स्त्री कर्तृत्वाची उंच भरारी !

डॉ.गीतांजली ठाकूर
स्त्री कर्तृत्वाची उंच भरारी !

एरंडोल येथील दत्त कॉलनीत छोट्याश्या वास्तूत असलेले नचिकेत इमेजिंग सेंटर! मोठा बोर्ड नाही कि मोठी भपकेबाजी नाही, महिला रुग्णांची संख्या जास्त तर कर्मचारीवर्गात ही महिला वर्ग जास्त! प्रतीक्षा कक्षात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसविलेले! व विविध पुरस्कार आणि विविध सन्मानचिन्हे ह्यांनी संपूर्ण व्यापलेली भिंत असे चित्र असलेले हे नचिकेत इमेजिंग सेंटर! ह्या सेंटरच्या संचालिका आहेत डॉ गीतांजली नरेंद्र ठाकूर! रेडिओलॉजी शाखेतील उच्चशिक्षित डॉक्टर!

सामान्यपणे इतर डॉक्टरांकडे त्यांच्या शाखेबद्दलचे, त्यांच्या विषयातील यश व परीक्षांबद्दलचे विविध प्रमाणपत्रे असतात पण येथील परिस्थिती वेगळीच! कारण आहे त्या शिक्षणाच्या आधारे, मिळालेल्या आरोग्य ज्ञानाचा डॉ.गीतांजली ठाकूर ह्यांनी ग्रामीण भागातील उपेक्षित अश्या महिलांसाठी आरोग्यक्षेत्रातील केलेल्या भरीव कार्याचे विविध संस्था व विविध वृत्तपत्रे, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील धुरीण ह्यांनी केलेल्या सन्मान व सत्काराच्या फोटोफ्रेमने व्यापलेल्या भिंती हे वेगळेपण दर्शविते!

डॉ गीतांजली ठाकूर ह्यांनी एरंडोल ह्या आपल्या सासुरवाडीच्या गावात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत छोटयाश्या सोनोग्राफी मशीनने एका दिवसापुरती प्रारंभ केलेल्या वैद्यकीय सेवेच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला दिसतो !

एरंडोल येथील सेंटरमध्ये डिजिटल एक्स रे, आठवडाभर सोनोग्राफीची सुविधा , सीटीस्कॅनची सुविधा, जळगावात सयुंक्तपणे सुरु केलेले महिलांसाठी स्तन विकार निदानाचे अत्याधुनिक डिजिटल मॅमोग्राफी सेंटर आणि गेल्या दोन वर्षांपासून जळगावातील आरोग्यक्षेत्रातील प्रगत असे ऍडव्हान्स एम.आर.आय. व सिटी स्कॅन सेंटरची स्थापना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील उंच भरारीची साक्ष देतात !

वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असतानांच सुखकर्ता फाउंडेशन ह्या प्रतिमेतून आरोग्य ग्रामीण जीवनासाठी अशी संकल्पना असलेल्या स्वयंसेवी संस्थेमार्फत त्यांनी केलेल्या विविध सामाजिक उपक्रम, वैद्यकीय प्रबोधन, महिलाविषयक नाविन्यपूर्ण कार्य व उपक्रमांची दखल विविध संस्थानी घेतलेली आहे! वैद्यकीय व सामाजिक कार्याबरोबरच कुठलाही वारसा नसतांना राजकीय क्षेत्रातील त्यांचे पदार्पणातील यश, नगरसेविका व उपनगराध्यक्ष असा प्रवास व त्यामार्फत केलेले लक्षवेधी कार्य हेही त्यांची राजकीय क्षेत्रातील भरारीचे प्रतीकच आहे करोनाच्या काळात डॉ गीतांजली ठाकूर ह्यांची एरंडोल नगरपालिकेने कोरोना ब्रँड अँबेसेडर म्हणून विशेष नियुक्ती केेली होती. कोरोनाच्या संपूर्ण काळात डॉ गीतांजली ठाकूर ह्यांनी आपल्या सेवाभावी कर्मचारीवर्गाच्या साथीने भीती न बाळगता आरोग्यसेवा सुरळीत चालू ठेवली !

करोनाबद्दल असलेली भीती, गैरसमज दूर करण्यासाठी विविध लेख वृत्तपत्रात प्रकाशित केले तर सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून कोरोनाबद्दलची अचूक व समोजोपयीगी माहिती ग्रामीण जनतेपर्यंत पोहचविण्याची धडपड केली !

सुखकर्ता फाउंडेशनमार्फत कोरोनाविषयीचे मोफत आरोग्यशिबिरे, मास्क व फेसशिल्डचे वाटप, दुर्बल घटकांना धान्य वाटप, ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन पाइपलाइनसाठी केलेली आर्थिक मदत ह्यांसह इतर केलेल्या कार्याची दखल घेऊन विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यात विशेष आहे रतनलाल सी बाफना ट्रस्ट ह्या नामांकित संस्थेकडून दिला गेलेला हार्ट ऑफ गोल्ड हा कोरोनायोद्धा सन्मान. आर्थिक, व्यावसायिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात डॉ ठाकूर ह्यांनी आपले कुटुंब सांभाळून घेतलेली भरारी एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासात आत्मिक विकासाचे महत्व अधोरेखित करणारी आहे, आणि आपली जीवनशैली आजच्या आधुनीकरणाच्या काळात कशी असावी हेही दर्शविणारी आहे.

शब्दांकन - जावेद मुजावर, एरंडोल

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com