Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमहावितरणच्या ग्राहकसेवेची भरारी

महावितरणच्या ग्राहकसेवेची भरारी

अन्न, वस्त्र व निवार्‍यासारखीच वीज ही मूलभूत गरज बनली आहे. विजेशिवाय जगण्याची कल्पना करणे शक्य नाही, इतके तिचे महत्त्व आहे. कोरोना विषाणू आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्चमध्ये केंद्र तसेच राज्य सरकारने लॉकडाऊनसह संचारबंदी घोषित केल्याने सर्वांना घरात राहावे लागले. सुमारे दोन अडिच महिन्यांच्या लॉकडाऊन कालावधीत महाराष्ट्रातील जनतेला घरात राहणे सुसह्य व्हावे यासाठी महावितरणने सुरळीत वीजपुरवठा केला. महावितरणच्या कार्यकुशल अभियंते आणि तांत्रिक कर्मचार्‍यांनी कोरोनाच्या संकटाला न डगमगता कर्तव्य बजावले. कोरोनाकाळातही उत्कृष्ट ग्राहकसेवेची भरारी महावितरणने घेतली आहे.

वीज ही अत्यावश्यक बाब असल्याने तिचा अखंडित पुरवठा ठेवण्यासाठी महावितरणने आपल्या कार्यप्रणालीत महत्त्वाचे बदल केले होते. सरकारला आरोग्यविषयक खबरदारी घेता यावी यासाठी अखंडित वीजपुरवठा करण्यात आजा. तांत्रिक किंवा इतर कारणाने खंडित झालेला विद्युतपुरवठा युद्धपातळीवर प्रयत्न करून तात्काळ पूर्ववत करण्यासाठी राज्यात वीजविषयक कार्यप्रणालीत बदल करून विविध उपाययोजना आखण्यात आल्या.

- Advertisement -

ऊर्जामंत्र्यांकडून दखल

या आणीबाणीच्या परिस्थितीत महावितरणचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम केल्याबद्दल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर्स, नर्सेस व पोलीस कर्मचारी यांचे नागरिकांकडून कौतुक होत असताना वीज पुरवठा करणारे वीज क्षेत्रातील इंजिनिअर्स, तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी व अधिकारी यांचेही योगदान प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे, असे मत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले.

करोनावर केली मात

कोरोनाच्या संकटातही ग्राहकांना सेवा देताना महावितरणच्या काही कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. मात्र त्यावरही मात करीत हे कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर रुजू होऊन सेवा बजावत आहेत. जळगाव परिमंडलात 152 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली होती. या कर्मचार्‍यांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी स्वत: लक्ष घातले होते. जळगाव परिमंडलात 149 कर्मचारी कोरोनामुक्त होऊन कामावर रुजूही झाले. दुर्दैवाने 3 कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या कर्मचार्‍यांच्या वारसांना महावितरणतर्फे प्रत्येकी 30 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

ऑनलाईन सुविधा वापर वाढला

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी तसेच वीजपुरवठ्याशी संबंधित महावितरणच्या उपलब्ध सर्व ऑनलाईन सेवेचा वापर केला. महावितरणच्या 24 तास उपलब्ध ऑनलाईन सेवेचा घरबसल्या वापर करून वीज बिलांचा भरणा केला. जळगाव परिमंडलात 1 लाख 31 हजार ग्राहकांनी 67 कोटी 34 लाख रुपयांचे वीजबिल ऑनलाईन भरले. ऑनलाईन बिल भरल्यामुळे ग्राहकांचा वेळ व पैसा वाचला. तसेच बिल भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासली नाही. ग्राहकांना खंडित वीजपुरवठ्यासह इतर तक्रारी नोंदवण्यासाठी मोबाईल अ‍ॅपसह कॉल सेंटर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याचा मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी लाभ घेतला.

सौर कृषिपंप शेतकर्‍यांसाठी सुर्योदयच

शेतकर्‍यांना दिवसा सिंचन करणे सोयीचे व्हावे, यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेंतर्गत जळगाव परिमंडलात 3486 ग्राहकांनी शेतकरी हिस्सा रकमेचा भरणा केला आहे. त्यापैकी 1950 सौरपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. कोरोनाकाळातही महावितरणने वेगाने काम करून सौरपंप आस्थापित केले. त्यामुळे या शाश्वत विजेचे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे. उर्वरित सौर उर्जा कृषी पंप मंजूर लाभार्थी शेतकर्‍यांच्या कृषी क्षेत्रावर बसवण्याचे कार्य प्रगतिपथावर आहे. सौरपंपामुळे दिवसा सिंचन शक्य होणार आहे. यात वीजपुरवठा खंडित होण्याचा, विजेच्या कमी दाबाचा प्रश्न नाही. विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीजबिलाचा किंवा डिझेलचा खर्च वाचणार आहे.

वीजबिल भरणे आवश्यक

कोरोनाच्या संकटातही महावितरणने चांगली सेवा दिल्यामुळे ग्राहकांना कसलीही अडचण आली नाही. आता ग्राहकांनी महावितरणने दिलेले वीजबिल भरून सहकार्य करण्याची गरज आहे. महावितरण ग्राहकांना जी वीज पुरवते, ती वीज खरेदी करण्यासाठी महावितरणला इतर कंपन्यांना नियमितरीत्या पैसे द्यावे लागतात. तसेच महावितरणच्या प्रचंड मोठ्या विद्युत यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीसाठीही मोठा खर्च करावा लागतो. ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. मात्र अनेक ग्राहकांनी आपले वीजबिल भरले नसल्याने महावितरणला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. तरी ग्राहकांनी आपले बिल भरणे आवश्यक आहे, जेणेकरून महावितरणकडून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा व दर्जेदार सेवा देणे सोपे जाईल.

वीजबिल भरण्यासाठी विविध पर्याय

महावितरणच्या संकेतस्थळावर, महावितरण मोबाईल अ‍ॅपवरून सर्व लघुदाब ग्राहकांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबँकीग, मोबाईल वॅलेट तसेच कॅश कार्डचा वापर करून वीजबिल भरणा करता येणे शक्य झाले आहे. याशिवाय विविध ऑनलाईन सुविधेबाबत महावितरणच्या संकेतस्थळावरील कंझुमर पोर्टल या विभागात ग्राहकांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ऑनलाईन बिल भरल्यास 500 रुपयांच्या मर्यादेपर्यंत बिलावर 0.25 टक्के सवलत देण्यात येते. या सुविधांचा ग्राहकांनी लाभ घेऊन महावितरणला सहकार्य करावे.

शब्दांकन- कृष्णराज पाटील

- Advertisment -

ताज्या बातम्या