त्याच्या पत्नीलाही अत्यंत आनंद झाला.

मौलवी ने त्या बालकाचे नाव कबीर असे ठेवले (कबीर म्हणजे महान) बालपणापासूनच कबिरांचे जीवन हे एका भक्ता प्रमाणेच होते. त्यांच्या जन्मगत अध्यात्मिक शक्तीमुळेच त्यांच्या कडून अनेक चमत्कार घडले .त्यांचा जरी विवाह झालेला असला तरी त्यांच्या भक्तीसाधनेमध्ये प्रपंच कधीच आडवा आला नाही. त्यांच्या लेखी भक्तीला प्रथम प्राधान्य होते. मात्र त्यांची भक्ती समस्त जनांना आदर्शवत होती. कबिरांचा निर्गुण उपासनेकडे कल होता.

कबिरांनी दूर दूर पर्यंत प्रवासही केला आणि भक्तीमधील प्रेम आणि सरलतेचा प्रचार केला. कबीर महाराजांनी बीजक सारख्या अनेक रचना केल्या आणि साकी पद्धतीच्या ही रचना केल्या. त्यातून त्यांची अदभुत उच्च अध्यात्मिकता आणि शुद्ध विचार सहज दिसून येतात. त्यांचे दोहे भारतात सर्वत्र लोकप्रिय आहेत.त्यातून एको देव: वैश्विक बंधुत्व उमजते. आणि प्रेम हाच अध्यात्मिक ध्येय गाठण्याचा एकमेव मार्ग आहे याचे प्रत्यन्तर येते.

कबीरजी म्हणतात सत्यासारखे पुण्य नाही आणि असत्या सारखे पाप पाप नाही ज्याचे अंतःकरण सत्याने भरलेले असते त्याच्याच हृदयात ईश्वराचा वास असातो कबिरांच्या रचनां मध्ये भक्ती संप्रदायाचा आणि सूफी संप्रदायाचा मधुर मिलाफ दिसून येतो. त्यांना हिंदू व मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील व्यक्ती शिष्य म्हणून मिळाल्या होत्या यामध्ये शीख सांप्रदायाचे जनक नानकजी आणि दादू सां प्रदायाचे संस्थापक दादू हे सुप्रसिद्ध आहेत.उत्तर भारतातील अनेकजण आजही स्वतःला कबीर सांप्रदायी म्हणवून घेतात.

भक्ती सांप्रदायाची अशी महान परंपरा मागे ठेऊन संत कबीर यांनी गोरखपूर जवळील मगर नावाच्या खेड्यामध्ये इ.स 1518मध्ये देह ठेवला .हिंदू आणि मुस्लीम समाजाने आपल्या आपल्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी काबीरांच्या मृतदेहावर आपला अधिकार सांगितला. परंतू आश्चर्य असे की जेव्हा मृतदेह उचलण्याची वेळ आली तेव्हा देहाच्या ठिकाणी केवळ फुलांची रास असलेली दिसून आली .शेवटी अत्यंत भक्ती भावाने दोन्ही समाजांनी ती फुले वाटून घेतली आणि आपल्या आपल्या धर्माप्रमाणे त्यावर संस्कार केले.

कबीर महाराजांची शिकवण

गुरू

यह तन विषकी बेलरी ,गुरू अमृतकी खान ।

सिस दिये जो गुरू मिलै , तो भी सस्ता जान ॥

अर्थ

हे शरीर म्हणजे विषवेल असेल तर गुरू म्हणजे अमृत सागर होय .असा गुरू आपले शिर अर्पण करून मिळाला तरी त्याचा लाभ स्वस्ता मधेच झाला आहे असे समजा.

मृत्यू

दस दारे का पिंजर तामै पंछी पौन ।

राहिब को अचरज है, जाय तो अचरज कौन ॥

अर्थ

हे शरीर म्हणजे दहा दारांचा पिंजरा आहे .त्यामध्ये हा प्राणरूपी पक्षी राहतो .तो त्यात राहतो हेच आश्चर्य आहे.तो उडून गेला तर त्यात आश्चर्य कसले?

परनारीचा मोह

परनारी पैनी छुरी,मति कोई लाओ अंग ।

रावन के दस सिर गये , परनारी के संग ॥

अर्थ

परस्त्री चा लोभ हा धारदार सूरी प्रमाणे असतो.त्यामुळे परनारीला घरी आणण्याचा मोह देखील करू नका.रावणाला दहा मस्तके होती पण परस्त्रीच्या लोभाने त्याला आपली सगळी मस्तके गमवावी लागली.

(एम.ए.संस्कृत) जळगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या