Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedसांस्कृतिक रंगभूमी पुन्हा होणार सुवर्णमय

सांस्कृतिक रंगभूमी पुन्हा होणार सुवर्णमय

प्रत्येक गोष्टीची झळ प्रत्येक क्षेत्राला पोहचते त्यापैकी कोरोना आक्रमण होते . या आक्रमणाने जगाच्या अर्थव्यवस्थोलाच नाही तर सबंध समाजाच्या क्रियाशीलतेला लगाम घातला. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जगाची उलथापालथ करून ठेवली. पर्यटकांचे प्रवास थांबवले, क्रीडा स्पर्धा थांबल्या.. सण , समारंभ, लग्न सोहळे ठप्प झालीत. कधी नव्हे तो 100 वर्षात समाज भयभयीत झाला. विस्कटलेल्या, मरगळलेल्या मनाला विसावा देण्याचे काम सांस्कृतिक क्षेत्र करीत असते..आणि याच क्षेत्रावर मोठी कुर्‍हाड कोसळली. सांस्कृतिक चेतना ही मनुष्याला आंतरिक आणि बाह्य अधिपत्यापासून मुक्त करून त्यांच्या मूल्यांना उत्क्रांतीच्या मार्गावर नेण्यास प्रेरित करीत असते. आणि व्यक्ती म्हणून स्वतःचे अस्तित्व निर्माण करीत असते.आणि कोरोनाने तर सांस्कृतिक सृजनाचेच अस्तित्व संपवू पाहिले. सांस्कृतिक अवकाश जिवंत ठेवण्यासाठी धडपडणारी सर्व व्यावसायिक आणि हौशी कलाकारांपुढे भवितव्याचे प्रश्नचिन्ह उभे केले. यंदाचे वर्ष मराठी नाट्यसंमेलनाचे 100 वे वर्ष होते.त्यानिमित्त होणारे नाट्यसंमेलने, नाट्य जागर अनिर्णयीत काळासाठी पुढे ढकलली गेली. नाट्यगृहे ओसाड पडली, रिकाम्या खुर्च्या रसिकांसाठी रडू लागल्या. रंगभूमी प्रयोगासाठी जीव धरून बसली. सिनेमा, नाटक, मालिका कलाकारांची संधीच नाही तर उमलत्या वयाची शालेय, महाविद्यालयीन रंगभुमीवरील प्रयत्नांची, मेहनतीची संधी सुध्दा बंद झाली. मात्र आता पुन्हा रंगभूमिला सुवर्णकाळ येणार हे मात्र निश्चित…!

करोना कालावधीच्या नऊ महिन्यात कलावंत भयाण उदास झाला. ते केवळ शरीराने श्वास घेत राहिले पण मनाने मृतावस्थेत घरात कैद झाले.त्यांची भूक भीतीने घेतली. नृत्य, गायन, वादन, अभिनय, पथनाट्य, लोककलाही सर्व सांस्कृतिक रंगमंचाचे अभिव्यक्तीचे साधन या अंगिक कलांचा व्यक्तिशः किंवा सामुदायिक आविष्कार घडवणार्‍या रंगमंचावरील कलावंत, रंगमंचामागील तंत्रज्ञ साहित्यिक या सगळ्या घटकांची घरबंदी झाली.

- Advertisement -

प्रयोग थांबले, सादरीकरण थांबले. घोर निराशा समोर आली. पण नाटकाच्याच भाषेत बोलायचं झालं तर शो मस्ट गो ऑन ची सवय झालेल्या किंवा खिसा रिकामा असला तरी चालेल पण समोरची जागा रिकामी नसावी या धुंदीत जगणार्‍या कलावंतांनी याही बिकट अवस्थेत आर्थिक नियोजनाकडे पाहिले नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत कलेशी प्रामाणिक राहण्यासाठी लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन लाईव्ह सांस्कृतिक कार्यक्रमांची निमिर्ती करून घरात बसून घरात कंटाळलेल्या रसिकांना आनंद देण्याचा त्याचा वसा सुरूच ठेवला.

2015 साली फेसबुकच्या माध्यमाने झुकेर बर्ग यांनी सुरू केलेल्या फेसबुक लाईव्हचा खर्‍या अर्थाने व्यापक प्रमाणात सकारात्मक आणि नवीन दृष्टीचा आविष्कार या 9 महिन्यात घडला आणि एका मोठ्या रसिक समुदायाला एकांत वासातून, निराशेच्या गुंत्यातून बाहेर काढून त्यांना तुटलेपणाची झळ न बसू देता त्यांना रचनात्मक कार्यक्रमात गुंतवून सांस्कृतिक विश्व समृद्ध केले. आता कलावंतांची आणि रसिकांची जबाबदारी एडियट बॉक्स, इंटरनेट आणि मोबाइल यावर आपसूक येऊन पडली.

या माध्यमातून अनेक संस्थांनी लेखकांना, कवींना बोलते केले, काव्यमाला, व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, अभिनयीन कार्यशाळा, गायन, कला स्पर्धा, सादरीकरणे सोशल मेडियावर आयोजित केली गेली. चित्रकारांनी या संकट काळातील वेदना आपल्या कुंचल्यातून सोशल मीडियावर उतरवल्या. शेवटी किती काळ उदास होऊन घरात बसणार? आणि रद्द झालेल्या सुपार्‍या, घेतलेले प्रयोग यांच्यासाठी मदत मागणार तरी कुठे? शासनाकडे मागायचे तर, तिथेही मागणारे हात अधिक होते! सामाजिक संस्था देणार तरी किती? तेव्हा सांस्कृतिक टाळेबंदीत टिकाव धरणे हे आव्हान होते !

आर्थिक नव्हे पण किमान मनाच्या उभारीसाठी पुन्हा चेतनादायी होण्याची आता गरज होती. कुठे तरी परिवर्तन हवेच असते मनुष्यास. कारण, परिवर्तन माणसाला विवेकाच्या दिशेने नेत असते. अनेक कलावंतांनी लघुउद्योग सुरू केले, काहींनी पदार्थ बनवून विकले, भाजीपाला, फळे विकली, चहा नास्ताची हातगाडी सुरू केली. उदरनिर्वाह साठी पाऊल उचलणं आवश्यक होते पण तरीही आपली कलेची भूक त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लाईव्ह सेशनने भागवली. कोरोनाचे सावट दूर होईपर्यंत, जनजीवन सुरळीत होईपर्यंत लाईव्ह उपक्रमामार्फत स्वतःच्या कलेचा रियाज, सराव करत राहून मानसिक आनंद घेण्याचा व देण्याचा अभिनव फंडा या कोरोना काळात वापरला गेला.

खर तर कलाकारांसाठी प्रेक्षकांची टाळी हीच खरी दाद असते.. घरात चार भिंतीत एकट्याने मोबाईलच्या कॅनव्हासवर ऍडजस्ट करण्यात त्याला सुख मिळत नाही. पण हेही नसे थोडके या समाधानावर सादर झाले. या उपक्रमांनी हौशी कलावंतांची मानसिक भूक भागली पण प्रायोगिक कलावंतांचे कंबरडे मोडले गेले. आज 9 महिन्यांनी थेटर अनेक नियमांचे पालन करून सुरू झालेत. सोशल डिस्टन्स साठी प्रेक्षक संख्या कमी करण्यात आली पण खर्च मात्र तितकाच राहिला, निर्माता, तंत्रज्ञ, कलावंत, सेटअप या सार्‍यांचा खर्च प्रयोगातून नक्कीच निघत नाहीय.

आज पुन्हा हा रंगमंच सज्ज होतोय, पुन्हा उमेदीने उभा राहतोय पण या नऊ महिन्यातील आठवणी गोंजारण्यास पुरेसा प्रेक्षक मायबाप समोर नाही, हे शल्य प्रत्येक कलावंताच्या हृदयात आहे. याही वेदनेतून रंगभूमी बाहेर नक्कीच पडेल. कारण कलेला शेवट नसतो तिला फक्त जन्म असतो. सादरीकरण थांबले तरी कला थांबत नाही. काळाने आज सांस्कृतिक मंचाचा श्वास रोखला असला तरी थोड्या महिन्यातच कोरोना काळाआड जाणार आणि रंगभूमीला पुन्हा सुगीचे दिवस येणार हा विश्वास रंगभूमीला आणि कलावंताला आहे.

दुर्दैवाने दिगग्ज कलाकार या कोरोनाने आपल्यातून नेले पण आता धुरा राहिलेल्या कला उपसकांवर आहे. त्यांची साधना पुन्हा रंगमंचाला समृद्ध करणार आहे. 2020 सालात ओस पडलेल्या जत्रा, सण उत्सव आणि त्या अनुषंगाने येणारे सांस्कृतिक कार्यक्रम 2021 मध्ये नव्या ऊर्जेने, चेतनेने सादर होणार आहेत.

लोक कलावंतांचें फड पुन्हा दुमदुमतील, गायनाच्या मैफिली सजतील, नृत्याचें घुंगरू वाजतील, प्रयोगाची तिसरी घंटा वाजेल आणि नाटकाच्या नांदीचे मंजुळ स्वर ऐकायला मिळतील आणि या गुढीपाडव्याला न वाजलेला ताशा पुन्हा कडाडेलच हा दृढ विश्वास रंगभूमीला आहे. आणि त्यासाठी नटराजाचे आशीर्वाद पाठीशी आहेतच. संकट काळात टिकाव धरून राहणारी, अस्तित्व जिवंत ठेवणारी रंगभूमी पुन्हा साता समुद्रापार झेंडा रोवणार आहे. नव्या दमाने, नवा प्रवेश, नवा जन्म रंगभूमीचा अगाध आनंद घेऊन येणार आहे.आणि पुन्हा सांस्कृतिक क्षेत्र कलेचे पारणे फेडण्यासाठी सुवर्णमय होंणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या