Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमुक्ताईनगर : दोन सत्ता केंद्रांमुळे विकासचक्र गतिमान होणार !

मुक्ताईनगर : दोन सत्ता केंद्रांमुळे विकासचक्र गतिमान होणार !

गेल्या तीन दशकांपासून मुक्ताईनगर विधानसभे सह लोकसभा मतदारसंघात भाजपाची राजकीय दादागिरी होती. त्यामुळे विधानसभेसह लोकसभा मतदारसंघातही एकच सत्ताकेंद्र होते. परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीमुळे व त्यानंतर राजकीय क्षेत्रात मोठ मोठे राजकीय भूकंप होऊन अनेक स्थित्यंतरे झालीत. त्याचा परिणाम म्हणजे मतदारसंघात दोन सत्ता केंद्रांची निर्मिती झाली. दोन सत्ता केंद्रामुळे मतदारसंघातील विकासाचे चक्र अधिक गतिमान होतील अशी अपेक्षा आहे…

पूर्वी म्हणजेच 1989 च्या अगोदर तत्कालीन एदलाबाद तर आजचा मुक्ताईनगर मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 1989 नंतर मात्र काँग्रेसच्या असलेल्या बालेकिल्ल्यास एकनाथराव खडसे यांनी लावलेल्या सुरुंगामुळे उध्वस्त झाला आणि तेव्हापासून मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा अर्थात माजीमंत्री एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला बनला आहे. त्यामुळे तेव्हापासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायती वर भसजपाचाच झेंडा आहे. असे असले तरी यापैकी बहुसंख्यकांची भाजपा पक्षापेक्षा नाथाभाऊ या समिकरणावर अधिक निष्ठा आहे. त्यामुळे ज्या दिवशी माजीमंत्री खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून हातावर घड्याळ बांधले, त्याच दिवशी खरे तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसह मुक्ताईनगर नगरपंचायत सुद्धा भाजपा मुक्त (..! ) झाली आहे.

- Advertisement -

माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या राजकारणातील प्रदीर्घ अनुभवामुळे व त्यांच्या मध्ये असलेली अभ्यासूवृत्ती या गुणामुळे त्यांनी जिल्ह्यासह मतदारसंघातील विकास कामांसाठी शासन दरबारी भांडून विकासाच्या निधीची अक्षरशः गंगा आणली. त्यांच्या काळात पूर्णा नदीवरील खामखेडा, धुपेश्वर तसेच तापी नदीवरील पिंप्रीनांदू सारख्या अशक्य वाटणार्‍या पूलांची उभारणी करून गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघातील लोकांचा मतदारसंघातील लोकांशीच तुटलेला संपर्क जोडला.

दळण वळणाचे महत्वाचे घटक असलेले रस्ते पूल बांधकामे करण्यात आली. त्यासोबतच मुक्ताईनगर तालुक्यात पाणीपुरवठा योजना, लिफ्ट इरिगेशन मोठ मोठे शाळा-कॉलेजेस, मुक्ताईनगर येथे शासकीय तांत्रिक विद्यालय तसेच शासकीय औद्योगिक केंद्र तर मुक्ताईनगर भव्य असे येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून साकारण्यात आले. यासोबतच आवश्यक त्याठिकाणी रस्ते, गटारी यांची बांधकामे करण्यात आली. मुक्ताईनगर तालुक्यातील इंजीनियरिंग कॉलेज, कृषी महाविद्यालय एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नातूनच उभारले गेले आहेत.

यामुळे शिक्षणापासून आरोग्याच्या सुविधापर्यंत जनतेच्या मूलभूत गरजा प्राप्त होण्यास मदत झाली. इतकेच नाही तर आदिशक्ती संत मुक्ताबाई यांचे पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे कोट्यवधी रुपयांचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येत आहे. या निधीमध्ये वॉटर पार्क, बोटिंग यासह प्राचीन काळातील आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार तसेच पर्यटन स्थळ म्हणून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून अनेक कामे करण्यात येत आहेत. एकनाथराव खडसे भारतीय जनता पक्षातर्फे गेल्या सहा पंचवार्षिक आमदार म्हणून निवडून आले होते त्यामुळे त्यानंतर त्यांनी 12 खात्याचे मंत्री, उच्चशिक्षण मंत्री त्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

कॉलेज जीवनापासून विविध शैक्षणिक संघटनांमध्ये काम करीत असताना केवळ नेतृत्व गुणांवरच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पद मिळविल्यानंतर विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत अतिशय कमी मतांच्या फरकाने आमदारकीच्या पदाने चंद्रकांत पाटील यांना हुलकावणी दिली. त्यानंतर 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र सतत तीन दशके भाजपाचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवाराच्या ताब्यात गेला.

या निकालाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर राजकीय क्षेत्रातील स्थित्यंतराला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर मुक्ताईनगर विधानसभेच्या राजकीय क्षेत्रात मोठी स्थित्यंतरे झालीत. आणि तीस वर्षानंतर पहिल्यांदाच एका तरुण व राजकारणातील नवख्या असलेल्या चंद्रकांत पाटील या उमेदवाराच्या गळ्यात आमदार पदाची माळ पडली. विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचारात गेल्या 30 ते 40 वर्षांच्या राजकारणात जनतेचे जे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत नेमके तेच प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी लोकांसमोर मांडले आणि पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. निवडून आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघासाठी वेगाने विकास निधी उपलब्ध करून दिला. त्यात मुक्ताईनगर येथील स्मशानभूमीसाठी दोन कोटी रुपये, गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेला तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविणारा एम.आय.डी.सी. निर्मितीसाठी निवडून येताच चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा सुरू केलेला असून अधिकार्‍यांकडून जागेची पाहणी करण्यात आली.

त्यांच्याकडून हिरवा कंदिल देण्यात आलेला आहे. एमआयडीसीचा प्रश्न त्वरित मार्गी लागावा यासाठी गेल्या 3 डिसेंबर रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आमदार चंद्रकांत पाटील यांची बैठक झाली. कोरोना काळात मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयातच मतदारसंघातील रुग्णांना उपचारासाठी सेंटर सुरू करण्यात आले. त्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाला सव्वा कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला. यामध्ये महिला पुरुषांसाठी स्वतंत्र रीत्या आयसीयू उपलब्ध करून देण्यात आले त्यासोबतच डिजिटल एक्स-रे मशीन, ईसीजी मशीन, उपजिल्हा रुग्णालयाची दुरुस्ती, रस्ते, शौचालय आदी कामेही पूर्णत्वास येत आहेत. त्यातून वैद्यकीय उपकरणांनी व यंत्रांनी सुसज्ज व अद्ययावत असे उपजिल्हा रुग्णालयाचे स्वप्न साकार होत आहे. कोरोना काळात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आ.चंद्रकांत पाटील यांनी आवश्यक असलेली औषधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे सुरुवातीची तीन महिने मृत्यूचा दर कमी राखण्यात मुक्ताईनगर तालुका व मतदारसंघाला यश आले होते. मतदारसंघातील सावदा येथील पाणीपुरवठा टाकीसाठी 70 लाखाचा निधी त्यासोबतच मुक्ताईनगर पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात असून बोदवड तालुक्यातील 51 गावांसाठी पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आणण्यासाठी आ.चंद्रकांत पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत.

मुक्ताईनगर शहरातील मूलभूत सुविधा गटारी रस्ते यासाठी कोरोना काळात भरीव निधी खेचण्यात चंद्रकांत पाटील यांना यश आले. इतकेच नाही तर कोरोनाकाळात राज्यात सर्वात पहिली आढावा बैठक मुक्ताईनगरात आमदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली व त्या काळात आ.चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या खर्चातून 100 पलंग व बेडशीट उपलब्ध करून दिले. इतकेच नव्हे तर मुक्ताईनगर तालुक्याचा रोजगाराचा प्रश्न मिटविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगाराच्या जागी व्यापारी संकुल मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. त्यासोबतच कोरोना काळात केळी पिकावर सी.एम.व्ही. रोगाची लागण झाली होती तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते.

नुकसान भरपाईचे पंचनामे व्हावेत यासाठी स्वतः आमदार पाटील यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून घेतले व शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले व मतदारसंघासाठी सुमारे 28 कोटी रुपयांचा भरीव सामाजिक सभागृहे बुद्धविहार स्मशानभुमी यासाठी 35 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. भविष्यात मुक्ताईनगर शहरातील वृद्धांसाठी ऑक्सीजन पार्कची निर्मिती करण्याचा आ.चंद्रकांत पाटील यांचा मानस आहे. अशाप्रकारे गेल्या तीस ते 40 वर्षांमध्ये माजीमंत्री व सध्याचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात अनेक प्रकल्प राबवले व अनेक विकास कामे आणली.त्यामानाने नवीन आमदार चंद्रकांत पाटील यांची एका वर्षात मंजूर कामे पाहता ती कमी आहेत. असे असले तरी आमदार पाटील यांचा विकासाचा वेग मात्र जास्त आहे. हा वेग असाच कायम राहिल्यास मुक्ताईनगर विधानसभा संघाचा प्रचंड वेगाने विकास होऊन चेहरामोहरा बदलल्या शिवाय राहणार नाही.

त्यासोबतच एकनाथराव खडसे यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणीताई खडसे यांची सुद्धा राजकीय क्षेत्रात इंट्री झाली असल्याने मुक्ताईनगर मतदारसंघाला पुन्हा एक नेतृत्व लाभणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या दुसर्‍यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या रक्षाताई खडसे यांनी मतदारसंघात प्रत्येक गावात हायमस्ट लॅम्प दिले. विधानसभा मतदार संघासह लोकसभा मतदारसंघ हा केळीचा मोठा पट्टा लाभलेला असा मतदारसंघ आहे. यासाठी भव्य केळी प्रकल्प आणण्याची आवश्यकता आहे. यासाठी खा.रक्षाताईंनी प्रयत्न करण्याची अपेक्षा आहे. मतदारसंघात मुक्ताईनगरसह वडोदा वनपरिक्षेत्र लाभलेले असून त्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प व अभयारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

ती मार्गी लागावी तसेच जंगलातील प्राणी संरक्षित व्हावेत यासाठी केवळ घोषणापेक्षा प्रत्यक्ष कृती व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. त्यासोबतच मतदारसंघात दीर्घकालीन अशी पाणी पुरवठा योजना यशस्वी होण्यासाठी आ.चंद्रकांत पाटील यांच्यासह दिग्गज नेते असलेले एकनाथराव खडसे यांची मदत लागणार आहे. भविष्यात साखर कारखान्यासह सूतगिरणी पूर्ण क्षमतेने चालावी, भविष्यात जनतेला दाखवण्यात आलेले शुद्ध पाणीपुरवठाचे स्वप्न पूर्णत्वास यावे, तसेच मतदारसंघातील फसलेल्या कुर्‍हा – वडोदा उपसा सिंचन योजना, बोदवड उपसा सिंचन योजना, गरिबांच्या मुलांसाठी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था सुधारावी, त्यातील शिक्षणाचा स्तर वाढावा, जिल्हा परिषदेच्या शाळांना ऊर्जितावस्था प्राप्त होऊन शिक्षणाची गरिबांची असेल मूलभूत गरज पूर्ण व्हावी.

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील मतदारसंघातील बेरोजगारांच्या हाताला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत, की शहरासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलेले नाही वरील सर्व राहिलेले प्रकल्प पूर्णत्वास यावेत यासाठी तसेच पर्यायाने मतदारसंघाच्या विकासासाठी राजकारणातील या दोन सत्ताकेंद्रांनी हातात हात घालून काम करावे, अशी अपेक्षा जनतेतून असल्याने या दोन दिग्गजांच्या प्रयत्नांचा व अनुभवाचा फायदा मतदारसंघाच्या विकासासाठी होईल. त्यामुळे इतर मतदारसंघातील विकासापेक्षा निश्चितच मुक्ताईनगर मतदारसंघातील विकासाचे चक्र अधिक गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या