Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedआयएसआय पुन्हा सक्रिय; भारत काय करणार?

आयएसआय पुन्हा सक्रिय; भारत काय करणार?

डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक

पाकिस्तान सरकारकडून, लष्कराकडून होणार्‍या अन्यायांना वाचा फोडणार्‍या, पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार्‍या, बीबीसीने जगातील सर्वांत प्रभावशाली 100 महिलांच्या यादीत स्थान दिलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी पाठवून बलुचांच्या प्रश्नाबाबत मदतीचे आवाहन करणार्‍या करीमा बलुच यांचा कॅनडामध्ये रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

गेल्या15 वर्षांमध्ये 5500 बलुच नागरीक रहस्यमयरित्या बेपत्ता झाले आहेत. मध्यंतरी एका बलुच पत्रकाराचाही असाच मृतदेह आढळला होता. या सर्वांमागे आयएसआयचे सुनियोजित षड्यंत्र असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भारतानेही आता बलुच प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयकरण करुन पाकिस्तानला नामोहरम केले पाहिजे.

पाकिस्तानच्या क्रूर राजकारणाने त्यांच्या दबावशाहीविरुद्ध आवाज उठवणार्‍या आणखी एका कार्यकर्त्याचा बळी घेतला आहे. करीमा बलुच या कार्यकर्ता तरुणीचं नाव आहे. करीमा ही अशी तरुणी आहे जिचा समावेश जगातील सर्वांत प्रभावी 100 महिलांमध्ये केला होता. तिने पाकिस्तानला अक्षरशः घाम फोडला होता. या तरुणीने पाकिस्तानचा खरा चेहरा जगापुढे उघडा केला होता. पाकिस्तान आपण दहशतवादाला बळी पडलेला देश आहोत, आपल्या देशात लोकशाही सुव्यवस्थितपणाने नांदते आहे, आपल्या देशात स्थैर्य आहे असे भासवून जगाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असला तरी या पाकिस्तानचे खरे रुप काय आहे, किंबहुना ते किती क्रूर आहे हे जगापुढे आणण्याचा प्रयत्न या तरुणीने केला होता.

पाकिस्तान हा संपूर्ण जगभरात धार्मिक मूलतत्त्ववाद कसा पसरवतो आहे, दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन जगभरात दहशतवाद पसरवणारी फॅक्टरी कसा बनला आहे, पाकिस्तानात अल्पसंख्यांकांचा अमानुष छळ कसा चालला आहे, इस्लामिक रिपब्लिक म्हणवून घेणार्‍या या देशात कसा अनागोंदी कारभार सुरु आहे हे सर्व वास्तवचित्र 32 वर्षीय करीमाने जगापुढे आणले होते. बलुचिस्तानचे भविष्यातील नेतृत्त्व म्हणून पाहिले जाणार्‍या या करीमाचा नुकताच अत्यंत रहस्यमय पद्धतीने गूढ मृत्यू झाला आहे. कॅनडामधील टोरंटो येथील एका तलावाजवळ तिचा मृतदेह आढळून आला. तत्पूर्वी दोन दिवसांपासून ती बेपत्ता झाली होती. असे असूनही तिचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे दाखवण्यात येत असले तरी यामागे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचे षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण करीमा ही पाकिस्तानसाठी अत्यंत जड झालेली होती. त्यामुळे तिला अत्यंत क्रूर पद्धतीने आणि सुनियोजित कट करुन संपवण्यात आले आहे.

पाकिस्तानातील याच धार्मिक मूलतत्त्ववादाने आणि कपटी राजकारणाने यापूर्वी बेनझीर भुत्तोंचा बळी घेतला होता. मलाला युसुफजाईवरही अशाच प्रकारे जीवघेणा हल्ला झालेला होता. तशाच प्रकारे आता करीमाच्या रुपाने एका प्रभावी महिलेला जग मुकले आहे.

करीमा बलुच ही बलुचिस्तानमधील तरुणी. लहानपणापासून तिने बलुच लोकांवर पाकिस्तानात कसा अन्याय-अत्याचार होतो आहे हे पाहिले होते. खनिज संपत्तीने समृद्ध असणार्‍या बलुच प्रांताचे वर्षानुवर्षांपासून पाकिस्तानकडून कमालीचे शोषण केले जात आहे. त्याबदल्यात बलुच लोकांना केवळ बेरोजगारी आणि गरीबीच दिली गेली आहे. पाकिस्तानात प्रादेशिक असमतोल अत्यंत टोकाला पोहोचला आहे. बलुचिस्तानमुळेच पाकिस्तानातील पंजाब व उर्वरित पाकिस्तान समृद्ध बनलेला असूनही बलुच लोकांना त्यांचे न्यायहक्क दिले जात नाहीयेत.

विशेष म्हणजे ज्या-ज्या लोकांनी यासाठी मागणी केली आहे, त्या-त्या लोकांना अत्यंत पद्धतशीरपणे संपवले जात आहे. 2005 ते 2020 या 15 वर्षांमध्ये 5500 बलुच नागरीक रहस्यमयरित्या बेपत्ता झाले असून अद्यापही त्यांचा पत्ता लागलेला नाही. यामध्ये महिला, तरुण यांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या लष्कराने आणि तेथील गुप्तहेर संघटनेने या लोकांना संपवले आहे. याविरुद्ध कोणीही आवाज उठवायला तयार नव्हते. करीमा बलुच या तरुणीने याविरुद्ध पहिल्यांदा आवाज उठवला.

पण त्याची किंमत तिला प्राण देऊन चुकवावी लागली आहे. 2015 मध्ये करीमा बलुच यांना पाकिस्तान सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी कॅनडामध्ये राजाश्रय घेतला होता. तिथे बलुच स्टुडंट ऑर्गनायजेशनच्या प्रमुख बनल्या. त्यापूर्वी हैदर बलुच नामक व्यक्ती या ऑर्गनायजेशनची प्रमुख होते; पण तेदेखील कोठे गायब झाले याचा आजवर ठावठिकाणा लागलेला नाही. त्यांना देखील पाकिस्तानकडून संपवण्यात आले असण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्यानंतर करीमा यांच्याकडे या संघटनेचे नेतृत्त्व आले. गेल्या चार वर्षांपासून त्या या संघटनेच्या प्रमुख होत्या. या संघटनेला पाकिस्तानने बेकायदेशीर म्हणून घोषित केले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या विविध व्यासपीठांवर, विविध समित्यांमध्ये करीमा बलुच यांनी बलुच लोकांचे प्रतिनिधीत्त्व केले होते. इतकेच नव्हे तर या मंचांवर पाकिस्तानचा काळा चेहरा उघड केला. पाकिस्तानात धार्मिक मूलतत्त्ववाद कसा वाढतो आहे, आयएसआय आणि लष्कर, दहशतवादी संघटना, धार्मिक मूलतत्त्ववादी संघटना पाकिस्तानातील राजकारण कसे नियंत्रित करत आहेत याच्यावर त्यांनी प्रमुख प्रकाश टाकला होता. त्यांनी जगाला हे सांगितले की, पाकिस्तानवर वेळीच दबाव आणला नाही तर बलुच लोकांचे अस्तित्त्व संपून जाईल. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्या सहभागी झाल्या. या सर्वांतून बलुचींच्या दुःखांना वाचा फोडण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला.

यामुळे पाश्चिमात्य माध्यमांमध्ये त्या कमालीच्या लोकप्रिय बनल्या. जसजशी त्यांची लोकप्रियता वाढत गेली तसतसा पाकिस्तानचा काळा चेहरा जगापुढे येऊ लागल्याने पाकिस्ताननेच त्यांना संपवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. करीमा बलुच यांच्याविषयी आपण विचार का करायचा? याचे कारण करीमा बलुच यांचे भारताबरोबरचे नाते अत्यंत भावनिक स्वरुपाचे होते. याच करीमा यांनी बलुच लोकांचे भारताबरोबरचे भावनिक नाते विणण्यास सुरुवात केली. याच करीमा यांनी 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखीपौर्णिमेला राखी पाठवली होती आणि तिने त्यांना भावनिक आवाहन केले होते. ङ्गतुम्ही माझे मोठे बंधू आहात. मोठे भाऊ म्हणून आम्ही सर्व बलुच लोक तुमच्याकडे मुक्तीदाता म्हणून पहात आहोत. हजारो बलुच बेपत्ता होत आहेत, त्यांच्या हत्या होत आहेत. त्यामुळे तुम्ही या प्रश्नामध्ये लक्ष घालावेफ अशी विनंती त्यांनी केली होती. यातून त्यांनी भारताच्या नेतृत्त्वावर विश्वास दाखवला होता.

पंतप्रधान मोदी बलुच लोकांना न्याय मिळवून देऊ शकतील अशा प्रकारचे वातावरण करीमा यांनी तयार केले होते. कारण 2015 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून जे भाषण केले होते त्यामध्ये त्यांनी बलुच मुक्ती चळवळीविषयी काही महत्त्वपूर्ण विधाने केली होती. या माध्यमातून त्यांनी पाकिस्तानच्या मर्मावर बोट ठेवले होते. गिलगिट बाल्टिस्तान, सिंध, बलुच या पाकिस्तानसाठी अडचणीच्या ठरणार्‍या प्रश्नांना त्यांनी हात घातला होता. त्यामुळे बलुच लोक भारताकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून, मदतीच्या आशेने पाहू लागला. त्यामुळे करीमा बलुच यांचा उल्लेख भारताच्या बलुचविषयक धोरणाला दिशा देणारी व्यक्ती म्हणून करावा लागेल. कारण त्यानंतर बलुच लोकांचा प्रश्न नेमका काय आहे, पाकिस्तान कशा प्रकारे त्यांच्यावर अमानुष अत्याचार करत आहे हे भारतीयांना कळले.

गेल्या तीन-चार वर्षांत करीमा या जास्त प्रसिद्धीच्या झोतात आल्या. कारण आजवर केवळ पाकिस्तानच त्यांच्या मागावर होता; परंतु चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणारा चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडॉरचा मुख्य मार्ग बलुचिस्तानमधून जाणारा आहे. त्याच्या रक्षणासाठी मोठ्या संख्येने चीनी लष्करी अधिकारी बलुचिस्तानात आहेत. तेथे मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरु आहे. अशा स्थितीत बलुच लोकांचे मोठ्या प्रमाणावर शोषण होत आहे. त्यामुळे बलुच लोक आता चिनी अधिकार्‍यांवर हल्ले करु लागले आहेत. याविरुद्धही करीमा बलुच यांनी आवाज उठवला होता. या कॉरीडॉरमुळे बलुच लोकांचे शोषण कमालीचे वाढणार आहे, यावर त्यांनी बोट ठेवले होते. त्यामुळे चीनचाही त्यांच्यावर रोष होताच. या सर्व पार्श्वभूमीवर करीमा यांची सुपारी आयएसआयला दिली गेली असावी, असा तर्क बांधला जात आहे.

यापूर्वी साजिद हुसेन नामक एका तरुण पत्रकाराचीही अशाच प्रकारे हत्या झाली होती. त्यांनीही विविध व्यासपीठांवर करीमांप्रमाणेच बलुच लोकांचे प्रश्न मांडण्यास सुरुवात केली होती. तेही असेच बेपत्ता झाले आणि स्वीडनमध्ये त्यांचा मृतदेह सापडला होता. करीमा आणि साजिद यांच्या या गूढ मृत्यूंचा घटनाक्रम पाहिल्यास ती मोडस ऑपरेंडी आयएसआयची असल्याचे दिसते. कारण इतक्या सहजपणे एखाद्या मृत्यूला नैसर्गिक मृत्यू दाखवणे फार अवघड आहे. पण याचे नियोजन अत्यंत कौशल्याने केले आहे. त्यामुळेच टोरंटो पोलिसांनी या मृत्यूमागे घातपात नसून तो नैसर्गिक मृत्यू असल्याचे घोषित केले आहे. असे काम एखादी मोठे नेटवर्क असणारी गुप्तहेर संघटनाच करु शकते.

यातून काही बाबी पुढे येत आहेत. एक म्हणजे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय ही अशा प्रकारच्या घातपातांसाठी सक्रिय झालेली आहे. आयएसआयने आपले आंतरराष्ट्रीय नेटवर्क पुन्हा कार्यरत केले आहे. पाकिस्तान सध्या एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये आहे. फेब्रुवारीत या संघटनेची पुढील बैठक पार पडणार आहे. ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानला आपली प्रतिमा स्वच्छ करायची आहे. त्यामध्ये करीमा या अडथळा ठरत होत्या. त्यामुळेच त्यांना संपवण्यात आले. यातून एका उभरत्या कार्यकर्तीचा आवाज कायमचा दाबला गेला आहे. असे असले तरी बलुच लोकांचा न्याय हक्कासाठीचा लढा पुढे सुरुच राहणार आहे. येणार्‍या काळात अशा अनेक करीमा पुढे येताना दिसतील. या सर्व पार्श्वभूमीवर भारताने बलुचिस्तानबाबतचे आपले धोरण बदलण्याची गरज आहे.

अजूनही आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारत गिलगिट बाल्टिस्तान किंवा बलुचचा उल्लेख करणे टाळत आहे. पण बलुचिस्तानच्या मुक्तीसंघर्षाला भारताने उघडपणाने पाठिंबा देण्याची गरज आहे. ज्या प्रकारे पाकिस्तान काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करुन भारताला बदनाम करत आहे, तशाच प्रकारे भारताने बलुच प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयकरण करुन पाकिस्तानला नामोहरम केलेे पाहिजे. करीमा बलुचसारख्या कार्यकर्त्यांचा जीव वाचवायचा असेल तर पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे पाश्चिमात्य जगाने आणि पाकिस्तानला मदत करणार्‍या देशांनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा. अन्यथा, भविष्यातही अशा अनेक करीम मारल्या जातील आणि पाकिस्तानची काळी कृत्ये तशीच सुरु राहतील !

- Advertisment -

ताज्या बातम्या