Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedसंकटांशी सामना करीत पारोळ्याची भरारी

संकटांशी सामना करीत पारोळ्याची भरारी

पारोळा तालुक्याने व्यापार-उद्योगांसह शेती व रोजगारातून ‘भरारी’ घ्यावी अशाच भरभराटीच्या काळात गेल्या 7/8 महिन्यापासून ‘कोरोना’ने भरारी घेण्यापासून रोखत अनेक अडचणी आणत फरफटत नेल्याने तालुक्याला सर्वच क्षेत्रात मरगळ आली.तालुका पातळीवर प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरिक्षकांसह कर्मचारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स, कुटीर रूग्णालय डॉक्टर्स, न.पा. कर्मचारींसह शाळा-माध्य. विद्यालय, महाविद्यालय प्राध्यापक-शिक्षक-विद्यार्थ्यांनी कोरोनाला थांबवत आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत. यात बर्‍याच ‘कोरोना’ योध्दांसह दानशूरांनी अन्नदानासाठी श्री बालाजी महाराज अन्नदान समितीकडे रोख रकमेसह अन्न-धान्याची मदत करून गोर-गरीबांना घरो-घरी किराणा किटचे देखील वाटप केले. विविध संकटांशी मुकाबला करीत पारोळा तालुका भरारी घेत आहे…

श्री बालाजी महाराजांच्या पावन चरण स्पर्शाने सुरूवातीला 2 महिने कोरोनाचा या तालुक्याला स्पर्श देखील झाला नव्हता, पण जनतेच्या आततायीपणाने कोरोनाने धर-पकड सुरू करत अनेकांचे बळी घेतले. यात तालुक्यातील जनतेला आर्थिक, मानसिक व शाररिक त्रासाशी जबरदस्त मुकाबला करावा लागला. त्यात व्यापार-उद्योग, मजुरांची रोजंदारी थांबली, गोर-गरीबांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली, व्यापार मंदावल्याने व्यापारी येणे थांबल्याने देणे देखील थांबले. या सार्‍या विवंचनेत बाजारपेठेवर मंदीचे सावट आल्याने शहराची मुख्य बाजारपेठेवर अवकळा आली. नगरपालिकेच्या पदाधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी बॅरेकेट लावत कोरोना रूग्णांच्या भागात जाण्यास मज्जाव करीत मास्क वापरा, संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन करून शर्थीचे प्रयत्न केलेत.

- Advertisement -

शासन-प्रशासन व आ.चिमणरावआबांच्या निधीतून कोरोना रूग्णांसाठी बेड, ऑक्सीजन व औषधींची तातडीने व्यवस्था झाल्याने रूग्ण बरे होऊन घरी परतू लागलेत. तालुक्यातील ग्रामीण भागात देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याने ग्रामस्थांना सुध्दा कोरोनाने कोरून काढले. आता परिस्थिती बरी असली तरी कोरोनाची भिती अजून गेलेली नसल्याने शासन प्रशासन आज देखील सतर्क राहा, मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा म्हणत असले तरी तालुकावासी समजून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

तालुक्यातील सर्वात मोठी 15 दिवस भरणारी व कोट्यावधी रूपयांची उलाढाल होणारी श्री बालाजी महाराजांची यात्रा व रथोत्सव बंद झाल्याने छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांचे फार मोठे नुकसान झाले. आता याच तालुक्यातील चोरवड येथील श्री गुरूदत्तांची दत्त जयंतीला भरणारी मोठी यात्रा देखील रद्द झाल्यास 15/20 दिवस चालणार्‍या या यात्रेत व्यापार्‍यांसह तमाशा फडांना देखील फार मोठी आर्थिक झळ सोसावी लागणार असून ग्रामपंचायतीचे सुध्दा हजारो रूपयांच्या करापोटी मिळणार्‍या उत्पन्नाचे नुकसान होणार आहे.

कोरोनामुळे तालुक्याचा विकासाला देखील खीळ बसली असून विकास थांबला त्यातच अवकाळी पावसानं थैमान घातल्याने शेतकर्‍यांचे नगदी पीक कपाशीला फटका बसल्याने एकरी 6/7 क्विंटलचे येणारे उत्पन्न एकरी 3 क्विंटलवर येऊन ठेपल्याने शेतकर्‍यांना नुकसानीशी सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसाच्या मदतीचा हात या तालुक्याला मिळाला नसल्याने शेतकर्‍यांची नाराजी वाढली आहे. कोरोना अन् अवकाळी पावसाने सर्वत्र हाहा:कार माजविला असला तरी मुकाबला करण्यात तालुका हरला नाही पण लोकप्रतिनिधींनी कोरोना व अवकाळी पावसाच्या फटक्याला सावरण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा शेतकर्‍यांसह शेतकरी संघटनेने केली आहे.

स.ध.भावसार कौतुकास पात्रच

जवानीचे मोल म्हातारपणी तोलले जावू शकत नाही असे म्हटले जाते, पण म्हातारपणात तरूणांना लाजवेल असे सूत्र ज्यांनी आजतागायत पाळले, वेळेचे बंधन, समाजसेवेबरोबर गुणवंतांचा सन्मान अशा वयाच्या 74 व्या वर्षी देखील हसतमुख व सेवाभावी वृत्तीचे गुरुवर्य स.ध. भावसार सरांच्या कार्याच्या लेखाजोखा पाहता ते आदर्श तर आहेतच पण सर्वच क्षेत्रात कौतुकास्पद व्यक्तीमत्त्व असल्याचे त्यांनी त्यांच्या कार्यातून सिध्द करून दाखविले आहे. त्यांच्या पत्रांचा पत्रसंग्रह व लिखाण पाहता त्यांना वयाचे भान नसावे असेच वाटते, बजरंगाचे भक्त असल्याने बजरंगच मला ही शक्ती देतात असे ते नेहमी सांगतात. अशा या बजरंगाच्या भक्ताची आर्थिक परिस्थिती जेमतेम असतांना गरजूंना मदत करण्याची व सामाजिक, शैक्षणीकसह जनसेवेचे व्रत घेतलेल्या स.ध.भावसार सरांना मानाचा मुजरा.

भवानीगड कौतुकास्पदच

पारोळा तालुक्याचे आराध्य दैवत श्री बालाजी महाराज व त्यांचे भव्य दिव्य मंदिर तसेच मर्दानी राणी लक्ष्मीबाई झाशीवाली यांच्या मर्दुमकीच्या यशोगाथा असलेल्या या तालुक्याला ऐतिहासिकते बरोबरच धार्मिकतेची जोड लागली आहे. तालुक्यतील जनतेत भजन, किर्तन, भागवत सप्ताहा बरोबर धार्मिकविधी, परमेश्वरांचे पूजन, श्री स्वामी समर्थांचे पठण, श्री समर्थ्यांच्या बैठकी आदी बाबी पाहता तालुक्यातील जनतेचा धार्मिकतेकडे ओढा वाढला असून जप-तप-पूजा पाठाबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासणारे तसेच दानशूर व्यक्तीमत्व देखील आपली प्रतिष्ठा पणाला लावतांना दिसून येतात.

याच सार्‍या बाबी पाहता तालुक्याचे तारणहार श्री बालाजी महाराजांचे भक्त गणांमुळे तालुका अनेक संकटांशी संघर्ष करीत असून याचा प्रत्यय आम जनतेला ‘कोरोना’ काळात आला आहे. याच धार्मिक भावनेतून माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व.सुधाकरराव तांबे यांचे सुपूत्र डॉ.मंगेश ताबें यांनी पिताश्रींचा सामाजिक व राजकीय वारसा जोपासत राजकीय कारकिर्दीला सुरूवात करतांना तळागाळातील लोकांसह गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत दातृत्व निभावत आपल्या कार्यकुशलतेने नगरपालिकेत नगरसेवक पदापासून उपनगराध्यक्ष पदापर्यंत जबाबदारी सांभाळतांना पुरातन भवानी मंदिराचा जिर्णोध्दार करीत त्याच भवानी मंदिराला आगळे-वेगळे स्वरूप देत शहरात प्रतिआनंद सागर (शेगाव) व्हावे ही भावना मनी ठेवत झपाट भवानी (पुरातन) व गजानन महाराज मंदिराचा कायापालट करीत आज शहरात झपाटभवानीचे ‘भवानीगड’ तयार करून याच भवानी गडावर खा.उन्मेष पाटील यांच्या हस्ते व नगराध्यक्ष करण पाटील, अमोल चिमणराव पाटील, माजी नगराध्यक्ष अशोक वाणी, शिवसेना शहर प्रमुख अशोक मराठे, अ‍ॅड.तुषार पाटील, दिपक अनुष्ठान, प्रकाश वाणी, मधुकर पाटील, प्रेमानंद पाटील, मोहित तांबे आदिंच्या उपस्थितीत वैकुंठ रथाचे लोकार्पण केले. यापूर्वी देखील डॉ.मंगेश तांबे यांनी पाण्याचे टँकर, रूग्णवाहिका, सामाजिक कार्याचे मोफत कार्य केली असून कुठलीही शासकीय किंवा देणगी न घेता 7.50 कोटीच्या स्वखर्चातून भव्य-दिव्य असे ‘भवानी गड’ मंदिराची उभारणी केली आहे. हे धार्मिक-सामाजिक व राजकीय कार्य डॉ.मंगेश तांबे यांचे कौतुकास्पदच असल्याचे म्हटले जाते.

राष्ट्रवादीचे नेते तळपत्या तलावारीच

पारोळा तालुक्यातील व एरंडोल-भडगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे जुने जाणते नेते माजी खा.अ‍ॅड.वसंतराव मोरेकाका व माजीमंत्री डॉ.सतिशअण्णा पाटील जय-पराजयाची खंत न बाळगता आपली तळपती तलवार त्याच बरोबर शब्दांना असलेली धार सतत तेज ठेवत लढवय्याची भूमिका ठेवून ‘रडायचं नाही लढायचं’ अशाच माध्यमातून आम्ही शूर शिलेदार शरद पवार साहेबांचे अनुयायी असल्याचे सिध्द करीत असतात. मा.खा.मोरे काका वयाची सत्तरी ओलांडून देखील तरूणांना लाजवतील अशा जोमात आपली शक्तीपणाला लावण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. राष्ट्रवादीच्या ध्येय-धोरणांना पाठबळ देत ‘जवळ असतील ते मावळे जातील ते कावळे’ या भूमिकेतून आपली सिंह गर्जना आजही दोन्ही नेते करीत असून कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या प्रयत्नात प्रत्येक ठिकाणी जिंकण्याचा हेतू ठेवत राष्ट्रवादीच्या गोतावळ्यात राहणे पसंत करतात तर राष्ट्रवादीसाठी कटिबध्द असल्याचा त्यांचा दावा कणखरपणे सिध्द करण्याचा मानस एकमेकांच्या साथीनं टिकवून ठेवत असल्याचा त्यांना सार्थ अभिमान असल्याचे ते नेहमी बोलत असतात.

सुपूत्रांची राजकीय झेप

पारोळा तालुका तसा राजकीय क्षेत्रात लखलखणारा ताराच म्हणावा लागेल. याच तालुक्याने खासदारकी, पालकमंत्री, आमदारकी, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँक संचालक, जिल्हा बँक अध्यक्ष पदांसह अनेकविध पदे भूषविली. अशा या बहुआयामी तालुक्यात सतत राजकीय वर्चस्वाच्या लढाईत मा.खासदार वसंतराव मोरे काका, राष्ट्रवादीतून भाजपात जावून सतत दोनदा खासदार झालेले मा.खा.ए.टी.नाना पाटील व सतत आमदारकीसाठी झुंज देणारे मा.आ.डॉ.सतिशअण्णा पाटील व विद्यमान आ.चिमणराव आबा यांच्या लढती सर्वश्रुतच आहेत. या वर्चस्वाच्या लढतीत सुपूत्रांची देखील राजकीय झेप महत्त्वाची गणली जाते. या झेपेतून मा.खा.मोरे काकांचे सुपूत्र रोहन मोरे हे नगरपालिकेत नगरसेवक तर मा.आमदार डॉ.सतिश पाटील यांचे सुपूत्र रोहन पाटील हे जि.प. सदस्य आहेत. आ.चिमणराव आबांचे सुपूत्र अमोल पाटील हे जिल्हा बँक संचालक व कृषि उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष असून शिवसेनेचे युवा नेते म्हणून मतदार संघात भेटी-गाठी घेत सतत जनसंपर्कात दिसून येतात.

जि.प. सदस्य रोहन पाटील हे देखील लग्नकार्य-मृत्युच्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत मतदारसंघात नेहमी जात असतात. आपापल्या पिताश्रींच्या राजकीय अस्तित्वासाठी या सुपूत्रांची ही राजकीय झेप भविष्यात त्यांना देखील कामी येऊ शकते, असे म्हटलं जात असलं तरी राजकारणात राजकीय वारसा जपणार्‍या या सुपुत्रांबरोबर तालुक्यात आपलं राजकीय वलय व वजन वाढविण्याच्या अथक परिश्रमात राजकारणात जि.प.सदस्य शिवसेनेचे उपाध्यक्ष डॉ.हर्षल माने यांचा देखील या सुपुत्रांबरोबर एका राजकीय नेत्यांचा मानसपुत्र म्हणून उल्लेख केला जातो. त्यांनी देखील जि.प.सदस्य म्हणून जि.प.मतदारसंघात विकासकामे करून जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न सुरूच आहे. त्यांची स्वप्ने फार मोठी असली तरी उंच भरारी घेण्यासाठी त्यांना भक्कम पाठबळाची गरज आहे ना? अशा या सुपुत्रांच्या बरोबर माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शहास-काटशह देणार्‍यांच्या यादीत प्रथम क्रमांकावर असून त्यांनी गेल्या पंचवार्षिक नगरपालिका नगराध्यक्ष निवडणुकीत काट्याच्या लढतीत चांगलीच टक्कर दिली होती. त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात शहराचा सर्वांगिण विकासासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतल्याचे आजही शहरवासी त्यांच्या कामाचं कौतुक करतात. त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून तालुक्यात त्यांचा जनसंपर्क दांडगा असून हसतमुख, मितभाषी, समाजमनाचा आदर करणारे व्यक्तिमत्व म्हणून जनमानसात त्यांना मानणारे चंद्रकांतदादा मित्र मंडळाचे शहरभर प्रतिनिधी आहेत हे विशेष.

सावित्रींच्या सुपुत्रांची यशोगाथा

तालुक्यात स्व.पिताश्री एकनाथ दादांच्या वारसा चालवतांना आपल्या गरीबीची जाण ठेवून एकनाथ शिरूळे यांच्या सुपुत्रांपैकी गोविंद आबा शिरूळे यांनी गरीबांसाठी रोजगार निर्मिती करून पोटा-पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा चंग बांधला व त्याच जिद्दीतून आईच्या नावाने सावित्री फटाका फॅक्टरीची निर्मिती करून शेकडो बेरोजगारांना रोजगार देऊन बांधलेली खुणगाठ व जिद्द पूर्ण करीतत आज ते शहराचे आधारस्तंभ बनले. त्यांच्या माध्यमातून गोरगरीबांना रोजगार तर मिळालाच पण फटाके विक्रीतून पारोळ्यापासून नाशिकपर्यंतच्या किरकोळ विक्री दुकानदार व्यापार्‍यांना या माध्यमातून उद्योग-व्यवसाय मिळाल्याने त्यांची किर्ती वाढत जाऊन शहरवासीयांचे ते गळ्यातले तावीत बनले, असे म्हटले जाते. ते माजी नगराध्यक्ष असून त्यांच्या कुटूंबातील महिला सदस्य देखील नगरसेविका असून गत काळात शिरूळे परिवारातील महिलेने नगराध्यक्षपदाचा सन्मान मिळविला. गोविंदआबा शिरूळे हे शहर विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी गेल्या पंचवार्षिकला एरंडोल विधानसभा मतदासंघात उमेदवारी लढविली होती. मतदासंघात त्यांची चाहती मंडळी भरपूर असून नाशिकपर्यंत त्यांचा व्यवसाय असल्याने ते सर्वांना परिचित आहेत.

करण पाटील राजकीय योध्दा

पारोळ्याच्या राजकारणात राजकीय पटलावर बुध्दीबळासारखे प्यादे कोण राखील असाच खेळ व घडामोडी झाल्याने राष्ट्रवादी व नात्याची बंधने तोडत करण बाळासाहेब पाटील यांनी भाजपात प्रवेश करून आपलं वेगळं वलय व स्थान निर्माण करीत ‘राजकीय योध्दा’ होत स्वकीयांशी बंडाचा झेंडा हाती घेत लढवय्या होऊन नगराध्यक्ष पद पदरी पडल्याने विकास कामांची जोरदार सुरुवात करीत गत पाच वर्षाच्या काळात नगरसेवक व कर्मचार्‍यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियानात बक्षीसे मिळविलीत. उंच भरारी घेण्याच्या प्रयत्नात आमदारकी लढविण्याच्या प्रयत्नांना युतीमुळे यश हुकले, तरी देखील युतीच्या उमेदवारासाठी जोरदार प्रयत्न करीत नात्याला थांबा देत विजयश्री खेचून आणत युतीच्या उमेदवाराच्या गळ्यात माळा अन् गळ्यात गळा घातला, पण युती फिस्कटल्याने भाजपा दूर सारला गेला अन् महाआघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र आल्याने भाजपाला बाजूला थांबावे लागले. अशाही परिस्थितीत करण पाटील यांनी हार न मानता आपला केंद्रबिंदू भाजपा कायम ठेवल्याने आपली वाटचाल आजही सुरुच ठेवली असून गत काळातील विकास कामाच्या जोरावर भविष्यातील राजकीय आखाडा लढविण्याचा जोरदार प्रयत्न स्पष्ट दिसत आहे. येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीत तगडे आव्हान उभे ठाकेल त्यात शिवसेना-राष्ट्रवादी वेग-वेगळे उमेदवार देऊन दमछाक करण्याचा प्रयत्न होईल ही बाब नाकारता येत नाही तरी देखील करण पाटील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी ठेवून असल्याचे म्हटले जाते. मुरब्बी राजकारणी कै.आ.भास्करराव आप्पांच्या तालमीत लहानाचा मोठा झालेला करण पाटील राजकारणाच्या खाचा-खोचा पाहून यशोशिखराकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करेल, असे म्हटले जाते. राजकीय वारसा व माजी जि.प.सदस्य बाळासाहेब भास्करराव पाटील यांचे सुपूत्र करण पाटीलचा राजकीय प्रवास आज तरी जोरदार मुसंडी घेत सुरू आहे. भविष्यात भविष्य काय बदल करते की ‘राजयोग’ बलवान करते हे येणारा काळच ठरवेल!

राजकीय वारसा नसतांना राजकीय पदे

पारोळा तालुक्यातील वसंतनगर शिरसोदे गट व शेळावे बु॥ म्हसवे गटातून जिल्हा परिषद गटात जि.प.सदस्य म्हणून निवडून आलेल्या अनुक्रमे दळवेल येथील सरपंच रोहिदास पाटील यांच्या पत्नी सौ.रत्नाबाई रोहिदास पाटील यांना फार मोठा राजकीय वारसा नसतांना सौ.रत्नाबाई पाटील ह्या भरघोस मतांनी विजयी झाल्यात. तर शेळावे बु॥-म्हसवे गटातून कुठलाही राजकीय वारसा नसतांना हिम्मत वामन पाटील म्हसवे हे देखील मताधिक्याने निवडून आलेत. सौ.रत्नाबाई रोहिदास पाटील ह्या शिवसेनेच्या उमेदवार होत्या, तर हिम्मत वामन पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. या उमेदवारांनी आपल्या पक्ष नेत्यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढविली व ते विजयी देखील झालेत.

कोरोनाच्या काळातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका कोरोनाची परिस्थिती सावरताच तालुक्यातील 58 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात. या निवडणुकीत 188 प्रभागात 506 ग्रा.पं.सदस्य निवडून द्यायचे असून यासाठी 15 जानेवारीला मतदान तर 18 ला मतमोजणी होऊन 23 ला निकाल जाहिर होणार असल्याने तालुक्यातील राजकारण तापू लागले आहे. यात तालुक्याचे दोन भाग झाल्याने कांही ग्रामपंचायती अमळनेर तालुक्यात येतात त्या अशा सुमठाणे, हिरापूर, भोकरबारी, बोदर्डे-वंजारी खु॥, भिलाली, इंधवे, भोलाणे, शिरसोदे, रत्नापिंप्री, शेवगे बु॥, शेळावे बु॥, शेळावे खु॥, वसंतनगर, अंबापिंप्री, महाळपूर, दळवेल, बहादरपूर, जिराळी, पिंपळकोठा, चिखलोद बु॥, कोळपिंप्री तर एरंडोल विधानसभा मतदार संघातील पारोळा तालुक्यातून विचखेडे, टेहू, चोरवड, पळासखेडे बु॥, तरवाडे खु॥, मुंदाणे प्र.उ., टोळी, मुंदाणे प्र.अ., देवगाव, तामसवाडी, करंजी, मंगरूळ, नगाव, हनुमंतखेडे, जोगलखेडे, आडगाव, सावरखेडे, पिंप्री प्र.उ., ढोली, वेल्हाणे खु॥, मोरफळ, टिटवी, वसंतवाडी, शिरसमणी, रताळे, सांगवी, बोळे, उंदीरखेडे, विटनेर, सारवे बु॥, बाभळे नाग, बाहुटे, पळासखेडे सीम, तरडी, शिवरे दिगर, करमाड खु॥, करमाड बु॥ या गावांचा समावेश असून सर्व ग्रामपंचायतींना पक्षीय राजकारणाचा वेढा आहेच. यात शिवसेना-राष्ट्रवादीची ताकद पणाला लागेल. काँग्रेस व भाजपाचा कस लावण्याचा प्रयत्न असला तरी यात राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यातच खरी लढत दिसून येईल. महाविकास आघाडीची मात्रा येथे चालणार नसून तालुकास्तरीय राजकारणात अग्रेसर असलेल्या व मातब्बर नेत्यांच्या पक्षांचीच लढत या तालुक्यात रंगणार असून विद्यमान आमदार चिमणराव आबा व माजी आमदार डॉ.सतिश अण्णा पाटील हे आपले वर्चस्व सिध्द करण्यास कंबर कसतील अशाच ह्या निवडणुका असतील तर अमळनेर विधासभा मतदारसंघात गेलेल्या ग्रामपंचायतीवर विद्यमान आमदार अनिल पाटील व माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील काय करामती करून दाखवतील की त्यांना माजी आ.शिरिषदादा चौधरी आपला डाव टाकत धोबीपछाड देतील हे सांगता येत नसले तरी शिरीषदादा चौधरींचा दोन आमदारांशी करिष्मा दाखविण्याची व आपले वर्चस्व सिध्द करण्याची जबाबदारी येऊन ठेपली आहे. यात एरंडोल विधानसभा क्षेत्रातील पारोळा तालुक्याच्या ग्रामपंचायतींना आ.चिमणराव आबांनी ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडणुका करून कोरोना काळात संसर्ग वाढू नये, प्रशासनावर ताण येऊ नये, निवडणूक खर्चात बचत होऊन गावात एकोपा रहावा यासाठी बिनविरोध निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींना स्थानिक आमदार निधीतून 21 लाखांचा निधी देण्याचा निर्णय घेतल्याने अशा ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी फायदाच होणार असल्याने आ.चिमणराव आबांनी घेतलेला हा निर्णय स्वागतार्हच आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या