Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedशिक्षण, सहकारातील भरारीमुळे चोपड्याचे नाव सातासमुद्रापार

शिक्षण, सहकारातील भरारीमुळे चोपड्याचे नाव सातासमुद्रापार

चोपडा तालुक्याच्या उत्तर दिशेला असलेली अनेर व गुळ नदी तर दक्षिणेस तापी नदीचे पाणी, येथील सुपीक जमीन व भूगर्भात असलेले मुबलक पाणी तसेच हतनूर धरणाच्या पाण्यामुळे शेती शिवार बारमाही हिरवेगार दिसते. हतनूर, गुळ व अनेर धरणाचे पाणी व कुपनलिकांचे पाण्यामुळे चोपडा तालुक्यात आज हजारो हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आल्याने शेतीमालाच्या उत्पन्नात प्रचंड वाढ झाली आहे. सिंचनामुळे ऊस, केळी व कापूस पिकाचे विक्रमी उत्पादन दरवर्षी येत असते. बारमाही बागायतीमुळे तालुक्यातील शेतकरी व शेतमजूरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सिंचनाची क्रांती झाल्यामुळे शेतीमालाचे विक्रमी उत्पादनामुळे चोपडा तालुक्यात प्रत्येक कुटुंबाची प्रगती झाली आहे. शिक्षण व सहकारातील समृद्धीमुळे चोपडा तालुक्याचे नाव सातासमुद्रापार गेले आहे.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सिमेवरील सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेला आदिवासीबहुल तालुक्यात स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात शिक्षण, वैद्यकीय व सहकार क्षेत्रातील भरारीमुळे चोपड्याचे नाव सातासमुद्रापार पोहचले आहे. याचा तालुकावासियांना सार्थ अभिमान आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे स्वातंत्र्य संग्रामातील योगदानामुळे देशाच्या गौरवशाली इतिहासात चोपड्याचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहले गेले असून, जळगाव जिल्ह्यात स्वातंत्र्य सैनिकांचा तालुका म्हणून सर्वत्र ओळख आहे. सुपीक जमीन व भूगर्भातील पाणी आणि हतनूर धरणाच्या पाण्यामुळे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रात सिंचनाची क्रांती होऊन आर्थिक सुबत्ता आल्याने शहरासह ग्रामीणभागात शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाल्याने चोपडा तालुक्यात साक्षरतेचे प्रमाण लक्षणीय आहे.

शिक्षणामुळे काही कुटुंब ओळखले जात आहेत. बॅरिस्टर, कमिशनर, कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, डिवायएसपी, तहसीलदार, डॉक्टर, वकील, इंजिनियर, इन्कम टॅक्स, सेल टॅक्स, सीए, आयआयटी शिक्षणामुळे अनेक जण उच्च पदावर पोहचले आहेत. त्यात माचला येथील माजी आमदार तथा बॅरिस्टर देवराव माधवराव निकम यांचे सुपूत्र व महाराष्ट्र शासनाचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्वल निकम यांच्या उत्तुंग कामगिरीमुळे चोपडा तालुक्याचे नाव देशात व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले आहे. देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर अ‍ॅड.निकम यांच्यामुळे चोपड्याचे नाव देशभर झळकले आहे. गेल्या साठ वर्षात शिक्षण, वैद्यकीय व सहकार क्षेत्रातील नेत्रदीपक प्रगतीमुळे चोपडा तालुका समृद्ध झाला आहे. तर साखर कारखाना व सूतगिरणी प्रकल्प शेतकर्‍यांना वरदान ठरले आहेत.

उच्च विद्या विभूषित व मितभाषी असलेले अ‍ॅड. पाटील यांनी राजकीय, सामाजिक व वकीलीच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करून लौकिक मिळविला आहे. आज ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत. लासुर येथील माजी उपमुख्याध्यापक स्व.व्ही.झेड.पाटील यांचे सुपूत्र तथा जळगाव येथील माजी परिवहन अधिकारी जयंत पाटील परिवहन विभागात अधिकारी म्हणून मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्यानंतरच्या कालखंडात चहार्डी येथील स्वर्गीय शंकरराव पुना रायसिंग यांचे सुपूत्र व चोसाकाचे जेष्ठ संचालक आनंदराव शंकरराव रायसिंग यांचे लहान बंधू व चोपडा उपविभागाचे डीवायएसपी राजेंद्र रायसिंग व लासुर येथील स्व.नवल बाबुराव पाटील यांचे सुपूत्र मनोज नवल पाटील आज अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस विभागात कार्यरत आहेत.

दोघांनी शासकीय सेवेत उत्कृष्ट काम करून कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. माजी नगरसेवक व आदिवासी समाजाचे कार्यकर्ते सीताराम पारधी यांचे सुपूत्र उमाकांत पारधी उपजिहाधिकारी पदापर्यंत पोहचले. तिसर्‍या पिढीतील सामान्य कुटूंबातील वेल्डिंग काम करणारे तावसे येथील ईश्वर उत्तम पाटील यांचे सुपूत्र आशिष पाटील गेल्या दोन वर्षांपूर्वी आयएएस परीक्षा पास होऊन जिल्हाधिकारी झाले. आज पाटील केरळ राज्यात जिल्हाधिकारी पदावर काम करीत आहे. पाटील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरले आहेत.

एका सामान्य कुटूंबातील मुलगा जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहचला ही बाब चोपडेकरांसाठी अभिनंदनीय असून, कौतुकास्पद आहे. शहरातील व्यापारी पुनमचंद शर्मा याचे सुपूत्र अंकुश शर्मा आयआयटी होऊन दिल्लीत पुढील शिक्षण घेत आहे. वडगावसिम (ता.चोपडा) येथील कोळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट ताराचंद भावडू बाविस्कर यांचे नातू तर कैलास बाविस्कर यांचे सुपूत्र आकाश बाविस्कर आयआयटीचे शिक्षण घेऊन मुंबई येथे कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहेत. स्वातंत्र्य पूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर मोठमोठ्या शिक्षण संस्था उभ्या राहिल्याने शिक्षणाची कवाडे खुली होऊन संधी उपलब्ध झाल्याने तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील असंख्य तरुण शिक्षणामुळे मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.

स्वातंत्र संग्रामात राष्ट्रप्रेमाची मशाल पेटवून ब्रिटीश सरकारच्या जुलमी राजवटी विरुद्ध सच्चे देशभक्त मगनलाल नगीनदास गुजराथी उर्फ मोठे मगनशेठ यांच्या नेतृत्वाखाली चोपड्यात बंड पुकारले गेले. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली मिठाचा सत्याग्रह, चलेजाव चळवळ व जेलभरो आंदोलनात गावागावातील असंख्य कार्यकर्त्यांचा आंदोलनात सक्रीय सहभाग होता. त्यात थोर स्वातंत्र्यसेनानी तथा माजी आमदार स्वर्गीय माधवराव गोटू पाटील, गोवर्धनदास भिकारीदास गुजराथी उर्फ लहान मगनशेठ, शंकर कोठारी, चहार्डीचे डॉ.विठ्ठल केशव पाटील, शंकर कथू पाटील, भाऊराव माणिक पाटील आदी कार्यकर्त्यांचा स्वातंत्र्य संग्रामात समावेश होता. आंदोलनाच्या काळात मगनलाल नगीनदास गुजराथी उर्फ मोठे मगनशेठ, गोवर्धनदास भिकारीदास गुजराथी उर्फ लहान मगनशेठ, माजी आमदार माधवराव गोटू पाटील, शंकर कोठारी यांचेसह आदी कार्यकर्ते जेलमध्ये गेले.

चोपडा तालुक्यात शहरात व ग्रामीण भागात चहार्डी व अकुलखेडा येथील स्वातंत्र्य सैनिकांची संख्या जास्त आहे. देशात व महाराष्ट्रात स्वातंत्र्य सैनिकांचा तालुका म्हणून चोपड्याला विशेष ओळख आहे. स्वातंत्र्य संग्रामात इतिहासात सुवर्ण अक्षरांनी चोपड्याचा इतिहास लिहला गेला आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना भारत व पाकिस्तान दरम्यान कारगिल युद्ध झाले. युद्ध जिंकण्यासाठी ज्या हुताम्यांनी प्राणांची आहुती दिली. शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी चोपडा शहराच्याबाहेर यावल रस्त्यावर नगरपालिकेच्या सहकार्याने कारगिल स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. रात्री लख्ख प्रकाश झोतात स्मारक खुलून दिसते. चोपड्याचे कारगिल स्मारक महाराष्ट्रातील एकमेव स्मारक होय. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या अथक प्रयत्नातून कारगिल स्मारकाची उभारणी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करण्यात आली. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल पी.सी.अलेक्झांडर, तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, तत्कालीन आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कारगिल स्मारकाचे उदघाटन माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

चोपडा तालुक्यात असलेली सुपीक जमीन व भूगर्भातील पाणी आणि कापसाचा पेरा लक्षात घेऊन माजी आमदार जेष्ठनेते स्वर्गीय डॉ.सुरेश दादा पाटील यांच्या कार्यकाळात 1991 मध्ये सुतगिरणीची मुहूर्तमेढ करणेत आली. नंतरच्या कालखंडात माजी आमदार कैलास पाटील यांच्या अथक परिश्रमातून सुतगिरणीचा प्रकल्प पूर्णत्वास आला. त्यांच्या चेअरमनपदाच्या काळात सुतगिरणी प्रकल्पातून तीन वर्षांपूर्वी उत्पादन सुरू झाले. सुतगिरणी प्रकल्पामुळे तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सहकार क्षेत्रातील धुरंदर राजकारणी स्व.धोंडू आप्पा पाटील यांनी सुपीक जमीन व पाण्याचा विचार करून शेतकर्‍यांना सोबत घेऊन 1989 मध्ये तालुक्याला वरदान ठरणार्‍या चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची वेले ते चहार्डी रस्त्यावर मुहूर्तमेढ रोवली.

शासकीय अंदाजपत्रक 35 कोटीचे असतांना काटकसर करून फक्त 27 कोटीत कारखान्याची उभारणी केली. अवघ्या 4 थी पर्यंत शिक्षण घेतलेल्या रुखनखेडे येथील स्व.धोंडू आप्पांनी कारखाना निर्माण करून महाराष्ट्रात राजकारणात एक वेगळा आदर्श निर्माण केला. संस्थापक असलेल्या धोंडू आप्पांनी साखर कारखान्याचे दहा वर्षे नेतृत्व करून उत्तम प्रकारे चालविला. चोपडे शिक्षण मंडळाची स्थापना 1918 मध्ये चोपडा शहरात करण्यात आली. मंडळ संचलित प्रताप विद्या मंदिर शाळेत बालवाडी पासून 12 वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. संस्थेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संस्थेचा शतकपूर्ती सोहळा नुकताच दिमाखात साजरा करण्यात आला. दर्जेदार शिक्षणात प्रताप शाळेचे तालुक्यात नाव आहे. सोबतच संस्थेचे कृषी महाविद्यालय, आयटीआय व शिक्षणशास्र महाविद्यालय सुरू आहेत.

शिक्षण मंडळाच्या चेअरमनपदाची धुरा राजभाई मयूर यांचेकडे तर अध्यक्ष म्हणून विठ्ठलदास गुजराथी असून सचिवपदावर माधुरी मयूर, संचालक म्हणून चंद्रहास गुजराथी व समन्वयक म्हणून गोविंद गुजराथी कारभार हाताळत आहेत. नंतरच्या काळात माजी आमदार व काँग्रेसचे जेष्ठनेते तथा माजी आमदार स्व. डॉ.सुरेशदादा पाटील यांनी 1969 मध्ये महात्मा गांधी शिक्षण मंडळाची स्थापना करून तालुकावासियांना शिक्षणाचे दालन खुले करून दिले. संस्थेचे कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालय, आक्कासो. शरदचंद्रिका पाटील पॉलिटेक्निक कॉलेज, औषध निर्माण शास्र महाविद्यालय, कस्तुरबा विद्यालय, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय व आदिवासी आश्रम शाळा कर्जाणे, नर्सिंग कॉलेज, आयटीआय अशा संस्थेत विविध अभ्याक्रमांचे कोर्सेस सुरू आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य व गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून माजी आमदार स्व.डॉ.सुरेश दादा पाटील यांनी अनेक वर्षे धुरा सांभाळली.

स्व.शरदचंद्रिका आक्का पाटील शिक्षण मंत्री असतांना त्यांनी अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्र यांचेसह उच्च शिक्षणाचे कोर्सेस आणून शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. आज त्यांचे सुपूत्र तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील संस्थेचे अध्यक्ष म्हणून तर सचिवपद स्व.आक्का व दादांच्या स्नुषा डॉ.स्मिताताई पाटील यशस्वीपणे सांभाळत आहेत. 1990 मध्ये डॉ.सुरेश बोरोले यांनी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेची स्थापना करून पंकज प्राथमिक शाळा सुरू केली. शिक्षणाचा दर्जा उंचावल्यामुळे पंकज शाळा नावारुपाला आली. त्यानंतर संस्थेने पंकज महाविद्यालय सुरू केले.

त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मदत झाली. 1990 च्या काळात स्वामी विवेकानंदांच्या विचाराने प्रेरित झालेले डॉ.विकास हरताळकर व डॉ.विजय पोतदार यांनी विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संस्थेच्या माध्यमातून विवेकानंद विद्यालयाची सुरुवात केली. दर्जेदार शिक्षण व शिस्तीचे धडे विद्यार्थ्यांना दिल्याने विवेकानंद शाळेने चोपडा तालुक्यात मान मिळविला आहे. बालांगण पासून प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10 वी पर्यंत शिक्षण मिळत आहे. संस्थेचे अध्यक्ष म्हणून डॉ.विजय पोतदार तर सचिव म्हणून घनश्याम अग्रवाल काम पाहत आहेत. पंकज व विवेकानंद शाळेने कलेक्टर, इंजिनियर, डॉक्टर, वकील, संशोधक यांचे सह अनेक हुशार विद्यार्थी घडविले आहेत. गुणवत्तेच्या बाबतीत चोपड्यातील सर्वच प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांचे शिक्षण क्षेत्रातील काम कौतुकास्पद आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या