डॉ.गोपी सोरडे - Dr Gopi Sorade - Jalgaon - जळगाव :

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे 2018 च्या महापालिका निवडणुकीत विकास कामांच्या आश्वासनावर जळगावकरांनी भाजपला कौल देत स्पष्ट बहुमत दिले.

त्यामुळे जळगाव महानगरपालिकेत गेल्या 30 ते 35 वर्षांपासून असलेली सुरेशदादा जैन प्रणित खान्देश विकास आघाडीची सत्ता भाजपने मोडीत काढली आणि भाजप सत्तेवर विराजमान झाले.

मात्र त्यानंतर ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ च्या नादात राज्यात भाजपने सत्ता गमावली. आणि महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले. गेल्या अडीच वर्षात भाजपने जळगावकरांना विकासाचे केवळ आश्वासन दिले.

परंतू विकासकामे केली गेली नाहीत. परिणामी भाजपातीलच काही नगरसेवकांनी मोट बांधून सत्तांतरासाठी निर्णय घेतला. आणि याचाच परिपाक म्हणून आज, स्पष्ट बहुमतात असलेल्या भाजपला सत्ता गमवावी लागली.

खरंतर महापालिकेत शिवसेनेचे केवळ 15 नगरसेवक आहेत. अल्पमतात असतांनाही भाजपला सत्तेवरुन पायउतार करत, मनपावर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवला आहे.

बहुमतात असतांनाही सत्ता का गेली? नगरसेवक का नाराज झाले? भाजप नेत्यांचा नगरसेवकांनी का विश्वास गमावला. असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहे त्यामुळे पुन्हा एकदा भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत त्यावेळी स्वतः सुरेशदादा जैन यांनी पुढाकार घेवून गिरीश महाजनांच्या सोबत भाजप नेत्यांची भेट घेवून युतीसाठी एक पाऊल पुढे टाकले होते. परंतू, भाजपच्या नेत्यांनी दाद दिली नाही.

त्यामुळे जळगाव महापालिकेत भाजप-सेना युती होवू शकली नाही. भाजपने केवळ सत्तेच्या जोरावर जळगाव महापालिकेतील सत्ता मिळविण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण केले.

भाजपची विचारधारा नसलेले अनेक नगरसेवक भाजपच्या गोटात सामील झाले. त्यामुळे भाजपला महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले.

मात्र आता ही परिस्थिती बदलली आहे. हीच वेळ आता, भाजपवर आली. केवळ अडीच वर्षातच भाजपला महापालिकेच्या सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले आहे.

अखेर महाजनांकडून सत्ता हिसकावली

राजकारणात काही पण होवू शकते. काही वर्षांपुर्वी गिरीश महाजन यांच्या व्यासपीठावर त्यावेळी असलेले राज्यमंत्री आणि विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटीलांनी माझ्याकडे चिडी मारायची बंदूक आहे. आणि तुम्ही मला शिकार करायला सांगतात. आज राजकारण बदलले आहे. तेच गुलाबराव पाटील आज मात्र एकेकाळी पॉवरफुल असलेल्या गिरीश महाजनांना जेरीस आणून त्यांच्यायकडून सत्ता हिसकावून घेतली.

जनतेला बदल अनुभवायला यायला हवा

वास्तविक पाहता, सत्ता कोणाचीही येवो याचा सर्वसामान्य लोकांना काहीही सोयरसुतक नाही. केवळ मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात एवढीच जनतेची अपेक्षा असते. केवळ मुलभूत सुविधा नागरिकांना मिळत नव्हत्या, म्हणून जर भाजपचे नाराज नगरसेवक शिवसेनेसोबत आले आहेत. तर आता यापुढे विकासकामे करुन बदल अनुभवायला आला पाहीजे. नाहीतर मग हेच नगरसेवक पुन्हा जाणार नाही कशावरुन असा प्रश्नदेखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.

जनता भ्रमनिरास होणार नाही याची शिवसेनेने काळजी घ्यायला हवी

कोरोनाचा हॉटस्पॉट जळगाव जिल्हा आहे. रोज हजरावर रुग्ण येत आहेत. असे चित्र असतांना गेल्या आठ दिवसांपासून सत्तांतरासाठी पालकमंत्र्यांसह राज्यातील मोठ्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहे. आता सत्तांतर झाले. मात्र जनता भ्रमनिरास होणार नाही. याची काळजीदेखील आता सत्ताधारी शिवसेनेने घेणे अपेक्षित आहे.

सत्तांतराला वाळू व्यवसायाची किनार

भाजपच्या नाराज नगरसेवकांनी केवळ कामे होत नाही किंवा आम्हाला नेत्यांकडून विश्वासात घेतले जात नाही. असे कारण पुढे करुन, भाजपची साथ सोडली आणि शिवसेनेच्या सोबत गेले. हे जरी खरे असलेतरी नाराज नगरसेवकांपैकी बहुतेकजणांची वाळू व्यवसायामध्ये भागिदारी आहे. या भागिदारीतूनच नाराज नगरसेवक एकत्र आलेत. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.