पाचोरेकरांना अपेक्षा औद्योगिकीकरणाची

लक्ष्मण सूर्यवंशी - पाचोरा
पाचोरेकरांना अपेक्षा औद्योगिकीकरणाची

पाचोरा तालुक्याला पौराणिक व ऐतिहासिक नावलौकिक आहे. महाभारताच्या कालखंडात व पांडवांच्या वास्तव्याने शहराला पांचाळेश्वर-पांचाल नगरी-पाचोल. नंतर शाब्दिक अपभ्रंशातून पाचोरा नाव पडले आहे. अनेक धार्मिक स्थळे, रथयात्रा- उरूस जातीय सदभाव आणि सांस्कृतिक परंपरा जोपासणारा तालुका कृषी, व्यावसायिक, शैक्षणिक, क्रीडा, उद्योग समुहामुळे प्रसिध्द आहे. मात्र विकासाची गरुडझेप घेणार्‍या तालुक्याला सिंचन क्षेत्रात वाढ आणि वाढती बेरोजगारीचे निर्मुलन करण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होण्याची गरज आहे.

पाचोरा मतदारसंघाला भडगाव तालुका जोडण्यात आला. गेल्या चार पंचवार्षिक पासून पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूक होत आहे. 123 खेडी, पाच जिल्हा परिषद गट, दहा पंचायत समिती गण अशी पाचोरा तालुक्याची रचना असून साडे तीन लाखांच्यावर मतदार संख्या पोहोचली आहे. 1 एप्रिल 1947 साली नगरपालिकेची स्थापना झाली. सुपीक जमीन-जल प्रकल्पे भौगोलिक दृष्टीने तालुक्याची जमीन काळीशार व सुपीक आहे. कापूस-ज्वारी-बाजरी-सोयाबीन- तूर ही मुख्य पिके उत्पादित होतात.

फळबागात केळी-ऊस-मोसंबी-निंबू व भाजीपाला तालुक्यातून निर्यात होतो. दूरदृष्टीच्या धोरणातून शेती सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी बहुळा-हिवरा व अग्नावती तीन मध्यम प्रकल्प, गिरणा, तितूर, बहुळा, उतावळी नद्यांच्या विळखा, 22 च्यावर लघुप्रकल्प, के.टी.वेअर व लहान मोठी शेतीपयोगी जलाशय आहेत. पाचोरा शहराला ओझर, के.टी.वेअरच्या माध्यमातून शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नगरपालिका करते. मुबलक सिंचन साधने असल्याने सहसा पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत नसली तरी टंचाई काळात भिषण पाणी टंचाईची तालुक्याला झळ सोसावी लागते. शेती सिंचनासाठी बहुळा धरणाला उतावली नदी जोडची वीस- पंचवीस वर्षांपासूनची शेतक़र्‍यांची मागणी राजकीय स्तरावर मंत्री-खासदार-आमदार यांनी वेळोवेळी देऊनही शेतकरी हिताचे हे काम मार्गी लागत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करतात.

शिक्षण-क्रीडा क्षेत्रात अग्रेसर

शहरात व ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळा बोटावर मोजता येतील एवढ्याच शिल्लक आहेत. अर्धशतक पूर्ण करणार्‍या पाचोरा तालुक्यासह शिक्षण संस्थे व्यतिरिक्त प्राथमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ-कनिष्ठ मुलं-मुलीचे महाविद्यालय, इंग्लिश मीडियम, किमान कौशल्य, संगणकीय इन्स्टिट्यूट, चित्रकला, अध्यापक विद्यालय, अमंगा-मूकबधिर विद्यालये व आश्रमशाळा, शैक्षणिक अकॅडमी अशा अनेक खासगी संस्था कालानुरूप शैक्षणिक धोरण स्वीकारून ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. क्रीडा क्षेत्रातही तालुक्याचा नावलौकिक वाढत आहे.

प्रशासकीय कार्यालये-इमारती

जनतेच्या प्रशासकीय-आरोग्य-व अन्य सोयी सुविधांसाठी महसूल विभागाची भव्य प्रशासकीय इमारत पंचायत समिती, बचतभुवन, तालुका आरोग्य विभाग वग्रामीण रुग्णालय, नगरपालिका, बांधकाम विभाग, शासकीय विश्राम गृह, पाटबंधारे विभाग, पोलीस स्टेशन, भूमी अभिलेख, वन विभाग वगळता सर्व कार्यालयाच्या जनतेच्या दैनंदिन कामकाजासाठी भव्य इमारती आहेत.

बेरोजगारीकडे दुर्लक्ष

राज्य व केंद्र सरकारच्या विविध विकास धोरणातून शहर व ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधला आहे. तालुका झपाट्याने कात टाकून नवनवीन औद्योगिक, व्यावसायिक धोरणाकडे गरुडझेप घेत असला तरी तालुक्यात पदवीधर युवक आणि बेरोजगारांना रोजगार देणारे उद्योग तालुक्यात आणण्यासाठी आणि औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याकडे सर्वच राजकारणी आणि सत्ताधारी-विरोधकांचे दुर्लक्ष असल्याने रोजी-रोटी व नोकर्‍यांसाठी पदवीधर तरुण व मजुरांना अन्य जिल्हे व परराज्यात स्थलांतरित व्हावे लागते. स्थलांतर रोखण्यासाठी व औद्योगिकीकरणाच्या वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्नांची आणि प्रबळ मानसिकतेची गरज आहे.

बांधकाम क्षेत्रात वाढ

बदलता काळ आणि भूमीची गरज ओळखून सर्वच स्तरावर वेगाने बदल होत आहेत. शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या पाहता नोकरी व्यावसायानिमित्त येणार्‍या नागरिकांची शहरात भर पडत आहे. रहिवासा करिता जागेचे भाव गगनाला भिडत असल्याने जागा घेणे, घर बांधणे कठीण होत आहे. ही गरज ओळखून बांधकाम व्यावसायिकांकडून मोक्याच्या जागा व बिनशेती क्षेत्र पाहून व्यवसायांकरिता व्यापारी संकुले व रहिवासासाठी सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण रो-हाऊसेस, बंगले बांधून विक्रीचा व्यवसाय वाढत आहे.

आरोग्य क्षेत्रात झपाट्याने वाढ

दुर्धर व अतितातडीचे उपचार देणार्‍या रुग्णालयात दिवसागणिक शहरात वाढ होत आहे. गरोदर व बाळंतीण महिलांसाठी स्त्रीरोगतज्ञ, लहान मुलांसाठी बालरोग तज्ञ डॉक्टर यांचे हॉस्पिटल, हृदयरोग, हाडांचे आजार-उपचार, दंत चिकित्सक, अ‍ॅक्सिडट हॉस्पिटल, किडनी, मधुमेह व अन्य लहान मोठ्या आजारांवर उपचारासाठी पूर्वी जळगाव-नाशिक-मराठवाडा-मुंबई-पुणे सारख्या शहरांमध्ये जावे लागत होते. परंतु, आता तालुक्यातील काही भूमिपुत्र व अन्य विविध आजारांवर उपचार देणारे डॉक्टर पाचोरा नगरीत येत असल्याने आरोग्य व्यवसाय आणि मेडिकल क्षेत्रात वाढ होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com