Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedअदृश्य पुरावे : सगळ्यात महाग नक्कल

अदृश्य पुरावे : सगळ्यात महाग नक्कल

परेश चिटणीस,  9225111320

1983 साली न्यूजवीक नियतकालिक आणि अब्जाधीश रुपर्ट मरढॉक यांच्यात चुरशीची लढत चालू होती. एका हस्तलिखिताच्या प्रकाशन अधिकारासाठी बोली लावणे चालू होते. रुपर्ट मरढॉक यांनी त्या हस्तलिखिताच्या जागतिक प्रकाशन अधिकारासाठी तीन दशलक्ष डॉलर्स एवढी रक्कम देण्याची ऑफर देऊ केली. न्यूजवीक नियतकालिक फक्त अमेरिकेत प्रकाशन अधिकार मागत होते. चढाओढीत शेवटी मरढॉक यांनी पावणेचार दशलक्ष डॉलर्समध्ये ते अधिकार घेतले. हे हस्तलिखित होते अडॉल्फ हिटलर यांच्या सत्तावीस डायर्‍या व आत्मचरित्र मियान कांफ याचा तिसरा भाग.

- Advertisement -

रुपर्ट मरढॉक हा वॉल स्ट्रीटचा आणि मीडिया जगताचा राजा म्हणून ओळखला जात होता. त्याने नाणे खणखणीत आहे की नाही हे तपासून नाही घेतले तरच नवल. त्याने ह्यूज ट्रेवोर रोपर या इतिहासतज्ञाला झुरीचमधून आणले आणि त्याला ते हस्तलिखित विकत घेण्यापूर्वी तपासायला सांगितले.हे हस्तलिखित विकण्यास काढणारी ग्रुनर अ‍ॅण्ड झार ही कंपनीदेखील नावाजलेली होती. या कंपनीने स्वतः हे हस्तलिखित दोन दशलक्ष डॉलर्सला विकत घेतले होते. त्यांच्या एक पत्रकार जेरेड हिडमन यांनी ते एका गोपनीय अज्ञात व्यक्तीकडून मिळवले होते. या अतिश्रीमंत गोपनीय व्यक्तीचा भाऊ सैन्यात जनरल होता आणि तो नाझी वस्तूंचा संग्रह करत असे.

ग्रुनर अ‍ॅण्ड झार कंपनीने त्याआधीही दोन तज्ञ व्यक्तींना हे हस्तलिखित तपासायला बोलावले होते. त्यातील एक वरिष्ठ फोरेन्सिक तज्ञ होते पण ते सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ होते. त्यांचा हस्ताक्षर व हस्तलिखित दस्तावेज यांच्याशी काही संबंध नव्हता. तरीही पोलीस दलातला गाढ अनुभव असल्याने त्यांच्या परीक्षणाला महत्त्व होते. दुसरे तज्ञ हे हस्तलिखित दस्तावेज या क्षेत्रात पारंगत होते. त्यांना हस्ताक्षर जुळवून पाहणे हे काही नवीन नव्हते. पण त्यांना जर्मन भाषा येत नव्हती. त्यांना फक्त हस्ताक्षराच्या वळणांवरून ओळखावे लागले की हे हस्ताक्षर हिटलरचे आहे की नाही. लिखाणाची शैली, व्याकरण, संदर्भ इत्यादी गोष्टी त्यांना कळू शकल्या नाही.

मुळात इथे एक मोठी तांत्रिक चूक झाली होती. ते दोघे हिटलरच्या ज्या हस्ताक्षराशी हे नवीन हस्तलिखित जुळवून पाहत होते तेही त्याच व्यक्तीकडून आधी विकत घेतले होते. दोन्हींचा स्त्रोत तोच असल्याने त्यांच्या परीक्षणात चुकण्यासारखे काही नव्हतेच. या दोघांनी ते हस्ताक्षर हिटलरचेच आहे असे ठामपणे सांगितल्याने बँटॅम व न्यूजवीक नियतकालिकांनी ते मोठ्या किमतीला घ्यायची तयारी दाखवली होती. मात्र ते अमेरिकेपुरता मर्यादित विचार करत होते. रुपर्ट मरढॉक मात्र जागतिक प्रकाशन अधिकार मागत होते.

मरढॉक यांनी बोलावलेल्या ह्यूज ट्रेवोर रोपर या तज्ञाला ते हिटलरचे हस्ताक्षर असण्याची शंका होती. त्याने हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक कागद बघितले होते. ग्रुनर अ‍ॅण्ड झार कंपनीचे तीन उच्च पदस्थ अधिकारी त्याला सगळी माहिती देत होते. त्याच्यावर प्रेशर निर्माण झाले होते. त्याला लेखन शैलीमध्ये तफावत वाटत होती. हस्ताक्षरात फरक जाणवत होता. इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट झालेली असताना हे हस्तलिखित हिटलरचे नाही ही शंकादेखील त्याला मांडायची हिंमत झाली नाही. ट्रेवोर रोपर हिटलरचे एवढे लिखाण एका जागी बघून तो गडबडला होता. त्यातील मजकुरात काही ठिकाणी घटनाक्रमात चुका जाणवत होत्या. शेवटी तो त्या अधिकार्‍यांच्या दबाव तंत्राला बळी पडला आणि त्याने ते हस्तलिखित हिटलरचे असल्याचे सांगितले. रुपर्ट मरढॉकने ट्रेवोर रोपरची प्रकट मुलाखत लंडनच्या संडे टाइम्स या त्याच्या मालकीच्या नियतकालिकात प्रसिद्ध केली. त्यात त्याने या हस्तलिखिताच्या खरेपणाची खात्री पूर्णपणे झाल्याचे जाहीर केले.

दरम्यान, ग्रुनर अ‍ॅण्ड झार कंपनीने स्थानिक पोलिसांनाही या दस्तावेजाबद्दल चौकशी करायला सांगितले होते. हे सर्व सुरू असताना पोलीस अधिकारी डॉक्टर वरनर यांना हे माहिती होते की या सगळ्या डायर्‍या व आत्मचरित्र खोटे आहेत. त्यांनी आपला स्वतंत्र तपास चालू केला होता. ग्रुनर अ‍ॅण्ड झार या कंपनीचा पत्रकार जेरेड हिडमन अचानक खूप आलिशान गाड्या वापरू लागला होता. त्याने काही घरे विकत घेतली होती. अचानक त्याचे राहणीमान उंचावले होते.

पण त्याकडे कुणाचे लक्ष नव्हते. हस्तलिखित पुरवणार्‍या गोपनीय व्यक्तीला दोन दशलक्ष डॉलर्स त्याच्यामार्फत देण्यात आले होते. त्यामुळे पोलीस अधिकारी डॉ. वरनर यांना कुठेतरी पाणी मुरतेय हे लक्षात आले. त्यांनी त्यांच्या तपासात हिटलरच्या हस्ताक्षराकडे लक्ष दिलेच नाही. त्यांनी कागदाचा अभ्यास केला. यूवी लाईटखाली सहा कागदांचे नमुने तपासले असता सगळ्यात ब्लँकोफोर नावाचे रासायन आढळले. हे रसायन हिटलरच्या काळात अस्तित्वात नव्हते. त्यांनी सर्व दस्तावेज पोलीस लॅबमध्ये पाठवले. त्यांना रिपोर्टमध्ये असे कळले की, तो कागद सुमार दर्जाचा होता. त्यात कोनिफेरस लाकूड व पानांचा लगदा वापरला होता आणि ब्लँकोफोर रसायनाने त्याला पांढरे करून जुना कागद असल्याचे भासवले होते. पुस्तकाच्या बाईंडिंगमध्येही ब्लँकोफोर आढळले. डायरीच्या शिवणीतले दोरे पॉलिस्टर व विसकोसने तयार झाले होते. हे सर्व पदार्थ दुसर्‍या महायुद्धाच्या नंतरच्या काळात वापरात आले होते. लिखाणासाठी वापरलेल्या चार प्रकारच्या शाईचे नमुने तपासले गेले. 1983 मध्ये क्लोराईड इवॅपोरेशन टेस्ट केल्यावर असे आढळले की 1943 मध्ये लिहिल्या गेलेल्या हिटलरच्या डायरीमधील शाई एक वर्षापेक्षा जुनी नाही.

पोलिसांनी आपले शोध जाहीर करताच एकच खळबळ उडाली. ट्रेवोर रोपर ज्याने हस्ताक्षर हिटलरचे असल्याचा दावा केला होता तो प्रकाशन थांबण्यासाठी धडपड करत होता. मोठी गुंतवणूक केली असल्याने रुपर्ट मरढॉकने कानावर हात ठेवले व खोटे तर खोटे आपण प्रकाशन करणाराच यावर तो ठाम होता. ग्रुनर अ‍ॅण्ड झार कंपनी ज्यांनी हे हस्तलिखित विकले होते ते या सगळ्याशी आपला काही संबंधच नाही असे वागत होते.

पत्रकार जेरेड हिडमनला मात्र जेलचे दरवाजे दिसू लागले होते. कारण सगळे पैसे त्या अज्ञात व्यक्तीच्या खात्यात न जाता त्याच्याच खात्यात जमा झाले होते. त्याला नाईलाजाने आपल्या अज्ञात स्त्रोताचे नाव जाहीर करावे लागले. त्याने त्या डायर्‍या कोणा श्रीमंत संकलकाकडून नाही तर एका चोरट्याकडून मिळवल्या होत्या. तो चोर होता 45 वर्षीय कोनार्ड कजाऊ. 1943 पासून तो कागदपत्रांच्या नकला बनवत होता. दुर्मिळ चित्र, नाझी कागदपत्र व शेवटी हिटलरच्या खोट्या डायर्‍या असा त्याच्या गुन्ह्यांचा आलेख वाढत गेला होता. 1985 मध्ये जेरेड हिडमनला ग्रुनर अ‍ॅण्ड झार कंपनीच्या पैशांची अफरातफर केल्याबद्दल चार वर्षे आठ महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. कोनार्ड कजाऊ याला खोटे दस्तावेज तयार करून खरे भासवल्याबद्दल चार वर्षे सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला.

तुरुंगातून सुटल्यावर कोनार्ड कजाऊ याने खोट्या पेंटिंग आणि दस्तावेज यांचे संग्रहालय उघडले. त्या सगळ्यावर तो स्वतः सही करू लागला. अनेक चित्रकारांच्या पेंटिंगच्या नकला त्याने तयार करून बघायला ठेवल्या. हिटलरच्या डायर्‍यांच्या खर्‍या नकला म्हणून त्या प्रसिद्ध झाल्या. बाजारात या वस्तूंना चांगला भाव मिळू लागला. 12 सप्टेंबर 2000 ला कजाऊचे निधन झाले तेव्हा बाजारात त्याने काढलेल्या डाली, वॅन गॉघ, रेंब्रांट, मोनेट या चित्रकारांच्या चित्रांच्या नकलांना खूप मागणी आली. तो त्यावर त्या चित्रकाराची तसेच स्वतःची सही करायचा. खोट्या चित्रांचे अधिकृत मार्केट त्याने निर्माण केले असे म्हणायला हरकत नाही.

2006 मध्ये कजाऊच्या लांबच्या नातेवाईक पेटरा कजाऊ हिला कोनार्ड कजाऊने काढलेल्या नकलांची खोटी नक्कल विकल्याच्या कारणावरून अटक झाली. तज्ञांच्या मते त्या नकला कोनार्ड कजाऊच्या दर्जाच्या नव्हत्या. तिने 68 दशलक्ष डॉलर्सला खर्‍या चित्राच्या खर्‍या नकलेची खोटी नक्कल खरी म्हणून विकली. ज्या अनधिकृत नकलांमुळे वीस दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले होते त्याच नकलांची अधिकृत किंमत पंधरा वर्षांत सत्तर दशलक्ष डॉलर्स झाली होती. प्रकाशन क्षेत्रात घडलेला हा फोर्जरीचा सगळ्यात मोठा घोटाळा होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या