वरणगाव फॅक्टरीचे उत्पादन परदेशात जाणार !

jalgaon-digital
3 Min Read

देशातील 41 आयुध कारखान्यामधील 1 कारखाना वरणगांव येथे 1964 मधे स्थापन झाल्याने वरणगांवचे नाव देशपातळीवर गेले आहे. तत्कालीन मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयासाने या फॅक्टरीची महाराष्ट्रात स्थापना झाली होती. सुरूवातीस 5000 कर्मचारी होते, सध्या 2315 कर्मचारी अधिकारी काम करतात, 3037 एकर जमिन संपादीत करून निर्माणी उभारण्यात आली आहे. त्यावेळी लॅन्ड अफेक्टेड, वरणगांव, फुलगांव, तळवेल, कठोरा, अंजनसोडे आदी गांवातील लोकांना फॅक्टरीत नोकरीवर घेण्यात आले होते.

वरणगांव फॅक्टरीमधील पूर्वी सुरू असलेल्या उत्पादनाची मागणी कमी असल्याने नविन उत्पादन मिळण्यावरच पुढील भवितव्य अवलंबुन आहे. नुकतीच वरणगांव फॅक्टरीला अमेरिकेसारख्या प्रगत देशाला स्मॉल आर्म पुरविण्याची संधी आली असल्याचे वृत्त आहे. ही वरणगांव आयुध निर्माणीसाठी सुवर्ण संधी आहे. यावर फॅक्टरीचे भवितव्य अवलंबुन आहे. तसेच केंद्र सरकार आयुध निर्माणीचे कार्पोरेशन करण्याचा तयारीत असल्याने कर्मचार्‍यांवर टांगती तलवार असल्याची बोलले जाते.

सुरवातीस एकच प्रकारचे काडतूस बनविणार्‍या या फॅक्टरीत सध्या 5 .56, 7.62, 12.7 एम.एम. या तीन प्रकारचे काडतुस (बंदूकीच्या गोळया) तयार होतात. या गोळ्या सैनिक दल, राज्य राखीव पोलीस, राज्य पोलीस यांना पुरविण्यात येतात, आता काही आधुनिक मशीनरी आणलेल्या आहेत.

त्यावर काम केले जाते. जुन्या मशीन वरसुध्दा उत्पादन सुरू आहे. नवीन 9 एम. एम. च्या उत्पादनाची तयारी होत असुन यावरच फॅक्टरीचे भवितव्य व ओव्हर टाईम आहे. असे बोलले जाते, गुणवत्तेबाबत विविध मानांकन प्राप्त ही फॅक्टरी आहे. फॅक्टरीतील प्रशासनिक भवन सोलर एनर्जीवर काम करते. पर्यावरण रक्षण, कर्मचारी सुरक्षा, यावर विषेश भर दिले जाते.

कर्मचार्‍यांसाठी 2500 रहिवासी क्वार्टर, तापी नदीवरुन स्वतंत्र पाणीपुरवठा, आठवडयातून दोन वेळा बाजार, दुकाने, डांबरी रस्ते, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सामुदायिक भवन, भुसावळ हुन बस सेवा, वरणगांव हुन रिक्षा, विज सबस्टेशन, शाळा, सरकारी सुसज्ज दवाखाना आदी सुविधा उपलब्ध आहेत. न्याय व हक्का साठी कामगार संघटना आहेत यात कामगार, इंटक, बी.एम.एस.व इंडी पेंडेट संघटना, व सुपरवायझर, चालक, लिपीक, अराजपत्रित अधिकारी असोशिएनचा सामावेश आहे. कार्यसमिती, जे.सी.एम व्दारे व्यवस्थापनाशी चर्चा करून समस्या सोडविल्या जातात.

खेळांडूसाठी ज्युनियर, सिनियर क्लब, भव्य ग्राउंड, जिम, सर्व प्रकारचे खेळाचे साहीत्य फॅक्टरीकडून मिळतात. राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू येथे कार्यरत आहेत. त्यांना प्रोत्साहन दिले जाते. सर्व प्रकारचे धार्मीक स्थळ सर्व जाती धर्मियासाठी उपलब्ध आहेत. या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात सर्वाचा सहभाग यात असतो.

कर्जपुरवठा करणारी कामगारांची सहकारी सोसायटी असुन हीच सोसायटी घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा करते. सध्या फॅक्टरीचे महाप्रबंधक एस. के. राऊत हे आहेत. डी.एस.सी. व सुरक्षा विभागाव्दारे फॅक्टरी संरक्षणाची जबाबदारी घेतली जाते.

फॅक्टरीचे मतदान दर्यापूर ग्रामपंचायत हद्दीत आहे. सेवानिवृत कर्मचार्‍यानी याच परिसरात घरे बांधल्याने दर्यापूर गावाचा विस्तार वाढत आहे. वरणगांवची आर्थिक प्रगती करण्यात फॅक्टरीचा मोठा सहभाग आहे. केंद्र सरकारकडून देशातील सर्व फॅक्टर्‍यांचे निगमीकरण प्रक्रिया सुरू झाल्यामुळे कामगारामध्ये भितीचे वातावरण आहे. वरीष्ठ पातळीवर हे रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संघटना प्रतिनिधी सुनिल महाजन, महेश पाटील, सचिन चौधरी व अजय इंगळे यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *